कटिबद्ध कोणाशी ? कशासाठी ?

6
257

व्यक्तिमत्त्व म्हणजे दिसणे, बोलणे, विचार व्यक्त करणे, आत्मविश्वास, नजरेतील ठामपणा या गोष्टी असतात. जे दिसते ते क्षणकाल टिकते, मात्र जे असते ते सखोल परिणाम करते. एखाद्या कामाबद्दल, स्वतःच्या शब्दाबद्दल आणि इतरांच्या वेळेबद्दल जाणीव आणि बांधिलकी असणे हा व्यक्तिमत्त्वातला मोठा पैलू आहे. दिलेले वचन विसरणे, स्वतःच स्वतःच्या कामाबद्दल निष्ठा न बाळगणे यामुळे आपल्या शब्दाचे महत्त्व आपणच कमी करत असतो. एखाद्या विचाराने भारावून जाऊन, कामाला सुरुवात करणे, आरंभशूर असणे आणि कालांतराने त्या कामातले स्वारस्य जाऊन तिकडे दुर्लक्ष करणे ही स्वाभाविकपणे दिसणारी घटना. मात्र स्वतः स्वतःच्या कामाशी, निर्णयाशी, वेळेशी  आणि शब्दाशी बांधील राहून ते काम, तो विचार तडीस नेणे म्हणजे कटिबद्ध असणे. परिणीता पोटे यांनी त्यांच्या कामातून ‘कमिटमेंट’ ही जाणीव कशी पक्व होत गेली याबद्दल लिहिलेले अनुभव वाचू या.

– अपर्णा महाजन

कटिबद्ध कोणाशी ? कशासाठी ?

कमिटेड ! … कोणाशी? स्वतःशी. कशासाठी… स्वतःसाठी. कमिटमेंट म्हणजे फक्त इच्छा नव्हे. कमिटमेंट म्हणजे एखादी गोष्ट करणे फारसे सोईचे नसतानाही ती करत राहणे. आयुष्यात भेटलेल्या लोकांची आठवण सतत येत असते. एक श्रुती ताई होती. ती म्हणायची, एखादे काम सुंदर, नीटनेटके, योग्य पद्धतीने करण्यासाठी ते काम स्वत: केले आहे एवढे एकच कारण पुरेसे आहे. स्वत:च्या हातून योग्य पद्धतीने काम घडण्यासाठी बाहेरचे कोठलेही मोटिवेशन असू नये. स्वत: जे काम करीन ते चांगलेच असेल हे एकच कारण काम चांगले घडण्यासाठी पुरेसे आहे. मग ते काम म्हणजे एखादे भांडे घासणे असू दे, लेखनातील अक्षर असू दे, तयार केलेला रिपोर्ट असू दे… काहीही-कोठलेही काम ! ते काम ह्याच ‘कमिटमेंट’ने चांगले करावे.

मी अकरावीत असताना गुजरातला भूकंप झाला. मला एका टीमबरोबर तेथे मदत करण्यास जाण्याची संधी मिळाली. गुजरातमधील भचाऊ गावाला पोचतानाचे दृश्य धक्कादायक होते. घरे, बिल्डिंग, उंच उंच इमारती… सर्व पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या होत्या. त्या दिवसांमध्ये स्वत:ला जीवनात काय करायचे आहे याबद्दल माझ्या मनात आराखडे तयार होत होते. भचाऊ गावाचे ते दृश्य पाहून मनात आले, की आयुष्यभर कष्ट करून एखाद्याने घर बांधले आणि निसर्गाने ते वास्तूशांतीच्याच दिवशी कवेत घेतले. लोकांनी जवळची माणसे मरताना बघितली. जोडीदाराचा मृत्यू लग्नाच्या दिवशीच घडून आला आणि गंमत म्हणजे, अख्खी इमारत जमिनीखाली गेली असतानाही लोक आत जिवंत राहिले ! आणि जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडणारी व्यक्ती तिच्याच घराच्या कमानीखाली येऊन मरण पावली ! घरात थांबलेले सुरक्षित राहिले. अशा सर्व घटनांवरून मनाने ठरवले, की यात काही फार अर्थ नाही ! म्हणजे निसर्गाचे किंवा कोठल्या तरी शक्तीचे हा पसारा चालवण्यावर नियंत्रण आहे. मग ज्या गोष्टी स्वत:कडून हिरावल्या जाऊ शकतात त्या मिळवण्याचा प्रयत्न करण्यावर किती भर द्यावा?

त्यातच तेथे असलेल्या एका मिलिटरी ऑफिसरांची ओळख झाली. त्यांनी संपूर्ण गावाच्या जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. प्रत्येकाला स्वच्छ चवदार असे एक वेळचे जेवण मिळत होते. जेव्हा मदत केंद्र उभे करण्यासाठी बैठक झाली तेव्हा त्या ऑफिसरने सांगितले होते, की जे काम कोणी घेणार नाही ते मी घेईन. ते काम होते स्वयंपाक करण्याचे. त्यांना स्वयंपाकाची सवय त्या आधी अजिबात नव्हती. पण त्यांनी सकाळी उठून ट्रॅक्टर घेऊन लाकडे तोडायला जाणे, स्वयंपाक, त्यानंतरची स्वच्छता हे सारे शिकून घेतले. ते संपूर्ण गावासाठी काही महिने सातत्याने आणि खूप आनंदाने जेवणाची सोय करायचे. मी त्याच दरम्यान समाजकार्य शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मी समाजकार्य शिक्षण ‘मातृ सेवा संघा’त घेतले. प्रत्येक शिक्षक शिकवायचे तेव्हा त्यांची त्या विषयाबद्दलची तळमळ, विषयाबद्दलची स्पष्टता, विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याची धडपड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जे शिकवत होते तसे जगण्याचा निश्चय, हे बघण्याचे भाग्य मला लाभले. त्यांनी त्यांना ‘प्रोटोकॉल’नुसार जेवढे शिकवणे गरजेचे होते त्याच्या पुढे जाऊन शिकवले. त्याचा रेकॉर्ड कोठेही नाही, पण असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक नेहमी म्हणत, की तुझा पिंडच समाज कार्यकर्त्याचा आहे.

एक शिक्षिका मी लायब्ररीत जास्त वेळ अभ्यास करावा म्हणून वर्षभर स्वतःच्या डब्यासोबत माझ्यासाठी डबा आणायच्या. तो डबादेखील पोषक आहाराच्या आदर्श डब्याचे प्रात्यक्षिक असे. त्यांना ते करून काय मिळाले? त्यांचे ते करायचे ठरले होते. ते त्यांनी का केले-कसे केले हे त्यांनी कोठेच सांगितले नाही, म्हणून वाया गेले का? त्या म्हणायच्या, की कोणी जे काम करतो त्याचे परिणाम त्या काळी त्याला दिसत नाहीत. पण दहा-बारा वर्षांपूर्वीचे विद्यार्थी जेव्हा फोन करून त्यांच्या प्रगतीबद्दल सांगतात तेव्हा आमचे काम आम्हाला कळून येते. आम्हाला आठवड्यातील काही दिवस ‘फील्ड वर्क’ आणि काही दिवस ‘क्लासेस’ असे असायचे. ‘क्लासेस’च्या दिवशी शिक्षकांचे व्याख्यान ऐकत असताना माझे मन ते शिकवत असलेल्या गोष्टी ‘फील्ड वर्क’मध्ये घडलेल्या गोष्टींशी जुळवून बघायचे. ते शिकवत असलेल्या कोठल्या गोष्टी ‘फिल्ड वर्क’मध्ये कशा वापरू शकतो? मागील ‘फील्ड वर्क’मध्ये जे केले होते त्याची पद्धत योग्य होती का? कोठल्या लोकांशी बोलताना काही वेगळे बोलता आले असते, याबद्दल मन विचार करायचे. त्यामुळे मी वर्गात प्रश्न विचारत नसे. मी माझ्या विचारांत हरवलेली असायची. पण मी काय करते याची अचूक जाण माझ्या शिक्षकांना होती. त्यांनीच ते माझ्या नजरेस आणून दिले होते.

आम्ही ‘फील्ड वर्क’मध्ये ‘जर्नल’ लिहायचो. त्यात ‘फील्ड वर्क’मध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वाक्याची नोंद असायची. शिक्षक ती तपासायचे. एकदा मी लिहिले होते, की ‘कम्युनिटी’त गेल्यानंतर एका मुलाने मला काही फुले आणून दिली. मी फुले आणून दिली ह्या आनंदात होते, की त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून स्वीकारले ह्या? पण मला आठवते, माझ्या शिक्षकांनी लिहिले होते, की फुले का आणून दिली याचा विचार कर. तेव्हापासून समोरची व्यक्ती जशी वागते तशी ती का वागते, क्लाएंट एखादी गोष्ट बोलतो ती तशी का बोलतो? त्याच्या बोलण्यामागचा अर्थ काय? त्याच्या कृतींमागे अर्थ काय? असे विचार करण्याची सवय लागली. शिक्षकांशी चर्चा करताना माझ्या एका आवडत्या शिक्षकांनी मला सांगितले, की कधी कधी किंवा नेहमीच स्वत:समोर व्यक्ती उपस्थित असेल असे नाही, पण पुस्तकांच्या रूपाने स्वत:कडे ज्ञान असते आणि ते जे ज्ञान असते ते स्वत:च्या मदतीला नेहमी धावून येते. थिअरी व  प्रॅक्टिकल वेगवेगळे असे कधीच शिकवले गेले नाही. थिअरी ही अनुभवातून निर्माण झालेली असते. त्यामुळे तिचा व्यवहारात उपयोग होतो आणि समाजकार्य शिक्षणाच्या थिअरीचा तर होतोच होतो. ‘चॅरिटी’ या शब्दापासून सुरू झालेले समाजकार्य एक विद्याशाखा म्हणून प्रगत झालेले आहे. पण त्या ज्ञानशाखेचा अभ्यास करण्याची तयारी नसल्याने त्याकडे संकुचित वृत्तीने बघितले जाते. एखाद्याची मदत तात्पुरती पूर्ण करणे एवढेच समाजकार्य असे बघतो. पण समाजकार्य हे समाजाला शाश्वत टिकणारे आणि सध्याच्या युगात क्लिष्ट झालेल्या समस्यांचे उत्तर देणारे असे असू शकते.

मला समाजकार्य शिक्षणाने एक गोष्ट शिकवली. ती म्हणजे स्वतः कोणी कोणाचे कल्याण करू शकत नाही, तो अहंकार कोणी बाळगू नये. प्रत्येकाची समस्या ती व्यक्ती स्वतः चांगल्या रीतीने ओळखत असते. म्हणून तिचे अचूक उत्तरही त्या व्यक्तीला माहीत असते, जर सुचवलेले मार्ग किंवा मदतीची पद्धत मदत घेणाऱ्याला आवडली नाही तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेण्यात उणेपणा राहिला. त्या व्यक्तीला अजून समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी समाजकार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानक्षेत्रांचा भरपूर अभ्यास करणे गरजेचे आहे. मी पुस्तकांमध्ये आवडलेली वाक्ये अंडरलाईन करून ठेवत तशा खूप पुस्तकांचा संग्रह घरी केलेला आहे. अजूनही काम करताना अडचणी आल्या, निराशा वाटली, सुचेनासे झाले की मी शिक्षकांना फोन करण्याच्या आधी पुस्तक चाळते. समाजकार्य ह्या शाखेकडे या पद्धतीने बघण्यास हवे. फक्त इच्छा झाली म्हणून समाजकार्य करण्यापेक्षा स्वत:च्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचा जास्तीत जास्त परिणामकारक उपयोग इतरांना कसा होईल यासाठी ते कार्य ज्ञानाआधारित असणे गरजेचे आहे.

समाजकार्य म्हणजे फक्त ‘फील्ड वर्क’ असाही गैरसमज आहे, समाजकार्य म्हणजे कार्यकर्ता व्यक्ती कोठे जाऊन काय करतो यापेक्षा तिच्यासमोर असलेल्या व्यक्तीशी ती काय बोलते, कसे बोलते, तिचे दुःख-तिचे विचार समजून घेताना तिला नवीन विचार-दृष्टिकोन देऊन स्वयंपूर्ण कसे करावे याबद्दलचे ते ज्ञान आहे. उन्हातानात फिरून रस्त्यावरही ते करता येते आणि केबिनमध्ये बसूनही करता येते. समाजकार्य हे एकच ज्ञान समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते असा दावा समाजकार्य कधीच करत नाही, पण समाजकार्यकर्ता योगदान देऊ शकतो हे मात्र नक्की. मी दहावीनंतर समाजकार्य शाखेत प्रवेश घेतला. मी सध्या पीएच डी करत आहे. तो प्रवास करत असताना त्या ज्ञानासंदर्भात माझे एक अधिष्ठान तयार झाले आहे असे मला वाटते. समाजकार्य पद्धत ही समस्याग्रस्त व्यक्तीशी कमिटमेंट आहे. ती कमिटमेंट कधीच बदलू शकत नाही. ती ‘कमिटमेंट’ काय आहे हे समजावून सांगण्याच्या पलीकडील आहे.

लोक विचारतात, काम करत असताना लोकांचे दुःखद प्रसंग सतत ऐकण्यामुळे समाज कार्यकर्त्यास निराशा येत नाही का? तर नाही ! कारण त्याला त्याच्या मर्यादा माहीत असतात. समाजकार्यकर्ता इतरांना मदत करत असतो, तो स्वतःलाच मदत करत असतो. त्यामुळे ते काम कोणासाठी करण्याचे, कोणाला दिसावे म्हणून करण्याचे-कोणी कौतुक करावे म्हणून करण्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात कौतुक झाले की आनंद होतो, पण नाही झाले-कोणी शंका घेतल्या तरी हरकत नाही. समाज कार्यकर्त्याने स्वतःसाठी घेतलेले ते व्रत असते. हे कृतिरूप ज्ञान पोचवणाऱ्या सर्वांना एवढेच सांगणे आहे, की आम्ही चालवू हा पुढे वारसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा…

– परिणीता पोटे 9028469211 poteparinita@gmail.com
—————————————————————————————————————-

About Post Author

6 COMMENTS

 1. खूप सुंदर लेख आहे शब्दाची सुरेख मांडणी केली आहे
  यातुन आपली वैचारिक क्षमता प्रगल्भ आहे यात शंका नाही यानंतरही
  अशा प्रकारचे लेख वाचायला मिळेलच आपल्या लेखनीस भरभरून शुभेच्छा

  • धन्यवाद!लेख वाचून प्रतिक्रिया दिल्या गेल्या असल्या की पुढील कामासाठी हुरूप वाढतो.
   मनःपूर्वक धन्यवाद!

 2. मनःपूर्वक लिहिलेला , जाणीव जागृतीचे अनेक पैलू स्पष्ट करणारा सुरेख लेख ! सृजन आनंद विद्यालयात आम्ही कार्यकर्ते शिक्षक ताई दादा ‘ कामासोबत बांधिलकी ‘ या विषयावर नेहमी बोलत असू. स्वतःचे तर्कशुद्ध मूल्यमापन ही एक मानसिक स्तरावरची परीक्षा देताना चांगल्या कामाच्या मोजपट्टीवर आपण कुठे आहोत याचे भान येई. आवश्यक आणि विचारपूर्वक मांडणीचा हा लेख फार आवडला.

 3. मी फेसबुक वर या लेखाचे short vesion लिहिले होते,आणि तेंव्हा त्याला दोन दिवस अजिबात लाईक आले नाही,तेंव्हा वाटले delete करावे,पण आई दिला म्हंटले आपले विचार आहेत ते ..नंतर अपर्णा ताई महाजन यांचा फोन आला की खुप छान झाला आहे,अजून थोडे विस्तार पूर्वक लिहून पाठव.आज तुम्हाला लेख आवडला,तुमची प्रतिक्रिया वाचून वाटले आपले स्व पण जपले की आपल्या विचारांची माणसं भेटत जातात,
  मनापासून धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here