महत्त्वाकांक्षी ‘महाभूषण’ प्रकल्प
विदुषी इरावती कर्वे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ सोमवारी खुले होत आहे (30 जून 2025). हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आले आहे. (https://iravati.mahabhushan.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे 1900 ते 1930 या काळात महाराष्ट्रात जन्मलेल्या महनीय व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. प्रकल्पात सुमारे तीनशे वेबसाइट तयार होणार आहेत. पैकी साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, व्ही. शांताराम आणि आबासाहेब गरवारे या पाच पूर्ण झाल्या आहेत. आणखी दहा वेबसाइट येत्या तीन महिन्यांत पूर्ण होतील. या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे.
इरावती कर्वे यांचे नाव मानववंशशास्त्राच्या इतिहासात मोठे मानले जाते. त्यांच्या ‘युगांत’ या महाभारतावरील विश्लेषणात्मक पुस्तकाला 1968 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. संकेतस्थळावर इरावती कर्वे यांचा जीवनप्रवास, त्यांचे शैक्षणिक कार्य, संशोधन, समाजविषयक चिंतन, ललित लेखन, साहित्यिक योगदान आणि त्यांची दुर्मीळ छायाचित्रे हे सारे अभ्यासपूर्ण व आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. भारतीय समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि संस्कृती यांच्या अभ्यासात मोलाचे योगदान देणाऱ्या इरावती कर्वे यांच्या कार्याची ओळख या संकेतस्थळामुळे होणार आहे.
प्रकल्प सूत्रधार गिरीश घाटे म्हणाले, की या तीनशे वेबसाइटमुळे महाराष्ट्राचा गेल्या दोनशे वर्षांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास झळाळून उठेल आणि त्याचबरोबर मराठी समाजाचे संस्कृतिसंचित रेखले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात या गोष्टीला फार मोठे महत्त्व आहे.