रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तयाला दिधले शहाबाज हे नाव !!’ असा करतात. तेथे शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, चौकीचा पाडा व घसवड असे पाच पाडे आहेत. शहाबाज गावाला मंदिरांचे गाव म्हणावे इतकी विविध देवतांची मंदिरे तेथे आहेत. टेकडीवरील दत्तगुरु आणि मुरलीधर यांचा वरदहस्त गावावर आहे. त्याशिवाय प्रत्येक पाड्यात हनुमान मंदिरासहित अनेक देवता विराजमान आहेत. त्या सर्व देवतांचे जयंती उत्सव होतात. त्यानिमित्त कथा-कीर्तने-प्रवचने-धार्मिक ग्रंथांची पारायणे यांवर गावकरी खूष असत. ते प्रमाण थोडे कमी झाले आहे.
पण गावाचे वैशिष्ट्य आहे ती तेथील प्राथमिक शाळा. ती 1865 साली सुरू झाली आणि सातवीचा वर्ग 1889 साली. त्यामुळे गावाची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत गेली. ब्रिटिश काळापासून, सातवीची परीक्षा पास केली की शिक्षकाची नोकरी हमखास मिळत असे. स्वातंत्र्योत्तर एका टप्प्यावर अनेकांना शिक्षकाची नोकरी मिळाल्याने त्या गावाला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी लाभली. तेथील वाचन चळवळीला चालना देण्याचा विचार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी केला. त्याबरोबर शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. कमळ विठू पाटील या निर्भय व्यक्तीने ब्रिटिश सरकारने बंदी घातलेली वर्तमानपत्रे आणून गावातील भैरवनाथाच्या मंदिरात त्याचे सामूहिक वाचन सुरू केले. त्यात एक बंडखोरी होती व शिवाय ज्ञानाची, म्हणजेच उन्नयनाची हाक होती. लोकांचा उत्साही प्रतिसाद पाहून हरी जोमा पाटील यांनी विद्यार्थी मंडळाची स्थापना केली. चाळीस-पन्नास विद्यार्थी सभासद झाले. सुशिक्षित त्या निमित्ताने एकत्र झाले. त्यांनी सार्वजनिक मोफत वाचनालयाची मुहूर्तमेढ विठोबा राघो पाटील ऊर्फ खोत यांच्या अध्यक्षतेखाली काशीविश्वेश्वर मंदिराच्या माडीवर रोवली (स्थापना 03/04/1916 रजि. नंबर एम एस जी 313/ सन 1929).
गावात बहुसंख्य शेतकरी समाज, त्यामुळे रोकड पैसा नाही. पर्याप्त निधी संकलन अवघड होऊ लागले. तेव्हा विठोबा पाटील (खोत) आणि सचिव तुकाराम जाखू भगत अशा मंडळींनी मुंबई-ठाणे येथील ज्ञातिबांधवांशी संपर्क साधला. आगरी समाजाचे मुंबई येथील त्या वेळचे मोठे कंत्राटदार कै. मंगळराव रामजी म्हात्रे यांनी भरीव मदत वाचनालयास केली. सुरुवातीस ‘मंगळराम मोफत वाचनालय’ असेच नाव दिले गेले.
संस्थेचे आद्य संस्थापक कै. विठोबाशेठ पाटील यांना ‘शहाबाजचे मुकुटमणी’ असे संबोधले जात असे. कारण त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनकाळात सत्कार्य, सदाचरण, सद्विचार आणि औदार्य या मूल्यांची कास धरली. त्यांचा जन्म धामणपाड्यात सधन कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कमी असले तरी त्यांनी उद्योग-व्यवसायात बाजी व्यवहारचातुर्य, गोड वाणी या जोरावर मारली. सचोटी आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे मोठे भांडवल होते. त्यांनी व्यापारात उत्तम प्रगती साधल्यावर आयुष्यात सामाजिक, शैक्षणिक व समाज संघटनेच्या कार्यास वाहून घेतले. त्यांचे उद्दिष्ट ज्ञातिबांधवांची उन्नती हे होते. त्यांचे विद्यार्थी मंडळाची स्थापना हे काम कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यांनी वाचनालय उभारून वाचन चळवळीचे इवलेसे रोप लावले ते डेरेदार वृक्षाच्या रूपाने बहरतच आहे.
म.सु. पाटील हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षक शहाबाज गावच्या धामणपाड्यात होऊन गेले. त्यांनी शालेय शिक्षणासाठी गाव सोडले. ते तेथील वाचनालयाच्या आनंददायी आठवणी सांगत. ते वाचनाचे महत्त्व कधीच विसरले नाहीत. त्यांनी त्यांच्या गावातील वाचनालयाची भरभराट होण्यासाठी प्रयत्न केले. म.सु. पाटील आणि त्यांच्या सहचारिणी विभावरी यांनी मित्रमंडळींचा संच उभारून नाटकाचा प्रयोग स्वतः करून देणगी जमवली होती. त्यांनी पुढेही सतत वर्षानुवर्षे वाचनालय समृद्ध होईल याकडे लक्ष दिले. त्यांच्या घरात लहान मुलांसाठी वाचनालय सुरू ठेवले. त्यांचे आयुष्य प्राध्यापक म्हणून मनमाडला गेले, तेथेही त्यांनी ग्रंथप्रेम रुजवण्याचे काम केले. त्यांच्या पत्नी विभावरी पाटील यांच्या नावाने वाचनालयात बाल विभाग आहे.
वाचनालयाच्या नवीन इमारतीचा पाया नारायण जाखू भगत आणि तुकाराम जाखू भगत या बंधूंनी स्वखर्चाने 1928 साली घातला. त्यास विद्यार्थी मंडळाने लोकवर्गणी, देणगी जमवून भर घातली. गावकऱ्यांनी श्रमदान केले. दोन हजार पन्नास चौरस फूट बांधीव क्षेत्रफळाचे हे वाचन मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते झाले. ते कदाचित गावस्तरावर स्वतःच्या मालकीची इमारत असणारे जिल्ह्यातील एकमेव असे वाचनालय असावे.
बावीस हजार नऊशेअडतीस एवढे ग्रंथ वाचनालयात आहेत. वाचनालयात अनेक दुर्मीळ ग्रंथ जपून ठेवले आहेत. ‘महाराष्ट्र शब्दकोश’ या केतकर यांच्या दुर्मीळ ग्रंथाचे एकवीस खंड तेथे सुस्थितीत उपलब्ध आहेत. तेथील तत्पर कर्मचारी वर्गाचे सभासद कौतुक करतात. संदर्भग्रंथ हवे असल्यास त्या वाचनालयाला बाहेरगावाहून येऊन भेटी दिल्याची उदाहरणे आहेत. डिजिटायझेशनचा आधुनिक मार्ग तेथील मंडळींनी स्वीकारला आहे.
आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात वाचनालयाचे चारशेचौसष्ट वर्गणीदार आहेत. संस्थेचे एकशेतेवीस आजीव सभासद आहेत. ग्रंथालयात नऊ वर्तमानपत्रे आणि सोळा नियतकालिके येत असतात. ग्रंथालयाची स्वतःची वेबसाईट आहे आणि संस्था इमेल आयडीनेसुद्धा संपर्क साधते. ई लायब्ररी, क्लाऊड डॉट कॉम यांसारखे सॉफ्टवेअर वापरून छोट्या गावातील हे वाचनालयही नव्या जगाशी स्वतःला जोडून घेऊ पाहत आहे. वाचनालयाने आणखी एक पाऊल पुढे टाकत तरुणाईला हाताशी धरत आभासी शिक्षणपद्धत नुकतीच सुरू केली आहे. लहान लहान मुलांना ऑडिओ, व्हिजुअल मार्गाने विषय सोपा करून शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चौथी-पाचवीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षांसाठी तयार करणे, तसेच स्पर्धा परीक्षेसाठी नियमित मार्गदर्शन वर्ग असे उपक्रम राबवले जातात.
शहाबाज सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयास 2016 साली शंभर वर्ष पूर्ण झाली. शतसंवत्सरिक तीन दिवसीय सोहळा झाला. त्याचे वर्णन साहित्य, संस्कृती आणि संगीत यांचा अनुपम्य सोहळा असे वाचण्यास मिळाले. ग्रंथदिंडी, पाच गावांतील पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित रथयात्रा, विविध विषयांवर परिसंवाद, समाज जीवनावर होणारे चांगलेवाईट परिणाम, आगरी समाजाचा उत्कर्ष, कवी संमेलन, लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाचा प्रसार व्हावा यासाठी मुलांच्या वाचनालयाच्या दालनाचे उद्घाटन, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणारे साहित्य आणि मार्गदर्शन या दालनाचे उद्घाटन असे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर गांगल, अशोक नायगावकर हे साहित्यिक आमंत्रित होते. परिसरातील ज्येष्ठश्रेष्ठ नवोदित साहित्यिक उपस्थित होते. सांगितिक मेजवानी होती. नवोदित कलाकारांना घेऊन नाटकही सादर केले गेले.
मी वाचनालयास भेट देण्यास गेले असताना तेथे धडपडणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांतील प्रकाश पाटील आणि मंगेश भगत यांची गाठ पडली. त्यांच्याकडे संस्थेबद्दल प्रचंड आपुलकी जाणवली. त्यांनी अनेक मंडळींनी केलेली मदत आवर्जून सांगितली. त्यात मला आवडलेला उपक्रम म्हणजे ग्रंथालयाने ‘वाचू आनंदे’ हा छोट्या मुलांसाठी वाचनाची गोडी लागावी म्हणून सहा महिन्यांपर्यंत केलेला प्रयोग. त्याचा लाभ सहाशेबेचाळीस मुलांनी घेतला. मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचण्याची मुभा होती. पुस्तक न्या, वाचा, परत करा एवढ्यावर न थांबता जे वाचले त्यावर प्रश्न विचारले जात, छोटीशी परीक्षा होई. विजेत्यांना बक्षिसे दिली जात. तो उपक्रम कोरोनाकाळात थांबला. तालुक्यात सर्वाधिक बालवाचक असणारी ही संस्था आहे. शहाबाजसारख्या छोट्याशा गावातील गरीब शेतकरी वर्गाने स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, त्यात या ग्रंथालयाचा मोठा हातभार आहे हे नि:संशय !!
– वर्षा कुवळेकर 8766569136 varshakuvalekar11@gmail.com



