Home अवांतर त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)

त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)

1

कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत. त्यामधून केळशी परिसरात सांगितल्या जाणाऱ्या दंतकथांना काही प्रमाणात आधार मिळतो.

केळशी हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील समुद्राकाठचे गाव. लाल माती, नारळ-पोफळीच्या हिरव्यागार वाड्या, आंबा-फणस-काजूची झाडे, पुरातन मंदिरे, जांभा दगड -त्याचा घरांसाठी केलेला उपयोग अशी कोकणातील सर्वपरिचित दृश्ये केळशीला आहेत. त्यासोबत असते ती समुद्राची गाज. गावाच्या उत्तरेला भारजा नदीची खाडी आणि पश्चिमेला समुद्र. असे हे टुमदार गाव आहे.

पाच शतकांपूर्वी भूगर्भीय घडामोडींमुळे तेथे नैसर्गिक आपत्ती आली होती. ती रात्र 1524 च्या सप्टेंबर महिन्यातील होती. उत्तर रात्र संपत आली होती. निद्रिस्त केळशीवासींच्या आयुष्यात त्या दिवशी उष:काल होता होता काळरात्र आली ! समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन काळ आला आणि विक्राळ जबड्यात त्याने गावाचा एकच घास घेतला. काळोखात काय होते ते कळायच्या आत मुलेमाणसे, गुरेढोरे… सारा संसार घेऊन काळ गेला. घरे, गुरांचे वाडे, घरातील कपडे, भांडीकुंडी, शेतीची अवजारे असे सारे काही समुद्रात गडप झाले. लाटांनी तळ घुसळून काढला. त्याबरोबर समुद्रातील वाळू झंजावातासारखी वर आली आणि गावच्या काठावर काही क्षणांत वाळूचा लांबलचक ढिगारा तयार झाला. त्याखाली घरदार, माणसे, गुरेढोरे गाडली गेली.

योगायोग असा, की त्सुनामी आली तेव्हा वास्को द गामा त्याच्या तिसऱ्या भारत सफरीसाठी दाभोळ-केळशीच्या किनाऱ्यावर पोचत होता. त्याच्या ताफ्यात चौदा जहाजे होती. दाभोळ या केळशीपासून जवळ असलेल्या बंदराजवळ असताना त्सुनामीने त्यांना गाठले होते. त्यांपैकी चार-पाच जहाजांना वाटेत जलसमाधी मिळाली -मोठा ठोसा लगावल्यासारखी ती भेलकांडली व समुद्रात गडप झाली. केळशीच्या किनाऱ्याजवळ पोचलेल्या इतर बाकी जहाजांना समुद्राच्या लाटा गदा गदा हलवू लागल्या. जहाजातील खलाशांपैकी कोणालाही नीट उभे राहता येईना. सारे कोसळू लागले. जहाजात खाली पडल्यावर सरकू लागले, भयाने ते किंकाळ्या मारू लागले, आक्रोश करू लागले. समुद्रातील ते तांडव सुमारे तासभर चालले. त्या अटीतटीच्या वेळी वास्को द गामाचे अतुलनीय धैर्य व प्रसंगावधान प्रकट झाले. वास्को द गामाने सहकारी खलाशी, नावाडी यांचे डळमळणारे मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हटले, “पाहा, पोर्तुगीजांच्या आगमनाने समुद्रसुद्धा कसा थरथर कापू लागला. धीर सोडू नका, मित्रांनो. समुद्र तुम्ही आल्यामुळे घाबरला आहे !” अखेरीस, पहाटे ते तांडव शांत झाल्यावर जमीन त्यांच्या दृष्टीस पडली.

वास्को द गामा त्यापूर्वी 1498 साली, त्यानंतर पाच वर्षांनी, 1503 साली भारतात आला होता. या त्सुनामीच्या वेळी एकवीस वर्षांनी (1524 साली) त्याचे भारतात आगमन होत होते. युरोपीयन दर्यावर्दी हे अत्यंत धाडसी असत. त्याबरोबर त्यांतील काही शिक्षित असत व ते प्रवासाच्या नोंदी ठेवत. त्याप्रमाणे या त्सुनामीच्या घटनेचेही वर्णन खलाशाच्या डायरीतील नोंदींत आढळते.

दाभोळपासून पाचशे किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या खंबातच्या आखातातील जहाजांनीही त्यावेळी तसेच तांडव पाहिले. केळशीच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी लाटांच्या आपत्तीचा कालखंड निश्चित करण्यास संशोधकांना वास्को द गामाच्या ताफ्यातील खलाशांच्या डायरीतील नोंदी उपयोगी ठरल्या. सप्टेंबर 1524 मध्ये आलेल्या त्सुनामीची नेमकी तारीख मात्र कळत नाही. काही संशोधकांच्या मते ती 11 तर काहींच्या मते 21 तारीख असावी.

खुद्द केळशी परिसरातही प्रलयाच्या आठवणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितल्या गेल्याने त्या आठवणी कायम राहिल्या आहेत. तिथी, मास, वर्ष वगैरे ज्ञात नसले तरी कोणे एके काळी समुद्राला खूप मोठे उधाण आले असल्याची, घरेदारे नष्ट झाल्याची, माणसे मृत्यू पावल्याची हकिकत गावकऱ्यांनी त्यांच्या वाडवडिलांकडून ऐकल्याचे सांगितले जाते. त्या वेळी गावात डोंगरालगत असलेली गुर्जर समाजाची वस्ती नष्ट झाल्याचे गावकऱ्यांच्या बोलण्यात येते. ओहोटीच्या वेळी भारजा नदीच्या खाडीत आणि वाळूच्या डोंगरात मिळणाऱ्या अवशेषांमुळे काही हकिगतींना पुष्टीही मिळते. ओहोटीच्या वेळी जुनी नाणी, भांडीकुंडी तसेच गाळात रुतलेले माणसांचे सांगाडे पाहिल्याचे गावकरी सांगतात. मात्र त्यावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. समुद्रावर लहानमोठी वादळे वर्षानुवर्षे होतच असतात. केळशीजवळ असलेल्या आंजर्ले या गावात समुद्रसपाटीवर असलेले गणपतीचे प्राचीन देऊळ पाण्यात बुडू लागल्याने त्या देवस्थानाची पुनर्स्थापना शेजारच्या डोंगरावर करण्यात आल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. ते देवस्थान ‘कड्यावरचा गणपती’ या नावाने प्रसिद्ध आहे. आंजर्ले येथे समुद्रामध्ये गणपती व अजून काही जुन्या देवस्थानांचे अवशेष आहेत. त्या किनारपट्टीवर समुद्राची पातळी वाढली असल्याचे दिसून येते.

किनारा महामार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या केळशी ते वेळास या पुलाच्या बांधकामासाठी केळशीच्या वाळूच्या डोंगरालगत खोदकाम चालू होते. तेव्हा तेथे चिनी मातीची भांडी, दगडी जाते, उखळ अशा स्वयंपाकघरात वापराच्या वस्तू मिळाल्या. या वस्तू तसेच घरांची जोती, विहिरी अशा अवशेषांमुळे नैसर्गिक आपत्तीत गाव गाडले गेल्याचे स्पष्ट झाले. थरारक त्सुनामी नाट्याचा साक्षीदार व गावाचे रक्षण करणारा हा वाळूचा डोंगर नष्ट होऊ नये यासाठी केळशी-वेळास पुलाचे काम थांबवण्यात आले होते. पुलासाठी दुसरी जागा नियोजित करण्यात आली. केळशी गावात असलेला पाचशे वर्षांचा हा वाळूचा डोंगर पुराततत्त्व, भूगर्भशास्त्र, भूवैज्ञानिक सर्वेक्षण, सागर संशोधन संस्था यातील संशोधक, अभ्यासक यांच्या संशोधनाला नवे आयाम देत असतो. तो जतन व्हावा असा आहे.

– रजनी देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. हा इतिहास थरारक आहे. केळशी किनाऱ्यावर पुन्हा जावे अशी ओढ लावणारा. युरोपातून आलेले दर्यावर्दी, त्यानी केलेल्या या नोंदी. अनंत त्यांची ध्येयासक्ती 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version