Home मोगरा फुलला शेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)

शेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)

ज्येष्ठ आणि साक्षेपी वैयाकरणी, यास्मिन शेख यांनी 21 जून रोजी, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या तल्लख आणि कार्यमग्न आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र हे त्यांच्या आयुष्यभराच्या ध्यासाचे विषय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे परिपूर्णत्वाचा ध्यास आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांनी सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार यांच्या सोयीसाठी  ‘मराठी शब्दलेखन कोश’ तयार केला. राज्य मराठी विकास संस्थेसाठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ तयार केली. त्यांनी वृत्तपत्रांमधून भाषाविषयक लेखन केले.

शंभराव्या वर्षात पदार्पण करण्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘किमान लेखकांनी तरी प्रमाणभाषा लिहिली पाहिजे. …सर्वांना कळण्यासाठी, औपचारिक आणि शास्त्रीय दृष्ट्या लिहिताना प्रमाणभाषा आवश्यक आहे.’ त्याच मुलाखतीत त्यांनी छोट्या चुका दाखवून दिल्या आहेत-‘सहृदयी नव्हे सहृदय असते, मृत व्यक्ती स्वर्गीय नसते; स्वर्गवासी असते. आनंद स्वर्गीय असतो. …शपथविधी घेत नाहीत; शपथ घेतली म्हणतात.’ मराठी भाषेत रूढ होत असलेल्या अशा चुकीच्या अनेक वाक्प्रयोगांबद्दल सडतोडपणे बोलणारी फार थोडी माणसे उरली आहेत.

शेखबाईंनी पस्तीस वर्षे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन केले. त्या मुंबईच्या एस.आय.इ.एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभागाच्या प्रमुख होत्या. त्या दरम्यान, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या शिरीन कुलकर्णी यांनी बाईंकडून लाभलेल्या ज्ञानकणांविषयी कृतज्ञतेने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्याकरता येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

शेखबाईंच्या सहवासात 

शेखबाईंची आणि माझी पहिली ओळख मोठी गमतीदार झाली. मी रुईया महाविद्यालयात दोन वर्षे मीना गोखले यांच्या रजेच्या अवधीत काम करत होते. दोन वर्षे संपल्यावर माझी नोकरीही संपली आणि मी अनेक ठिकाणी, अर्थात महाविद्यालयांत अर्ज केले. त्या वेळेपर्यंत मला मुलगा झाला होता आणि मला नोकरीची गरज होती. अनेक ठिकाणी, उत्तम मुलाखत देऊनही मला नोकरी काही मिळाली नाही.

अचानक, एके दिवशी माझ्या वडलांना, म्हणजे र.वि. हेरवाडकर यांना, रस्त्यात पुष्पा भावे भेटल्या. त्यांनी सांगितले, की एस. आय. ई. एस. महाविद्यालयात जागा रिकामी झाली आहे. शिरीनला अर्ज घेऊन शेखबाईंना ताबडतोब भेटायला सांगा. दुसऱ्या दिवशी, मी अर्ज घेऊन तिथे पोचले, पण बाई घरी निघून गेल्या होत्या. मी स्टाफ रूमच्या शिपायाकडे अर्ज दिला आणि दुसऱ्या दिवशी, तो  बाईंना देण्याविषयी बजावले.

त्यानंतर एक दिवस मधे गेला आणि एस. आय. ई. एस. मधून शिपाई नेमणूकपत्रच घेऊन आला. मी थक्क ! जाऊन बाईंना भेटले. त्या म्हणाल्या की इथे जागा रिकामी झाली आहे, हे मला माहीत नव्हते. जो माणूस सोडून गेला, त्याची नेमणूक खरे तर झाली होती. परंतु त्याने त्यानंतर निर्णय बदलल्याची कल्पना मला दिली नाही. त्यामुळे मी घरी गेल्यावर तुला पत्र लिहिणार होते, की तुझा अर्ज उशिरा आला आहे. आमच्या नेमणुका झाल्या. पण पत्र लिहायला घेण्यापूर्वी मला श्री.पु. भागवतांचा फोन आला आणि त्यांनी मला तो माणूस सोडून गेला असल्याचे सांगितले. मग मला तुझ्या अचानक आलेल्या अर्जाचा अर्थ समजला !

मी पुन्हा एकदा थक्क ! बाईंनी लिहिलेले पत्र पोस्टात पडल्यानंतर श्रीपुंचा फोन गेला असता तर? पुष्पाबाई वडलांना भेटल्याच नसत्या तर?… आम्हां दोघींनाही सगळ्या योगायोगांची गंमत वाटली. नंतर बाईंचा सहवास रोजच मिळू लागला. त्यांचा गुलाबी गोरा रंग पाहून मी नेहमी विचारात पडत असे. माणूस इतका सुंदर गुलाबी कसा असू शकतो? मग एक दिवस बाईंकडूनच ते कोडे उलगडले. बाई मूळच्या ज्यू ! त्यांचे आधीचे नाव जेरुशा रुबेन. बाईंच्या वडलांची नोकरी फिरतीची होती. त्यांनी नाशिकला घर बांधले होते, पण शिक्षणासाठी बाई पुण्याला आल्या. त्या जात्याच बुद्धिमान आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती. त्यामुळे त्यांनी दिगंत यश मिळवले. त्या पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए. करताना सर्व विषयांत सर्वप्रथम आल्या. त्या श्री. म. माटे यांच्या लाडक्या विद्यार्थिनी होत्या. त्यांना त्यानंतर एम.ए. साठी फेलोशिप मिळाली, पण आजारी पडल्यामुळे त्या नाशिकला परतल्या. त्या एम.ए. साठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी मिळवण्यासाठी वसंत कानेटकर यांच्याकडे पावसात भिजून चिंब अवस्थेत गेल्या. कानेटकरांनी त्यांची अभ्यासाची तीव्र इच्छा पाहून त्यांना सगळी मदत केली. त्या अभ्यासातूनच त्यांना व्याकरणाची गोडी लागली; आणि कानेटकरांमुळेच बाई जेरुशा रुबेनच्या यास्मिन शेख झाल्या.

बाईंचा मला उणापुरा दोन वर्षांचा सलग सहवास मिळाला. पण त्या दोन वर्षांत मला बाईंकडून जितके शिकायला मिळाले, तितकेच त्यांचे प्रेमही मिळाले. त्यावेळी नेमणुकांचे सगळे नियम बदलले होते. त्यामुळे दरवर्षी मुलाखतीला सामोरे जावे लागे. एका मुलाखतीत बाईंनी मला विचारले, की ‘सामान्य रूपाची व्याख्या सांग.’ मी सांगितले, की ‘शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडले गेल्यावर त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल घडतो, त्याला सामान्य रूप म्हणतात. बाई म्हणाल्या, ‘अगदी बरोबर. पण मग शब्दाला विभक्तिप्रत्यय जोडल्यावर काय होते?’ त्याबरोबर माझ्या डोक्यात ‘अरेच्चा ! खरेच की !’ असा जो दिवा लागला तो कायमचा !

मी अकरावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका तयार करत असे. त्यावेळी त्या लांबलचक प्रश्नपत्रिका स्टेन्सिल कट करून द्याव्या लागत. त्यामुळे काम भराभर आटोपून घरी जावे, असा माझा मानस असे. घरी माझा तीन महिन्यांचा मुलगा होता आणि त्यामुळे माझा जीव घरी ओढ घेत असे. पण बाई त्यांना प्रश्नपत्रिका दाखवल्याशिवाय काम पुढे सरकावायला नकार देत. त्यावेळी मला अस्वस्थता येई. पण बाई अतिशय बारकाईने प्रश्नपत्रिका पाहत आणि सुधारणा सांगत. त्यांनी सांगितलेल्या काही सुधारणा माझ्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आणि मला माझ्या, पुढील तीस वर्षांच्या नोकरीच्या कालखंडात त्यांचा खूप उपयोग झाला. त्यांनी सांगितले होते, की ‘लेखकाने वर्णन कसे केले आहे? असे प्रश्न योग्य नाहीत. मुले, चांगले केले आहे असे उत्तर देऊन मोकळी होतील. त्याऐवजी ‘लेखकाने केलेल्या वर्णनाची वैशिष्ट्ये सांगा’ असा प्रश्न हवा. तसेच, संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी स्वस्पष्टीकरणात्मक म्हणजे सुभाषित किंवा सुविचारवजा वाक्ये देऊ नयेत. मुले संदर्भ विचारात न घेता, कल्पनाविस्तार करू शकतात.’

त्याशिवाय त्यांनी मला विरामचिन्हांचा वापरही कसा करावा, हे शिकवले. त्यांच्यामुळेच मला एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार कसा करावा, हेही समजले. बाईंनी मला ग्रंथालय कसे विकसित करावे हेही शिकवले. कॉलेजच्या ग्रंथालयात कधी संदर्भ बघण्यासाठी तर कधी पुस्तके नेण्यासाठी विंदा करंदीकर, श्री.पु. भागवत येत असत. त्यामुळे ते ग्रंथालय अधिकाधिक विकसित कसे करावे हे जेव्हा मला समजले, तेव्हा मला फार आनंद झाला. बाई मला घेऊन पुस्तकांच्या दुकानात गेल्या आणि महाविद्यालयांच्या ग्रंथालयासाठी पुस्तके कशी निवडावी हे शिकवले. दुकानात जाण्यापूर्वी ग्रंथालयात जाऊन तेथे कोणत्या लेखकाची कोणकोणती पुस्तके आहेत; याचा आढावा घ्यावा आणि एकेक लेखकाचा पुस्तकसंग्रह पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवावा हे मला बाईंमुळे उमजले. ती पुस्तके नंतर अंतिम मान्यतेसाठी मागवून घ्यावी आणि मग त्यातून कोणती पुस्तके घ्यावी, हे ठरवावे. हे ज्ञान मला खूप उपयोगी पडले.

त्यावेळी एस. आय. ई. एस. महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव होता आणि त्यानिमित्त पंडित कुमार गंधर्व यांची मैफल आयोजित केली होती. त्याच्या तिकिटविक्रीसाठी मी बाईंबरोबर खूप फिरले. त्यांच्यामुळे मला विदुषी देवकी पंडित, व्यंगचित्रकार श्याम जोशी यांच्या घरी जाता आले आणि या मोठ्या मंडळींना जवळून बघता आले.

अशा किती घटना ! बाईंनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. मी त्यांच्या घरी जाऊन अनेकदा त्यांच्या हातचे सुग्रास जेवले आहे. आम्ही दोघी शंकर पाटलांचे कथाकथन ऐकताना खदखदून हसत होतो आणि आम्हांला श्रीपुंच्या चेहऱ्यावरची रेषा हलत नाही हे बघून आणखी हसू येत होते. बाई आणि मी भाषेच्या, बोलण्यात होणाऱ्या गफलतींनाही खूप हसायचो. एकदा बाई चुकून ‘ची- केन’ असे म्हणाल्या आणि त्यावर त्यांचे स्वतः हसून झाल्यावर त्यांनी तशा अनेक घडलेल्या घटना मला सांगितल्या. त्यांपैकी त्यांनी सांगितलेली एक घटना माझ्या लक्षात राहून गेली आहे. महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी म्हस्के नावाच्या माणसाला तबला वाजवण्यासाठी बोलावले होते. ते कुठे बसले आहेत ते सापडत नव्हते. त्यांना शोधणाऱ्या व्यक्तीला ते तबला वाजवत बसलेले अचानक दिसले आणि आनंदाच्या भरात त्याने ‘बघा, बघा, म्हस्का तबले वाजवतायत’ असे म्हटले. तो प्रसंग आठवून आम्ही दोघी डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसलो.

दोन वर्षे भुर्रकन संपली आणि बाईंची निवृत्ती आली. त्यांना निरोप देताना मला रडू आवरेना. बाईंनी घरी दिलेल्या पार्टीत विंदा करंदीकर, श्री. पु. भागवत, श्रीराम पंडित, प्रकाशभाई मेहता यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींबरोबर मलाही बोलावले होते. सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींसमोर अवघडून बसलेली माझी मूर्ती मलाच अजून दिसते. पण बाईंमुळे मी एस.आय.ई.एस.मधे नोकरीला लागले आणि त्यामुळे विंदा करंदीकर, श्री.पु.भागवत यांच्याशी नुसता परिचय नाही, तर चांगली ओळख झाली. त्यामुळेच विंदांनी माझ्या मुलाला ‘तुझा मुलगा सुरेख आहे ‘ असा आशीर्वाद दिला. मी शेखबाईंबरोबर श्रीपुंच्या घरीही काही वेळा गेले. एकदा तिथे श्रीनिवास विनायक कुलकर्णीही आले होते. माझ्या अतिशय आवडत्या लेखकाला बघून मला खूप आनंद झाला होता.

बाई निवृत्त झाल्या आणि मग माझा आणि त्यांचा संपर्क कमी झाला. त्यावेळी मोबाईल फोनही  नव्हते. पुढे, बाई पुण्याला गेल्या आणि खूप वर्षांनी मला त्यांचा नवा संपर्क मिळाला. आम्ही दोघे त्यांना भेटायला गेलो. बाई त्यावेळी 90/91 वर्षांच्या होत्या. त्या मला कडकडून भेटल्या. त्यांना इतका आनंद झाला होता की तो त्यांच्या डोळ्यांतून, देहबोलीतून व्यक्त होत होता. त्यांनी आमच्यासाठी गोडाचा शिरा केला होता. कॉफी केली होती. त्यांच्या हातचे पदार्थ पुन्हा एकदा खाऊन, तृप्त होऊन आम्ही निघालो होतो.

माझे वडील गेल्यावर व्याकरणाच्या शंका, ऱ्हस्व-दीर्घच्या शंका कुणाला विचाराव्या; असा प्रश्न मला पडत असे. मी बाईंचा मोबाईल नंबर मिळाल्यावर एकदोनदा त्यांना फोन करून शंका विचारल्या. बाई तेव्हा नक्कीच 94/95 वर्षांच्या असतील. त्यांनी माझ्या सगळ्या शंकांचे निरसन केले. मी विचारले, की ‘ऐतिहासिक, भौगोलिक यांसारख्या शब्दांत सि, लि हे ऱ्हस्व आहेत. मग ठराविक आणि लवचिकही ऱ्हस्वच ना ?” त्या म्हणाल्या, ”नाही. ऐतिहासिक, भौगोलिक यांसारख्या शब्दांत मूळ शब्द इतिहास आणि भूगोल आहे आणि त्यांत ‘इक’ प्रत्यय मिसळला आहे. म्हणून ते ऱ्हस्व आहेत. पण ठरावीक, लवचीक हे शब्द स्वतंत्र आहेत आणि ते दीर्घ आहेत.” मी त्यांना पुढे विचारले, “बाई, दुर्मिळ शब्द काही ठिकाणी ऱ्हस्व सापडतो, तर काही ठिकाणी दीर्घ ! मग बरोबर कोणता?” त्या म्हणाल्या, “दुर्मीळ दीर्घ बरोबर. कारण संधी होताना विसर्गाचा र् झाला आणि तो मिच्या डोक्यावर चढताना मि ला दीर्घ करून गेला.” अशा बाई ! त्या वयातही स्मृती तीक्ष्ण आणि संपूर्ण स्पष्टीकरण देण्याची क्षमता ! नंतर आम्ही एस. आय. ई. एस. मधे त्या काळात काम करणाऱ्या अनेक शिक्षकांविषयी बोललो. जवळपास सगळेच त्यांना आठवत होते. आणि मी ! फ्रीज उघडल्यावर काय काढायचे ठरवले होते, तेही मला आठवत नव्हते.

नंतर बाई शमाताईंजवळ, त्यांच्या मुलीजवळ राहायला गेल्या. मग दोन/तीन वेळा फोनवर त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी माझ्या व्याकरणाच्या काही शंकाही सोडवल्या. त्यानंतर मात्र त्यांचे वय लक्षात घेता त्यांना वरचेवर त्रास द्यावा हे मनाला पटेना.

त्यांनी शंभराव्या वर्षात प्रवेश केला आहे. अशा वेळी, मी त्यांना मनापासून नमस्कार करते आणि त्यांना निरामय आरोग्याच्या आणि क्रियाशील आयुष्यासाठी अगणित शुभेच्छा देते. बाकी तर सगळे बाईंनीच मला दिले आहे !

– शिरीन कुलकर्णी 9930484252 Shirin511@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. शिरीन मॅम खूपच सुंदर लेख. खूप मोठ्या आणि गुणी लोकांमध्ये तुम्ही राहिलात , त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. तुमच्याकडून तुमच्या सहवासातील अनेकांना , मलाही खूप शिकायला मिळत आहे आणि पुढेही मिळत राहील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version