मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील गाव. गाव मालवणपासून सतरा किलोमीटरवर आहे. त्या गावाला छान निसर्गरम्य परिसर लाभला आहे. मशहूर या नावाचे हे गाव पुढे मसुरे असे सर्वत्र परिचित झाले. मसुरे गावात वाड्या अनेक आहेत. ते गाव मागवणेवाडी, गडगरेवाडी, मेढावाडी, मर्डेवाडी, मार्गाचित वाडी अशा अनेक वाड्यांनी मिळून निर्माण झाले आहे. त्यांतील प्रसिद्ध म्हणजे आंगणेवाडी. आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर प्रसिद्ध आहे. मसुरे गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे. गावातील लोकांची बोलीभाषा मालवणी आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांचे ग्रामदैवत भरतेश्वर आणि ग्रामदेवी सातेरी आहे. भरतेश्वर मंदिर हे देऊळवाडा या वाडीमध्ये आहे. सातेरीदेवीचे मंदिर हे बिळवस या गावामध्ये आहे. सातेरीदेवी मंदिराला जलमंदिर असेही संबोधले जाते, कारण त्या मंदिराच्या तिन्ही बाजूंना पाणी आहे. त्याशिवाय गावात भराडी, माऊली, पावणाई, विठ्ठल, रवळनाथ, गांगो, आकारब्राह्मण, दांडेकर, साईबाबा, गणपती अशा देवतांची मंदिरे आहेत. गावात स्वामी समर्थ मंदिराची स्थापना 2012 साली करण्यात आली. स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने तेथे प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद आयोजित केला जातो.
मसुरे गावाला कावा नदी लाभली आहे. नदीवर बांधिवडे आणि मसुरे या गावांना जोडणारा पूल आहे. मसुरे गावचा आठवडी बाजार मर्डेवाडी येथे भरतो. तो बाजार गुरुवार आणि रविवार अशा दोन दिवशी भरतो. त्या बाजारात आजूबाजूच्या गावांतील लोकही येतात.
मसुरे गावाच्या पूर्वेला भरत आणि भगवंत असे दोन गड प्रसिद्ध आहेत. ते शिवकालीन आहेत. वाडीकर फोंडसावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंडसावंत यांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर 1680 साली किल्ला बांधण्याचे ठरवले. त्यांनी त्यासाठी प्रथम विहीर खोदण्यास सुरुवात केली. विहीर दोनशेअठ्ठावीस फूट खोदल्यावर पाणी लागले. किल्ला त्यानंतर 1701 साली बांधून झाला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर फोंडसावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे चिडून तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर 1748 साली हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच, सावंत यांनी गड परत ताब्यात घेतला. करवीरकर यांनी भरतगड सावंत यांच्याकडून 1787 मध्ये जिंकला; पण नंतर त्याचा ताबा सावंत यांच्याकडे दिला. तो इंग्रजांनी कॅप्टन हर्चिसनच्या नेतृत्वाखाली 1818 मध्ये जिंकला. त्यावेळी त्याला गडावरील विहीर कोरडी आढळली. गडावर झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे विहिरीच्या तळाला तडे जाऊन विहिरीतील पाणी नाहीसे झाले होते. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या. भरतगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे दोनशे फूट खोल विहीर. असे म्हटले जाते, की त्या विहिरीच्या तळाशी एक गुप्त दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून सिंधुदुर्ग किल्ल्यात थेट जाता येते. भरतगडावरील एका मंदिराच्या शेजारी मशीद आहे. तेथून पुढे भगवंतगड आहे. भगवंतगड खाडीच्या पलीकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला दिसतो. भगवंतगड पाहण्यासाठी बांधिवडे खाडी होडीने ओलांडून जाता येते.
मसुरे गावात रामनवमी आणि दसरा हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मसुरे गावातील आंगणेवाडी येथे भराडीदेवीची जत्रा साजरी केली जाते. ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा जत्रांपैकी आहे. आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीय देवीचा कौल घेतात आणि जत्रेची तारीख ठरवली जाते. ती तारीख जत्रा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी ठरवली जाते. परंतु तेवढ्या अल्पावधीत, आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली रे झाली, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व परराज्यांतूनही हजारो भाविक खास त्या जत्रेसाठी मसुरे गावात येतात. यात्रा-जत्रा केवळ दोन दिवस असते. आंगणेवाडी भराडीदेवीची जत्रा लाखो भक्तांनी फुलून येते.
मसुरे गावापासून कणकवली तीस किलोमीटर आणि कुडाळ पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. ती दोन रेल्वे स्टेशने आहेत. गावात केवळ भातशेती नाही तर दोन्ही हंगामात होणारी शेती आहे. भुईमुग, नाचणे, कुळीथ, चवळी, उडीद, राजमा, कलिंगड, सोयाबीन, सूर्यफुल, वाल मोठया प्रमाणात पिकवला जातो. गावातील लोक शेती व्यवसायासोबत नारळ, पोफळ(सुपारी), काजू, आंबा अशा पिकांचीही लागवड करतात.
गावात स्टेट बँक, जिल्हा बँक, दोन पतपेढया, चार तलाठी कार्यालये, एक पोलिस दूरक्षेत्र, होमगार्ड कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच खासगी दवाखाने आहेत. या गावाने धार्मिक पर्यटनाचा अनोखा वारसा जपला आहे. गावाला कालावल खाडीपात्राचा किनारा लाभला आहे. त्या पात्रातील खोतजुवा बेट, मसुरकर जुवा बेट, परुळेकर जुवा बेट आदी छोटी छोटी बेटे हे पर्यटकांना मोठे आकर्षण असते.
गावातील तरुण मंडळी विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. गावात मुलांच्या शिक्षणासाठी शाळा-कॉलेजे आहेत. मात्र गावात जुन्या चालीरीती, रूढी-परंपरा जोपासल्या जातात. प्रथमेश परब आणि नक्षत्र बागवे हे दोन तरुण अभिनेते मसुरे गावचे आहेत. मसुरे गावाच्या आजूबाजूला आचरा, बागायत, बांधिवडे आणि कांदळगाव अशी गावे आहेत.
– ओंकार रमेश परब 9420953938 parab30081998@gmail.com
———————————————————————————————-