नमन-खेळे : श्रद्धा व नाट्य यांचे मिश्रण (Naman-Khele – Folk art that combines Devotion with Drama)

0
236

नमन-खेळे हा एक कोकणातील लोकनाट्य प्रकार आहे. नमन-खेळे यातील नमन या शब्दाचा अर्थ देवाला नमस्कार करणे, देवापुढे नम्र होणे, देवापुढे वाकणे, लवणे हा आहे. खेळे म्हणजे आराध्य देवतांची भक्ती करताना शक्ती, नृत्यक्रीडा व नाट्य यांचा समन्वय साधून सादर केलेला लोकनाट्यप्रकार. नमन-खेळेच्या आरंभी बारा नमने असतात. देव-देवता, ग्रामदेवता, धरतरी (धरित्री) माता, चंद्र-सूर्य, पाच पांडव, सप्तऋषी, सप्तसागर, गुरुस्वामी, दहाखंडकाशी रावण व प्रेक्षक यांना नमन केले जाते. या नमनांमध्ये विविधता आहे. उदाहरणार्थ,

अहो, पहिले नमन | गणपती देवाला |
अहो, दुसरे नमन | धरतरी मातेला |
अहो, तिसरे नमन | गावीच्या देवाला हो, सांबा हो देवाला |
अहो, चवथे नमन | चौतीच्या चंद्राला, हो चांद हो सूर्याला |
अहो, पाचवे नमन | पाचिवे पांडवाला |
अहो, सहावे नमन | गुरु हो स्वामीला |
अहो, सातवे नमन | सप्त हो ऋषीला |
अहो, आठवे नमन | अष्ट हो भैरवाला, कृष्ण हो देवाला |
अहो, नववे नमन | नऊ हो खंडाला |
अहो, दहावे नमन | दशा हो रावणाला |
अहो, अकरावे नमन | मारुद्र (महारुद्र) हनुमंताला |
अहो, बारावे नमन | मंडपी दिव्याला, बैसल्या सभेला |

ठिकठिकाणी होणाऱ्या खेळ्यांमधील नमनात पंचक्रोशीतील गावाप्रमाणे देव-देवता बदललेल्या असतात.

नमन-खेळेच्या सादरीकरणाच्या वेळी खेळे (म्हणजे खेळ करणारे गडी वा भिडू) रंगमंचावर एका रांगेत उभे राहून बारा नमने नाचत म्हणतात. त्याच वेळी संकासूर, कोळीण अशी सोंगे नाचत असतात; म्हणजे एक प्रकारे खेळ्यांचे व सोंगांचे नाट्य सादर होत असते. सोंगे खेळ्यांच्या समोर खेळ सादर करतात.

नमन-खेळेत प्रारंभापासून समारोपापर्यंत म्हणजे सुरुवातीच्या बारा नमनांपासून शेवटच्या आरतीपर्यंत या नृत्यनाट्यक्रीडेला महत्त्व असते. त्यामुळे भक्ती आणि नाट्यकला यांचा संगम म्हणून हा लोककलाप्रकार ‘नमन-खेळे’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

लोकनाट्याचे वेगवेगळे प्रकार कोकणात साजरे केले जातात. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार, फाग, चित्रकथी; रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे, शक्ती-तुरा, शिमगा खेळ, चित्रकथी, मादळ, बोहाडा, जाखडी नृत्य, कलगी-तुरा असे लोकनाट्यप्रकार अस्तित्वात आहेत. ग्रामदेवता, गावाच्या शीवेवरच्या देवता यांची पूजा आणि सार्वजनिक सत्यनारायण महापूजा, लग्न, गृहप्रवेश, नामकरण समारंभ अशा निमित्ताने हे प्रसंग घडतात. ही लोकनाट्ये मनोरंजनासाठी सादर होतात.

या लोककला कोकणाच्या स्वत्वाची एक खूणच आहे. विविध जातिजमातींनी त्यांचा पारंपरिक वारसा म्हणून ह्या कलाप्रकारांचे जतन व संवर्धन केलेले दिसून येते. नमन-खेळे हा लोकनाट्यप्रकार कुणबी समाजाने जोपासलेला आहे. कुणबी समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अंगांनी जी जडणघडण झाली तिचा संबंध या लोकनाट्याशी आहे. हा लोकनाट्य प्रकार उत्तर रत्नागिरी पट्ट्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर या तालुक्यांमध्ये आढळतो. त्या तालुक्यांमध्ये अनेक नमन मंडळे आहेत. कोकणात फाल्गुन महिन्यात होळीच्या सणापासून नमन-खेळेच्या सादरीकरणाला आरंभ होतो. कोकणाच्या विविध भागांमध्ये फिरतीचे नमन-खेळे, वस्तीचे नमन-खेळे, होळी खेळवणे, फागनाट्य यांसारखे प्रकार सादर होतात. नमन-खेळेच्या निर्मिती संबंधी अभ्यासकांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. नमन-खेळे पेशवाई काळापासून होत असावेत. खेळण्यांच्या गीतांत राघोबादादांच्या नावाचा उल्लेख आढळतो. श्यामजी नाईक-काळे यांनी कर्नाटकातून जो लोककलाप्रकार सन 1728 साली आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला व नमन-खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले.

नमन-खेळेत प्रथम गणपती आला, मग इतर सोंगे व गौळणी यांची कल्पना पुढे आली. मथुरेला दही-दूध घेऊन जाणाऱ्या गौळणी व त्यांना प्रतिबंध करणारे श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आले. कंसाकडून गोपगोपिकांचा होणारा छळ थांबवण्याकरता कृष्ण अवतार, कंस-कृष्ण युद्धे अशा गोष्टींची भर पडत गेली. असा नमन-खेळे प्रकार विकसित होत गेला.  

नमनात बारा तत्त्वे मानली गेली आहेत. नवखंड पृथ्वीमध्ये पुरुषखंड, भारतखंड, केतूमालखंड, हिरण्यमयखंड, कुरुखंड, रमणखंड, भाद्राश्वखंड, इलावृत्तखंड, हरिवर्षखंड समाविष्ट आहेत. रावण, हनुमंत व सभामंडपातील सहभागी प्रेक्षक, दिपे इत्यादी मिळून बारा नमने गायली जातात.

विधिनाट्यामध्ये देवतेच्या साक्षात संचाराला महत्त्व असते. त्यामुळे विधिरिंगणामध्ये/कलारिंगणामध्ये पूजनीय देवतांचा संचार व्हावा म्हणून त्यांची स्तवनगीते गायली जातात.

वार वार खचलं, सुरवार खचलं |
तो गणा नमिला, पाहिले बा |
अहो, शेंदूराची उठी |
अहो, नाच रे रंगाड्या रंगामध्ये |

या गणेशस्तवनानंतर साक्षात गणेशाचे म्हणजे गणेश-वेषधारी नटाचे मंडपामध्ये आगमन होते. त्यास साक्षात गणेश मानून त्याचे गंध, पुष्प, फल, तोय अशा पूजाद्रव्यांनी पूर्वार्धामध्ये पूजन केले जाते.

पूर्वार्धामध्ये गणपती, सरस्वती या देव-देवता रंगमंचावर येऊन आशीर्वाद देऊन जातात. त्याप्रमाणे नटवा हे मुखवटा घातलेले पात्र देव-देवतांचा प्रतिनिधी म्हणून येते. त्या पात्राची स्तुती करणारे गीत कोकणातील लोककलांमध्ये गायिले जाते. काही नमन-खेळेमध्ये त्यांचा समावेश झालेला असतो. उदाहरणार्थ 

अहो, गणेशासारखा नटवा हो
सांबासारखा रतन हो,
इंद्रासारखा किरीट हो

गौळण म्हणजे श्रीकृष्णाच्या भक्त गवळणी व राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातून साकारणाऱ्या मधुराभक्तीचे दर्शन घडवणारे शृंगारनाटय होय. गौळण तमाशा या लोककला प्रकारातही असते. गोंधळ या विधिकला प्रकारात राधा-विलास असतो. त्याप्रमाणे नमन-खेळेत गौळण असते, परंतु तमाशातील व गोंधळातील गौळणीचे स्वरूप व बाज आणि नमन-खेळेतील गौळण नाट्य प्रसंगातील गौळणीचा बाज मूलतः व स्वरूपतः भिन्न वळणाचा आहे. तमाशामध्ये गवळणी, मावशी, कृष्ण व त्याचा साथीदार पेंद्या या पात्रांच्या साहाय्याने केवळ विप्रलंभ शृंगारयुक्त नाटयप्रसंग उभा केला जातो. तो तमाशाच्या स्वभावधनीशी अनुबंध राखणारा असतो आणि गोंधळ या विधी कलेतील राधाविलासमधील शृंगार अखेरीस भक्तिरसात परिवर्तन पावतो.

नमन-खेळेतील गौळण हा नाटयप्रसंग भक्तिभाव प्रकट करणारा असतो. मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणी या स्त्रीपात्रांना श्रीकृष्ण आणि त्याचे साथीदार सुदामा, पेंद्या, वाकड्या ही पात्रे वाटेवर अडवतात. या नाटयप्रसंगात श्रीकृष्ण व पात्रे त्यांची अलौकिक म्हणजे परमेश्वर स्वरुपाची ओळख गवळणींना पटवून देतो. त्यामुळे गवळणी साक्षात परमात्मा भेटल्याचा आनंद व्यक्त करतात आणि गौळण हा दुसरा नाटयभाग संपतो.

कोकणच्या दशावतारी लोकनाट्य परंपरेत श्रीविष्णू संकासुराचा वध करतो असा प्रसंग येतो. श्रीविष्णूने दशावतारात एकेका राक्षसाचा धर्मसंस्थापनार्थ, संस्कृति रक्षणार्थ वध केल्याची कल्पना आहे. त्यांतील पहिल्या अवताराचे दर्शन दशावतारी लोकनाटकात घडते. नमन-खेळेतही राक्षसवधानेच पूर्वार्धाची समाप्ती केली जाते. येथे श्रीविष्णूच्या आठव्या अवताराचे कार्य दाखवण्यासाठी कंसवधाचा प्रसंग उभा केला जातो. ही नमन-खेळेची प्राचीन परंपरा असल्याचे सांगितले जाते.

नमन-खेळे या लोकनाट्यप्रकाराचे जतन पिढ्यानपिढ्या केलेले दिसून येते. या लोकनाट्यप्रकाराचे स्वरुप विधिनाट्यासारखे आहे. विविध देव-देवतांची पूजाअर्चा करणे हा विधिनाट्याचा भाग आहे. देव-देवतांची पूजाअर्चा करणे माणसाला आवश्यक वाटत आले म्हणून प्रस्तुत नमन-खेळेत विधी आणि नाट्य यांचा कलात्मक सुमेळ साधलेला आहे. भक्ती व श्रद्धा हे भाव त्यात मिसळलेले आहेत. श्रद्धा व नाट्य यांचे कलात्मक मिश्रण म्हणजे विधिनाट्यरुप नमन-खेळे होय. देव जागवणे, सर्व गावाला देवाचे दर्शन घडवणे हाही विधीचा एक भाग आहे आणि या दर्शनाकडे समाजाला वळवण्यासाठी ज्या कृतींचा आधार घेतला जातो त्या कृती म्हणजे नाट्य. याकरता नमन-खेळेत गणपती नाचवणे याबरोबरच अन्य सोंगे आणली जातात, म्हणूनच नमन-खेळे हा लोकनाट्यप्रकार ‘विधिनाट्य प्रकार’ म्हणून अस्तित्वात आहे.

नमन-खेळे या विधिनाट्याला धार्मिक बैठक लाभलेली आहे. त्यात भक्तिभाव व नाट्यभाव यांचे कलात्मक मिश्रण आहे. त्यामुळे नमन-खेळे विधिनाट्य कलात्मक पातळीवर नाट्यभावाचा विकास साधून सादर केले जाते. त्यातूनच नमन-खेळेला कलात्मक धर्मचरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एक कलात्मक धर्माचार म्हणून नमन-खेळे सादर केले जाते. पारंपरिक विधिनाट्ये देव-देवतांच्या भक्तीबरोबर मनोरंजनासाठी सादर केली जातात. परंपरेचे जतन करणे, ग्रामदेवता व इतर देवदेवतांची भक्ती करणे हे नमन-खेळेंचे मुख्य प्रयोजन आहेत.

– जुईली मोहिते 7715088841 Juimohite08@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here