कोकण आणि कॅलिफोर्निया ! (Konkan And California)

1
140

कोकण आणि कॅलिफोर्निया अशी तुलना हल्ली होत नाही. पूर्वी म्हणजे ज्यावेळी कोकणाला उघड उघड दरिद्री संबोधले जाई, त्या काळी नेहमी कोकणासमोर कॅलिफोर्नियाचा आदर्श ठेवला जात असे. मुंबईत त्या काळात एकूण मराठी भाषिक माणसांपैकी चाळीस टक्के लोकसंख्या एकट्या रत्नागिरी (सिंधुदुर्गसह) जिल्ह्यातील असे. सिंधुदुर्गहा रत्नागिरी जिल्ह्यातच समाविष्ट होता. मुंबईत गावागावांचे गट असत. ते गावागावांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत सभा-संमेलने भरवत असत. त्या अनेक प्रश्नांत दारिद्र्याविरूद्धची लढाई ही समस्या असेच असे. तशाच एका समारंभात बेळगावचे मराठी उद्योजक रावसाहेब गोगटे (1916-2000) यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचे मोठ्ठे स्वप्न पाहिले ! त्याचाच तो वाक्प्रचार बनला.

कॅलिफोर्नियात आणि कोकणात कसे आणि काय साम्य आहे? हे पाहणे मनोरंजक वाटले. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील प्रगत, फळफळावळीने समृद्ध असे राज्य. परंतु त्या काळी उपस्थित श्रोत्यांपैकी कोणी आणि व्यासपीठावरील एकानेही कधी अमेरिका पाहिलेली नव्हती. तरी तशी तुलना करून ‘कोकणचा कॅलिफोर्निया’मध्ये क आणि क असा अनुप्रास साधल्याने त्या घोषणेत आकर्षण तयार झाले असावे. कोकण आणि कॅलिफोर्निया हे दोन भाग पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील आहेत. दोघाही भूभागांच्या पश्चिमेस समुद्र आहे. कोकणाचे पाय अरबी समुद्र धुतो तर कॅलिफोर्नियाचे पॅसिफिक. साम्य तेथेच संपते. कॅलिफोर्निया हा विस्तृत प्रदेश असल्याने तेथे नैसर्गिक विविधता खूप आढळते, त्या मानाने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला कोकण हा एकात्म नैसर्गिक प्रदेश आहे. कॅलिफोर्निया क्षेत्रफळाने कोकणाच्या साडेतेरा पट (कॅलिफोर्निया चार लक्ष चोवीस हजार चौरस किलोमीटर तर कोकण एकतीस हजार चौरस किलोमीटर). कॅलिफोर्नियाचा समुद्रकिनारा तेराशेपन्नास किलोमीटर लांब तर कोकण किनारा फक्त सातशेवीस किलोमीटर. कोकणचे अक्षांश रेखांश 16-18 अंश – 73 तर कॅलिफोर्नियाचे 32-42 अंश–114-124 कोकणातील डोंगर दोन हजार आठशे-चार हजार फूट उंच तर कॅलिफोर्नियातील काही शिखरे जास्तीत जास्त साडेचौदाशे फूट उंचीची. दोन्ही प्रदेशांच्या हवामानातही खूप फरक. कोकणात समशीतोष्ण 15-38 अंश सेल्सिअस तर कॅलिफोर्नियात थंडी शून्याखाली नऊ अंश तर कमाल अठ्ठावन्न अंशापर्यंतही. कॅलिफोर्नियात वाळवंट आहे; तसेच, प्रचंड क्षेत्रावर हरित वने आहेत. कोकणात उष्णतेची असह्य लाट कधी येत नाही तर कॅलिफोर्नियात काही भागांत जीवघेणी उष्णताही असते. वनविभागात वणवे पेटणे हे कॅलिफोर्नियाचे वैशिष्ट्यच झाले आहे. कॅलिफोर्नियात बदाम, अक्रोड, खजूर, द्राक्षे, मोसंबी, लिंब यांच्या बागा आहेत. कोकणात नारळ, सुपारी, आंबाकाजू यांच्या बागा आहेत व मसाल्यांचे पदार्थही विकतात. फळफळावळ संपूर्ण भिन्न. कोकणात बिबट्या तर कॅलिफोर्नियात अस्वल यांचा संचार. कॅलिफोर्नियात आठ लाख ते पस्तीस लाख लोकवस्तीची मोठमोठाली शहरे आहेत. कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था संपूर्ण भारतापेक्षा मोठी आहे. जगभरातून कौशल्यनिपुण व उच्चशिक्षित यांचे कॅलिफोर्नियात स्थलांतर करण्याचे स्वप्न असते. कोकणात स्थलांतरित हंगामी मजूर म्हणून उत्तर भारतीय येत असतात. ते जेमतेम साक्षर असतात. कॅलिफोर्नियात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात लाखो भारतीय तरुण-तरुणी डॉलर्स मिळवत आहेत; त्यात महाराष्ट्रातील कोकणस्थ दखल घ्यावी इतक्या संख्येने आहेत. गमतीने असेही म्हटले जाते, की कोकणाचा कॅलिफोर्निया होण्यापूर्वी कॅलिफोर्नियाचा कोकण होत आहे !

         अमेरिकेत एकूण एकशेपस्तीस तेल शुद्धिकरण (रिफायनरीज) प्रकल्प आहेत. त्यांतील अठरा कॅलिफोर्निया या एका राज्यात आहेत. कॅलिफोर्नियाच्या संपन्नतेत त्या तेल शुद्धिकरण कारखान्यांचा वाटा लक्षणीय आहे. कोकणातील राजापुरात तेल शुद्धिकरण प्रकल्पाला चालना मिळून तो प्रकल्प सुरू झाला तर कोकणचे भवितव्य संपन्न-समृद्ध होईल. मग कोकण-कॅलिफोर्नियाची तुलना करण्यास रिफायनरीचे अस्तित्व हा आणखी एक समान मुद्दा मिळेल. परंतु रिफायनरी किंवा कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प तेथे येण्याआधी विरोधी राजकारण येते. तोपर्यंत कोकण आणि कॅलिफोर्निया यांचा अनुप्रास फक्त मौजेचा समजायचा.

                कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा प्रयत्न अन्य कोणी हिरिरीने मांडलेलादेखील नाही. रेल्वेचे स्वप्न मात्र अनेकांनी पाहिले. तेथे छोट्या वहाळावरचा साकव (लाकडी छोटासा पूल) होता होत नसे, तर रेल्वे कशी आणि कोण आणणार असे लोक म्हणत. पण ते स्वप्न अखेर पूर्ण झाले ! कोकण आणि कॅलिफोर्निया यांत फरक एवढाच, की कोकण दरिद्री आणि कॅलिफोर्निया खूप समृद्ध ! कोकण महाराष्ट्रात-भारतात आणि कॅलिफोर्निया अमेरिकेत. आज कोकणाला दारिद्र्य हा कलंक राहिलेला नाही. पण तरीदेखील कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा उच्चारही कोणी करत नाही. उलट, कॅलिफोर्नियात मात्र पाण्याचा दुष्काळ अधुनमधून येत असतो व पाण्याच्या वापरावर बंधने घातली जातात.

राजा पटवर्धन 9820071975 rajapatwardhan2015@gmail.com
———————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. या लेखात तुलनात्मक विधाने असली तरीही कोकण याला महत्व आहेच..आपल्या साधन परंपरेला कर्तव्याची जोड देत अनेक योजना अंमलात येतीलही फक्त कोकण हे वैचारिक,शैक्षणिक,आणि उत्पादन नियोजन भविष्यात रीतसर घडले तर कोकण प्रांत अजून समृध्द होण्यास मदत होईल फक्त …हलके कान आणि फाजील राजकारण ….यात तरुण पिढीला ओढून जे सुरू आहे ..ही खरी शोकांतिका आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here