नटसम्राट – एक प्रतिक्रिया

0
258

वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. प्रश्न असा आहे, की ते चित्रपटाचे परीक्षण करताना या नाटकाला काटेकोरपणे संदर्भचौकट म्हणून वापरतात- म्हणजे ते नाटकाचीच मोजपट्टी लावून चित्रपटाचे मूल्यमापन करतात आणि घोटाळा तेथेच होतो.

नाटक आणि चित्रपट या दृश्यात्मक कला असल्या तरी माध्यम म्हणून त्या भिन्न आहेत. कथानकाचा गाभा दोन्ही माध्यमांत सर्वसाधारण सारखा असला तरी तपशिलात फरक होणे अपरिहार्य आहे. नाटकामध्ये तपशील मांडताना त्याला स्थळकाळाच्या आणि वेळेच्या मर्यादा आहेत. चित्रपटामध्ये त्या मर्यादांना सहजपणे ओलांडता येते. नाटकामध्ये मोजके आणि व्यावहारिक मर्यादित तपशील मांडावे लागतात. चित्रपटात मात्र याबाबतीत दिग्दर्शकाला पुष्कळ स्वातंत्र्य आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटातील दृश्यात्मकतेमुळे सेकंदात जो तपशील प्रेक्षकांमध्ये पोचवता येतो, तो नाटकात त्यांच्यापर्यंत पोचण्यास खूप वेळ लागतो. कधी-कधी चित्रपटाएवढ्या सूक्ष्मतेने तपशील मांडणे शक्यही होत नाही. नाटकातील गणपतराव बेलवलकर हे अभिनेते म्हणून वेगळे आहेत व सामान्य माणूस म्हणूनही वेगळे आहेत. पण नाटकामध्ये, ते स्वतंत्रपणे दाखवता येणे शक्य नसते. चित्रपट माध्यमाने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून, पटकथाकार-दिग्दर्शकाने मूळ एकच असलेल्या व्यक्तिरेखेच्या दोन व्यक्तिरेखा करून त्या गणपतराव आणि रामभाऊ अशा स्वतंत्रपणे दाखवल्या आहेत. तरी ‘नटसम्राट’मधील नट म्हणून असलेल्या गणपतरावांच्या व्यक्तिमत्त्वाला किंचितही गालबोट न लावता, ज्या त्यांच्यातील सामान्य माणसाच्या गुण-दोषांतून त्यांची शोकांतिका झाली आहे, त्या सामान्य माणसाचे हिडीस आणि केविलवाणे स्वरूप थेटपणे दाखवणे शक्य झाले आहे.

संजय मेणसे हे वाचक मात्र त्यांच्या परीक्षणात या वेगळ्या काढलेल्या अभिनेत्यालाच गृहीत धरून गणपतरावांमधील स्खलनशील सामान्य माणसाचे मूल्यमापन करतात. मूळ नाटकामध्ये गणपतरावांची शोकांतिका दाखवताना आजुबाजूची पात्रे नकळतपणे आणि अपरिहार्यपणे खलनायकत्वाच्या परिघात ढकलली जातात. त्या पार्श्वभूमीवर मग विठोबा आणि राजासारखी पात्रे गणपतरावांना जी सहानुभूती दाखवतात, त्यामुळे ते अकारण उंच झाल्यासारखे भासतात. खरे तर, गणपतरावांतील तो अहंकारी आणि हुकूमशाही मानसिकतेचा सामान्य माणूस आजुबाजूच्या सरळसोट जगू पाहणाऱ्या माणसांच्या सामान्य जीवनगतीलाही किती त्रासदायक ठरू शकतो हे नाटकात बाहेरचे तपशील मांडता येत नसल्याने शक्य झाले नाही. चित्रपटामध्ये मात्र त्या माध्यमाच्या अंगभूत सामर्थ्यामुळे ते शक्य झाले आहे. त्यामुळे मूळ नाटकात गणपतराव त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची सहानुभूती राखून ठेवू शकतो. ती चित्रपटात उरत नाही. कारण गणपतरावांच्या त्या अहंकारी सामान्य माणसामुळे बाकीच्यांनाही किती त्रास होतो हे सर्वसामान्य प्रेक्षकांना दिसत असतेच.

शिरवाडकर यांनी मूळ नाटकामध्ये एका उंचीवर असलेल्या माणसाचे स्खलन दाखवण्याचे असल्यामुळे, त्यांनी बेतलेले आणि नंतर त्याच्या झालेल्या शोकांतिकेमुळे चुकीचे निर्णय यावरच फोकस ठेवला आहे. पण मानवी स्वभावदोषांमुळेच व्यक्तीचा ऱ्हास वा उन्नती होते हे संजय मेणसे यांनी शेक्सपीयरचे उद्‌धृत केलेले तत्त्व मात्र उजागर होत नाही. नाटकामध्ये तशी गरजही राहत नाही, पण चित्रपटाचा कॅनव्हास मोठा असल्याने तो सिद्धांत प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी तपशिलात अनेक बदल करावे लागले, अनेक नव्या पात्रांची योजना करावी लागली हेही समजून घेण्यास हवे. रामभाऊ, कुमुद, सिद्धार्थ यांसारखी नवी पात्रे त्याच भूमिकेतून चित्रपटात आली आहेत आणि ते स्वातंत्र्य पटकथाकार व दिग्दर्शक यांना निश्चितच आहे. मेणसे यांनी त्यांच्या परीक्षणात्मक लेखनात मध्यम वर्ग आणि आर्थिक-सामाजिक परिस्थिती या अंगाने त्या चित्रपटाचे आणखी थोडे विश्लेषण केले आहे. ते योग्य आहे. खरे तर, त्यांनी चित्रपटाचे विश्लेषण त्याच दृष्टिकोनातून केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते.

उच्चवर्णीय मध्यमवर्ग 1960-70 च्या दशकात एकमेव होता. त्याची मूल्यव्यवस्था हीच संपूर्ण समाजाची सांस्कृतिक मूल्यव्यवस्था आहे या भ्रमात आपले सांस्कृतिक विश्वावरील वर्चस्व ठेवण्यासाठी नाटक या तथाकथित अभिजात कलेचा वापर करत होता. त्या वेळीही चित्रपट कलामाध्यम म्हणून पुढे येत होते, पण तो बहुजन कष्टकरी वर्गाचा स्वत:चा करमणुकीचा भाग होता. त्याच बहुजन कष्टकरी वर्गातून आताचा नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे, पण नाटकापेक्षा त्याच्यावर चित्रपटमाध्यमाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे त्या काळातील उच्चवर्णीय मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेचे वहन करणाऱ्या नाटकांचे चित्रपटमाध्यमातून सादरीकरण चालू झाले आहे. ‘काकस्पर्श’, ‘कट्यार काळजात घुसली’ हे चित्रपट व ‘उंच माझा झोका’ यांसारख्या दूरदर्शनमालिका हा त्याचाच परिणाम आहे.

मेणसे यांनी काळी टोपी किंवा सिद्धार्थसारख्यांचा लूक यांचा संबंध हिंदुत्ववादी परिवाराशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आजची परिस्थिती पाहता, त्यांच्या संशयाला जागा आहे. परंतु त्या काळातील सगळ्या मध्यमवर्गाचा पोषाख, काळी टोपी व काळ्या कोटाचा होता. नाटक पाहण्यास आसुसलेला राजा आणि नाटक हे एक तत्त्व समजून घेण्यास आसुसलेला सिद्धार्थ हेही समजून घेण्यास हवेत.

नव्या व्यवस्थेमध्ये सिद्धार्थसारखी मुले वेगवेगळ्या माध्यमांतून समाज समजून घेण्यासाठी विलक्षण तळमळीने धडपडत आहेत. सिद्धार्थचा लुक असलेली ती सगळी तरुण मुले त्यांच्या अवतीभोवती आपल्याला दिसत आहेत. राजाच्या नाटक पाहण्याच्या ओढीपेक्षा सिद्धार्थच्या नाटक समजून घेण्याच्या तळमळीकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास हवे. त्यासाठी त्याला विनाकारण गोळवलकरगुरुजी ठरवणे योग्य नाही.

एकदा रामभाऊ-गणपतराव या दोन व्यक्तिरेखा एकाच माणसातील आहेत हे समजून घेतले, की नानाने स्वीकारलेल्या अभिनयाचा बाज नीट आकळू लागतो. एकसुरी अभिनय कधीच लोकप्रिय नसतो. नानाबद्दल अनेक गैरसमज असतील, पण तो त्याच्या अभिनयाला नाव ठेवण्याइतका नक्कीच सामान्य नाही. महाराष्ट्रात कलाकृतीचा- विशेषत: नाटक-सिनेमाचा गंभीरपणे विचार करणारा प्रेक्षकवर्ग निर्माण होऊ लागला आहे हे ‘नटसम्राट’वरील लोकांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले.

– राजा शिरगुप्पे

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here