पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

1
324

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. वास्तविक आजोबांपासून त्या कुटुंबांचा मुक्काम तेथे होता. ते सारे लोक पारधी समाजातील, वीसपंचवीस वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये स्थलांतरित झाले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात; त्यामुळे ती शाळेत जाऊ शकत नाहीत.

अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांनी शाळा त्यांच्याजवळ घेऊन जाणे हा पर्याय पुढे आणला. त्यात प्रमुख होते भटू सावंत. त्यांच्या प्रयत्नांतूनच ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली. ही गोष्ट नऊ वर्षांपूर्वीची. शाळेला ठाणे महानगरपालिकेचे सहकार्य मिळाले. ती देशातील पहिली ‘सिग्नल शाळा’ ठरली. संस्थेचे संस्थापक आहेत मुकुंद गोरे. भटू सावंत हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प प्रमुख म्हणून आरती परब ‘सिग्नल शाळे’ची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या बरोबरीने संचालक मंडळात उल्हास कार्ले, अजय जोशी, सुरेंद्र वैद्य, अदिती दाते, निखिल सुळे, सुजय कुलकर्णी ही मंडळी आहेत.

शाळा सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी दहा तास चालते. ती गेली आठ वर्षे पुलाखालीच कंटेनर्समध्ये भरते. शाळेत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. ‘सतत अव्यक्त राहणाऱ्या मुलांना व्यक्त होण्याची मुभा देणारा फळा, तंत्रशिक्षण, संगणक शिक्षण, रोबोटिक शिक्षण, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, सिग्नल शाळा बँक, तसेच क्रीडा मैदान, स्केटिंग ट्रॅक, लाठी-काठी, कराटे प्रशिक्षण वर्ग, वायफाययुक्त डिजिटल शाळा, कबड्डी, मल्लखांब, खो-खो खेळासाठी मैदान अशा विविध साधनांनी व सुविधांनी शाळा सुसज्ज आहे. शाळेचे वेगळेपण म्हणजे तेथे साठ मुलांना शिकवण्यासाठी सतरा शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणाव्यतिरिक्त वेल्डिंग, सुतारकाम, प्‍लंबिग, फॅब्रिकेशन, पेंटिंग, लेथ मशीन, इलेक्ट्रिशीयन असे इतर व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. त्यासाठी वेगवेगळे शिक्षक नेमलेले आहेत. मुलांच्या अंघोळींपासून ते रात्रीचे जेवणही त्यांच्या शिक्षणक्रमात अंतर्भूत करण्यात आले आहे. अशा सुविधा वंचित मुलांना पुरवताना त्यांच्यातील शैक्षणिक प्रगतीच्या अभावाचा अनुशेष भरून काढणे हा मूळ दृष्टिकोन आहे. त्यामुळे या प्रत्येक भौतिक सुविधेचे यश मुलांच्या शैक्षणिक विकासातून प्रतिबिंबित झालेले दिसते.

‘रोज अंघोळ करणे’ हीच या मुलांसाठी एकेकाळी चैन होती ! त्यांच्यासाठी स्नानगृह व स्वच्छतागृह; मुख्य धारेच्या अभ्यासक्रमाची भाषा वेगळी – सुसंस्कृत; ती लक्ष्मणरेषा ओलांडण्यासाठी मुलांची बोलीभाषा (उदाहरणार्थ पारधी) शिक्षकांनी शिकून घेतली; किंबहुना शाळेतील शिक्षणाचे माध्यम पारधी-मराठी हेच आहे. अशा सोयी शाळेत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बोलीभाषेपासून अभ्यासक्रमाच्या भाषेपर्यंत नेणारी व्यवस्था उभी करावी लागली. मुलांना भीक मागण्याच्या सवयीपासून परावृत्त करणे, उद्याची स्वप्ने पाहण्यास शिकवणे, प्रतिकूल परिस्थितीत सन्मानाने जगणे या साऱ्या आव्हानांची उत्तरे ‘सिग्नल शाळे’त शोधली गेली. प्रकल्पाचा प्रतिमाह खर्च चार लाखांचा आहे. सध्या मुख्य देणगीदार आय एम सी इंडिया प्रा लि. व सिडबी स्वावलंबन फौंडेशन आहेत. परंतु मागील सात वर्षांत मुख्य करून लोकवर्गणीतून प्रकल्प चालला व उभा राहिला असे भटू सावंत यांनी सांगितले.

शाळेला उपराष्‍ट्रपतींच्‍या उपस्थितीत उपराष्‍ट्रपती भवनात ‘अंत्योदय बेस्ट प्रॅक्टिस’ या पुरस्काराने गौरवले गेले आहे. तो पुरस्कार त्या शाळेचे वैशिष्टय अधोरेखित करतो. ती शाळा हे केवळ शैक्षणिक यश दाखवून देत नाही, तर त्यातून व्यक्त होतो तो तेथील शिक्षणव्यवस्थेचा लवचीकपणा. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाकडे नेणारी, त्यांच्या पद्धतीने वळू शकणारी अशी शाळा ‘सिग्नल शाळे’च्या माध्यमातून घडवली गेली आहे. त्यामुळेच त्यामधून स्थलांतरित शाळाबाह्य मुलांसाठी एक पथदर्शी प्रकल्प उभा राहिला आहे. तशा प्रकल्पाचा आराखडा भटू सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी आखला आहे. शाळेतील आठ मुले दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत. चार मुले इंजिनीयरिंग डिप्लोमापर्यंत पोचली आहेत. एक मुलगा पदवीधर होऊन पीएसआय परीक्षेची तयारी करत आहे. चार मुले स्केटिंग स्पर्धेच्या जिल्हा पातळीपर्यंत तर एक मुलगा मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या राज्य पातळीपर्यंत पोचला आहे. आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुलांनी रशिया, इस्राइल यांसारख्या तंत्रकुशल देशांच्या रोबोट्सशी स्पर्धा करणारा रोबोट बनवून प्रतिष्ठेचा ‘ज्युरी अवॉर्ड’ पटकावला आहे. दोन मुले राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात पुरस्कार प्राप्त करून त्यांची ‘इस्रो भेटी’साठी निवड झाली आहे.

गोदरेज कंपनीचे माजी उपाध्यक्ष आणि गोदरेजच्‍या एरो स्‍पेस विभागाचे प्रमुख सुरेंद्र वैद्य तेथील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासोबत तांत्रिक शिक्षण देत आहेत. ते ‘समर्थ भारत व्यासपीठ’ संस्‍थेचे संचालक आहेत. त्यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर बारा वर्षे ‘इस्रो’च्‍या विविध उपक्रमांत काम केलेले आहे. शाळेचा स्वत:चा शिक्षकवर्ग पूर्ण वेळ व पात्रताप्राप्त आहे – त्यांच्याबरोबरीने पोर्णिमा करंदीकर, समिधा इनामदार, विना शेनॉय हे शिक्षक स्‍वयंसेवी म्‍हणून कार्यरत आहेत.

संस्थेचे कार्य ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गुणीजन’, हिंदुस्थान टाइम्स तर्फे ‘ठाणे रत्न’, रोटरी क्लबतर्फे ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स’, अहमदाबादच्या महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठातर्फे ‘युगांतर’ अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. शाळेतील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेली मुले वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील मान्यताप्राप्त उद्योगांमध्ये नोकऱ्या करू लागली आहेत. पुलाखाली निर्वासितांसारखे जगणाऱ्या सात पालकांनी ऑटो रिक्षा घेतल्या आहेत. त्यांनी अस्थिरतेचे दृष्टचक्र भेदले आहे.

‘सिग्नल शाळा’ हा पथदर्शी प्रकल्प विविध महानगरांमध्ये राबवण्यासाठी स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळात सिग्नल शाळेवर तीन वेळा चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांच्या चर्चेतून राज्य शासनाने हा प्रकल्प ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून स्वीकारावा व ठिकठिकाणी तो राबवावा, असे निर्देशही केले आहेत. मुंबईतील चेंबूरच्या अमर महल पुलाखाली दुसरी, तर नवी मुंबईतील कोपरखैराणे भागात तिसरी अशा दोन ‘सिग्नल शाळा’ सुरू होत आहेत. मुलांना शाळेत आणण्याऐवजी शाळाच मुलांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत आहे ! मूल शिक्षणामुळे संवेदनशील व्हावे अशी अपेक्षा असते. शिक्षणही तितक्याच संवेदनशीलतेने मुलांपर्यंत घेऊन जावे लागणार आहे.

‘सिग्नल शाळे’तून केवळ मुलांचा शैक्षणिक विकास झाला नाही तर तीन हात नाक्याच्या पुलाखालील विस्थापितांना तेथून जवळपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये स्थलांतरित करण्यात यश आले आहे. पुलाखालील दोन पिढ्या व सर्व कुटुंबे स्थिर झालेली आहेत. त्यांचे निर्वासित आयुष्य संपून त्यांचे सर्वांगीण पुनर्वसन त्यातून घडले आहे.

भटू सावंत हे मूळचे धुळ्याचे. ते शिक्षणासाठी त्यांच्या काकांकडे ठाण्यात आले. त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घरात सामाजिक कार्याचा वारसा होता. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ठाण्यातील फिरते वाचनालय असलेल्या ‘साहित्य यात्रा’ यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर पुस्तक प्रदर्शनात भाग घेतला. त्यातून त्यांना वैविध्यपूर्ण संस्कृती व माणसे यांचे दर्शन घडले. राज्यातील अनेक सामाजिक संस्थांचा परिचय झाला.

सावंत पत्रकारिता करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या बजेटची कॉपी त्यांच्या हाती आली. त्यामध्ये रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची काहीतरी सोय करण्यास हवी, त्यांना मुख्य धारेत आणण्यास हवे असे दोन-चार ओळींत लिहिलेले आढळले. पण ते प्रत्यक्षात कसे करावे, याचे उत्तर त्यात नव्हते. सावंत यांनी पुढाकार घेऊन ‘समर्थ भारत व्यासपीठ’ संस्थेतील पदाधिकारी, इतर सहकारी व ठाणे महानगरपालिकेचे सहकार्य यांतून ‘सिग्नल शाळे’ची सुरुवात केली !

– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. एक अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे! इतर शहरात हयाच धर्तीवर शाळा सुरू करायला हव्यात.
    लेखक महोदयांच कार्य ही वाखाणण्याजोगे आहे. त्यांना शुभेछा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here