मसुरे गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे मंदिर आणि तेथे फेब्रुवारी-मार्च दरम्यान भरणारी दरवर्षीची देवीची जत्रा. भराडीदेवीविषयी कथा अनेक प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. स्वतः चिमाजीअप्पांना एका मोहिमेदरम्यान भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभला होता. म्हणून त्यांनी बावीस हजार एकर जमीन देवळासाठी दान केली. आंगणे नामक एका ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असताना सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि ती तेथे प्रकट झाली असल्याचे सांगितले. तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. ती स्वयंभू पाषाणरूपी देवी ‘भरड’ भागातील एका राईत अवतरली, म्हणून ती भराडीदेवी. देवळाचा खर्च चिमाजीआप्पांनी इनाम दिलेल्या आणि आंगणे कुटुंबाच्या वहिवाटीखाली असलेल्या दोन हजार एकर भरड जमिनीच्या आणि शेत जमिनीच्या उत्पन्नातून चालतो.
देवीची जत्रा शेतीची कामे आटोपल्यावर ठरते. ती साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात भरते. विशेष म्हणजे जत्रा विशिष्ट तिथीशी संबंधित नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणे) होतो. त्या विधीच्या वेळी आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर लोक एकत्र जमतात आणि सहभोजन करतात. जत्रेचे नियोजन त्या वेळी केले जाते. त्यासाठी कौल लावला जातो. त्यावेळी गाऱ्हाणे “शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकूम दे, शिकार साध्य करून दी…” असे घातले जाते. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. त्यालाच ‘रान धरणे’ असे म्हणतात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही. डुकराची शिकार करून, शिकारीची मिरवणूक गावातून काढली जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तेथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. त्या शिकारीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जातो आणि मग जत्रेची तारीख ठरवली जाते.
भराडीदेवी म्हणजे प्रत्यक्षात तुळजाभवानी आहे. यात्रेत कोंबड्या-बकऱ्यांच्या बळीचे नवस बोलण्याची प्रथा नाही. अन्य नवसफेड हा मोठा विधी असतो. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडीचोळी, नारळाचे तोरण घातले जाते. उत्सवाच्या दिवशी देवीची पाषाणमूर्ती अलंकारांनी सजवली जाते. पाषाणास मुखवटा घालून साडीचोळी नेसवली जाते. जत्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे तीनपासून भाविक ओट्या भरू लागतात. देवीची ओटी खणानारळाने, तर नवस तुलाभाराने फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे असे पदार्थ देवीला वाहिले जातात. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.
अजून एक आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागणे. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी काही शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतर उपवास सोडला जातो. यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटे लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) कार्यक्रम असतो. तो मान आंगणे कुटुंबाचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणे यांच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येते. उत्सवात सामील होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुना यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या घरूनच ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) आणि नवस असेल तर साडी घेऊन यावे अशी प्रथा आहे. जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद होऊन उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. त्या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. जत्रेत शेती अवजारापासून सुक्या म्हावऱ्यापर्यंत अनेक वस्तूंची खरेदी-विक्री होते.
भराडीदेवीच्या जत्रेचे व्यवस्थापन आंगणेवाडी कुटुंबीय आणि मुंबईचे आंगणेविकास मंडळ करतात. आंगणेवाडीत एकशे तीस कुटुंबे आहेत. त्यात कोणी एक व्यक्ती प्रमुख नसून सर्व मिळून उत्सव पार पाडतात असे भास्कर आंगणे यांनी सांगितले. त्यांनी याबाबत अधिक खोलात जाऊ नये असा सल्लाही दिला.
– ओंकार रमेश परब 9420953938 parab30081998@gmail.com
———————————————————————————————-