मार्सेलिसची मासीया – रशियन तरुणीचे भारतप्रेम (Massia Bibikoff’s book on an Indian in first world war)

0
278

मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले…

मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले, कारण त्या कथेतील प्रमुख व्यक्ती मासीया बिबिकॉव्ह (Massia Bibikoff/ Bibikov) ही युद्ध – चित्रकार होती. पहिले महायुद्ध 1914 साली सुरू झाले. ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्यासाठी लष्करभरती हिंदुस्तानात सुरू केली. भरती केलेले असे सैनिक मोठ्या संख्येने छावण्या उभारणीचे काम मार्सेलिस येथे करू लागले. त्या सैनिक गोतावळ्याची रेखाचित्रे काढण्यासाठी तेथे आलेली चित्रकार म्हणजे मासिया बिबिकॉव्ह. ती फक्त तेवीस वर्षांची होती. तिला इंग्रजी फारसे येत नव्हते. ती तिची मातृभाषा फ्रेंच ही असल्यासारखी ती भाषेत प्रवीण होती.

युरोपात मिलिटरी पेंटर असा चित्रकारांचा एक उपवर्ग होता. ते कलाकार युद्ध व युद्धाची विविध अंगे – सैनिक, शस्त्रास्त्रे, सैनिकांचे गणवेश, पलटणींच्या हालचाली, घोडेस्वार इत्यादी चित्रांतून नोंदून ठेवत असत. ज्यां – बाप्टिस्ट एडवर्ड डिटॅलिक (Jean – Baptist Edoward Detallic) नामक असेच एक विख्यात चित्रकार फ्रान्समध्ये होऊन गेले. ते 1912 मध्ये निधन पावले. मासिया हिने चित्रकलेचे धडे डिटॅलिक यांच्याकडे घेतले होते. मासिया हिची आई फोटोग्राफर होती.

मासिया त्यांना ‘आपले हिंदुस्थानी’ असे पुस्तकात म्हणते ! त्याचा काही अंशी खुलासा पुस्तकाच्या अखेरीस होतो. हिंदुस्थानी सैनिक मार्सेलिसमध्ये येणार अशी बातमी आल्यावर लोकांत जादा कुमक आल्यामुळे प्रचंड उत्साह निर्माण झाला. उपहारगृहांत बसून पेयपान करणारे लोक सैनिकांच्या स्वागताच्या घोषणा देऊ लागले. तंबू उभारण्याचे काम चालू होते, तेथील सैनिकांचे वर्णन – “त्यांच्यापैकी एकही जण पाच फूट अकरा इंच यापेक्षा कमी उंचीचा नव्हता. सडपातळ, सौंदर्यपूर्ण प्रमाणबद्धता. त्यांचे भाव सौम्य व सहानुभूती दर्शवणारे होते. मी त्यांच्या छावणीत दाखल झाले तेव्हापासून त्यांच्यापैकी अनेक जण हातातील कामे थांबवून, माझ्याभोवती गर्दी करून, एखाद्या विचित्र प्राण्याला बघावे तसे माझ्याकडे बघत होते. ते सारे, सैनिक खरे तर, रासवट होते, पण ते लहान मुलांसारखे आनंदले होते. त्यांची चित्रे मी रेखाटत होते ह्याचा त्यांना अभिमान वाटत होता.”

सैनिकांच्या याच अप्रूपाचा अनुभव मासिया हिला पुढे अनेक वेळा आला. तिने बलुची, पठाण, शीख अशा विविध पंथांतील हिंदुस्थानी सैनिकांची रेखाटने केली आणि त्यांची रूपवैशिष्ट्ये मुक्तपणे नोंदली. तिने प्रादेशिक स्वयंपाक करणाऱ्या सैनिकांचे रेखाटन केले आणि त्या सैनिकांचे, त्यांच्या कृतीचे तपशील पुस्तकात लिहिले आहेत- “काय ग्रूप होता तो ! ते सारे अस्ताव्यस्त पद्धतीने पसरले होते किंवा बसले होते. सारे जण इतके सडपातळ, बारीक आणि लवचीक होते की शरीराची घडी घालून वाकले तर अर्ध्यावर उरतील. त्याचे रेखाटन करायचे म्हणजे कसलेला चित्रकारच हवा. त्यांच्यातील एक जण कमरेपर्यंत उघडा होता. त्याने त्याच्या कंबरेभोवती एक प्रकारचा पांढरा स्कर्ट गुंडाळलेला होता- अगदी फॅशनेबल तऱ्हेने. दुसऱ्याच्या अंगात, सायकलस्वार घालतात तशी राखाडी रंगाची जर्सी होती. त्याची हाफ पॅण्ट गुडघ्यापर्यंत होती.”

तिने रेखाचित्रे काढली की सैनिक त्या चित्रांवर सह्या करत, बऱ्याचदा त्यांच्या त्यांच्या मातृभाषांत किंवा हिंदुस्थानी भाषेत. साऱ्यांना त्यांची रेखाचित्रे काढली जावी आणि रेखाचित्राची एक प्रत प्रत्येकाकडे हवी असे वाटायचे. ते तशी मागणी तिच्याकडे करत. तिला सैनिकांबरोबर असलेल्या (किंवा असू शकत असलेल्या) एखाद्या पुजाऱ्याचे रेखाचित्र करायचे होते. परंतु एका अधिकाऱ्याने तिला त्यापासून परावृत्त केले- तो म्हणाला, “पुजाऱ्याचे चित्र काढण्याचा विचारही करू नकोस. त्याचे चित्र काढले जाणे हे तो अधिकारी अपशकुनी मानतो.” मासिया आणि तिचे चित्रविषय यांच्या वृतींमध्ये एक प्रकारचे साम्य होते. सैनिकांना जसे त्यांचे स्वत:चे चित्र काढले गेले, की हरखून जाण्यास होई; तशीच, मासिया तिने काढलेले चित्र ऑफिसर्स मेसमध्ये लावले जाणार हे समजताच आनंदून गेली !

छावणी पुढील मुक्कामावर जाण्यासाठी गुंडाळली गेली तेव्हा मासियाला भरून आले. “या उमद्या तपकिरी वर्णांच्या सैनिकांनी माझे हृदय चोरले आहे. मी त्यांच्या सहवासात अगदी अल्पकाळ राहिले असले तरी. त्यांनी जे नवे देखावे उभे केले आणि ठसे उमटवले त्यामुळे मी रोज सिंदबादच्या सफरींवर जात होते.”

पुस्तकाचा उत्तरार्ध वेगळा आहे. हिंदुस्थानातील अनेक संस्थानिकांनी त्यांचे सैनिक मार्सेलिस येथे ब्रिटिशांना मदत म्हणून पाठवले होते. मासिया हिला संस्थान या व्यवस्थेबद्दल आणि संस्थानिक या व्यक्तीबद्दल कुतूहल होते, त्या बद्दल तिच्या मनातही कौतुक ऐकीव वर्णनांमुळे निर्माण झाले होते. अशा पार्श्वभूमीवर तिला समजले की काही छावण्या फक्त राजे लोकांच्या आहेत, तेव्हा तिचा उत्साह ओसंडून वाहू लागला. महाराजांच्या पलटणीतील काही गोष्टींची/माणसांची रेखाचित्रे काढण्यास मिळावी अशी तिची इच्छा तिने एका ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर व्यक्त केली, तेव्हा त्याने म्हटले, की ‘सांगता येत नाही’. संस्थानिकांच्या पलटणीवर फक्त त्यांचा अधिकार चालतो. पण त्याने तिला पलटणीच्या मुख्याची ओळख करून दिली. तेव्हा तिला अस्मान ठेंगणे झाले. महाराजा पर्बतसिंग राठोड (राजपूत) यांनी, त्यांची सत्तरी ओलांडली असतानाही स्वतःची पलटण स्वखर्चाने मार्सेलिसला नेली होती, ते स्वतः त्या पलटणीत सामील झाले होते. तिने लिहिले आहे – “महाराजांना भेटायचे या कल्पनेने माझे हृदय धडधडू लागले. मोत्यांनी विणलेले जादुई नाव – महाराजा ! मी माझ्या लहानपणी ज्या कल्पना केल्या होत्या, त्याचे रूपडे रत्नांच्या लखलखाटात आणि रंगांच्या उधळणीत असे जे स्वप्नात पाहिले होते ते प्रत्यक्षात दिसणार होते.” महाराजांनी तिच्याकडे नजर वळवली, त्याबद्दल ती नोंदते- “त्याचा चेहरा माझ्याकडे वळला. तो म्हणजे सूर्यकिरणच होता. मी माझ्या साऱ्या आयुष्यात इतका देखणा पुरुष बघितला नव्हता. ‘अरेबियन नाइट्स’मधील राजपुत्र आणि नायक मी ज्या सौंदर्यप्रारूपात स्वप्नात बघत होते, ते माझ्यासमोर प्रत्यक्ष दिसत होते. त्याने डोके हलवले तेव्हा त्याच्या कानांत घातलेल्या दोन हिऱ्यांतून निळा प्रकाश स्रवला. त्याने तेजस्वी हास्य केले तेव्हा त्यांचे दात मोत्यांच्या दोन पंक्तींसारखे झळकले.”

त्या रूपसुंदर राजाचे नाव शेरसिंग. त्याने मासिया हिला छावणीतील दृश्ये रेखाटण्याची परवानगी दिली, परंतु सारी छावणी निद्रिस्त होती. तिने एखाद्या घोडेस्वाराचे चित्र रेखाटता येईल का असे विचारले तेव्हा पूर्ण पोषाखातील चार स्वार काही वेळात तिच्यासमोर आणले गेले. “ते सारे लहानखोर होते. हिंदू तसे लहानखोरच असतात, पण इतक्या लहान चणीचे हिंदुस्थानी मी बघितले नव्हते. त्यांतील एक अगदी अल्फान्सो तेरावा (स्पेन देशाचा राजा- जन्म 1886,  मृत्यू 1941) याचा भाऊ शोभेल इतका हुबेहूब त्याच्यासारखा होता. इतर तीन कोण असतील? एका फ्रेंच दुभाष्याने सांगितले, की ज्या महाराजांनी स्वखर्चाने पलटण फ्रान्सला आणली होती, त्यांचे ते चार मुलगे होते. ”

घोडेस्वार व घोडे यांचे रेखाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी खूप पाऊस पडला. सर्वत्र चिखल माजला. मासिया आणि तिची आई चिखल तुडवत महाराजांच्या रेजिमेंटमध्ये पोचल्या. “आम्ही त्या चॉकलेट क्रीममध्ये भुईसपाट पडण्याची भीती मनात बाळगून, काळजीपूर्वक मुख्य रस्ता डावीकडे ठेवून गवत-थैल्या आणि इतर अनेक प्रकारच्या वस्तू यांतून वाट काढत, उड्या मारत ‘आमच्या’ तुकडीत पोचलो.” छावणीत परिस्थिती अधिकच वाईट होती. घोटे चिखलात बुडाले होते. काही हिंदुस्थानी रोट्या बनवत होते, तिने त्यांचे रेखाटन केले. मासियाने स्वतःच्या भावभावनांची नोंद करत असताना, सैनिकांना काय वाटत असेल यासंबंधीही विचार केला.” या पवित्र वेळी, नवलाईच्या दुनियेतील या मुलांच्या मनात कसले विचार येत असतील? त्यांचे डोळे मोठे आणि स्वप्नाळू होते. त्या डोळ्यांत बुद्धिमत्ता आणि सखोलता दिसत होती. त्यांच्या बाह्य लौकिक आयुष्यापेक्षा त्यांचे अंतर्जीवन अधिक खरे होते.”

तिने माणसे, त्यांची उपकरणे यांची चित्रे रेखाटली तशीच खेचराच्या पाठीवरून पाणी आणण्याचे व ते फुकट न घालवता वापरण्याची युक्ती असे एक चित्रही रेखाटले आहे. तिने महाराजा शेरसिंग यांचे चित्र रेखाटण्याची इच्छा प्रगट केली तेव्हा तीही तिला मिळाली. महाराजांनी तिला व तिच्या आईला चहापानाचे आमंत्रण दिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही – “महाराजांबरोबर चहापान ! माझी कल्पनाशक्ती जागृत झाली. मी लहान असताना हे दिवस मला येतील अशी कल्पना मला आली असती तर किती बरे झाले असते ! तेव्हा मी पूर्वेकडील कथा वाचायचे आणि स्वप्नात बघायचे, की मी हिंदुस्तानात आहे आणि महाराजांनी योजलेल्या समारंभात सहभागी झाले आहे. ते एक स्वप्न होते –  परिकथेसारखे. पण आज तो दिवस उगवला होता. आम्ही मायलेकी चांगला, सुव्यवस्थित पोशाख करून चहापानासाठी निघालो, पण दुर्दैव. पावसाने चिखल इतका झाला होता, की छावणीतील नोकराला आम्हाला उचलून तंबूत नेऊन ठेवावे लागले.”

ती शेरसिंग याचा पोशाख कसा होता याचे वर्णन तपशीलवार करते. शेरसिंगाने तिला सांगितले, की ते आणि त्यांची सारी पलटण ही राजपूत लोकांची आहे. ते लढाऊ वृत्तीचे व अत्यंत सौजन्यशील आणि हिंदुस्तानातील सर्वात देखण्या अशा जातीत जन्मलेले आहेत. ती स्वतःच्या ज्ञानाचा दुजोरा शेरसिंगाच्या विधानास देते- “मला याचे आश्चर्य वाटले नाही. पलटणीतील तीन चतुर्थांश लोक देखणे होते. लोककथा सांगतातच, की उदयपूर आणि जोधपूर येथील राजवंशातील लोक हे रामाचे- सूर्याला जिंकणाऱ्याचे- वंशज आहेत. शेरसिंग याने तिने केलेली रेखाटने बघितली, त्यांचे कौतुक केले. तेव्हा ती त्याला म्हणाली, “शीख लोक आमच्या कोसॅक लोकांसारखे आहेत. ” यावर छावणीतील लोकांनी कौतुकोद्गार काढले. “इतक्या दूर अंतरावरील देशांतील सैनिक आमच्या शूर कोसॅक लोकांबद्दल पेपरमधून वाचत असतात हे आम्हाला आतवर स्पर्शून गेले.” तिने तो निष्कर्ष कशावरून काढला त्याचे उत्तर पुढील घटनेतून मिळते -शेरसिंग याला छावणीच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याने मायलेकींना विनंती केली, की त्यांनी शेरसिंगांना हव्या असलेल्या काही वस्तू बाहेरून आणून द्याव्यात. त्या वस्तू म्हणजे- अनेक रीम कागद, त्यांना शोभतील असे लिफाफे, शेरसिंग याच्या डॉक्टरांसाठी बूट, हजारो सिगारेटी आणि एक वृत्तपत्र- Daily Mail. त्या खरेदीचा हिशोब केला गेला तेव्हा असे आढळले की शेरसिंग याने छावणीत प्रवेश करण्यापूर्वी याच वस्तू खरेदी केल्या तेव्हा त्यासाठी तिप्पट रक्कम मोजली होती !

तिने म्हटले आहे, की “मला हिंदुस्तानात जावंसं वाटतं. किती सुरेख देश असेल तो ! ” त्यावर शेरसिंगाने तिला आश्वासन देत म्हटले, “युद्ध संपेल तेव्हा मी जिवंत असलो तर मी पुन्हा एकदा पॅरिसला येणार आहे. तेव्हा मी तुला हिंदुस्तानात घेऊन जाईन. तेव्हा तू राजवाड्यात राहशील आणि तुला राणीसारखा मान दिला जाईल, तुझ्यावर मोती व हिरे उधळले जातील.” पत्त्यांची देवाणघेवाण झाली आणि मग तिने तिची इच्छा प्रगट केली – शेरसिंगाचे चित्र रेखाटण्याची.

तिने शेरसिंग याचे रेखाटन सुरू केले. “मला कबूल केले पाहिजे, की मला थोडे भय वाटत होते. माझे मॉडेल असलेला पुरुष इतका देखणा होता, त्याचे चित्र चांगले यावे अशीच माझी इच्छा होती. मी चेहेऱ्याचे रेखाटन सुरू केले. मला ते जमेल का? हो. जमेल. डोळे बरोबर आले. बाकीचा चेहराही जमला. तो मुख्य भाग. आता उरल्या त्या त्यांच्या गणवेशाच्या रेषा. झाले !”

अखेर, शेरसिंग याचा मुक्काम हलण्याची वेळ आली तेव्हा त्याने तिला, तिने निरोप देण्यासाठी स्टेशनवर यावे असे सुचवले. तीही दुःख व आनंद अशा हुरहुरीच्या मिश्र भावनेने गेली. त्याच्या गाडीची वेळ कोठली याबाबत समजुतीचा थोडा घोटाळा झाला होता. तो दिसला नाही तेव्हा तिचा जीव खालीवर झाला. अखेर, तो आला आणि मुक्काम हलला. ती लिहिते- “शेरसिंग परत गेला. गाडीत बसला. सारे संपले. खरोखर, संपूर्ण पलटण निघाली होती. त्या सर्व सैनिकांबद्दल मला खूप माया वाटते या विचाराने मला रडू आले. जणू काही माझा एक अंश फाटून निघाला होता. त्यांनी माझ्यासाठी सर्वात उजळ अशी आठवण मागे ठेवली होती.”

शेरसिंग व मासिया यांच्यातील सौहार्द व तिला वाटणारी भारतीय जीवनाबद्दलची आत्मीयता वाचली, की एक प्रेमकथा वाचत आहोत असा भास होतो. मासियाच्या या छोट्या पुस्तकाला उपसंहार आहे. त्यात ती म्हणते- आजच्या या गद्य आणि क्षुल्लक जगात, सर्व देशांचे स्वत्व जात आहे आणि सर्व देश एकमेकांची नक्कल करत आहेत. अशा वेळी हे तपकिरी अंगकांतीचे सैनिक, एक संपूर्ण वेगळा देश उभा करतात ! त्यांनी त्यांच्या इतिहासांत अनेक आक्रमणे सहन केली आहेत, तरीही त्यांनी त्यांच्या आत्मनिर्झराला आटू दिले नाही. त्यांनी त्यांचे पूर्वेकडील स्वच्छ आकाश आमच्या रंगहीन आकाशात आणले. सूर्याचे वंशज, शूर व सभ्य क्षत्रिय, त्यांनी आमच्या सर्वसामान्य ऐहिक चिंतांवर उबदार असा प्रकाशाचा किरण आणला. त्यांनी आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. माझ्यापुरते म्हणाल तर खूप काळापूर्वी विस्मृतीत गेलेल्या ‘अरेबियन नाइट्स’च्या स्मृती स्वच्छ जाग्या झाल्या. मला ते पुन्हा भेटतील की नाही कोण जाणे, पण ज्यांनी त्यांना पाहिले आहे ते या जगाच्या दुसऱ्या टोकाहून आलेल्या आणि सत्य व न्याय यांच्या विजयासाठी आमच्या सामायिक शत्रूंविरूद्ध लढणाऱ्यांना विसरू शकणार नाही हे निश्चित.”

प्रस्तुत पुस्तकाची एक आवृत्ती Peter Harrington या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली. कंपनीच्या peterharrington.co.in या वेबसाईटवरील पुस्तकाच्या परिचयात ही माहिती दिली आहे.

ह्या पुस्तकाची पी डी एफ मला संजय सहस्त्रबुद्धे यांनी पाठवली. त्यांचे मनःपूर्वक आभार. या पुस्तकाची लिंक सोबत जोडली आहे.

– मुकुंद वझे 9820946547 vazemukund@gmail.com

————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here