Home वैभव अचलपूर येथील महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी

अचलपूर येथील महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी

0

महानुभाव पंथातील पाचवे अवतार श्री चक्रधर स्वामी अचलपूर येथे दहा महिने वास्तव्य करून होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंत रत्नपूजा मंदिर, अंबिनाथ मंदिर, अष्टमहासिद्धी मंदिर यांचा समावेश होतो…

अचलपूर येथे महानुभाव पंथातील पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी यांचा  पदस्पर्श झालेल्या काही वास्तू व तीर्थस्थाने आहेत. तेराव्या शतकात तेथे यादवांचे मांडलिक राजा रामदेव दरणा याचे राज्य होते. महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी हे अचलपूर येथे दहा महिने वास्तव्यास होते. तेव्हा राजा रामदेव दरणा याने त्याची मुलगी उमादेवी हिचा विवाह चक्रधर यांच्याशी करून दिला. तिचे नाव गौरी असे लग्नानंतर ठेवले, पण तिचा मृत्यू लवकरच झाला. चक्रधरांचे वास्तव्य अचलपूर येथे ज्या ठिकाणी होते त्यातील काही महत्त्वाची स्थाने –

रत्नपूजा मंदिर हे स्थान अचलपूरात बिलनपुरा (स्वातंत्र्यवीर सावरकर नगर) या ठिकाणी आहे. राजा रामदेव दरणाच्या प्रधानाची बायको धानाईसा हिने चक्रधरस्वामी यांची रत्नांनी पाद्यपूजा केल्याचा उल्लेख तेथे आहे. त्या ठिकाणी असलेल्या मंदिरास रत्नपूजा मंदिर असे म्हणतात. चक्रधरस्वामी ज्या ठिकाणी बसले होते त्या स्थानी ओटा बांधला आहे त्याची पूजा केली जाते.

अंबिनाथ मंदिर म्हणजे अंबेचा नाथ असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. स्थानिक लोक त्यास लासमी नाथ मंदिर असेही म्हणतात. अकरा ज्योतिर्लिंगे आणि हे अर्धे अंबिनाथाचे शिवलिंग अशी एकूण साडेअकरा ज्योतिर्लिंगे सांगितली जातात. मंदिर बिच्छन नदीच्या काठी आहे. मंदिरात शिवलिंग तसेच काही प्राचीन मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या मूर्ती जीर्ण अवस्थेत आहेत. चक्रधरस्वामी त्या शिवलिंगास रोज येऊन विडा वाहत असा उल्लेख लीळाचरित्र या ग्रंथात आहे. त्यामुळे महानुभावपंथास शिवपूजा मान्य नसली तरीही या स्थानास येऊन ते नमस्कार अवश्य करतात.

अष्टमहासिद्धी मंदिरात महानुभाव पंथाचे अवतार गोविंदप्रभू व चक्रधरस्वामी यांनी निवास केला होता. हे स्थान परतवाडा-अमरावती मार्गावर परतवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने सरळ गेल्यास अष्टमहासिद्धी मंदिर लागते. त्या ठिकाणी शुक्रवारी व बुधवारी यात्रा भरते. त्या स्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कापुरी विहीर ! त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्व प्रकारचे रोग दूर होतात असा समज आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुलांना तेथे आणून अंघोळ घालतात. अष्टसिद्धींचा वास त्या विहिरीच्या पाण्यामध्ये आहे असे सांगितले जाते.

अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा l प्राप्ती प्राकांम्यमीशित्वम वशित्वम चाष्ट सिद्धय: ll

त्यामध्ये काही तथ्य आहे का? हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांचा एक चमू तेथे येऊन गेला. त्यांनी तेथील पाण्याचे निरीक्षण व अभ्यास केल्यावर त्यात गंधकाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. क्षारांचे प्रमाण पाहता त्या पाण्याने त्वचारोग बरे होऊ शकतात असा निष्कर्ष त्या शास्त्रज्ञांनी काढला.

अशी अनेक स्थाने महानुभाव पंथियांना पूज्य आहेत. जसे सर्पिन नदीच्या काठावरील तापी भारती मठ, (जे पूर्वी पिंगळा भैरवाचे मंदिर होते) निर्वाणेश्वरस्थान, सोमनाथ, लाखारबन ही ठिकाणे चक्रधरस्वामी यांच्या वास्तव्यामुळे संस्मरणीय ठरली आहेत.

– अनुपमा खवसे 9420235506 anukhawase29@gmail.com

—————————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version