तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. सुदाम्याचे पोहेहा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. ते बहु असोत सुंदर, संपन्न की महान या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी शाळेत शिकत असतानाच लेखनास सुरुवात केली. त्यांनी त्यावेळी सुखमालिका हे नाटक लिहिले. अर्थात, त्याचे प्रयोग झाले नाहीत. वा पुढे ते फार नावारूपासही आले नाही, पण कॉलेजमध्ये असताना, वयाच्या तेविसाव्या वर्षी तात्यासाहेबांनीवीरतनयहे नाटक लिहिले. ते नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी 1896च्या मे महिन्यात रंगभूमीवर आणले. मग नाटककार म्हणून श्रीपाद कृष्ण गोखले ऊर्फ तात्यासाहेब कोल्हटकर हे नाटकवेड्या रसिक प्रेक्षकांना माहीत झाले व आवडूही लागले. त्यांचे मूकनायकहे नाटक विशेष गाजले, पण त्यांना त्यांच्या नाटकांचे मृत्यू त्यांच्या हयातीतच पाहण्यास लागले.

कोल्हटकर यांचा पहिला विनोदी लेख साक्षीदार विविध ज्ञानविस्तारात 1903 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांचा अठरा धान्यांचे कडबोळेहा पहिला विनोदी लेखसंग्रह 1910साली प्रसिद्ध झाला. सुदाम्याचे पोहेहा बत्तीस विनोदी लेखांचा संग्रह 1921साली प्रसिद्ध झाला. श्रीपाद कृष्ण हे नाटककार असूनही नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, पण ते पुणे येथे भरलेल्या तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1927साली झाले.

कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे बी ए, एलएल बी असे शिक्षण झाले होते. त्यांना इंग्रजी नाटके, कादंबऱ्या वाचण्याची आवड. त्यांची साहित्यनिर्मिती ही वकिली व्यवसायात असतानाच सुरू होती.

त्यांनी वकिली अकोला, खामगाव, जळगाव-जामोद या ठिकाणी केली. ते आयुष्याच्या अखेरीस जळगावला स्थायिक झाले. त्यांच्या नावावर असलेले साहित्य म्हणजे मूकनायक’, ‘वीरतनय’, ‘वधुपरीक्षा यांसारखी एकूण तेरा नाटके, अठरा धान्यांचे कडबोळेसुदाम्याचे पोहेहे दोन विनोदी लेखसंग्रह, श्यामसुंदरदुटप्पी की दुहेरी या कादंबऱ्या आणि आत्मवृत्त हे आत्मचरित्र.

त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे, की मराठी भाषा ही दुय्यम शिक्षणात माध्यम व वरिष्ठ शिक्षणात ऐच्छिक झाल्यापासून अनेक चांगल्या शालोपयोगी पुस्तकांची निर्मिती होऊ लागली आहे. इंग्रजी वाङ्मयाकडे फाजील पक्षपाताने झुकत चाललेली महाराष्ट्रीयांची दृष्टी परत खेचून मराठी भाषेकडे वळती करण्याचे मुख्य श्रेय मराठी भाषेत स्वतंत्र व सरस ग्रंथरचना करणाऱ्या लेखकांसच दिले पाहिजे.

ते सांगली येथे 1920 साली भरलेल्या तिसऱ्या ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठी कवितेवर त्यांचा नितांत जीव होता. ते स्वत: कविता करत. त्यांचा मृत्यू 1 जून 1934 रोजी झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

———————————————————————————————————————–

महाराष्ट्र  गीत

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

 

         गगनभेदी गिरिविण अणुनच जिथे उणे ।
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ।
अटके परी जेथील तुरूंगि जल पिणे ।
तेथ अड़े काय जलाशय – नंदांविणे ।।
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। १ ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नान्  वा मौक्तिकांही मूल्य मुळि नरे ।
रामणीची कूस जिथे नृमणि – रवनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलहि गृहा गृहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। २ ।।

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूंचेहि शौर्य मावळे ।
दौड़त चहुकडूनि जवें स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शामितबल अहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ३ ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्किर्ति अशी विस्मयावहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ४ ।।

गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो ।
स्पूर्ति दीप्ति द्रुतिहि देत अंतरी वसो ।
वचनि लेखनिहि मराठी गिरी दिसो ।
सतत महाराष्ट्र – धर्म मर्म मनि वसो ।
देह पडो सत्कारणि ही असे स्पृहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ५ ।।

—————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here