चार्ल्स डिकन्सची ‘A Tale of Two Cities’ ही प्रसिद्ध कादंबरी सर्वांना परिचित आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील दोन गावे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने ओळखली जातात; त्यांची गोष्ट फार मनोवेधक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही दोन्ही गावे राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मोडतात. त्यांतील एकाचे नाव आहे ‘जॉर्जपेठा’ तर दुसऱ्याचे नाव आहे ‘ग्लासफर्डपेठा’.
‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही !
दक्षिण चांदाचे उपवनसंरक्षक एच.एस. जॉर्ज बेजुरपल्ली गावात 9 नोव्हेंबर 1924 च्या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यांना प्राणहिता नदीकाठावरील पारसेवाडा या गावात सर्वेक्षणाकरता जायचे होते. बेजुरपल्ली ते पारसेवाडा हे अंतर जेमतेम पंधरा किलोमीटर, पण ती वाट निबिड, नीरव, शांत अशा घनदाट जंगलातून जात असे. त्या काळी त्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल यांच्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर स्वैर होता. त्यामुळे एकटा-दुकटा माणूस त्या जंगलात पाऊल ठेवायलासुद्धा घाबरत असे. ते जंगल पूर्वीसारखेच घनदाट आणि भयावह आहे.
जॉर्ज यांना संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी सोबतीला मुडेवाही नावाच्या गावातून सामा वेलादी हा माडिया गोंड आदिवासी वाटाड्या म्हणून घेतला. जंगल तर भीतीदायक होतेच, त्यात शिवाय अवघड असे नदी-नाले ओलांडावे लागत होते. जॉर्ज यांनी त्यांच्यासोबत 12 बोअरची शॉटगन ठेवली होती. वाटेत एका ठिकाणी त्यांनी सामाच्या हातात बंदूक देऊन सामाला पुढे काही अंतरावर उभे राहण्यास सांगितले आणि ते स्वत: लघुशंकेसाठी एका भल्यामोठ्या शिळेमागे गेले. जॉर्ज यांच्या दुर्दैवाने तेथे, त्या परिसरात दहशत माजवणारा नरभक्षक वाघ दबा धरून बसला होता ! त्या वाघाने निमिषार्धात जॉर्ज यांच्यावर मागून झडप घातली आणि जॉर्ज यांच्या गळ्याला करकचून पकडले. त्याच्या धारदार नख्या व तीक्ष्ण दात हे जॉर्ज यांच्या मानेच्या मांसल भागात खोलवर रूतले. वाघाने त्याच्या बळकट पायांनी जॉर्ज यांना कवेत घेऊन घेरले होते. त्या वाघाने जॉर्ज यांच्या पायांमध्ये त्याचे शेपूट फैलावत त्यांना डझनभर यार्डापर्यंत फरफटत नेले. जॉर्ज त्या अचानक हल्ल्याने सुन्न होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांनी त्यांची शुद्ध हरपण्याआधी एक क्षीण किंकाळी मारली. त्यामुळे सामा सावध झाला. त्याने पाहिले तर वाघ रक्तस्त्रावाने शुद्ध हरपलेल्या जॉर्ज यांना घनदाट झाडीत खेचून नेत होता. सामा प्रसंगाचे गांभीर्य ओळखत, क्षणाचाही विलंब न लावता जॉर्ज यांच्या दिशेने धावला. त्याने त्याचा मोर्चा वाघाकडे वळवून थरथरत्या हातांनी बंदुकीचा चाप खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती बंदूक सामाकडे देताना जॉर्ज यांनी ती लॉक केली होती. बंदुकीतून गोळी काही सुटेना. तेवढ्यात वाघाने सामाकडे पाहिले आणि एक भीषण डरकाळी फोडली. वाघ सामावर झेपावणार तितक्यात प्रसंगावधान राखून सामाने बंदूक उलटी फिरवून तिच्या दस्त्याने वाघाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो वाघ अधिकच संतापला आणि भीषण डरकाळ्या फोडू लागला. त्या डरकाळ्या इतक्या भयावह होत्या की कोणीही घाबरून तेथून पळ काढला असता. परंतु सामाने तसे न करता जीवाची बाजी लावून त्या गोऱ्या साहेबाला वाचवण्याचे मनाशी पक्के ठरवले होते. मानेचा लचका तोडल्याने रक्तबंबाळ झालेल्या जॉर्ज यांचे शरीर सामाला डोळ्यांसमोर दिसत होते. जाणारा एकेक क्षण जॉर्ज यांना मृत्यूच्या विळख्यात घट्ट जखडत होता. त्यामुळे सामा जॉर्जसाहेबांना वाचवण्याकरता जीवावर उदार होऊन वाघावर तुटून पडला. तो त्याची सगळी शक्ती एकवटून बंदुकीच्या दस्त्याने वाघाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करत राहिला.
वाघ त्या प्रहाराने गांगरून गेला आणि दूर हटला; परंतु फक्त क्षणभर. तो ओढ्याला फेरा मारून, गर्द झाडीतून पुन्हा सामावर चाल करून आला. तोपर्यंत सामाने जॉर्जसाहेबांचे रक्ताळलेले शरीर त्याच्या बाजूने ओढले आणि तो वाघाच्या पुढील हल्ल्याला तयार झाला. संतापलेला वाघ अधिक आक्रमक होऊन त्याच्या शिकारीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. तो सामावर झेपावण्याच्या तयारीत असतानाच, सामाने त्याच्या तोंडावर पुन्हा एकदा बंदुकीचा जोरदार तडाखा मारला. आता तर, वाघानेसुद्धा संतापून बंदुकीचे तोंड पकडण्याची पराकाष्ठा केली, त्या झटापटीत सामाने बंदुकीचा दस्ता वाघाच्या घशात कोंबला. जॉर्ज यांच्या रक्ताने माखलेले त्याचे विक्राळ तोंड, रक्ताळलेले दात आणि तोंडातून पडणारी फेसाळणारी लाळ यामुळे तो नरभक्षक वाघ अधिकच क्रूर आणि भेसूर दिसत होता. दरम्यान, वाघाच्या कर्णकर्कश गर्जना आणि सामाच्या सर्व शक्तीनिशी मारलेल्या किंकाळ्या यांमुळे जॉर्ज यांना शुद्ध आली, पण ते सावरून उभे राहण्याच्या प्रयत्नांत पुन्हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. शेवटी, वाघाने सामाच्या हल्ल्यासमोर माघार घेतली आणि तो जंगलातील गर्द काळोखात नाहीसा झाला.
जॉर्ज यांच्या मानेवरील जखमेतून रक्तस्त्राव मुक्तपणे होतच होता. वाघाचे तीक्ष्ण दात त्यांच्या मानेत खोलवर रुतले होते. परंतु सुदैवाने मानेतून रक्त वाहून नेणारी जग्युलर रक्तवाहिनी तुटली नव्हती, त्यामुळे ते बचावले होते. अन्यथा जागीच त्यांचा प्राण गेला असता. सामा वेलादीने त्याच्या खांद्यावर जॉर्जसाहेबांना घेतले आणि तो परतीच्या दिशेने मुडेवाहीकडे धावू लागला. रक्ताच्या वासाने वाघ पुन्हा त्या दोघांच्या मागावर येत आहे हे लक्षात येताच सामाने त्याचा वेग वाढवला आणि तो जोरदार आरोळ्या ठोकत एका हाताने बंदूक उगारून धावत सुटला. सामाच्या त्या आवेशामुळे शेवटी वाघाने त्यांचा पाठलाग सोडला. सामा जॉर्जसाहेबांना खांद्यावर घेऊन सर्व शक्तीनिशी मुडेवाही गावाच्या दिशेने धावत राहिला.
मुडेवाही गावात पोचल्यावर जॉर्ज यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले, परंतु लागलीच त्यांना तेथून हलवून सिरोंचा येथे नेण्यात आले, मग काही दिवसांतच चंद्रपूरला हलवण्यात आले. थोडी तब्येत सुधारल्यावर त्यांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. जॉर्ज यांच्यावर तेथे उपचार होऊन, शेवटी, लंडनला पुढील उपचारासाठी नेण्यात आले. त्या प्राणघातक हल्ल्यातून वाचून, पूर्णतः बरे होऊन जवळपास आठ महिन्यांनी जॉर्ज भारतात परतले, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल ! एच.एस.जॉर्ज हे 1924 मध्ये दक्षिण चांदा वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक (Deputy Conservator of Forests) होते. ते 1946 मध्ये संपूर्ण मध्य प्रांताचे सर्वोच्च वनाधिकारी म्हणजे ‘मुख्य वनसंरक्षक’ (Chief Conservator of Forest) पदावरून सेवानिवृत्त झाले.
सामाने जॉर्जसाहेबांस खांद्यावर घेऊन साधारणतः चार किलोमीटर अंतर कापले होते. वाघ त्या दोघांच्या मागावर त्या मार्गावर जवळपास एक किलोमीटरपर्यंत होता. वाघ सामाच्या सततच्या किंकाळ्यांमुळे आणि हल्ल्यामुळे त्यांच्यापासून दूर राहिला. परंतु त्याच दिवशी, वाघाने एका गावकऱ्याला ठार मारले होते. वाघाला नरभक्षक म्हणून त्या घटनेनंतर घोषित करण्यात आले. त्याने त्यानंतर काही महिन्यांत जवळपासच्या गावातील अनेक लोकांना ठार मारले. नंतर तो त्या भागातून अचानक कायमचा नाहीसा झाला.
ही गोष्ट तेथेच संपली नाही. असाधारण धैर्य आणि शौर्य दाखवून एच.एस. जॉर्ज या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचवल्याबद्दल ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी सामा वेलादी याला ‘अल्बर्ट शौर्यपदक’ जाहीर केले. ‘अल्बर्ट मेडल फॉर गॅलण्ट्री इन लाइफसेव्हिंग’ हे ब्रिटिश पदक अशा नागरिकांना दिले जात असे, की ज्यांनी त्यांचा स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. युद्धभूमीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दलचा तो अत्यंत प्रतिष्ठित असा नागरी पुरस्कार होता. ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांच्या पतीच्या – प्रिन्स अल्बर्ट यांच्या – नावे 7 मार्च 1866 रोजी त्याची सर्वप्रथम सुरुवात केली. हा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार प्राप्त करणारा सामा वेलादी हा एकमेव भारतीय आदिवासी आहे.
सामाला त्या पुरस्कारासोबत पंचेचाळीस एकर जमीन बहाल करणारी सरकारी सनद, बैलजोडी, चांदीचा कमरपट्टा, त्याच्या शौर्याचे अंकन केलेला चांदीचा बाजूबंद आणि रोख बक्षीस मिळाले. त्याला त्याच्या गावाचा प्रमुखदेखील नेमण्यात आले. सामा पुरस्कार घेण्यासाठी अर्थातच लंडनला जाऊ शकत नसल्याने मध्य प्रांताचे राज्यपाल सर फ्रँक ली यांनी त्याला जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) येथे बोलावून घेतले. अल्बर्ट मेडल देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी सामा केवळ एक लंगोट लावून गेला होता. त्यामुळे ते मेडल कोठे अडकावायचे असा अनोखा पेच राज्यपालांना पडला होता. शेवटी, सामाच्या गळ्यात एक रिबन घालून त्यात ते मेडल गोवण्यात आले होते. असा चमत्कारिक प्रसंग पहिल्यांदाच घडल्याने त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. सामाला अल्बर्ट मेडल जाहीर झाल्याची अधिसूचना 12 मे 1925 च्या लंडन गॅझेटमध्ये आली आहे, पण त्याला पंचेचाळीस एकर जमीन बहाल करणारी सनद जारी झाली ती 28 मे 1945 रोजी. या दोन घटनांमध्ये वीस वर्षांचा काळ गेला होता. ही जमीन ताब्यात मिळवण्यासाठी सामा वेलादी सरकार दरबारी खेटे घालत असताना, भारतावरील ब्रिटिशांची सत्ता संपली आणि नव्या राजवटीतही सामा वेलादी खेटे घालतच राहिला.
सामाच्या परिवाराच्या बाबतीत शंभर वर्षांनंतरची, 2023 सालची शोकांतिका ही आहे, की पुरस्कार म्हणून देऊ केलेली पंचेचाळीस एकर जमीन त्यांना मिळालेली नाही. त्यांपैकी वीस एकराची सुपीक गाळाची जमीन ही प्राणहिता नदीच्या पुरात दरम्यानच्या काळात वाहून गेल्याचे कारण पुढे करत शासकीय अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. या सत्यकथेचा नायक सामा वेलादी 1959 मध्ये मरण पावला. तरीही त्याच्या हक्कासाठी त्याच्या परिवाराचा संघर्ष चालूच आहे. बक्षिस मिळालेल्या चांदीच्या वस्तू त्याच्या परिवाराकडे जतन केलेल्या आहेत, जमीन मात्र त्यांना कधी मिळालीच नाही ! सामा वेलादीच्या परिवाराच्या जमीन ताब्यात मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रस्तुत लेखकही त्यांच्यासोबत सहभागी आहे.
– अमित भगत 7722071687 amit_264@yahoo.co.in
————————————————————————————————–
अद्भुत साहस आणि खूपच रंजक कथा.. सामा च्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या प्रयत्नांना यश मिळो.
बापरे किती धारीष्ट्य सामा वेलादी यांना त्रिवार सलाम
धन्यवाद!!
वाचनीय लेख…
धन्यवाद!!
इतिहासातील एक शौर्यगाथा अमित यांनी अतिशय उत्कटतेने वाचकांपर्यंत पोहोचवली.
ह्या कथेच्या खऱ्या नायकाला बक्षीस मिळालेल्या जमिनीसाठी हयातभर खेटे घालावे लागते ही त्याची शोकांतिका आहेच आणि संवेदनाहीन सरकारी व्यवस्थेची लाजिरवाणी स्थिती आहे. तीत बदल होणार की नाही?