हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते…
विविध कलांचा व संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा व गाण्यातील मूर्त-अमूर्त अशा जागांविषयी लिहीत आहेत ज्येष्ठ पत्रकार व प्रसिध्द लेखिका रेखा देशपांडे. विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण प्रत्येकाने वाचायलाच हवेत. प्रस्तुत लेख दोन भागात प्रसिध्द होत आहे. त्याचा हा दुसरा भाग. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरुन वाचता येतील.
– सुनंदा भोसेकर
कहीं ये वो तो नहीं?…
कशाची तरी आठवण आसभास नसताना जागी होते ती कोणत्या तरी गंधानं. कुणाची चाहूल लागते ती विशिष्ट ध्वनी ऐकू आल्यानं, कुणाच्या तरी सुरातून. मिथकांनी, पुराणकथांनी बासरीच्या सुरात कृष्णाचं अस्तित्व भरून दिलं आपल्याला. शापापायी शकुंतलेचं अस्तित्व पार विसरलेल्या दुष्यंताला शापाचा असर ओसरू लागल्यावर कसली तरी हुरहूर लागते. सुंदर चित्र पाहिलं, मधुर स्वर कानी पडले तर आनंदानं नाचावंसं वाटायला हवं, त्याऐवजी ही हुरहूर का लागते? कसली आठवण येते? जन्मजन्मान्तरीचे काही लागेबांधे जागे होतात की काय?
रम्याणि वीक्ष्य मधुरं च निशम्य शब्दान्
यत्पर्युत्सुकी भवति सुखितोsपि जन्तु
तत्चेतसां नूनमबोधपूर्वं
भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि ।
‘मेघदूता’तही विरहकातर यक्षाला असंच काहीसं वाटतं –
मेघालोके भवति सुखिनः अपि अन्यथावृत्तिचेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ।
ज्याला कोणतं दुःख नाही अशा माणसालाही मेघांनी दाटलेलं आभाळ पाहून सैरभैर व्हायला होतं तर मग एकमेकांपासून दुरावलेल्या प्रेमी जनांची अवस्था अशी झाली तर नवल काय?
———————————————————————————————-
संवेदनांचं आणि निसर्गाचं नातं अतूटच. अचानक एक अनुभव आठवला. काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकासाठी शशी कपूर यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या नेपियनसी रोडवरच्या घरी गेले होते. तेव्हा जेनिफर कपूरचं निधन होऊन फार दिवस लोटले नव्हते. साधारण संध्याकाळी चार-साडेचारची वेळ. मुलाखतीचा विषय होता गुरू. त्याची कल्पना शशी कपूरना आधीच फोनवर दिलेली होती आणि तेही त्या तयारीनंच बसले होते. म्हणाले, मी माझ्या एका नाही, तीन गुरूंविषयी बोलणार आहे. पापाजी- पृथ्वीराज कपूर, राजसाहब आणि जेनिफर. खूप भरभरून, सुंदर बोलले. वेळ कसा गेला कळलंच नाही. निघाले. ते फ्लॅटच्या दारापर्यंत मला सोडायला आले. बाहेर जायच्या दरवाज्याच्या बरोबर समोर फ्लॅटची पश्चिमाभिमुख बाल्कनी होती. समोर समुद्रावर उतरून आलेली मावळती लाल-सोनेरी संध्याकाळ. सुंदर पण उगाचच उदास करणारी. मी दारात उभी राहून निरोप घ्यायला वळले. ख्रिस्ती पादऱ्यांसारखा निळसर राखी रंगाचा पायघोळ गाऊन घातलेले शशी कपूर मला सामोरे. त्यांच्या मागे बाल्कनीतून दिसणारा संध्याकाळचा उदास-रम्य प्रकाश त्यांच्या देहाकृतीला बॅक-लाइट पुरवत होता. क्षणभर माझ्या मनात विचार चमकला, ‘मी त्यांच्या आठवणींच्या तारा छेडल्या होत्या, इतका वेळ हे छान आठवणी जागवत बोलण्यात गुंतले होते, पापाजींबरोबर होते, राजसाहेबांबरोबर होते आणि आपल्या जीवनसंगिनीबरोबर होते. आणि आता नेमक्या या कातर करणाऱ्या वेळी हे एकटेच असतील.’ मला अपराधी अपराधी वाटलं. तशीच जिना उतरले.
इंगमार बर्गमनच्या ‘ऑटम सोनाटा’ (1978) मधील सांज-सोनेरी प्रकाशयोजनेतली उदास सुंदर लिव उलमनही नकळत आठवली. नंतर एका मैत्रिणीला हा सगळा अनुभव सांगितला तर त्यावर ती हसली. ‘हिला कशाला त्याच्याबद्दल एवढं वाटायला पाहिजे’, असं काही तरी म्हणाली. संध्याकाळची वेळ सुखी माणसालाही उदास करू शकते यावर तिचा विश्वास नव्हता. आणि असंही कोणी असतं यावर माझा विश्वास बसत नाही.
नाही तर विशिष्ट रागांच्या सुरावटींतून विशिष्ट भावना उद्दीपित करण्याचं कसब संगीतकारांना कसं जमलं असतं? विशिष्ट मूडसाठी चित्रकार विशिष्ट रंगच का निवडू लागले असते? छाया-प्रकाशाचा आणि पटकथेतल्या भावुक क्षणाचा नेमका मेळ साधण्यासाठी फिल्म स्टुडिओत कॅमेरामननं तासनतास का लावले असते? मुळात काव्यशास्त्रातला ‘रस-सिद्धान्त’च जन्माला का आला असता? वाक्यं रसात्मकं काव्यम्. वाक्यातून रस निर्माण होत नसेल तर त्याला काव्याचा दर्जा कुठून मिळणार? आता रस हा विषय जिव्हेचा नं? तरी श्रवणाचा आणि वाचनाचा म्हणजे दृष्टीचा आणि मतीचाही विषय जे वाक्य त्यात हा रस निर्माण होतोय! ‘सुवर्णसुंदरी’ (1957) या चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं आहे- ‘कुहू कुहू बोले कोयलिया’. इवलासा ‘ऋतुसंहार’च. शृंगार रसाची निर्मिती करणाऱ्या उद्दीपन विभावाचा उत्सव म्हणजे हे गाणं.
—————————————————————————————————
दिल्लीला भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बेबेट्स फीस्ट’ नावाचा डेन्मार्कचा चित्रपट 1987 ला पाहिला होता. त्यातली बेबेट ही एक फ्रेंच शरणार्थी स्त्री आपली खरी ओळख लपवून एका गावातल्या दोन वृद्ध बहिणींकडे विनावेतन हाऊसकीपर म्हणून येऊन राहते. त्या बहिणी असतात पादरी पित्याच्या लेकी. पित्याच्या आणि चर्चच्या साध्या राहणीच्या कडक शिस्तीत वाढलेल्या, उपभोगापासून दूर चर्चच्या सेवेसाठीच अविवाहित राहिलेल्या. चविष्ट जेवणाचा आस्वाद घेणं हे त्यांच्या लेखी पाप… एक दिवस बेबेटनं पॅरिसमध्ये असताना घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटाला दहा हजार फ्रँक्सचं बक्षीस लागतं. तेव्हा ती त्या पैशातून चर्चची सेवा करणाऱ्या या बहिणी आणि गावकऱ्यांसाठी मेजवानीचं आयोजन करते. पॅरिसहून स्वयंपाकासाठी लागणारे विविध जिन्नस मागवून घेते. असले पदार्थ या दूरवरच्या गावात कधी कोणी पाहिलेलेही नसतात. शिवाय इतकं चविष्ट जेवण म्हणजे पाप. तेव्हा जेवताना स्वादाविषयी कोणीही काहीही बोलायचं नाही, असं बहिणी ठरवतात. एका बहिणीचा एकेकाळचा प्रेमिक जो आता बडा लष्करी अधिकारी आहे, अचानक पाहुणा म्हणून येतो आणि नियम माहीत नसल्यानं या फ्रेंच जेवणाचं रसग्रहण करू लागतो. या चवीचं जेवण त्यानं कित्येक वर्षांपूर्वी पॅरिसच्या होटेल अँग्लाइसमध्ये घेतलेलं त्याला आठवतं आणि बेबेटची खरी ओळख उघड होते. ती एकेकाळी होटेल अँग्लाइसची हेड शेफ- प्रमुख पाककला कर्मचारी होती. या मेजवानीमुळे चर्चच्या संस्कारातलं उपभोगाला, जीवनातल्या आनंदाला पाप समजणारं कुंद, गोठलेलं वातावरण मोकळं होतं. बेबेटची पाककला हीच या चित्रपटाची नायिका म्हणायला हवी. बेबेट बनवत असलेले विविध पदार्थ, ते बनवण्याच्या तिच्या पद्धती, तिची लगबग, तिची त्यातली एकाग्रता हे सारं इतक्या तपशिलात दाखवलं जातं की ते पाहताना प्रेक्षकाचा जठराग्नीही प्रज्वलित होतो. तसंच झालं होतं. त्यातच थिएटरमधल्या एसीमुळेच नव्हे तर समोर पडद्यावर बर्फाळ प्रदेशाचं दृश्य दोन तास पाहात राहून गारठायलाही झालेलं. चित्रपट संपला तेव्हा नेमकी दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. डेन्मार्कमधून भारतात यायला काही क्षण लागले. हा अनुभव जितका मनोरंजक तितकाच प्रत्ययकारी आणि अविस्मरणीय होता. न खाल्लेल्या पदार्थांच्याही स्वादाचा प्रत्यय देणारा आणि स्पर्शाचाही.
——————————————————————————————
संवेदनांच्या या परस्पर नात्यामुळेच कधी कधी अमूर्तातून मूर्त साकारताना ‘दिसतं’. आपल्याला एखादं दृश्य ‘दिसतं’ ते आपल्या नव्हे तर दुसऱ्या कुणाच्या तरी नजरेतून. या डिव्हाइसचा वापर अनेकदा सिनेमात होतो. ‘मुगल-ए-आझम’मध्ये सर्वप्रथम अनारकलीचं दर्शन होतं ते प्रेक्षकाला तिचं दर्शन न होताच. ते तो अनुभवतो ते सलीमच्या डोळ्यांतून. सलीमच्या आगमनाप्रीत्यर्थ शहंशाह अकबरानं मूर्तिकाराला एक सुंदर शिल्प घडवायचा आदेश दिला. ती मूर्ती काही वेळेत पूर्ण झालेली नाही. मूर्तिकारानं मूर्तीऐवजी नादिरा या एका कनीज़लाच उभं केलंय. मूर्तीचं अनावरण दुसऱ्या दिवशीच्या सकाळी शुभमुहूर्तावर शहजादा सलीमच्या हस्ते करायचं ठरवण्यात आलं. मात्र शहजाद्यानं चंद्रास्तापूर्वी कोणत्याही मूर्तीचं दर्शन घेणं हा अपशकुन ठरणार आहे, शोकात्म घटनांची नांदी ठरणार आहे, असं राजज्योतिषानं सांगितलं.त्याउलट मूर्तिकाराचा छातीठोक दावा आहे, की माझ्या मूर्तीचं सौंदर्य पाहून योद्धा त्याची तलवार, शहंशाह त्यांचा राजमुकुट आणि माणूस त्याचे हृदय काढून तिच्यापुढे ठेवील. एकीकडे राजज्योतिषाची ताकीद आणि दुसरीकडे मूर्तिकाराचा दावा. आणि तोही बंडखोर वृत्तीच्या सौंदर्यपूजक तरुण शहजाद्यासमोर. शहजादा सलीम कसा संयम ठेवणार? तो राजज्योतिषाची ताकीद धुडकावून लावून मोत्यांचा पडदा दूर सारतो. प्रेक्षकाला दिसतो पडदाभर सलीमचाच क्लोज अप. सलीम कॅमेऱ्यात रोखून (म्हणजेच त्याला समोर दिसणाऱ्या दृश्यात रोखून) काही तरी पाहतोय. त्याच्या मुद्रेवर तसेच भाव आहेत. डोळ्यात तो जे काही पाहतोय ते विलक्षण आहे हे एव्हाना प्रेक्षकाला जाणवलंय, त्याच्यात उत्कंठा दाटलीय. पण त्यानं सलीमच्या डोळ्यांनी ते पाहिलंय. सलीमची नजर आणि प्रेक्षकाचं मन यांची युती इथे झाली आहे.
—————————————————————————————————
“आओ, इधर आओ. बैठो.” जमिनीवरच रोखलेला कॅमेरा या आवाजाचा माग घेत पुढे जातो सुंदर, सजलेल्या पावलांवर… कारण भूतनाथची नजरही जमिनीवरच आहे… ‘‘हां, हां क्यों नहीं। बड़ा ही सुंदर नाम है- भूतनाथ.’’ – इतका वेळ खाली मान घालून बसलेला भूतनाथ वर नजर करून बघतो आणि त्याला छोटी बहूचं प्रथम दर्शन घडतं. कपाळावरचं रुपया येवढं ठसठशीत कुंकू आणि त्याखालचे अथांग डोहासारखे डोळे. ‘साहिब बीबी और गुलाम’मध्ये छोटी बहूचं प्रथम दर्शन भूतनाथला आणि प्रेक्षकालाही होतं ते तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातून. नजरेची भूमिका पार पाडणारा असतो व्ही. के. मूर्तींचा कॅमेरा. आणि पुढचा रोल अदा करतो तो चित्रपटचा संकलक. ध्वनी ‘लीड’ घेतो आणि दृश्य अनुभव मागुती येतो.
ध्वनीनं पुढाकार घेऊन येऊ घातलेल्या दृश्याची सूचना देण्याचं एक डिव्हाइस चित्रपटात काही वेळा वापरलं जातं आणि ते सिनेमाच्या अनुभवात भर घालतं. ‘मुगल-ए-आझम’मध्ये सलीम शहंशाह आणि महाराणी जोधाबाईच्या उपस्थितीत बाण मारून मूर्तीचं अनावरण करतो तेव्हाच मूर्तीरूप अशा नादिराचं (अनारकलीचं) दर्शन होतं आणि त्याबरोबरच एक रहस्यमयी, किंचित उदासीची किनार लाभलेली सुरावट ऐकू येते. पुढेही ह्या सुरावटीचा वापर होतो. ही सुरावट जणू अनारकलीची ओळख बनते. तिच्या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्यही ती नकळत सांगून जाते. मनाचा ताबा घेणारी गोड सुरावट… आणि तरीही कोणत्या तरी अघटिताची, विनाशाची चाहूल देणारीसुद्धा. विनाश कोणाचा? सल्तनतीचं उद्याचं आशास्थान जो शहजादा, त्याचा? शहंशाह अकबरानं वाढवलेल्या-जपलेल्या सल्तनतीचा? की शहजाद्याला वेड लावणाऱ्या अनारकलीचाच?
गुलझार दिग्दर्शित ‘लेकिन’मध्ये रेवा (डिंपल)चा आत्मा देहरूपात ज्या ज्या वेळी समीर (विनोद खन्ना) समोर प्रकट होणार आहे त्या त्या वेळी ऐकू येईल-न येईल अशी अतिसूक्ष्म किणकिण होते. फक्त समीरलाच रहस्यमय अस्तित्वाची जाणीव देणारी. सिनेमातलं हे घटित किंवा वापरण्यात येणारं तंत्र म्हणजे लाइटमोटिफ (leitmotif). लाइट म्हणजे लीड करणे, पुढे जाणे. हा जर्मन शब्द आहे. संगीतातून किंवा ध्वनीतून एखाद्या व्यक्तिरेखेचं, एखाद्या पुन्हा पुन्हा जाणवणाऱ्या भावनेचं किंवा विचाराचं सूचन करणं.
———————————————————————————————–
बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ (1959) मध्ये अधीर (सुनील दत्त) सुजाता (नूतन) ला म्हणतो, “तुम्हारे जूड़े में चंद्रमल्लिका का फूल है, माथे पर चंदन का लाल टीका. चम्पई रंग की साडी पहने तुम मेरे पास खड़ी हो. बताओ तो इस सपने का क्या मतलब हुआ.”
सुजाता उत्तर देते , “इसका यह मतलब हुआ कि ‘तुम’ सुंदर हो.”
गंध, स्पर्श आणि स्वाद या अर्थी रस या संवेदनांचा अनुभव सिनेमा माध्यम देऊ शकत नाही, तरीही ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत…
– रेखा देशपांडे 9821286450 deshrekha@yahoo.com
लेख नेहमीप्रमाणे छानच.
माहितीसाठी:
‘पाद्री’हा शब्द बाद होऊन बराच काळ लोटला आहे. ख्रिस्ती समाजाचे पालन करणारा म्हणून पाळक हा शब्द प्रोटेस्टंट समाजात प्रचलित आहे .
ख्रिस्ती उपासना विधीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द दाते सूचीसाठी तयार करून देण्याची जबाबदारी रेव्ह.भास्करराव उजगरे ह्यांच्यावर सोपवण्यात आली होती तेव्हा त्यांनी ‘प्रीस्ट’साठी ‘आचार्य ‘, ‘धर्मगुरू’, ‘बिशप’साठी ‘महाधर्मगुरू’ ‘लेन्त’ साठी (गुड फ्राय डे संदर्भातील ४०दिवसांचा उपवासकाळ) साठी ‘वसंतोपवाससमय’ इत्यादी शब्द सुचवले होते.
–अनुपमा निरंजन उजगरे
संवेदनांच्या उत्सवाचा चित्र-प्रत्यय देणारा लेख.