कोकणात धार्मिक महोत्सव भरपूर. जुन्या प्रथा-परंपरा घट्ट रुजलेल्या. त्यात नव्या अभिनव अशा कासव महोत्सवाची गेल्या दोन दशकांत भर पडली आहे. तो महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत साजरा होत असतो. ते कोकणचे नवे आकर्षण बनले आहे…
कोकणात दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘कासव महोत्सव’ पर्यटक व अभ्यासक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. तो महोत्सव रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दापोली, मंडणगड, गुहागर, राजापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले; तसेच, रायगड जिल्ह्यातही हरिहरेश्वरसारख्या भागामध्ये आयोजित करण्यात येतो. त्या महोत्सवाचा आरंभ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संरक्षण व संवर्धन मोहिमेमधून झाला. तो कासव संरक्षण प्रकल्प महाराष्ट्राच्या सातशेवीस किलोमीटर किनारपट्टीवर राबवला जातो. पर्यावरण चळवळीचा प्रमुख भाग म्हणून त्या मोहिमेस विशेष महत्त्व आहे. कासव संरक्षण मोहिमेचे श्रेय प्रामुख्याने भाऊ काटदरे यांच्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेला दिले जाते. मोहिमेला सुरुवात ‘कासवांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावी झाली.
‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेचे कार्यकर्ते भाऊ काटदरे सागरी गरुडाच्या सर्वेक्षणासाठी फिरत असताना, त्यांचे सहकारी विजय महाबळ हे वेळासमध्ये गेले होते. तेथे त्यांच्या निदर्शनास वाळूत छोटे खड्डे आणि आजुबाजूला पडलेली पांढरी टरफले आली. ती बाब त्यांनी भाऊ काटदरे यांना सांगितली. ती टरफले नेमकी कशाची याचा शोध सुरू झाला. भाऊ व त्यांचे सहकारी यांनी चिपळूण ते वेळास असा मोटरसायकलीवरून प्रवास केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अनेक ठिकाणी व वारंवार भेटी घेतल्या. समुद्रकिनाऱ्याचे निरीक्षण रात्रीच्या वेळेस केले आणि अखेरीस, त्यांना अनेक दिवसांच्या पाहणीनंतर ती कासवांची अंडी आहेत हे स्पष्ट झाले.
त्यापुढील आव्हान होते कासवांची ती अंडी संरक्षित करण्याचे. वेळासचे सरपंच नंदकुमार पाटील यांचे त्या कामी सहकार्य झाले. कासव संरक्षणाच्या मोहिमेलाही त्यातून सुरुवात झाली. कासवे नोव्हेंबर-डिसेंबरपासून किनाऱ्यालगत प्रजननासाठी येतात. कासवांच्या विणीचा हंगाम सर्वसाधारणपणे, नोव्हेंबर ते एप्रिल हा असतो. त्या प्रजातीची मादी कासवे त्या कालावधीत वाळूमध्ये एक ते दीड फूट खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये शंभर ते दीडशे अंडी घालतात. मादी कासवे अंडी घातल्यावर त्या खड्ड्यांत वाळू भरून समुद्रात निघून जातात. त्या अंड्यांची उबवण, त्यातून पिलांची निर्मिती आणि जन्मलेली पिले समुद्रात जाणे ही सर्व प्रक्रिया नैसर्गिक आहे.
कासव संरक्षण मोहिमेत मिळालेले वाळूतील घरटे खणून, आतील अंडी काढून घेऊन त्याच किनाऱ्यावरील हॅचरीमध्ये (जाळीने बंदिस्त केलेली जागा) खड्डा तयार करून संरक्षित केली जातात. काही ठिकाणी, अंडी नैसर्गिक रीत्याही संरक्षित असतात. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेने पहिल्या वर्षी (2002 साली) पन्नास घरटी संरक्षित केली आणि एकूण दोन हजार सातशेचौतीस पिल्ले समुद्रात सोडली. त्याच्या पुढील वर्षी तो प्रकल्प चार गावांत राबवला गेला. वीस वर्षांत त्या प्रकल्पाची व्याप्ती ऐंशी समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पसरली आहे. प्रत्येक गावात मानधन देऊन त्या कामासाठी माणूस नेमण्यात आला आहे. गंमत बघा हं, आता या कामी नेमलेल्या माणसांपैकी चाळीसपेक्षा अधिक लोक पूर्वी कासवांची अंडी चोरायचे, कासव मिळाले तर मारून खायचे. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, तशीच ही पर्यावरण प्रेमाची गोष्ट. त्या लोकांना कायद्याची माहिती देण्यात आली. ऑलिव्ह रिडले हे कासव भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या शेड्यूलनुसार संरक्षित केले आहे. त्या मंडळींना पर्यावरणातील कासवांचे महत्त्वही पटवून देण्यात आले आहे. त्यांना चोरीत मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त रक्कम मानधन मिळते हे आकर्षण आहेच. यामुळे स्थानिक गावकरी ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेच्या कामात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण झाली आहे.
मोहिमेतील नवा टप्पा गाठला गेला तो कासव महोत्सवाने. पहिल्या कासव महोत्सवाचे आयोजन 2006 साली वेळास येथे करण्यात आले. पर्यटकांची राहण्याची सोय ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यातून त्यांची घरे, अंगणे येथे करण्यात आली होती. काही प्रमाणात गैरसोय असूनही कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्याचा तो अप्रतिम सोहळा पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ! भाऊ काटदरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाचा सदस्य या नात्याने केलेल्या प्रयत्नांमुळे 2012 साली त्या प्रकल्पाला निधी मिळाला, त्यामुळे प्रकल्पाला अधिक बळ लाभले.
स्थानिक लोक कासव संवर्धन प्रकल्पात सहभागी झाले, त्यांना प्रकल्प त्यांचा वाटला तरच प्रकल्प चिरकाल टिकू शकतो, या जाणिवेने ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ने प्रकल्प स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायती व वनविभाग यांच्याकडे 2014 साली सुपूर्द केला आहे. तो प्रकल्प वनविभागाचा कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने चालवला जातो. काटदरे व त्यांची टीम मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रकल्पाला साहाय्य करत असते.
अंड्यांमधील कासवांच्या पिलांचा जन्म साधारणतः चाळीस ते साठ दिवसांनी होतो. ती जन्मतः समुद्राकडे धाव घेतात. तो निसर्गाचा सारा खेळ पाहणे म्हणजे उत्सवच बनून गेला आहे. पिल्ले समुद्रात सकाळी लवकर आणि संध्याकाळी दिवस मावळल्यावर सोडली जातात. कासव महोत्सवात मासेमारी, कोकणातील प्राणिजीवनावरील चित्रपट, प्राणी-पक्षी निरीक्षणासाठी जंगलातील भटकंती, प्राणितज्ज्ञांशी गप्पा, स्थानिक मनोरंजनपर कार्यक्रम, स्थानिक खाद्यसंस्कृती अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो.
वेळास गावातील ऐंशी टक्के लोक कासव महोत्सवावर अवलंबून आहेत. गावाचे अर्थकारण जणू या महोत्सवावर अवलंबून आहे. वेळास ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव करण्यात आला आहे, की गावात कोणतेही हॉटेल होऊ नये. वेळास येथे जवळपास बत्तीस होम स्टे आहेत. तेथे येणाऱ्या पर्यटकांची निवास व्यवस्था केली जाते.
भाऊ काटदरे यांच्या ‘सृजनसंवाद’मधील लेखाच्या आधारे प्रस्तुत लेख तयार केला आहे. सह्याद्री निसर्ग मित्र -09423831700
– अश्विनी भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com
—————————————————————————————————————-