माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)

माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते… लहानगा मी बाबांचे बोट मुठीत धरून चालत आहे. रस्त्याने त्यांना अक्षरश: दुतर्फा लोक अभिवादन करत आहेत. ते कधी माझी मूठ उंचावल्यासारखे करत, तर कधी डावा हात उंचावून, कधी भुवया उंचावून तर कधी स्मिताने अभिवादन स्वीकारत आहेत. कधी थांबून चौकशी करत आहेत. कधी काळजी व्यक्त करत आहेत. कधी मदतीचा हात पुढे करत आहेत !

आई मला आठवते ती पावसाळ्यात अंगणभर दाणे फिस्कारत बसलेली. अंगणात चिवचिव नांदती आहे. उन्हाळ्यात पाखरांसाठी पाण्याचे मातीचे भांडे झाडावर टांगून ठेवलेले आहे. सणासुदीला मुद्दामहून सालगड्याच्या आंधळ्या आईची ममतेने आठवण करणारी माझी महिमामयी माता मला आठवते. मला आठवतो आमचा धोबी इस्माईलमामा. त्याच्या घरचा शिर-खुरमा. त्याला आग्रहपूर्वक हज यात्रेला पाठवणारे माझे बाबा… मला बालपणीच पशुपाखरांचे, पर्यावरणाचे, एकात्मतेचे असे अमृतमय बाळकडू लाभले.

मला गुडगुडी वाजवत काळे कांबळे पांघरून रात्रीतून येणाऱ्या फकिराच्या कंदिलाचा पाझरता प्रकाश दिसतो. ‘अलख’ म्हणत हातातील चिमटा उंचावून भिक्षा मागणारा नाथयोगी आठवतो. कडकलक्ष्मी आठवते. वासुदेवाची चिपळी मनाच्या गाभाऱ्यात घुमते. पहाटेचा बैरागी आणि आठवड्यातून फक्त गुरूवारी डफ वाजवत येत भजने गाणारा आदिवासी भिक्षेकरी… हे सारे माझ्या बालपणीचे दोस्त आहेत.

मला कविता शिकावी वा अनुभवावी लागली नाही. ती सरळ एखाद्या जीवनव्रतासारखी उरीशिरी येऊन भेटली. मी या साऱ्यांच्या आणि कष्टकरी आईबाबांच्या कुशीत पाखरांच्या पिलासारखा वाढलो. तो सर्व काळ म्हणजे स्मरणयात्रेच्या वाटेवरील निधान आहे.

मी मोठा झालो, शिकलो, विचार करू लागलो, मला साहित्याची जाणीव आहे, वेदनेचा वेद वाचता येतो. प्रेमाचे उपनिषद गाता येते. लोक विचारतात, ‘तुमची साहित्यविषयक प्रेरणा काय?’ माझे मातीशी अन् मेघांशी नाते ही माझी प्रेरणा आहे. पहिले विद्यापीठ आईची मांडी अन् दुसरे विद्यापीठ निसर्गाचा भावगंधित पसारा. मी धुंवाधार कोसळणारा ढग बघतो. मी धरतीत न पेरलेले उगवताना बघतो. तेव्हा मला वाटते, पावसाळी धारांमधून ही अदृश्य-अतर्क्य बीजे धरणीच्या उदरात खोलवर उतरतात, रूततात, रूजून येतात आणि हिरवी भाषा अवतरते. काळ्या धरतीवर ज्वारीचे चांदणे लहडते; काळ्या आभाळभर ज्वारी हसते.

माझ्या बाबांनी मला तीन गोष्टी सांगितल्या. ‘पेरलं की उगवतं’ याचा अर्थ पेरल्याशिवाय उगवत नाही. त्याचाच अर्थ असा, की ‘काही हवे असेल तर काही सोडावे लागते.’ तो त्यांना कालच्या जगण्याचा आलेला अनुभव. ‘जे पेरले तेच उगवते. कोय रोपली की आंबा मिळतो. बाभळ पेरणाऱ्याला आंबा कोठून मिळेल?’ ही बाबांची जीवनश्रद्धा. तेच वर्तमानाचे गीत. तोच त्यांचा विश्वास. बाबांनी असे काल, आज आणि उद्या समजावून सांगणारे नवल वर्णिले. ते मी जोपासले, विवेकाने अलंकृत केले, परिश्रमाने शृंगारित केले.

माझ्या छोट्या जीवनात अमृतक्षणांची अखंड बरसात आहे. राजस्थानात कोटा नावाचे एक शहर आहे. तेथे एक कवी राहतात. बाळकृष्ण थोलंबिया त्यांचे नाव. त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होत होता तेव्हाची गोष्ट. अमृतकुंभासारखे बाळकृष्ण. मी त्यांचे काही साहित्य वाचले होते. मला त्यांची दळदार संदर्भांचा भावस्पर्शी कवी, संवेदनशील लेखक, करारी शिक्षक, शिस्तबद्ध शिक्षणाधिकारी अशी विविध रूपे ठाऊक होती. पण आमची ना गाठ ना भेट. पत्रांतून संवाद होता. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते- ‘मी संत नामदेवांच्या अभंगांचा हिंदीतून अनुवाद करू इच्छितो.’ ते वाचून मी मोहरलो, गहिवरलो. नामदेव माझा. माझ्या महाराष्ट्राचा. पंजाबपर्यंत पोचला होता. थेट घुमान गाठले. तेथे त्यांची समाधी. मी बाळकृष्ण यांना पत्र धाडले. लगेच त्यांचे उत्तर आले. ‘‘मला हवीत एकावन्न पदे. पदे हवीत सख्यभक्तीची. देव आणि नामदेव एका जाजमावर बसले आहेत आणि त्यांच्या गप्पा चालल्या आहेत अशी पदे हवी आहेत. पाठवाल ना? वाट बघेन.” मी सख्यभक्तीची एकशेएक पदे निवडली, सुवाच्य लिहिली, रजिस्टर्ड डाकेने धाडून दिली ! बाळकृष्ण प्रसन्न झाले. काम सुरू झाले. मध्ये दोन महिन्यांचे मौन गेले. खूप तगादा लावला. अखेर, त्यांचे एक पत्र आले. दरम्यान, बाळकृष्ण विधुर झाले होते. एकटे-एकाकी-आत्ममग्न. पत्रात एकच वाक्य होते -‘आतापर्यंत तिच्यासोबत काम करत होतो. आता तिच्यासाठी करीन!’ बाळकृष्ण यांनी स्वतःला सावरले होते. अश्रू पुसले होते. दुःख झटकले होते. लेखणी सरसावली होती. त्यांचे सारे काम पूर्ण झाल्याची वार्ता कळली. त्यांनी सारे बाड मजकडे धाडून दिले. एकावन्न पदे होती. मी पेन्सिलीने खूणा केल्या. काही बदल सुचवले. खूप-खूप भारावून त्यांनी लिहिले, की “तुमच्या उंबरठ्याला अभिवादन करावे असे मनात आहे.” मी त्यांनी सुचवल्यावरून माझे छायाचित्र पाठवून दिले. काही महिने लोटले. आणि एक दिवस टपालात एक पार्सल आले. पार्सलात होते एक पुस्तक – ‘नामदेव निर्माल्य’. मला धन्य वाटले. मजवर अमृतकणांचा वर्षावच झाला. पुढे बघतो तो अर्पणपत्रिकेत माझे छायाचित्र छापलेले. बाळकृष्णांनी तो ग्रंथ मला अर्पण केला होता ! ‘तुमची वस्तू तुम्हालाच समर्पित’ अशा आशयाच्या दोन ओळी हिंदीतून कवितेत लिहिलेल्या होत्या. मला नामदेवांचा प्रसाद पोचला. मी नामदेवांच्या अक्षर दिंडीत असा सामील झालो ! मी विचार करू लागलो. जीवनसूत्र हाती आले. कोणी मोठा होत असेल तर आपण अवश्य मदत करावी. तो मोठा होईल, त्याची पालखी निघेल, आपल्याला तो पालखीत बसवील आणि स्वतः पायी चालेल! मोठे बनू शकण्याचा तो राजमार्ग मला गवसला !

मी पीएच डीचा अभ्यास नुकताच सुरू केला होता. त्यावेळची घटना. दिल्ली-हरिद्वार मार्गावर सहारनपूर नावाचे जंक्शन आहे. तेथे कन्हैयालाल मिश्र ‘प्रभाकर’ राहत होते. मी त्यांचे व्यक्तिमत्त्व, साहित्य आणि पत्रकारिता यांचा विचार करणारा शोधप्रबंध लिहिला. पुणे विद्यापीठाने पदवी दिली. तो ग्रंथ सिद्ध झाला. प्रसिद्धही झाला. प्रभाकरजींच्या आठवणी हा माझा ठेवा आहे. मी प्रथमच प्रभाकर यांच्या भेटीसाठी निघालो होतो. काही पत्ता नाही. मे महिना. रणरणते ऊन. चाळीस तासांचा रेल्वेचा प्रवास. अखेर सहारनपुर आले. भलेथोरले रेल्वे स्टेशन. अनेक प्लॅटफॉर्मस. माझ्या येण्याचे आधी कळवले होते. प्रभाकरजींना त्यापूर्वी बघितले नव्हते. ओळखदेख नव्हती. प्रदेश अनोळखी. शहर नवे. भाषा परिचित. पण भाव अपरिचित. देश आपलाच पण आवेश वेगळा. काय करावे? स्थानकावर उतरलो. एका हाती अवजड सूटकेस, खांद्यावर शबनम, कावरीबावरी नजर, कोणाला विचारू? पोस्टाचा पत्ता होता. लांबवर नजर गेली. उंच सताड मूर्ती. श्वेत खादीधारी काया. डोक्यावर छत्री. डोळ्यांवर चश्मा. काही हरवून गेले आहे आणि ते शोधणारी पारदर्शक नजर. काय उचंबळून आले मनाच्या डोहात कोण जाणे? धावतच निघालो. पावलांवर वाकलो. ‘आपण प्रभाकरजी का?’ एकच क्षण. त्या श्वेत पोशाखात मी गुरफटला गेलो. मला आलिंगनबद्ध करत या देशाचा स्वतंत्र प्रज्ञेचा निर्भीड पत्रकार बोलला-‘‘अरे, किती वाट बघत होतो मी तुझी! आलास!!’’ हे शब्द ऐकले. ते अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असे होते. त्या तप्त उन्हात माझ्या कपाळावर चंदनाचा लेप होत होता. त्या आनंदक्षणांची बरोबरी पदवी मिळाल्यावरही अनुभवता आली नाही.

मी गांधीजींच्या सव्वाशेव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा अभ्यास करण्यास लागलो. गांधीजींवर दहा लेख मराठीतून लिहावेत असे मनाने घेतले. काही रूपरेखा मनाशी योजली होती. ती देशभरच्या गांधीभक्तांना कळवली. पत्र-संवाद केला. दूरभाषवरून बोललो. ‘ठीक आहे तुमचे काम’ येथपासून तर ‘आता मी खूप कामात आहे. सवडीने कळवीन’ अशी टोकाची पत्रे आली. एक पत्र मात्र उत्साहवर्धक आले. ते पत्र फार महत्त्वाचे होते. पत्र होते नारायणभाई देसाई यांचे. ते गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे पुत्र. महादेवभाई गांधींजींना मुलासारखे. नारायणभाई यांनी मला लिहिले होते -‘‘प्रिय विश्वासराव, असं हो काय करता? तुम्ही अन् मी चांगले शेजारी शेजारी आहोत ना ! मग असं पत्रातून हो काय लिहिता? या की इकडं. भेटू या ! बसू या ! बोलू या !’’ मी चाचपडत होतो. स्वातंत्र्योत्तर भारतात माझा जन्म झालेला. आजादीची लढाई ग्रंथांमधून वाचलेली. ठरवले, की चोवीस तास त्यांच्या सोबत राहू या. मनमोकळेपणाने माझा मनोदय त्यांना लिहिला. उलटटपाली उत्तर आले. ‘‘या ! या !! अवश्य या ! वाट बघतोय.’’ मी निघालो. पोचलो. राहिलो त्यांच्या सोबत. वाटले, जमेल आपल्याला. गांधीविचार करू लागलो, समजून घेऊ लागलो. तीनचार वर्षे तशी गेली. साऱ्या सुट्या तेथेच घालवल्या. आश्रमीय शिस्त पाळली. आश्रम हृदयात उतरला. काम वाढले.

दहा लेख लिहू पाहणारा मी स्वतःच अचंबित झालो. ‘ साधना, तपस्या आणि आहुती’ या शीर्षकाने त्रिखंडात्मक गांधी चरित्र सिद्ध झाले. मी ते काम हिंदीतून केले आहे. नारायणभाई माझ्या घरी येऊन गेले आहेत. त्यांनी विचारले, ‘कुठल्या खुर्चीवर बसून लिहितोस तू?’ मी अंगुलीनिर्देश केला. त्या खुर्चीवर नारायणभाई आसनस्थ झाले. प्रसन्नता घरभर पसरली. त्यांनी पहिल्या खंडाला प्रस्तावना लिहून दिली. आशीर्वादच तो ! गांधीचरित्र लेखनाचे कार्य पूर्ण झाले. त्यातील अक्षर न् अक्षर नारायणभार्इंनी ऐकले, सूचना केल्या, बदल सुचवले. पुनर्लेखन झाले. आता मी नारायणभार्इंच्या परिवाराचा सदस्य आहे. मी निरोप घेत होतो. त्यांच्या पवित्र कुटीच्या अंगणात सोनचाफ्याचे झाड आहे. मी त्यांच्यासमोर उभा आहे. नारायणभाई माझे दोन्ही बाहू धरून उभे आहेत. त्यांनी माझ्या नजरेत नजर मिळवली आहे. क्षणभरच त्यांच्या नेत्रांत पाणी तरारले. त्या जलाचा अमृतमय स्पर्श मला लाभला. अमृत अमृत म्हणून आणखी काय असते?

माझी सौभाग्‍यवती सौ. चंद्रकला हिने 19 नोव्‍हेंबर 2015 रोजी या नश्वर जगाचा निरोप घेतला. ती माझ्या आयुष्‍यात श्वासासारखी तादात्‍म्‍य पावली आहे. तिचे स्‍मरण स्‍वाध्‍यायरत असताना सतत सोबत करत असते.

माझ्या मनात एक कविता रूंजी घालते. गेल्या पन्नास वर्षांपासून तिचा ताजेपणा काही कमी होत नाही. उलट, ती अधिकाधिक ताजीतवानी, सार्थक आणि कालोचित वाटू लागते. ती कविता उणीपुरी आठ ओळींची आहे. तीच कविता जीवनसंजीवक ठरते, जीवन जगण्याची दिशा दाखवते, झुंजण्याचे परिमाण देते, समर्पणाची रीत शिकवते. कविता ही खरे तर एखाद्या कवीची असते; पुढे ती सर्वांची होते. मग कविता कधी चळवळीची पताका बनते, कधी अग्निफुलांची पखरण करते, कधी करूणेची स्रोतस्विनी बनते, कधी ऊर्जेचा सागर बनते, कधी जीवनस्पर्शी बनते, कधी देव्हाऱ्यातील सांजवात बनते. माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात अशीच एक कविता आहे. मला ती सातत्याने आठवते, मनोभावे आवडते.

ती कविता ही एक प्रार्थना आहे. जगभरातील प्रणत मुद्रांना स्वर देणारी अशी ती कविता आहे. निःशब्द मौन प्रार्थनांना अक्षरांचे वरदान अर्पिणारी ती कविता आहे. ती कविता सर्व धर्मांबद्दलचा आदरभाव व्यक्त करते. सर्व धर्मांवर समानतेने प्रीत करते. धर्मा-धर्मातील उसळत्या जलप्रवाहावर संवादाचा सेतू रचते. ती धर्मातीत कविता आहे. मानव्य फुलवणारी कविता आहे. कवितेची सुरूवात होते-

   ‘अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता | नेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा ||’

जगत् पित्याला अजाण लेकरांचे अभिवादन ! ‘सारी ईश्वराची लेकरे’ अद्वैत भावाचा हा शंखनाद येथे घुमतो. ती कविता मानवमात्राच्या समनुयोगाची दीक्षा देते. त्या कवितेतील ईश्वर मुक्त आहे, बंधनातीत आहे. त्याचे काही विशिष्ट रूप नाही. त्याचा काही ठरावीक आकार नाही. त्याला नाव नाही, ठाव नाही. ईश्वर हे सर्वव्यापक तत्त्व आहे, सर्वस्पर्शी विचारधारा आहे, ते सर्वात्मकाचे रूप आहे, ते सर्वेश्वराचे रूप आहे.

त्या ईश्वराचे पंचायतनही अद्भुत आहे. ते पंचायतन पंचमहाभूतांचे आहे. सूर्य, चंद्र, सागर, डोंगर, शेती, तळे यांसारखी तत्त्वे या ईश्वराची आरती करत आहेत. गुरे-वासरे ही त्या ईश्वराचीच. ते वात्सल्याचे प्रतीक आहे. फुले देवाची, फळे देवाची, पाखरांच्या ठायी त्याचेच तर चैतन्य नांदते. देवाला मनापासून भावणारी ती निसर्गसंपदा. तो देव असा चराचरात सामावलेला आहे. तो देव मंदिरात बंदिस्त नाही, कोठल्या मठात अडकलेला नाही, भाकडकथांच्या जाळ्यात गुंतलेला नाही, तो अमर्याद श्वासासारखा, व्यापक क्षितिजासारखा, अथांग दर्यासारखा, अनंत गगनासारखा आहे. त्या देवाला नाना नावे. त्याची दहा दिशांना घरे – किंबहुना दहा दिशा हीच त्याची घरे. त्याच्या मायेची चादर सर्वांवर आहे. कोणी आप्त नाही, कोणी सगा नाही, कोणी जवळचा नाही आणि कोणी असलाच सोयरा तर तो दीनजन आहे. देव शोषितांचा, वंचितांचा सखा आहे. अखेरच्या माणसाची कुटी हा त्याचा ठाव आहे.

जीवनाचे साफल्य काय? कशासाठी हा जीवित्वाचा ध्यास? कवी म्हणतो, खूप शिकावे, ज्ञानसंपन्न व्हावे, विज्ञानसंपन्न व्हावे, काम करावे, श्रमाधारित स्वावलंबी जीवन असावे, प्रेम धरावे मनी – मन प्रेमजळाने तुडुंब भरलेले असावे. मनाच्या सरोवरात प्रेम-कमळे फुललेली असावीत. प्रेम हे प्रभूचे महाद्वार आहे. प्रेमात सर्वस्व विलोपन साधावे लागते. प्रेमात अहं विसर्जन करावे लागते. प्रेमाची किमान अट प्राणांची कुरवंडी करण्याची असते. कवीच्या माध्यमातून आपण सारेजण ती प्रार्थना करू या ! कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांची महती कवी गातो. ती प्रार्थना आहे. ती तम हरील, कलुश जाळील, क्षुद्रता संपवील, उन्नतता जागवील.

कवी म्हणतो —

“अजाण आम्‍ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्‍या कथा

सूर्यचंद्र ही तुझीच देवा, तुझी गुरेवासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर,  फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला, तुझी रे दाही दिशाना घरं
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी” (संजीवनी मराठे)

प्राचार्य विश्वास पाटील 9767487483 / 9403848907 vishwaspatil52@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here