कालिदासाचा यक्ष आणि यक्षांच्या अष्टसिद्धी (Kalidas’s Yaksha and Yaksha’s achievements)

0
32

अमरकोशानुसार, दहा देवयोनी आहेत- विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध आणि भूत. त्यांपैकी ‘यक्ष’ हा ‘मेघदूता’चा कथानायक होय. सर्वसाधारणपणे, यक्ष हा देखणा, ऐश्वर्यसंपन्न, सुखात आकंठ बुडालेला, पत्नीवर अत्यंत प्रेम असलेला आणि माणसांच्या दृष्टीने अतीन्द्रिय शक्ती ज्याच्यापाशी आहेत असा मानला जातो. सर्व यक्ष हे कुबेराचे सेवक. कुबेर हा त्यांचा स्वामी. यक्षांवर जबाबदारी कुबेराच्या उद्यानांचे आणि कोशाचे रक्षण करण्याची असे. कालिदासाच्या ‘मेघदुता’तील कथानायक यक्षाने त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या कामात कुचराई केली आणि त्याला कुबेराच्या क्रोधाला सामोरे जावे लागले. अलकानगरी ही यक्षांची वसाहत कैलास पर्वतावर संपन्नस्थित अशी आहे. कुबेराने यक्षाला शाप दिला, त्याप्रमाणे त्याला तेथील त्याच्या घरादारापासून, प्रिय पत्नीपासून एक वर्ष दूर राहवे लागणार होते.

कालिदासाने यक्षाने कर्तव्यपालनात प्रमाद काय केला ते सांगितलेले नाही, पण टीकाकारांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. काही टीकाकार म्हणतात, की कुबेर हा शिवभक्त होता. कुबेराने यक्षावर शिवपूजेसाठी ताजी फुले पहाटेच खुडून आणण्याचे काम सोपवले होते. यक्षाचे लग्न नुकतेच झाले होते. प्रिय पत्नीच्या सहवासातून, पहाटे पहाटे दूर जायचे आणि फुले खुडून ती कुबेराला नेऊन द्यायची हे यक्षाच्या अतोनात जिवावर येत असे. त्यामुळे, एकदा, त्याने रात्रीच फुले खुडून आणली आणि सूर्योदयापूर्वी कुबेराला नेऊन दिली. त्यांतील एका कमळात रात्री एक भुंगा अडकून पडला होता. तो भुंगा कमळ सकाळी पूजेच्या वेळी उमलू लागले तेव्हा त्यातून बाहेर पडला आणि त्याने कुबेराच्या बोटाला दंश केला. कुबेराने त्याचा क्रोध अनावर होऊन यक्षाला शाप दिला, की तू हा प्रमाद ज्या पत्नीच्या आसक्तीमुळे केला आहेस त्या पत्नीपासून तुझा एक वर्ष वियोग होईल !

काही भाष्यकारांच्या मते, यक्षाची नेमणूक कुबेराच्या उद्यानाचा रक्षक म्हणून झाली होती. एके दिवशी, यक्ष जागेवर नसताना, इंद्राचा ऐरावत त्या उद्यानात शिरला आणि त्याने उद्यानाची नासधूस केली; तर काहींच्या मते, त्याला कुबेराच्या सरोवराचा रक्षक म्हणून नेमले होते, पण त्याचे पत्नीच्या मधुर आठवणींत सरोवराकडे दुर्लक्ष झाले. ऐरावत व इतर हत्ती सरोवरात घुसले आणि त्यांनी सरोवरातील कमळांच्या वेलींची हानी मोठ्या प्रमाणावर केली. त्यामुळे कुबेराने यक्षाला शाप दिला. त्याला त्या शापापोटी एक वर्षाचा काळ पृथ्वीवर कंठावा लागणार होता ! प्रिय पत्नीचा विरह सहन करावा लागणार होता. त्याच्याच जोडीला, यक्षांना ज्या अष्टसिद्धी प्राप्त होत्या, त्यांचे सामर्थ्यही त्या यक्षाला गमावावे लागणार होते. तो त्या शापामुळे विवश होऊन पृथ्वीतलावर येऊन पडला. यक्षाने विरहाचे आठ महिने कसेबसे घालवल्यावर त्याला पावसाळी मेघ दिसला. तो त्याची कुशल वार्ता पत्नीपर्यंत आणि उलट, तिचे क्षेमकुशल त्याच्यापर्यंत पोचवावे यासाठी त्या अचेतन मेघाला म्हणून करतो; मेघाने त्याचा दूत व्हावे अशी अपेक्षा बाळगतो. तो मेघाशी नातेसंबंध जोडतो. या संपूर्ण कल्पनारम्य प्रवासातून एक रमणीय असे काव्य जन्माला आले, ते ‘मेघदूत’ होय.

यक्षांच्या अष्टसिद्धी (Yaksha’s achievements)

यक्षांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि ते त्यांचे सामर्थ्य होते. कुबेराच्या शापामुळे ‘मेघदूता’तील यक्षाचे ते सामर्थ्य लयाला गेले.

मार्कण्डेय पुराणाने त्या अष्टसिद्धींविषयी जी माहिती दिली आहे, ती अशी-
अणिमा – शरीर अणूइतके सूक्ष्म करण्याची सिद्धी
महिमा – शरीर असीमित विशालकाय करण्याची सिद्धी
गरिमा – शरीराचा आकार सीमित ठेवून वजन वाढवण्याची सिद्धी
लघिमा – शरीर हलके, वजनरहित करण्याची सिद्धी
प्राप्ती – जी इच्छा करावी ते प्राप्त करण्याची सिद्धी
प्राकाम्य – कोणाच्याही मनातील इच्छा, विचार ओळखण्याची सिद्धी
ईशिता – आधिपत्य, सत्ता मिळवण्याची सिद्धी
वशिता – कोणालाही वश करून घेण्याची सिद्धी

(‘मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here