फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)

2
813

नवनिवृत्त माधवी इनामदार त्यांच्या नव्या आयुष्याचे नियोजन करत असताना मानसिक आरोग्य या विषयात काम करायचे ठरवतात. त्याचवेळी त्यांना एकलव्य संस्थेबद्दल माहिती मिळते. त्या  वर्तक यांच्या मार्गदर्शनाने त्या प्रकल्पांमध्ये काम करू लागतात. सामुदायिक गटचर्चेमध्ये सहभागी होतात. त्या झटके येणे, दुभंगलेले व्यक्तिमत्व आणि इतर मानसिक रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करू लागल्या. त्या रुग्णांमध्ये होत असलेल्या सुधारणेच्या स्वतः साक्षीदार झाल्या. माधवी यांनी या कामात स्वतःला कसे अडकवून घेतले या प्रवासावर  लिहिलेला त्यांचा अनुभव. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

– अपर्णा महाजन
————————————————————————————–

फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य

माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती. ‘एकलव्य फाउंडेशन’ या संस्थेच्या रूपाने मला हवे ते काम करण्याची तशी संधी मिळाली.

अनिल वर्तक आणि त्यांचे सहकारी ‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम गेली पंचवीस वर्षे करत आहेत. एकलव्य संस्था तीन महत्त्वाच्या गोष्टींवर काम करते- 1. मानसिक आजार असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी ऑनलाईन स्वमदत गट विनामूल्य चालवणे, 2. त्या विषयाबद्दल जनजागृती करणे आणि 3. मानसिक आजारांविषयी असलेली भीती किंवा कलंकभाव (स्टिग्मा) दूर करणे. वर्तक यांनी या विषयांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांचा स्वभाव शांत, निगर्वी आहे, त्यांना मानसिक आजाराबद्दल, विशेषतः सिझोफ्रेनिया या आजाराबद्दल असलेली कळकळ जाणवावी अशी आहे.

मानसिक समस्या निरनिराळ्या कारणांनी उद्भवतात. ह्या आजाराच्या लक्षणांकडे, ती म्हणजे पौगंडावस्थेतील बदल, कधी प्रेमभंग, तर कधी एखाद्या गोष्टीतील अपयश असे समजून दुर्लक्ष केले जाते. माणसाचे मानसिक स्वास्थ्य आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या कारणांनी बिघडू शकते. एखादी नकारात्मक भावना (राग, दुःख, चिंता, भीती) माणसाला इतकी ग्रासून टाकते, की तिचा परिणाम त्याच्या/तिच्या कार्यक्षमतेवर, वागण्यावर दिसू लागतो. त्याची/तिची कुचेष्टा केली जाते. त्याच्या आजूबाजूचा समाज त्याला वेडे ठरवतो. सोशल मीडिया, चित्रपट यांतून दाखवले जाणारे मानसिक आजारी व्यक्तीचे चित्र भयावह असते. एकूणच, जनमानसात त्या आजाराविषयी भीती, कलंकभावना आणि अज्ञान असल्यामुळे ते आजार लपवले जातात. मग त्यांची उग्रता आणि तीव्रता वाढत जाते.

सत्तरी पार केलेले डॉ. रुकडीकर आणि डॉ. ललित हे दोघेही आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी मिरजेहून आले. वर्तक यांनी मानसिक आजार या विषयावरील प्रशिक्षण देण्यासाठी मिरजेच्या डॉ. रुकडीकर या मानसोपचारतज्ज्ञांना बोलावले होते. रुकडीकर वैद्यकीय क्षेत्रात गेली काही दशके कार्यरत आहेत. त्यांनी सोप्या भाषेत मानसिक आजार आणि त्याचे प्रकार याचे सखोल प्रशिक्षण दिले. त्यांचे Mental Disorders and you हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

डॉ.अब्राहम लो यांचे My Dear Ones हे आत्मचरित्रही आम्हाला वाचण्यास मिळाले. त्यांनी Recovery through self help ही चळवळ सुरू केली. त्यांनी त्या आधी 1891 ते 1954 या काळात हजारो मनोरुग्णांचा अभ्यास केला. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर बरे होणे ही त्यांची संकल्पना अनोखी आहे. ती संकल्पना ‘रिकव्हरी इंटरनॅशनल’ या NGO मार्फत जगभर वापरली जाते. ‘एकलव्य गट’ त्या ‘रिकव्हरी इंटरनॅशनल’ संस्थेचा सदस्य आहे. तीच उपचारपद्धत संस्थेच्या स्वमदत गटाच्या चर्चांमध्ये वापरली जाते. त्या ‘रिकव्हरी’ पद्धतीत अनेक छोटी छोटी ‘टूल्स’ आहेत. त्या ‘टूल्स’चा वापर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती मानसिक समस्यांसाठी करू शकते. ती ‘रिकव्हरी’ पद्धत वापरणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जेव्हा त्यांचे अनुभव सामुदायिक चर्चांमध्ये मांडले तेव्हा लक्षात आले, की त्याचा त्यांना खूप उपयोग होत आहे. सामुदायिक चर्चांचा तो मोठा फायदा असतो. मानसिक समस्या असलेली व्यक्ती स्वतःचे अनुभव, ‘रिकव्हरी टूल्स’ने त्यातून बाहेर पडण्यास झालेली मदत हे सगळे जेव्हा मोकळेपणाने मांडते तेव्हा संस्थेत येणारे इतर सभासद ते ऐकत असतात. त्यांनाही त्या ‘टूल्स’चा वापर करता येईल याबद्दल त्यातून मार्गदर्शन मिळते. आमची ‘रिकव्हरी’ पद्धतीशी तोंडओळख अशा चर्चांतूनच झाली. शिवाय, ही उपचार पद्धत वरवर साधी वाटते, पण तिचा उपयोग खोलवर होऊ शकतो. विशेष म्हणजे त्यामुळे रुग्णांचे आजार ‘रिलॅप्स’ होण्याचे प्रमाण कमी झाले. ‘रिलॅप्स’ म्हणजे पुनरुद्भव- आजाराचे वारंवार झटके येणे. तर ‘रिकव्हरी’ पद्धतीने झटके येण्याचे प्रमाण कमी होते. रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेतो आणि आनंदी आयुष्य जगण्याची त्याची वाटचाल सुरू करतो.

‘प्रोजेक्ट फिनिक्स’ हा ‘एकलव्य’ संस्थेचा एक उपक्रम. त्यात आम्हाला मानसिक आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींचे अनुभवकथन शब्दबद्ध करणे होते. त्यांचे ते अनुभव त्यांना स्वतःला आणि इतरांना प्रेरणादायी ठरू शकतात. आम्ही आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती शब्दबद्ध करून, त्या वार्तापत्रातून लोकांपर्यंत पोचवल्या. लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. त्या गोष्टी वाचून, लोकांना तेही अशा प्रकारे मार्ग काढू शकतात, एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतात असे वाटू लागले. त्यांना त्यांच्या आयुष्यातील अवघड टप्पा ते पार करू शकतात हा विश्वास त्या अनुभवकथनातून मिळाला.

एकलव्य गटात मानसिक आजारी व्यक्तींना ‘शुभार्थी’ आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांना ‘शुभंकर’ असे संबोधले जाते. वर्तक यांच्याबरोबर स्मिता गोडसे, प्राची बर्वे, मंजिरी चव्हाण या समुपदेशक म्हणून गेली अनेक वर्षे चिकाटीने काम करत आहेत. समुपदेशकांचे काम म्हणजे लोकांना आवाहन करून मीटिंग्ज घेणे, त्यांचे म्हणणे सल्ला देण्याची घाई न करता शांतपणे ऐकून घेण्यास, लोकांना बोलण्यास प्रवृत्त करणे. त्यासाठी चिकाटी आणि संयम हे गुण लागतात. शुभार्थीना त्यांच्या प्रश्नांवर तेच उत्तरे अशा सामुदायिक प्रयत्नांतून मिळवू शकतात हे समजते. शुभंकर व्यक्तींना औषधोपचार घेण्यातील सातत्य आणि त्यांच्या वागण्यातील छोटे छोटे बदल बघून उमेद वाटते. त्यांची वाटचाल आनंदी आयुष्याकडे सुरू होते. विशेष म्हणजे त्यांना त्या प्रवासात ते एकटे नाहीत हा मोठा दिलासा मिळतो. महविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप’च्या माध्यमातून या उपक्रमात सामील केले जाते.

हल्लीच्या मानसिक, सामाजिक, राजकीय अस्वस्थतेच्या काळात केवळ ध्येय्य म्हणून विनामोबदला काम करणारी ही माणसे, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न बघितले की आश्वस्त वाटते. त्यातून मानसिक आजाराभोवतीचे भीतीचे, अंधाराचे, अज्ञानाचे सावट दूर होईल हा विश्वास निर्माण होतो.

– माधवी इनामदार 98813 09590 mrinamdar@yahoo.com
——————————————————————————————————–

शुभार्थी/शुभंकर यांची प्रतिक्रियेची दोन उदाहरणे-

१. राखेतून फुलपाखरू – मी “पुण्याच्या प्रतिष्ठित बी जे मेडिकल कॅालेजमधून पास झाले होते- भविष्याची सोनेरी स्वप्न रंगवत होते, पण मला त्याच कालावधीत गंभीर मानसिक समस्येला सामोरी जावे लागले. मी अस्वस्थता, बेचैनी, बावरणे, गोंधळून जाणे अशा लक्षणांनी त्रस्त होई. तशी अनेक वर्षे गेली. नंतर मला कळले, की पुण्यात एकलव्य या नावाने एक गट चालतो. मानसिक आजारी व्यक्ती आणि कुटुंबीयांसाठी खरे तर, मानसिक आजारी व्यक्ती म्हणून स्वत:ची ‘आयडेंटिटी’ जाहीर करण्याबद्दल समाजात खूपच अढी आहे. पण मी ही मीटिंग अटेंड करण्याचे ठरवले. मनात अनेक शंका होत्या, पण ग्रूपचा अनुभव माझ्यासाठी आनंदाचे एक दालन उघडणारा ठरला. सुरुवातीला बोलताना चाचपडणारी मी हळुहळू मोकळेपणाने बोलू लागले. ह्या गटचर्चांमुळे माझ्यात शांतता, उत्साह, संतुलन, स्वत:वरील विश्वास आणि समाधान वाढून माझ्यात आमूलाग्र परिवर्तन झाले, जणू काही राखेतून फुलपाखरू !”

अनामिका

२. कथा सांगतेस्वतःची –

आमचे एक सुखवस्तू कुटुंब तीन बहिणीएक भाऊ. मला इंजिनीयर व्हायचे होते.भावाबरोबर शिक्षण सुरू झाले, पण पहिल्या सेमिस्टरच्या शेवटी माझ्या वागण्या-बोलण्यात बदल जाणवू लागले. मला वेगवेगळे भास होत. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतलाइंजिनीयरिंग झेपण्यासारखे नव्हते याची जाणीव झालीतेव्हा मी कॉमर्स ग्रॅज्युएट होण्याचे ठरवले. आजाराची लक्षणे डोके वर काढत, पण सर्वांच्या आधारामुळे माझे जीवन सुरळीत सुरू झाले. दरम्यान, माझे लग्न मी ठरवल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आणि नाईलाजाने लग्न लावून दिले. सासरच्यानी आठ म हिन्यांतच गरोदर असतानाही माहेरी आणून सोडले, ते परत न नेण्यासाठी आयुष्यात चढउतार, मनस्ताप खूप होत होतेमाझी लक्षणे अनाकलनीय रीत्या बाहेर पडू लागलीत्यात मुलाचा जन्म झाला, पण मला कोठल्याही भावना जाणवत नव्हत्यासुरुवातीला समुपदेशनाचा फायदा झाला, पण एकटे वाटणेअसुरक्षितता, दैनंदिन जीवनातही छोटेमोठे निर्णय घेताना अडचणी येणेस्वतःला दोष देणे आणि मरगळल्यासारखे वाटणे या अशा अनेक भावना मला सतत जाणवत. माझ्या डॉक्टरांनी मला एकलव्य स्व मदत गटाबद्दल माहिती सांगितली. मी बिचकत तेथे पोचले. तेथे ज्या पद्धतीने आजाराबद्दल, स्वानुभवांबद्दल शेअरिंगचालू होते ते बघून मी थक्क झाले... मला मी माझ्या भावनिक लक्षणांना कसे सावरू शकेन याची जणू गुरुकिल्ली तेथे मिळालीमला तेथे वापरले जाणारे रिकव्हरी टूल्स सतत जीवनात उपयोगी पडतात. बऱ्याच शस्त्रक्रियांनंतर फिजीओथेरपीला अनन्यसाधारण महत्त्व असते; तसेच, मनोबाधेवर औषधोपचारांइतकेच महत्त्व समुपदेशन आणि स्व मदत गट यांचे आहे. मला मुलाची जबाबदारी जाणवलीत्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव होऊ लागलीहळुहळू, मी शिकलेसतत कार्यरत राहिले आणि मला मिळणारा आनंद, आत्मविश्वास वाढू लागलाएकूणच, माझा आत्मसन्मान वाढला. मी मुलाला चांगले शिक्षण देऊन, चांगला माणूस बनवण्याची तयारी केली आहे.

 अबोली

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here