तब्बल शंभरी ओलांडलेल्या बत्तीस हजार नवीन नागरिकांची भर एका 2015 या वर्षामध्ये जपानमध्ये पडली ! त्यामुळे शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या हयात नागरिकांची संख्या त्या साली पासष्ट हजारांपेक्षा जास्त झाली आणि नंतर ती त्याच वेगाने वाढत आहे. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत अंदाजे दहा हजार नागरिक शतायुषी आहेत. जपानची लोकसंख्या अमेरिकेच्या फक्त एक तृतीयांश इतकी आहे. त्यामुळे प्रमाणाच्या दृष्टीने पाहण्याचे झाले तर जपान या बाबतीत कोठल्या कोठे पुढे आहे. जपानची लोकसंख्या बारा कोटी सत्तर लाख एवढीच म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास आहे.
जपानमध्ये 19 सप्टेंबर हा दिवस ‘शतायुषी’ नागरिकांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टीही असते. शतायुषी व्यक्तींचा चांदीचे तबक देऊन सत्कार करण्यात येतो.
वाढत्या शतायुषी लोकसंख्येमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यांपैकी पासष्टी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक पंचवीस टक्के असावेत असा अंदाज आहे. अमेरिकेमध्ये तेच प्रमाण साडेतेरा टक्के एवढे आहे.
पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2060 सालापर्यंत चाळीस टक्क्यांना जाऊन भिडण्याची शक्यता आहे.
जननक्षम पिढी मात्र मूल होऊ देण्याबद्दल अनुत्सुकच आहे. लोकसंख्या स्थिरावण्यासाठी दर महिलेमागे दोन पूर्णांक एक दशांश मुले असा जन्मदर असणे गरजेचे आहे. तितक्या जन्मदरामुळे आकस्मिक मृत्यू, अपघातामुळे मृत्यू अशा घटना घडल्या तरी सांभाळून घेतले जाते. जोडप्यामागे दोन मुले असावीत अशी गरज आहे. परंतु जन्मदर प्रत्येक महिलेमागे फक्त एक पूर्णांक चार दशांश मूल एवढा उरला आहे. पण नोकरी-व्यवसायातील प्रगती, उशिरापर्यंत काम करण्याची प्रवृत्ती आणि गर्भ निरोधक साधनांची उपलब्धता यांच्या एकत्रित परिणामामुळे तरुण पिढीने त्यांचे विचार आणि आचार बदलले नाहीत तर पुढील काही वर्षांत जपानी लोकसंख्या नष्ट होण्याच्या पातळीपर्यंत खालावण्याची शक्यता आहे. हा जणू काही सुप्त ‘टाइम बॉम्ब’ आहे असेच जपानमधील जाणकार त्याकडे पाहतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जपानमध्ये जमीन उपलब्ध होऊ शकत नाही, कारण जपान हा देश फार लहान आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी जपानने आफ्रिकेमध्ये जमीन घेऊन त्यांची सोय तिकडे केली असल्याचे वाचनात आले आहे. त्यामुळे फक्त जमीन नाही, तर त्यांच्या अन्न, पाणी इत्यादी गरजाही जपानऐवजी इतर देशांतून पुरवल्या जातील. म्हणजे त्यासाठी जपानमधील मर्यादित साधनसंपत्तीवर ताण पडणार नाही.
भारतामध्ये तीस वयाच्या आतील तरुण पिढी चीनपेक्षाही जास्त आणखी काही वर्षांनंतर असेल असे सांगतात, पण त्यानंतर आणखी तीस-पस्तीस वर्षांनी तीच पिढी पासष्टच्या पुढील ज्येष्ठ नागरिकही बनणार आहे, याचा पण विचार झाला पाहिजे.
– शशिकांत काळे 9975244467
द्वारा मझदा मेडिकल स्टोअर, इराणी रेड, डहाणू रोड (पश्चिम) 401602
(चालना, दिवाळी 2021 वरून उद्धृत, संपादित -संस्कारीत)
———————————————————————————————-