किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे.
त्यातीलच साधारण तिप्पट-चौपट आकाराचे गुलाबी कागदात बांधलेले खडखडे लाडू, रुखवतात सजवलेले दिसतात. मालवणातून जरा पुढे सावंतवाडी-गोव्याकडे गेले की तेथे तुपात भाजलेल्या कणकेचे पिठी साखर घालून लाडू करतात. काजू, बदामाची पूड घातलेल्या त्या लाडवांना ‘राजभोग लाडू’ म्हणतात. राजभोग लाडू बनवण्यास फार कौशल्य आणि चिकाटी लागते. तुपात कणिक किती आणि कशी भाजावी हे कळण्यास सराईत हात आणि डोळे लागतात. त्याचबरोबर पीठी साखर, तूप आणि कणिक (भाजलेल्या कणकेतील गोडवा लक्षात ठेवून) यांचे प्रमाण बरोबर जमावे लागते. गोव्यावरून बेळगावला आलो की तिथे (खरे तर, गोकाक स्पेशल) ‘लडगी उंडे/लाडू’ मिळतात. लडगी लाडू म्हटले तर कडक बुंदीच्या लाडवांचाच तो प्रकार, पण गुळाच्या पाकात मुरून किंचित फुगलेल्या बुंदीचे ‘लडगी लाडू’ फार चवदार असतात. त्यात काजू, मगज बी, सुके खोबरे, वेलदोड्याची पूड घातलेली असते. हे लाडू गरम गरम बनवायचे असल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून बनवतात. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असावेच लागतात.
‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात. ते लाडू फुटाण्यांची डाळ गूळाच्या पाकात घालून बनवले जातात. त्या भागातील तंबिट लाडू, ते गूळाच्या पाकात सुक्या खोबऱ्याचा कीस, खसखस, तीळ घालून; मग त्यामध्ये राळ्याच्या तांदळाचे पीठ/ नाचणीचे पीठ/ फुटाण्याच्या डाळीचे पीठ/ भाजलेली कणिक यांपैकी एक किंवा यांपेकी काही मिश्र पीठे टाकून बनवतात. वरीचे तांदूळ म्हणतात तसे राळ्याला राळ्याचे तांदूळ म्हणतात. तंबिट लाडू पेढ्यासारखे दिसतात. ते लाडू उत्तर कर्नाटकात, घरोघरी पोरांच्या दुपारच्या खाण्यासाठी डब्यात भरलेले असतात.
साताऱ्याकडे, विशेषतः महाबळेश्वरच्या बाजूला खोबऱ्याचे लाडू करतात. ओले खोबरे भाजून भाजून कोरडे करायचे, गार झाल्यावर ते चांगले बारीक वाटायचे. त्यात दूधावरची साय आणि पिठी साखर घालून लाडू वळतात. कधी त्यात रवाही भाजून घालतात. या लाडवांना ‘आजीबाईंचे लाडू’ म्हणतात. या भागातील ‘दिलबहार इमली-जिऱ्याचे’ चिमुकले लाडूपण प्रसिद्ध आहेत. ती, खरे तर, गोळीच, पण अलिकडे त्यांचा आकार एका लहान लाडवाएवढा बनवलेला असतो. ते पुणे-बंगळूर हायवेवर सगळीकडे मिळतात. साताऱ्याच्या आसपासच्या सर्व गावांत बुंदीच्या लाडवांसारखे शेवेचे लाडू मिळतात. बेसनाची कुरकुरीत शेव काढतात. ती शेव चुरडून साखरेच्या पक्क्या पाकात घालून लाडू करतात. त्या लाडवांना ‘अळीचे लाडू’ म्हणतात. मी तर त्या लाडवांना ‘कळीचे लाडू’च म्हणत असे, पण आमच्या कॉलेजमधील एका मॅडमनी ते कळीचे नसून अळीचे लाडू आहेत असे मला ठासून सांगितल्यावर माझ्याही डोक्यात ‘अळीचे लाडू’ घट्ट बसले. ठाणे जिल्ह्यातील तलासरी भागात ओलसर तांदळाच्या कण्या भाजून, त्या गूळ-खोबऱ्याच्या पाकात घालून ‘कमाल लाडू’ करतात.
एकदा नंदूरबारच्या बाजूला गेले होते; तेथे ‘भूशाचे लाडू’ खाल्ल्याचे आठवते. असलेतसले नाव असले तरी गहू ओलसर करून कांडतात आणि त्याचे जात्यावर पीठ दळून, ते तूपात खमंग भाजून, त्यात सुका मेवा घालतात आणि त्यात बुरा साखर घालून ते लाडू करतात. जळगावला बनवणारे ‘दराब्याचे लाडू’ म्हणजे गहू ओलसर करून काढलेल्या सपीठाचे लाडू. ‘दराबा’ हे काय लाडूचे नाव आहे !
गोंड आदिवासी जमातीत मोहाची फुले, बाभळीचा डिंक, चारोळ्या आणि मध घालून लाडू करतात, त्याचे नाव ‘अस्वलाचे लाडू’. ते म्हणे अस्वलाने शोधले होते. त्या लाडवांविषयी दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘अस्वल’ या पुस्तकातही लिहिले आहे. अस्वल हे लाडू त्याच्या नवप्रसवा मादीसाठी बनवतात.
विदर्भात मुलीच्या लग्नात पूर्वी केशरी, हिरवा असे खाण्याचे रंग घालून भलेमोठे साखरेचे लाडू करत असत. त्यात बहुतेक लिंबाचा रसपण घालत असत. त्या लाडवांचे नाव म्हणे ‘भीम लाडू’. भीम कशाला तसले लाडू खाईल असे आपले मला तेव्हा वाटायचे. नागपूरवरून रामटेकला जाताना वाटेत मनसर नावाचे छोटेसे गाव लागते. त्या गावात मऊ आणि गोड असे मलईचे लाडू मिळतात. त्या मऊ लाडवांना (ते मऊ असल्यामुळेच) माझी आत्या ‘म्हातारीचे लाडू’ म्हणे. वर भोपळ्याच्या गोष्टीतील म्हातारीला तिच्या लेकीने तसलेच लाडू दिले होते असे ती सांगे.
एकदा कानपूरवरून आमच्याकडे आलेल्या एका पाहुण्याने ‘ठग्गू के लड्डू’ आणले होते. तेथील एका मथ्था पांडे नावाच्या, महात्मा गांधी यांच्या भक्त असलेल्या हलवायाने ते लाडू प्रथम बनवले होते. त्या वेळी ब्रिटिशांनी आणलेली पांढरी साखर म्हणजे ‘विष’; रोग निर्माण करणारी अशी समजूत होती. त्यामुळे कोणीही हलवाई मिठाई बनवण्यासाठी पांढरी साखर वापरत नसत. त्या वेळी मथ्था हलवायाने मात्र लालसर भाजलेला रवा, खवा, आटवलेले दूध, बदामाची पूड साखरेच्या पाकात घालून लाडू बनवले. रवा आणि खवा भाजलेला असल्यामुळे त्या लाडवात साखर असेल अशी शंका कोणालाही आली नाही. अशा रीतीने मथ्था हलवायाने लोकांना ठगवले; वर, तो ‘ऐसा कोई सगा नही, जिसको हमने ठगा नही’ हे गाणे गात लाडू विके. खरोखरच, अफलातून चवीचे लाडू अगदी देशभक्तही चवीचवीने खात. तेव्हापासून त्या लाडूचे नाव पडले, ‘ठग्गू के लड्डू’.
सिंध प्रांतातील गंडम लड्डू, हिमाचलमधील गूड बिठू कनक के लड्डू, गढवाल पहाडी प्रदेशातील मांडुआ, कुट्टू लड्डू, छत्तीसगडमधील चोपचिनी लड्डू, चंद्रपूर-भंडाऱ्याकडील कुटकी लड्डू हे सारे लाडूंचे प्रकारही एकदम भारी असतात. पण ते पोराटोरांचे किंवा आजाऱ्यांचे खाणे म्हणून सहसा विकले जात नाहीत.
सगळ्यात भारी लाडू म्हणजे बंगाल प्रांतातील ‘दोर्बेश’. दोर्बेश म्हटले, की संदेशसारखी मिठाई असेल असे वाटते, पण समोर येतात ते बुंदीसारखे दिसणारे लाडू ! पण वेगळ्या चवीचे. कारण इतर बंगाली मिठायांप्रमाणे त्याचाही मुख्य घटक मावा/खवा असतो. भरपूर सुका मेवा आणि टूटी-फ्रुटी घातलेले लाडू तोंडात घातल्याक्षणी ब्रह्मानंदी टाळी लागते. ‘एका वेळी एकच लाडू’ असे या लाडूच्या बाबतीच शक्यच नसते. दोर्बेश लाडू एकच खाल्ल्याचा अर्थ ताप-सर्दी झाल्यामुळे तोंडाला चव नाही एवढाच असू शकतो.
आमच्या एका मैत्रिणीकडे, एकत्र कुटुंबातील मुले भूणभूण करू लागली, की ते त्यांना लाडू देऊन गप्प बसवत असत. त्यांच्या घरी त्या लाडवांना ‘भूणभूण लाडू’ असे म्हणतात. पोळीच्या किंवा पुरीच्या लाडवात खसखस, खोबरे, वेलदोडे, बदाम आणि काजू भाजून घातले की त्याला मलिद्याचे लाडू म्हणतात. गावातील जत्रेत, विशेषतः पीराला मलिद्याच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावाच लागतो. एवढ्या गोड गोड लाडवांना अगम्य नावे ठेवणारे बऱ्याचदा त्यांचे जनक हलवाईच असतात किंवा पोरांना काहीही करून खाऊ घालणाऱ्या माताभगिनी असतात. आपल्याला काय… नावे काहीही असोत… ‘ताटात नसेल लाडू तर दिवस कसे काढू…!’ असे माझे तरी ब्रीदवाक्य आहे.
– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com
———————————————————————————————————
लेखाची सुरवात वाचूनच ओळखले की हा लेख मंजुषाचा असणार. ‘ जे न कधी ऐकले, जे न कधी पाहिले आणि जे न कधी चाखले ‘ असे पदार्थ तिच्या या चटकदार लेखातून प्रत्यक्ष खाल्यासारखे वाटतात. मी लहानपणी ‘ राघवदास लाडू ‘ खाल्ले होते. रवा, बेसन, साखर आणि तूप समप्रमाणात असायचे त्यात. असे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील अनेक लाडू मंजुषाला माहीत असणार !
मी आत्त्या कडून ऐकलं होतं की राघव दास लाडू म्हणजे ओल्या नारळाचे रवा लाडू.
छान वाटला लेख.कोणत्याही प्रकारच्या एखाद्या लाडूचा आस्वाद घ्यावा त्याप्रमाणे.भूक लाडू आणि तहान लाडू असेही प्रकार आहेत ना? मुक्तेश्वरांनी मराठी भाषेविषयी तर म्हटलंय की, ‘मराठी भाषेच्या लाडवांची ताट मी तुमच्या पुढे मांडलंय त्याचा आस्वाद घ्या’.दिवाळीच्या दिवसांत असं विविध लाडवांचं तआटंच समोर आलेलं आहे अभिनंदन आणि आभार.
लेख छान आहे. भारतात एवढ्या प्रकारचे लाडू बनवले जातात आणि खाद्यप्रेमी त्याचा आस्वाद घेतात,ही नवीन माहिती वाचायला मिळाली. शिळ्या चपातीचे बारीक तुकडे करून त्यात तूप आणि गूळ घालून केलेले लाडू लहानपणी घरी आणि नातेवाईकांकडे खाल्ले आहेत. लाडू हा पदार्थ गुळात अधिक पौष्टिक ठरतो. यात शर्करा आणि लोह यांचा शरीरास पुरवठा होतो. आयुर्वेदिक वैद्य हे यासाठी गूळ खाण्याचा सल्ला देतात. दिवाळी निमित्ताने लाडू माहिती उपयुक्त वाटली.
वळेसर नकळत सुटुन मोगऱ्याच्या कळ्या अंगा खांद्यावर टपाटप पडाव्यात तसे सगळे प्रांतीय लाडु गडगडले. बापरे! किती ते प्रकार! घरात, शेतात असलेल्या चीजांचे गुळ, तुप, साखरेत बांधुन आया बायांनी पोराटोरांची पिरपिर बंद करायला आणि चवेची रंगत जीभेवर रेंगाळायला केलेले लाडवाचे प्रयोग हलवाया इतपत सरस नसले तरी प्रांतीय वेगळे पणा टिकवण्यात अग्रेसरच असतील. एवढी माहिती जमवुन वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंजुषा मॅडमचे आभार मानते.
त्यांचा कोजागिरी वरील लेख ही आवडला होता. कोजागिरी पौर्णिमेचा संबंध फक्त लक्ष्मीशी आहे असा माझा समज होता