‘दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी’ ही आरती चुकीच्या पद्धतीने अनेकदा म्हटली जाते, कारण त्या रचनेचा अर्थ माहीत नसतो, त्यामागील संकल्पना माहिती नसते. त्या आरतीमध्ये कवीने मांडलेला विचार मुळातून समजून घेण्यासारखा आहे.
महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी ती आरती आहे. तेलंगणातील नरहर मालुकवी यांची ती रचना आहे.
ती देवी जिच्याशिवाय या संसारसागरातून तरणे कठीण आहे अशी आहे. त्रिभुवनी म्हणजे तीन भुवनांत आणि भुवनी म्हणजे जगात तिच्याशिवाय श्रेष्ठ कोणी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही म्हणजे तिचे गुणगान गाऊन चार वेद थकले आहेत; साही विवाद करता पडले प्रवाही म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंदस् आणि ज्योतिष ही सहा वेदांगेही थकली आहेत. चार वेद आणि सहा वेदांगे मिळून दशग्रंथ होतात. त्यांचा अभ्यास पूर्ण केलेल्या व्यक्तीला ‘दशग्रंथी ब्राह्मण’ म्हणतात. ते दहाही ग्रंथ थकले पण देवी, तुझा अपार महिमा गाऊन संपत नाही असे गुणवर्णन कवीने त्या आरतीत देवीचे केले आहे.
नवनाथ भक्तिसार या ग्रंथास दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या ग्रंथाचे कर्ते भक्त नरहर मालुकवी हे होत. नरहर मालू हे बासरचे राहणारे होते. बासरी हे गाव मनमाड-हैदराबाद रेल्वे मार्गावर स्थानक आहे. ते नांदेड-तेलंगणा सीमेवर गोदावरी काठी वसले आहे. यात्रेकरूंची वर्दळ सरस्वतीच्या दर्शनार्थ त्या ठिकाणी असते. तो भाग पूर्वी महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात समाविष्ट होता; परंतु 1956 च्या प्रांतरचनेत आंध्रच्या आदिलाबादेत गेला !
नरहर मालू यांच्या बालपणाबाबत अफाट कथा आहेत. ते उनाडक्या करत. त्यांना एक कानफाट्या जोगी एकदा भेटला. त्याने त्याच्याबरोबर नरहर मालू यांना नेले. त्याने नरहर मालू यांना नाथ परंपरेचे महात्म्य व नाथांची चरित्रे ऐकवली. जोग्याने त्याच्या जवळील त्यासंबंधीचे साहित्यही मालू यांना दाखवले. त्यावरून मालू यांना ते जोगी चमत्कारी व साक्षात्कारी वाटले. नरहर यांनी प्रभावित होऊन जोग्याच्या सांगण्याप्रमाणे बासर येथील सरस्वतीजवळ तपश्चर्या आरंभली. त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांना गोरक्षनाथ स्वत:च जोगीरूपाने भेटले. त्यांच्याकडून मालुकवी यांना मराठीत नवनाथ चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. म्हणून त्यांनी सरस्वतीनजीकच्या डोंगराच्या गुहेत बसून ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथाची रचना केली ! ते स्वतः ‘शारदा बोले लेखणी देवून वर्णिवेली सकळ ज्ञान’ असे म्हणतात. त्यांनी ‘नवनाथ भक्तिसार’ हा ग्रंथ ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शके 1741 (1819) मध्ये लिहून पूर्ण केला. त्यांनी तो ग्रंथ ज्या गुहेत बसून लिहिला ती गुहा ‘मालूची गुहा’ म्हणून ओळखतात.
नरहर मालू यांचे ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथाशिवाय ‘मालुतारण’ व ‘भक्तिकथासार’ हे दोन ग्रंथही प्रसिद्ध आहेत. त्यांनी रचना केलेली पदे, भजने व आरत्यादेखील मिळतात. कंदूकर्ती मठ (जिल्हा निजामाबाद) येथे त्यांचे एक पद तेलुगू भाषेतील नित्य भजनात म्हणतात. तसेच, ‘दुर्गेदुर्गटभारी… नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा’ ही तेथील महाकालीसाठी रचलेली आरतीदेखील महाराष्ट्रभर लोकांच्या मुखात आहे. नरहर मालू हे, मूळ तेलगू भक्तपरंपरेप्रमाणे हरिहरेश्वराची पूजा करत असत. पुढे त्यांना जोगी गोसाव्याने श्रीचक्र पूजण्यास दिले. परंतु पुढे, तेदेखील सर्व मराठी संत भागवत धर्माच्या पताकेखाली गोळा झाल्याने पंढरीचे भक्त झाले.
नरहर मालू हे वेदांतनिष्ठ होते. त्यांच्यासंबंधी दंतकथा प्रसिद्ध आहे – नागपूरचे अच्युतसाई बासरला आले. ते फिरत फिरत, नरहर मालू यांच्या घरी आले. त्यांनी सवाल टाकला, ‘कटोरा भर दो’ ! तेव्हा मालूने कितीही धान्य टाकले तरी कटोरा काही भरेना. मग नरहर मालू यांनी तो रिकामा कटोरा पाहून अच्युतसार्इंना म्हटले, “’सर्व जग व्यापूनही जो दशांगुळे उरला, त्यास कटोरा भर देने का सवाल क्या?” तेवढे बोलून होताच अच्युतसाई आनंदून चिदानंदी मग्न झाले, क्षणात त्यांची समाधी लागली. त्यांना खरोखरीची भिक्षा मिळाल्याचे समाधान झाले.
मालू घराणे बासर गावात वंशपरंपरेने चालू आहे. त्यांची वंशावळ पुढीलप्रमाणे आहे : धुंडीराज मालू – नरहर मालू – माणिक – 1. नाना गोसावी, 2. कृष्णा गोसावी .
- नाना गोसावी, विठ्ठल, अनंत नरहर , नागोराव – शंकरराव (पटवारी) – नागेश, शशिकांत, शशिरेखा.
- कृष्णा गोसावी – गोविंद (दत्तक गेले) – राजाबाई
त्यांचे आडनाव महागोसावीवार (तेलुगूमध्ये ‘कर’ला वार म्हणतात). महागोसाईवार घराणे नवनाथ परंपरेतील म्हणून प्रसिद्ध आहे. त्यासाठी त्यांना काही जमिनी इनाम म्हणून मिळालेल्या आहेत. त्यांची सातवी-आठवी पिढी हयात आहे. त्यांचे गुरू चिन्मय मालू, नरहर मालू व मणिमय मालू (माणिक) या वंशजांच्या तीन समाधी गोदाकाठावर आहेत. त्यांच्या घरी गोपाळकाला कार्तिक पौर्णिमेस होतो. ते तो आरतीसह मिरवत गावकऱ्यांना घेऊन समाधी स्थळी पूजनास जातात. त्यांच्या देवघरात हरिहरेश्वराची मोठी मूर्ती आहे. तसेच, अर्धे अंग तांब्याचे व अर्धे अंग पितळेचे अशी शिवविष्णूची मूर्तीसुद्धा आहे. त्याशिवाय श्रीचक्र ज्याला त्यांनी इंगळादेवी (हिंगलाजमाता-अग्निज्वालारूपी) असे म्हटले आहे, ती पण आहे. तेथील एक विद्वान शेषबुवा हरिदास यांनी सांगितले, की श्रीचक्र दोन प्रकारची असतात, एक भूपृष्ठीय तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले व दुसरे डोंगर शिखरासारखे उंचवटे निर्मित मेरूपृष्ठयंत्र. नरहर मालू यांच्या घरी तेच यंत्र आहे. त्यांच्या घरी हरिहरेश्वर, इंगळादेवी (हिंगलाज) व विठ्ठल-रुक्मिणी यांची पूजाअर्चा नित्यनेमाने चालत आलेली आहे. हिंगलाज मातेचे स्थान नवनाथ परंपरेत अनन्यसाधारण आहे.
त्यांचा एक मठही तेथून जवळच म्हैसाप परिसरात सुधा नदीकाठी वाळकी गावी आहे. ‘साधू विलास’कर्ते मालू यांच्या पोथीवरून पाहता नरहर मालू यांचे पूर्वज विजापूर राज्यात हुद्देदार होते (बासरगाव काही वेळ बहामनी राज्यात, तर काही वेळ विजापूर राज्यात होते असा उल्लेख गुरुचरित्रात आहे). मालू आडनावाची मंडळी राजस्थान-मारवाड या प्रदेशातही आढळून येतात. नरहर मालू यांनी नेवाशामध्ये गोपाळ या नावाने अवतार धारण करून मुक्तेश्वराचे महाभारत पूर्ण केल्याची कथाही प्रसिद्ध आहे. (संदर्भ : नवनाथ भक्तिसार ग्रंथ, सुट्या पानांची पोथी)
– एस.के. जोगी pspremsagar@reddiffmail.com
(मूळ प्रसिद्धी- मराठी संशोधन पत्रिका, जुलै-सप्टेंबर 2019. संस्कारित व संशोधित)
———————————————————————————————————————————–
श्री नरहर मालुकवी यांच्या बद्दल चांगली माहिती मिळाली.
दुर्गे दुर्घट भारी ही देवीची आरती करणारे ‘नरहर’ हे कोण ह्याचाही उलगडा झाला.
धन्यवाद