‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या सर्व हितचिंतकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! ‘मोगरा फुलला’ या दालनाला साक्षेपी वाचकांचा चांगला पाठिंबा मिळतो आहे ही आनंदाची बाब आहे.
नव्या वर्षाची सुरुवात करताना एका कर्तृत्ववान व्यक्तीचा परिचय करून देत आहोत. त्याआधी थोडे सामान्यज्ञान. Visa (व्हिसा) म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्यासाठीचा परवाना, जो पारपत्रावर नोंदवलेला असतो. Visus हा लॅटिन शब्द व्हिसा या शब्दाचे मूळ आहे. त्याचा अर्थ ‘पारखून घेतलेला’. भारतातूनच नाही, तर जगभरच्या देशांतून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा जारी केले जातात. त्यात EB-1A नावाची एक श्रेणी असते. त्यालाच ‘आइनस्टाईन व्हिसा’ म्हणतात. हा व्हिसा असामान्य क्षमता, कौशल्य असणाऱ्या गैर-अमेरिकनांना कायमस्वरूपी निवासासाठी दिला जातो.
आज ज्या मराठी व्यक्तीचा परिचय करून देण्यात येणार आहे त्यांचे नाव मंगेश घोगरे. आइनस्टाईन व्हिसा मिळालेल्या या असामान्य कौशल्य असणाऱ्या तरूण माणसाविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया. विशेष म्हणजे डी.जी. रूपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कला शाखेत, तृतीय वर्षात शिकणाऱ्या सानिका म्हसकर आणि तनुजा पाटील या दोन विद्यार्थीनींनी घोगरे यांचा परिचय करून दिला आहे.
घोगरे यांच्याविषयी आंतरजालावर उपलब्ध असणारी माहिती आणि दोनच आठवड्यांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखतीवर आधारित हा लेख आहे तर काही तपशील घोगरे यांनी स्वत: पुरवले आहेत.
‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
मंगेश मुंबईकर घोगरे
वर्तमानपत्र वाचताना ताज्या बातम्या, वेगवेगळ्या विषयांवरचे लेख यांच्या इतकेच शब्दकोडे हा आकर्षणाचा विषय असतो. फावल्या वेळात ‘तुम्ही काय करता’? असे विचारल्यावर अनेकजण ‘आम्ही शब्दकोडी सोडवतो’ असे उत्तर देतात. बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही किंवा स्वत: तयार केलेले शब्दकोडे एखाद्या वर्तमानपत्रात छापून यावे; अशी इच्छा बाळगत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली. त्या व्यक्तीचे नाव मंगेश घोगरे. ते पेशाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. मात्र शब्दकोडी बनवणे हा त्यांचा छंद, आवड आणि काम असे सगळे काही आहे. शब्दकोडी बनवण्यात तरबेज असलेल्या या मराठी माणसाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. त्यांनी तयार केलेली शब्दकोडी न्यूयॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द वॉल स्ट्रीट जर्नल अशा परदेशांतील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांत छापून येतात. इतकेच नाही, तर न्यूयॉर्क टाईम्सने त्यांच्यावर 18 डिसेंबर 2023 रोजी एक स्टोरी केली आहे.
तर ‘अपवादात्मक कौशल्य’ (आउटस्टॅन्डिंग स्कील) असणाऱ्या मंगेश घोगरे यांच्याविषयी जाणून घेऊया ! चव्वेचाळीस वर्षे वयाच्या मंगेश घोगरे यांचा जन्म चंद्रपूरचा पण ते वाढले पनवेलमध्ये. त्यांनी शालेय शिक्षणानंतर अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील माटुंग्याच्या ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट’ मध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर ‘नरसी मोनजी इन्स्टिट्यूट’मधून एमबीएची पदवी मिळवली. त्यांनी एमबीए केल्यानंतर इनव्हेस्टमेंट बँकर म्हणून करियरची सुरुवात केली. ते अमेरिकेत 2022 मध्ये स्थलांतरित झाले तेव्हा ते ‘नोमुरा इंडिया’ या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि इक्विटी कॅपिटल मार्केट डिव्हिजनचे प्रमुख होते. त्यापूर्वी त्यांनी एसबीआय कॅपिटल आणि एचएसबीसीमध्ये सुद्धा कार्यपालक निदेशक (Executive Director) म्हणून नोकरी केली होती. ‘फॉर्च्युन’ मासिकाच्या ’40 Under 40′ ह्या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीतही मंगेश यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील ‘Speaking Tree’ ह्या स्तंभासाठीही लिखाण केले आहे.
मंगेश घोगरे यांना लहानपणापासूनच शब्दकोड्यांचे वेड होते. ते शाळेतही वर्गात बसून शब्दकोडी सोडवत असत. त्या वेडापायी अनेकदा त्यांना वर्गाबाहेर उभे राहावे लागे. ते सांगतात, की “तेव्हा माझे मित्र मला हसायचे पण तेच मित्र आता मी त्यांचा मित्र आहे हे अभिमानाने सांगतात”. ते आणि त्यांचे मित्र महाविद्यालयात शिक्षण घेत असताना परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी इंग्लिश सुधारण्याकरता टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकातली शब्दकोडी सोडवायला सुरुवात केली. ती शब्दकोडी सोडवणे हे वाटते तितके सोपे काम नव्हते. त्यांच्या अनेक मित्रांनी कठीण आहे असे म्हणत शब्दकोडी सोडवण्याचा उद्योग अर्ध्यावर सोडून दिला मात्र मंगेश यांनी त्यांचा सराव नेटाने सुरू ठेवला. ते अभ्यास करून रोजच्या रोज शब्दकोडी सोडवत असत, रोज नवी टिपणे काढत. त्यांची वही वेगवेगळ्या विषयांवरच्या शब्दांमध्ये आणि संकल्पनांमध्ये विभागलेली होती. उदाहरणार्थ; धर्म, प्राणी, भौगोलिक परिस्थिती, फुले, झाडे, निसर्ग इत्यादी. त्यांनी त्यांचा स्वतंत्र छोटा विकिपीडिया तयार केला होता. त्यांना सततच्या अभ्यासानंतर संपूर्ण शब्दकोडे सोडवता येऊ लागले. आता हा फक्त अभ्यास राहिला नसून तो छंद झाला होता.
त्यांचे आयुष्य शब्दकोड्याने संपूर्ण बदलून टाकले. ते अधिकाधिक सरावाने शब्दकोडी सोडवण्यात प्रगती करत होते. दरम्यान त्यांनी GMAT ची परीक्षा दिली पण अमेरिकेत न जाता भारतातच एमबीए करण्याचा निर्णय घेतला. शब्दकोडी सोडवता सोडवता ती तयार करण्याची आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. शब्दकोड्यांचा निर्माता म्हणून स्वत:चे नाव यावे आणि त्याचा आईवडिलांना अभिमान वाटावा अशी त्यांची इच्छा होती.
मंगेश यांनी तयार केलेले शब्दकोडे बऱ्याच प्रयत्नांनंतर लॉस एंजेल्स टाईम्समध्ये पहिल्यांदा 2010 साली छापून आले. अमेरिकन शब्दकोडी सोडवणे गैर-अमेरिकन लोकांसाठी अवघड असते कारण त्या संस्कृतीशी, इतिहासाशी आणि तिथल्या इतर क्षेत्रांशी, घडामोडींशी परिचय नसतो. मंगेश घोगरे यांनी अमेरिकन शब्दकोडी सोडवण्यात प्राविण्य मिळवले इतकेच नाहीतर ‘अमेरिकन शब्दकोडी’ तयार करण्यावरही प्रभुत्व मिळवले. ‘मुंबई’ ह्या संकल्पनेवर आधारित त्यांचे दुसरे शब्दकोडे ‘मंगेश मुंबईकर घोगरे’ ह्या मथळ्याखाली लॉस एंजेल्स टाईम्समध्ये छापून आले. न्यूयॉर्क टाईम्स ह्या वर्तमानपत्रात अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित मंगेश यांचे शब्दकोडे 2014 साली छापण्यात आले. त्यांच्या त्या यशाची दखल घेऊन टाईम्स ऑफ इंडियात त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. त्यांची शब्दकोडी मुंबईतल्या ‘काळा घोडा’ महोत्सवात मोठ्या आकारात प्रदर्शित झाली होती.
त्यांनी 2014 नंतर अमेरिकेतील लोकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी शब्दकोडी बनवण्याचा ध्यास घेतला आणि तशी त्यांना संधीही मिळाली. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यदिनी ‘ताजमहाल’ ह्या संकल्पनेवर आधारित शब्दकोडे न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापण्यात आले. विशेष म्हणजे त्या शब्दकोड्याची रचना अशाप्रकारे केली आहे की, त्यातून ताजमहालाचा आकार दिसतो. त्यांनी भारतीय शब्दांची ओळख करून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एका विशेष शब्दकोड्याची रचना 2019 मध्ये केली होती आणि ते शब्दकोडे देखील न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केले होते. ते अमेरिकेच्या इतिहासाविषयी शब्दकोडे तयार करणारे पाश्चिमात्य जगाच्या बाहेर जन्माला आलेले एकमेव गैर-अमेरिकन आहेत. भारतात जशी शब्दकोडी सोडवणाऱ्यांची जमात आहे तशी अमेरिकेतही आहे. त्या लोकांमध्ये मंगेश यांना त्यांचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक सापडले. त्यांना अमेरिकन शब्दकोड्यांची ख्यातनाम निर्माती नॅन्सी सालोमन यांनी अगत्याने मार्गदर्शन केले.
भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे ते 2012 साली न्यूयॉर्क टाईम्स आयोजित ‘अमेरिका क्रॉसवर्ड टुर्नामेंट’चे परीक्षक राहिलेले आहेत. ते त्या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. या सगळ्या यशोगाथेमधली अजून एक कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांच्या कौशल्याची दखल घेत 2022 साली ‘असामान्य कौशल्य’ असणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘EB-1 Visa’ म्हणजेच ‘आइन्स्टाइन व्हिसा’ मंगेश ह्यांना देण्यात आला.
त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आले होते, की ‘तुम्ही आनंदाची व्याख्या कशी कराल?’ त्यावर ते म्हणाले, “सगळे चौकोन भरून शेवटी जेव्हा काही जागा शिल्लक असतात आणि अचानक एक उत्तर डोक्यात येते, त्या उत्तराने ती चौकट भरून जाते तो ‘युरेका क्षण’ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा आहे. नंतर आपण खूप वेळ त्या जादूई क्षणाबद्दल विचार करत असतो की, नेमके त्याच क्षणी हे उत्तर कसे सुचले. शब्दकोशातला शब्द शोधणे हे सगळ्यांसाठी त्या शब्दाचा अर्थ शोधण्यापर्यंत मर्यादित असेल मात्र त्यांच्यासाठी त्यातला एक एक शब्द म्हणजे आयुष्याचा अर्थ उलगडण्यासाठी केलेला प्रवास आहे, असे ते सांगतात.” इतक्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये ज्यांचा आनंद दडला आहे ते मंगेश घोगरे तरूण पिढीसाठी आदर्श ठरू शकतात.
त्यांची www.mangeshghogre.com ही वेबसाईट आहे. ते त्या वेबसाईटवर रोज एक छोटे शब्दकोडे विनामूल्य पोस्ट करतात. जीवनाची चौकट भरायला माणूस नाना तऱ्हेच्या गोष्टी करत असतो; ठरवून दिलेले, साचेबद्ध आयुष्य जगत असताना, मंगेश यांच्यासारखी थोडा ‘हटके’ विचार करणारी माणसे इतरांनाही चौकटीबाहेर बघण्याची प्रेरणा देतात.
– सानिका म्हसकर 8793447782 manasimhaskar1974@gmail.com
– तनुजा पाटील 7977668334 tanujapatil0207@gmail.com
Exceptional hobby and great perseverance. Kudos !
खूपच प्रेरणादायी लेख. हा लेख शाळाशाळांमध्ये वाचला जायला हवा. यातून मुलांचे आयुष्य घडू शकते. मुख्य म्हणजे दोन महाविद्यालयीन मुलींना हा लेख लिहावासा वाटला हे विशेष. त्यांचेही अभिनंदन !
छान माहिती…