माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव

शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था ‘आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह’ म्हणून ओळखली जाते.

आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह (शेवगाव) या मातृसंस्थेचे दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग, नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि महात्मा फुले समता विद्या प्रसारक मंडळ हे तीन घटक आहेत. आबासाहेबांचे चिरंजीव शिवाजीराव हे त्या शिक्षणसमूहाचे कर्णधार आहेत. ते संस्थेचे संवर्धन हिकमत व निर्धार या गुणांच्या जोरावर करत आहेत. ‘माझी संस्था’ चे ध्येय Unto the last child हे आहे. म्हणजे शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण पोचवणे ! संस्थेचा पसारा त्या आत्मीय भावनेने शेवगाव या मूळ व पाथर्डी, कर्जत, नगर या सभोवतालच्या तालुक्यांमध्ये पसरला आहे. तळागाळाच्या घटकांतील हजारो मुले-मुली त्या विविध शाळा-कॉलेजांत दर्जेदार शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबर राहण्या-जेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येते. त्याकरता संस्थेने ठिकठिकाणी वसतिगृहे उभी केली आहेत.

संस्थेचा कार्यविस्तार माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा, बालगृहे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, सी बी एस ई शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डी एड, बी एड कॉलेज, डी फार्मसी-बी फार्मसी कॉलेज, संगणक संस्था व अनेक वसतिगृहे असा आहे. त्या सर्व ठिकाणी मिळून पंधरा हजार विद्यार्थी काकडे शैक्षणिक समूहात शिक्षण घेत आहेत. वसतिगृहात नियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बाराशेच्या घरात आहे. आठशे शिक्षक त्या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचे, ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आबासाहेबांची मूळ विचारप्रेरणा आणि शिवाजीराव व हर्षदा काकडे यांचे मार्गदर्शन ही संस्थेची ताकद ठरली आहे.

‘माझी संस्था’ने जिल्ह्यात संगणक प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ वीस वर्षांपूर्वी रोवली. आधुनिक तंत्रज्ञानाचे व त्याच्या वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण सर्वसामान्यांना मिळावे, ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहवे असा हेतू त्यावेळी काकडे यांच्या मनी होता. संस्थेच्या विविध शाखांत पाचशे संगणक आहेत. ‘माझी संस्था’च्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थीही संगणक आत्मविश्वासाने हाताळतात.

संस्थेने अर्थ साक्षरतेवर भर दिला आहे. ते संस्थेचे वेगळे वैशिष्ट्य ठरते. जणू ‘गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले…’ या महात्मा फुले यांच्या उक्तीचे मर्म संस्थेने प्रत्यक्षात उतरवले ! ग्रामीण भागातील विद्यार्थी त्याला ‘अर्थ’ज्ञान प्राप्त न झाल्याने खचतो. पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्याला रोजगार देण्यास फारसे उपयोगी पडत नाही. त्याला स्वयंरोजगारासाठी आवश्यक आत्मविश्वास त्यातून मिळत नाही हे संस्थेने ओळखले. आबासाहेब काकडे कॉमर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपत्ती निर्माण, व्यावहारिक ज्ञान यांबाबत मार्गदर्शन सविस्तर केले जात आहे. संस्थेने विद्यार्थ्याने उद्योजक व्हावे याकरता अनोखा उपक्रम फेब्रुवारी 2020 पासून सुरू केला आहे. त्यात शिक्षण व उद्योग यांची सांगड आहे. त्याचे केंद्र अहमदनगर येथे आहे. उद्देश हाच की विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे मिळावेत !

आबासाहेब काकडे शिक्षण समूह शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखला जातो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतही शहरी मुलांबरोबर टिकावेत म्हणून त्यांना प्राथमिक अवस्थेत सज्ज केले जाते. त्यांना विविध शालाबाह्य परीक्षांच्या माध्यमातून भविष्यातील स्पर्धा वृत्तीचे बाळकडू पाजले जाते. संस्थेतील गुरुजन विद्यार्थ्यांना त्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन करतात. संस्थेतील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश संपादन केले आहे.

‘माझी संस्था’ ने ज्ञानदानाचा प्रवाह ‘कोरोना’सारख्या नैसर्गिक संकटातही थांबू दिला नाही. ती नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली संस्था संपूर्ण महाराष्ट्रात ठरली. संस्थेचे कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून अनोखा उपक्रम राबवला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओची निर्मिती करून; तसेच, ऑनलाईन ॲपच्या साह्याने अभ्यास शिकवला. शिक्षकांनी ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांकडे साधने नाहीत अशा विद्यार्थ्यांना मैलोन् मैल दूर जाऊन गृहभेटीद्वारे मार्गदर्शन केले.

ज्ञानेश्वर गरड 7020576246 garaddnyanesh6@gmail.com

————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here