न्या केशवराव कोरटकर – हैदराबाद लढ्यातील मवाळ कार्यकर्ते (Justice Keshavrao Koratkar – An Activist of the Hyderabad struggle)

1
282

न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867-1932) हे हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी बजावलेली कामगिरी शतकभराहून अधिक काळ हैदराबाद शहरी दृगोचर होत आली आहे. त्यांपैकी दोन संस्था म्हणजे विवेकवर्धिनी शिक्षणसमूह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद. केशवरावांचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ते निजाम राज्यात मुख्य न्यायाधीशपदापर्यंत स्वकर्तृत्वावर पोचले होते. केशवरावांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांची शिक्षणक्षेत्रातील कामगिरी अतुलनीय आहे. समाजाची प्रगती साधणे असेल तर प्रथम सामाजिक जागृती आवश्यक आहे आणि शिक्षण हा समाजजागृतीचा पाया आहे असा केशवरावांचा दृढ विश्वास होता. त्यांनी आयुष्यभर समाजात आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी निजाम राज्यातील मराठी व हिंदू हृदयांत आदराचे व प्रेमाचे स्थान मिळवले, मुसलमानांनाही आपलेसे केले.

केशवरावांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या पंधराव्या वर्षीच गुलबर्गा येथे तहसील कार्यालयात नोकरी करणे भाग पडले. केशवरावांनी नोकरी करत, जिद्दीने वकिलीच्या परीक्षा दिल्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी वकिलीची सनद मिळवली. त्यांनी गुलबर्ग्याच्या सत्र न्यायालयात काम सहा वर्षे केले. नंतर, ते गुलबर्गा सोडून हैदराबादेस उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी आले. त्यांना अभ्यासू वृत्ती, उर्दू आणि मराठी भाषांवरील प्रभुत्व या गुणांमुळे नामांकित वकील म्हणून निजाम राज्यात प्रसिद्धी मिळाली. निजाम सरकारने त्यांना ते पंचवीस वर्षे वकिली करून प्रसिद्धीच्या शिखरावर असताना उच्च न्यायाधीशपद देऊ केले. केशवरावांनी ते पद निजाम राज्यातील मराठी आणि हिंदू यांच्या अस्मितेचा विचार करून मान्य केले. केशवरावांनी न्यायाधीशपदी काम पाच वर्षे करून निवृत्ती स्वीकारली. केशवरावांची नियुक्ती निजाम राज्य कायदे मंडळावरही झाली होती. केशवरावांना ते निजामाच्या कायदे मंडळावर असल्याने सामाजिक कायद्यात अनेक बदल घडवून आणता आले. त्यांना त्यासाठी समाजात रोष पत्करावा लागला. ते काही बदल सनातनी सहकाऱ्यांचा विरोध, सामाजिक दबाव यामुळे आणू शकले नाहीत. परंतु त्यांनी खचून न जाता सामाजिक बदलांचा पुरस्कार शेवटपर्यंत केला.

केशवराव शिक्षण व साक्षरता हा सामाजिक जागृतीचा पाया आहे या विचारांचे होते. त्यावेळी साक्षरता तीन टक्क्यांहून अधिक नव्हती. ते वर्तमानपत्रे व नियतकालिके यांद्वारा प्रौढ साक्षरता आणण्याच्या विचारांचे होते. केशवरावांनी पुरोगामी विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणक्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली. त्यांनी हैदराबादेत विवेकवर्धिनी या शिक्षणसंस्थेची स्थापना 1907 मध्ये केली. ती संस्था पुढे खूप नावारूपाला आली. संस्था शंभर वर्षांनंतरही हैदराबादेत शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. केशवरावांचे निजाम राज्यात अन्य काही मराठी शिक्षण संस्थांच्या विकासातही मोठे काम होते. त्या संस्थाही तेथे शिक्षणप्रसाराचे काम करत आहेत. उदाहरणार्थ नूतन विद्यालय (गुलबर्गा), सरस्वती भुवन विद्यालय (औरंगाबाद), शारदा मंदिर (औरंगाबाद), एक्सलसीअर हायस्कूल (हैदराबाद) ही नावे सांगता येतील. केशवराव यांचे ‘निजाम विजय’, ‘नागरिक’, ‘राजहंस’, ‘रयत’, ‘ज्ञानप्रकाश’ या वर्तमानपत्रांना व नियतकालिकांना प्रोत्साहन असे. केशवरावांची बळवंत वाचनालय (औरंगाबाद), आर्यभूषण (पुणे) या संस्थांना मदत असे. त्यांनी मराठी ग्रंथसंग्रहालय हैदराबादमध्ये, चि.नी. जोशी यांच्या सहकार्याने 1922 साली स्थापन केले. केशवराव त्याच वेळी ‘दक्षिण साहित्य संघ’ या संस्थेचेही अध्यक्ष होते. ते 13 व 14 जानेवारी 1923 रोजी भरलेल्या पहिल्या विदर्भ साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचा पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी संबंध जवळचा होता आणि त्याचा त्यांना अभिमान वाटे. केशवरावांना वसंत व्याख्यानमालेत वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. ते त्या काळी विचारवंतांसाठी विचारांच्या देवाणघेवाणीचे महत्वाचे व्यासपीठ समजले जात असे.

केशवरावांचे समाजरचनेबाबत विचार पुरोगामी होते. त्यांना समाजातील रूढी व परंपरा यांत आमूलाग्र बदल आणण्याची आवश्यकता भासत होती. त्यांना सामाजिक बदल हाच विकासाचा एक मार्ग मान्य होता. केशवरावांच्या विचारांवर आर्य समाजाचा प्रभाव प्रामुख्याने होता. ते आर्य समाजाच्या हैदराबाद शाखेचे अध्यक्ष अनेक वर्षे होते. उदाहरणार्थ हैदराबाद सामाजिक सुधारणा संघ, सामाजिक परिषद (हैदराबाद), महाराष्ट्र हिंदू धर्म परिषद, सोशल सर्व्हिस लीग (हैदराबाद) या संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. केशवरावांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद सामाजिक सुधारणा परिषदेचे दुसरे अधिवेशन 1919 साली भरले. केशवरावांनी अस्पृश्यता विरोध, विधवा पुनर्विवाह, लग्नाच्या कायदेशीर वयात वाढ, बालविवाहात नाबालिक शारीरिक संबंधांस शिक्षा, विधवांना संपत्तीत वाटा अशा पुरोगामी विचारांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. केशवराव अस्पृश्य सहभोजनात 1911 साली सहभागी झाले होते. त्यांना घरी आणि समाजात अनेक काळ बहिष्कार सहन करावा लागला होता.

केशवरावांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही. ते समाजजागृती ही समाजाची प्रथम गरज आहे या विचाराने राजकारणाला दुय्यम महत्त्व देत. परंतु त्यांची ब्रिटिश राज्यातील काँग्रेसच्या चळवळीला सहानुभूती असे. ते स्वतःला गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कृत मवाळ विचारसरणीचे अनुयायी मानत. परंतु त्यांना लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आदर होता आणि त्यांना त्यांच्याशी असलेल्या स्नेहसंबंधाबाबत अभिमान वाटे. चाफेकर बंधूंनी रँड यांचा वध केला. दामोदर चाफेकर पकडले गेले, परंतु बाळकृष्ण चाफेकर निजाम राज्यात भूमिगत झाले. बाळकृष्ण चाफेकर यांच्यावर कठीण परिस्थिती ओढवली. त्यातच ते आजारी पडले. तशा परिस्थितीत लोकमान्य टिळक यांनी सुचवले म्हणून केशवराव यांनी बाळकृष्ण चाफेकर यांना योग्य ती मदत केली. निजाम राज्यात ती मोठीच जोखीम होती.

केशवरावांनी समाजसुधारक महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्याबरोबर काही संस्थांत काम केले आहे. केशवरावांनी अण्णासाहेबांबरोबर विदेशदौरादेखील केला. त्यांची रँग्लर परांजपे यांच्याबरोबर घनिष्ट मैत्री होती. केशवरावांच्या अंतिम समयी रँग्लर परांजपे हेच त्यांच्या बरोबर होते. केशवरावांचे चिरंजीव विनायकराव यांनी हैदराबादेत ‘केशव मेमोरियल’ची स्थापना केली. ‘केशव मेमोरियल’मध्ये स्वतंत्र भारताचा तिरंगा 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकावला गेला. तेव्हा तेथे निजाम राज्य होते. निजाम पोलिसांनी कारवाई केली. त्यात अनेक देशभक्त जखमी झाले. तेथून चळवळीला वेग आला आणि अखेर, निजाम राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले.

केशवरावांच्या कार्यात हैदराबादचे वामनराव नाईक, गुलबर्ग्याचे विठ्ठलराव देऊळगावकर आणि गिरिरावअण्णा घाटे-जहागीरदार या सहकाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे. केशवरावांच्या दोन अनुयायांनी स्वतंत्र भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. केशवरावांचे ज्येष्ठ पुत्र विनायकराव व केशवरावांचे जवळचे अनुयायी काशीनाथ वैद्य हे स्वतंत्र भारताच्या नव्या हैदराबाद राज्यात विधानसभेवर निवडून आले. विनायकरावांनी अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला तर काशिनाथ वैद्य यांची सभापती म्हणून निवड (1952) झाली.

गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com
————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here