भवताल व अभ्युदय या दोन संस्थांनी अजिंठा येथे शिबिरे आयोजित केली होती. शिबीर चालू असताना, शिबिरात सांगत असलेल्या संकल्पनांमुळे एक लहान शिबिरार्थी भांबावून गेला. त्याला बाहेर आलेला पाहून शिबीर संयोजक शुभा खांडेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले. त्यावर सृजन शाहू पाटोळे या विद्यार्थ्याने गंमतीशीर उत्तर दिले…
‘भवताल’ आणि ‘अभ्युदय’ या दोन संस्थांनी गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या प्रत्येकी दोन अशा, अजिंठ्याच्या चार शिबिरांची सांगता नुकतीच झाली. त्यांतील अनुभव आणि आठवणी हा माझा अमूल्य आणि अविस्मरणीय असा ठेवा आहे. त्या शिबिरातील गोड, वर्षानुवर्षे गुदगुल्या करत ठेवणारी, परंतु महत्त्वाचा गर्भितार्थ असणारी अशी एक आठवण !
सृजन शाहू पाटोळे हा औरंगाबादचा आमच्या एका बॅचचा, वयाने सर्वात लहान शिबिरार्थी. वॉल्टर स्पिंक – शॉर्ट क्रोनॉलॉजी- वाकाटक- सातवाहन- अश्मक -ऋषिक- चैत्य- विहार- स्तूप- बुद्ध या शब्दांच्या व संबंधित संकल्पनांच्या सततच्या भडिमारामुळे भांबावलेला, गोंधळलेला, Information Overload मुळे त्रासलेला; पण तरीही झेपेल तोपर्यंत प्रत्येक लेण्यात मी आणि रवी जोशी जे सांगू ते चिकाटीने ऐकण्याचा प्रयत्न करणारा चश्मिश मुलगा. मी एकदा, रवीचे सत्र लेणे क्रमांक 10 मध्ये सुरू असताना विश्रांती घेण्यासाठी म्हणून लेण्याबाहेर बसले होते. तेवढ्यात सृजन बाहेर आला. हताश, हरवलेल्या मनस्थितीत.
“का रे? बाकीचे कुठायत?” मी विचारले.
“ते लेण्यामध्ये आत आहेत, रवीसरांचे भाषण ऐकत आहेत.”
“मग तू एकटाच बाहेर कसा काय आलास?”
“ती मोठी माणसं आहेत, त्यांना समजतं, मला समजत नाही. मी लहान आहे” असे तो उत्तरला.
“काय बघितलंस आत?” असे मी त्याला विचारले.
म्हणाला, “भिंतींवर त्याचे नाव लिहिले आहे.”
“कोणाचे नाव?” असे मी विचारले, तर तो म्हणाला “वॉल्टर स्पिंक…!”
मी हसतच सुटले ! जॉन स्मिथ आणि वॉल्टर स्पिंक? एक (जॉन स्मिथ) बंदूक घेऊन वाघ मारण्यास आलेला शिकारी आणि दुसरा (वॉल्टर स्पिंक) सात खंड लिहून अजिंठा लेण्यांच्या इतिहासाला विलक्षण कलाटणी देणारा संशोधक विद्वान ! This is absolutely hilarious ! आणि मग माझ्या लक्षात हळूहळू येऊ लागले, की या छोट्याशा मुलाने केवढ्या मोठ्या चिरंतन संघर्षाचे ‘स्टेटमेंट’ किती निरागस सहजतेने केले आहे ! अजिंठ्यावर लिहिल्या जाणाऱ्या बहुतेक लेखांमध्ये जॉन स्मिथचा उल्लेख असतोच असतो. तो शिकार करण्यास गेला असता त्याला अजिंठा लेणी गवसली. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (ए एस आय) जॉन स्मिथच्या वंशजाला बोलावून, अजिंठ्याचा शोध लागल्याच्या घटनेच्या दोनशे वर्षांचे ‘सेलिब्रेशन’ मोठ्या जल्लोषात 2019 मध्ये केले होते, पण वॉल्टर स्पिंक यांचे मात्र कोठे नामोनिशाणदेखील नाही ! सृजनने ‘The Gun is Mightier than the Pen’ या ए एस आयच्या धोरणाचाच उच्चार नकळत केलेला होता !
मी मनातल्या मनात म्हटले, “सृजन, तुझ्या चुकलेल्या उत्तराच्या ‘हसीन गलती’साठी तुला 100 पैकी 200 मार्क ! अजिंठाभर कौतुक, आशीर्वाद आणि शुभेच्छा !” शिक्षकदिनी आपणा सर्वांचे गुरू वॉल्टर स्पिंक यांना समर्पक अशी आदरांजलीच जणू सृजनने आपणा सर्वांच्या वतीने वाहिली होती !
लेणे क्रमांक 21 हे कार्बन डेटिंग झालेले अजिंठ्याचे एकमेव लेणे आहे. त्या कार्बन डेटिंगमुळे वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा जो कालखंड, त्यांच्या संशोधनाधारे नोंदला आहे तो खरा ठरला आहे.
जॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक… दोन्ही माणसे मोठीच; पण एक सत्तेसाठी लढला, दुसरा ज्ञानसंशोधनासाठी. स्पिंकसाहेबांची थोरवी अजून भारतीय मनावर बिंबायची आहे. पिक्चर अभी बाकी है !
– शुभा खांडेकर 9969439986 shubhakhandekar@gmail.com
—————————————————————————————————————————————
वॉल्टर स्पिंक यांच्या बरोबरीने जॉन स्मिथला ‘मोठा माणूस’ ठरवणे म्हणजे सगळंच मुसळ केरात की हो! निव्वळ अपघाताने सापडलेल्या वारसास्थळावर धारदार उपकरणाने स्वतःचे नाव कोरून ठेवल्यामुळे जर माणूस मोठा ठरत असेल तर वॉल्टर स्पिंक यांच्याबद्दल आपण न बोललेलेच बरे. पुरातत्व खात्याप्रमाणे आपणही मौनच बाळगावे, काय बिघडतंय?