आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद (!) मिरवणारी धारावी ही झोपडपट्टी. सुरुवातीला ती मुंबई शहराच्या शीवेच्या म्हणजे सायनच्या बाहेर होती. पाण्याने एखाद्या बेटाला विळखा घालून पुढे जावे, तसे मुंबई शहर धारावीला विळखा घालून पुढे सरकत गेले. धारावी आता वाढत्या शहराच्या मध्यावर आली आहे. तो कष्टकऱ्यांचा मिनीभारतच आहे ! भारतभरच्या सगळ्या प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक तेथे वस्ती करून आहेत. घेट्टो करून रहाणं ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे एकच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रांतनिहाय वस्त्या धारावीत आहेत.
धारावीने मुंबईच्या मध्यभागी जवळपास सहाशे एकर जमीन व्यापली आहे. सध्याच्या काळात जमिनीला आलेले मोल कोणाला सांगायला नको. धारावीच्या विकासाचे प्रस्ताव वारंवार येत असतात. राजकारणी, भांडवलदार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्या साट्यालोट्यातून धारावीचे गिरणगाव तर होणार नाही ना; अशी दुष्ट शंका सुजाण नागरिकांच्या मनात येत असते. अर्थात गिरणी कामगारांच्या आणि धारावीतील नागरिकांच्या बार्गेनिंग पॉवरमध्ये फरक आहे. काळही बदललेला आहे.
सविता दामले यांनी पन्नासहून अधिक पुस्तकांचे भाषांतर केले आहे. त्यांनी येथे धारावीची सविस्तर माहिती दिली आहे.
‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
निढळाच्या घामाची नगरी – धारावी
इंग्रजांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहर विकसित करायचे ठरवले. त्यांनी लंडनच्या धर्तीवर मुंबईचा फोर्ट विभाग उभारला. 1870 साली चर्चगेट स्टेशन तर 1887 साली बोरीबंदरचे व्हिक्टोरिया टर्मिनस बांधले. इंग्रजांच्या वस्तीत प्रशस्त रस्ते होते, टुमदार बंगले होते. त्यांनी लंडनच्या बिग बेनच्या धर्तीवर राजाबाई टॉवर उभारला. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मातृभूमीसारखे काहीतरी उभारू इच्छितो. हळूहळू मुंबई वाढू लागली. उच्चभ्रू फोर्ट विभागापलीकडे मलबार हिलच्या पायथ्याशी गिरगाव ही पांढरपेशा नोकरदारांची वस्ती, भोईवाडा, गिरणगाव आदी श्रमिक कामगारांची वस्ती अशा वस्त्या निर्माण झाल्या.
सुरुवातीची मुंबई फोर्टपासून शीवपर्यंत होती. शीव म्हणजे सीमा. परंतु मुंबईचा वाढण्याचा रेटा जोरदार झाला होता. मग मुंबईतल्या आधीपासूनच्या काही वस्त्या वाढत्या शहराला अडचणीच्या ठरू लागल्या. त्यामुळे त्या वस्त्या शहराच्या शीवेपलीकडे, दलदलीच्या भागात घालवण्यात आल्या. या दलदलीच्या भागाचं नाव होतं धारावी.
धारावी शीव-वांद्रा-कुर्ला यांच्यामधल्या बेचकीत वसली आहे. मुंबईतल्या इतर वस्त्यांप्रमाणे धारावीसुद्धा मूळची कोळ्यांची वस्ती होती. इंग्रजांनी वसवलेल्या नव्या मुंबई शहराला काय काय नको होतं? तर एकेकाळी मध्य मुंबईतला कुंभारवाडा नको होता, तो धारावीत आला. कातडी कमावण्याचा उद्योग म्हणजेच ढोरवाडा- तो धारावीत आला. त्यानंतर धारावीत भंगारवाले आले, त्यांची मोठमोठी गोदामं आली. ते लोक कचरा गोळा करायचे, त्यातून सुरुवातीला लोखंड आणि नंतरच्या काळात प्लॅस्टिक आणि अन्य वस्तूंचे वर्गीकरण करून रिसायकलिंगसाठी द्यायचे. अशा तऱ्हेने मुंबईला जे जे नको ते सगळे धारावीत आले. मुंबईचे डम्पिंग ग्राउंडही धारावीला आले. अशा प्रकारे धारावी हीच पूर्ण मुंबईची ‘डम्पिंग ग्राउंड’ बनली. थोडक्यात सांगायचे तर पूर्वी गावाला जसा महारवाडा असायचा तशी मुंबईची धारावी असा प्रकार झाला.
पुढे काय झालं की मुंबईचा विस्तार चौतर्फा होऊ लागला. धारावीला ओलांडून शहर पुढे पोचलं आणि एकेकाळी शहराबाहेरची धारावी शहराच्या मध्यभागी आली. आता या धारावीची वैशिष्ट्यं सांगायची तर खूपच आहेत पण त्यातलं मुख्य वैशिष्ट्य काय तर ती ठरवून घडलेली नाही. मुख्य मुंबईत नको होते ते सगळे उद्योग एका मागोमाग एक असे धारावीत आले, त्यांच्या अनुषंगाने काम करणारी माणसं येत गेली. चामडं कमावणाऱ्या लोकांत तमिळ होते. मग चामड्याला रंग लावणारे, चामड्याच्या वस्तू होलसेलमध्ये बनवणारे लोक आले. आपण पर्सेसच्या शोरूम वांद्रे-धारावी रस्त्यावर बघतो, त्या सगळ्या वस्तू तिथंच तयार झालेल्या असतात. धारावीत कोण नाही? भारतातल्या जवळजवळ सर्व प्रांतांतले, सर्व जातिधर्मांचे लोक धारावीत आहेत. तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश- जे म्हणाल ते आणि महाराष्ट्रातल्या तर जवळजवळ सर्व जिल्ह्यातले लोक तेथे आहेत. म्हणजे एक प्रकारचा अठरापगड जातींचा आणि समाजातील शोषित-वंचितांचा मिनीभारत इथे निर्माण झाला असे म्हणायला हरकत नाही. गरीब माणसं संरक्षण बघून येतात, काम कुठे मिळेल ते बघून येतात. चामड्याच्या कारखान्यात, एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चरच्या कारखान्यात काम मिळेल या आशेने येतात. हे लहानसहान उद्योग काढणारा माणूस त्यांच्यातलाच असतो. तोही काही फार मोठा नसतो, पण जरासा हुशार असतो. तो तिथे आपला उद्योग सुरू करतो आणि मग आपल्या गावची; आपल्या विश्वासातली माणसं आणतो. मग त्या त्या भाषेच्या त्या प्रांताच्या लोकांच्या वस्त्या तिथं तयार होतात. असाच प्रकार धारावीत झाला.
कुंभारवाड्यात सध्या फारशा वस्तू तयार होत नाहीत. त्याऐवजी सौराष्ट्र-कच्छ येथे घडवलेल्या मातीच्या आधुनिक वस्तू, शो पिसेस विकायला येतात, कारण धारावीत बाजारपेठ आहे. येथे अजूनही मातीच्या जुन्या भट्ट्या दिसतात, परंतु मुंबई परिसरात माती मिळणे अवघड झाले आहे. धारावीत फूड इंडस्ट्री खूप जोरात आहे. चिवडा, चकल्या, वेफर्स, कचोरी, चिक्की या सगळ्या सुट्या वस्तू धारावीत तयार होतात. इडली, मेदुवडे, अप्पम बनवणारे कारखानेही धारावीत आहेत. मोठे मशीन असते. त्यामुळे ट्रेनमध्ये आणि अन्यत्र हे पदार्थ विकणाऱ्या लोकांना स्वतः ते घरी तयार करण्यापेक्षा यांच्याकडून विकत घेऊन विकणे परवडते. येथे एक्सपोर्ट गारमेंट्स बनवण्याचा व्यवसायही जोरात चालतो.
धारावीतील वस्ती दाटीवाटीची आहे. दहा बाय दहाच्या झोपडीसदृश घराला दोनतीन माळे असतात. खाली मालक राहतो आणि वरचे माळे भाड्याने देतो. वर राहणारे लोक तिथं राहतात आणि तिथंच व्यवसाय करतात. त्यामुळे धारावीत एका घरामागे 25 ते 40 माणसे राहतात असे म्हटले जाते. धारावीची वस्ती साधारणपणे 10 लाख आहे आणि एकूण क्षेत्रफळ 2.39 चौ किमी (590 चौ. एकर) आहे. म्हणूनच धारावी ही भारतातील सगळ्यात मोठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी ठरली आहे.
एवढे प्रचंड संख्येने कष्टकरी लोक इथे राहतात, येथेच काम करतात. म्हणजे त्यांची खायचीप्यायची, कपड्यालत्त्यांची सोय येथेच करावी लागते. त्यामुळे धारावीतील रस्त्यावरील पन्नास फुटांच्या दुकानाची किंमत 60 ते 70 लाख रुपये आहे, कारण ते चालतं, नव्हे धावतं !
धारावी उद्योगनगरी आहे. येथील कामकरी लोक रोज सकाळी लवकर उठतात, बाहेरच नाश्ता करतात. त्यामुळे हॉटेलं चालतात. हॉटेल परवडत नाही तो रस्त्यावर अंडाभुर्जी खातो, वडापाव खातो. अशा प्रकारे सगळ्यांचा धंदा चालतो आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे, खिशातल्या पैशांप्रमाणे अन्न मिळतं. कपडे रस्त्यावर मिळतात आणि मोठ्या दुकानातही मिळतात. ज्याला जे परवडेल ते तो घेतो.
इथं एकट्यानं राहणाऱ्यांची संख्या खूप आहे. सुरुवातीला लोक एकेकटे येतात, नंतर परिस्थिती सुधारली की गावाहून कुटुंबं आणतात आणि भाड्यानं झोपडे घेऊन धारावीतच राहतात. त्यांना दुसरीकडे राहणे परवडत नाही. परंतु शेवटी, धारावी ही मुंबईच आहे. मुंबईत येण्याची सर्वांची इच्छा असते, इथं आलं की दृष्टिकोन विशाल होतो. प्रगतीचे मार्ग मिळतात.
धारावीचं स्वरूप काळागणिक बदलत गेलं आहे. इथं केवळ झोपडपट्टीच नसून महानगरपालिकेच्या इमारती आहेत, खाजगी इमारतीही आहेत, पक्की घरं, कच्ची घरं सगळ्या प्रकारची घरं दाटीवाटीनं भरलेली आणि मधले चिंचोळे आतले रस्ते – अशा या धारावीत आता शिक्षक राहायला येतात, खाजगी कंपनीतील नोकरदार -अगदी सरकारी नोकरही राहायला येतात. कारण मुंबईत नव्यानं येणाऱ्या लोकांना मध्य मुंबईत परवडणारं घर फक्त धारावी देऊ शकते. जसजशा मुंबईतील घरांच्या किमती आभाळाची उंची गाठू लागल्या तसतसे इथे मध्यमवर्गीय लोकही राहायला येऊ लागले. त्यामुळे आता केवळ हातावर पोट असलेला गरीब माणूसच इथं आहे असे नाही. शीव आणि माहीम स्टेशनं धारावीला लागून आहेत. चुनाभट्टी स्टेशनही जवळ आहे, तेही सोयीचं होतं.
झोपडपट्टी म्हणून धारावीची दयनीय अवस्था बदलण्याचं श्रेय,‘महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास,1971’ या कायद्याला जातं. हा कायदा येण्यापूर्वी झोपडपट्टी हा प्रकारच महाराष्ट्रात सर्वत्र बेकायदेशीर होता. त्यामुळे तिथं रस्ते, दिव्यांची सोय, पाणी, वीज, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी निचरा व्यवस्था; असं काहीच नसायचं. महानगरपालिका सुविधाच पुरवत नव्हती. थोडक्यात सांगायचे तर तिथली परिस्थिती मानवी जीवनास अयोग्य होती. पण वाढत्या शहराच्या गरजा पुरवण्यासाठी माणसांची, त्यांच्या सेवांची प्रचंड गरज भासू लागली. अशा वेळेस हा कायदा आला. बाबुराव उंबरकर, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांनी चळवळ केली, जनमताचा दबाव आणला. या कायद्यानुसार एखादं ठिकाण झोपडपट्टी घोषित करण्याचा अधिकार महानगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात आला – झोपडपट्टी घोषित केली की तिथं सुविधा द्या, सुधारणा करा- सुधारणा करता येत नसेल तर पाडा आणि नवीन बांधा- असा तो प्रकार होता. मलबार हिल परिसरातही झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी ही शहरांची गरज बनली. या झोपडपट्ट्या मुख्यत्वेकरून शासकीय जमिनीवर वसलेल्या होत्या. खूप थोड्या खाजगी जमिनीवर होत्या, पण तिथंही झोपडपट्टी घोषित करण्याचे अधिकार पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांना आहेत. राज्यातील असे सर्व कायदे सरकारच्या मनात आले म्हणून झालेले नाहीत, तर जनतेच्या दबावामुळे झाले आहेत.
धारावीत कुटुंब राहायला आल्यापासून शाळांसाठी आणि पुढे कॉलेजांसाठी तेथील मुलं मोठ्या संख्येनं शीव- माहीममध्ये जातात. धारावीत महानगरपालिकेची शाळा आणि अन्य शाळा आहेत, पण त्यांची संख्या अपुरी पडते. त्यामुळे धारावीतील मुलं माहीम-शीव येथील अनुदानप्राप्त शाळांत, तर शीवमधील श्रीमंतांची मुलं आयसीएससीच्या महागड्या शाळांत असा, अन्यत्र दिसतो तसाच प्रकार येथेही आहे.
कोविडकाळात मात्र दाटीवाटीची धारावी बऱ्यापैकी ओस पडली. ज्यांना कुठे जाणे शक्य नव्हते ते लोक तिथंच राहिले. महानगरपालिकेने जंतूनाशक फवारणीची यंत्रं दिली तर काही ठिकाणी लोकांनी स्वखर्चाने घेतली. लोकांनी उत्स्फूर्तपणे सॅनिटायझरची व्यवस्था केली. त्या काळात माणुसकीचा उत्तम अनुभव आला, परंतु रोजंदारीवरील लोकांचे, आठवड्याला पगार होणाऱ्या लोकांचे हाल झाले. त्यांना गावी जावं लागलं. गावी जाण्यासाठी कोविड नसल्याचे सर्टिफिकेट देणाऱ्या काही डॉक्टरांनी 200-500 रुपये काढायचे उद्योगही केले. शेवटी काय? सर्व प्रकारचे लोक समाजात असतात. याचा अनुभव येतच असतो. कोविड संपल्यावर लोक परत आले, कारण पर्याय काय?
झोपडपट्टी पुनर्वसन योजना 95 सालच्या निवडणुकीच्या वेळेस जाहीर झाली. प्रत्यक्षात त्या कायद्याची सगळी रूपरेषा मांडली जाऊन अंमलबजावणीला 2001 साल उजाडलं. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2004 रोजी विलासराव देशमुख सरकारनं धारावीच्या एकात्मिक विकासाचा अध्यादेश काढला. तेव्हापासून धारावीतील एसआरए पुनर्विकास प्रकल्प (झोपडपट्टी पुनर्विकास महामंडळाचे प्रकल्प) स्वीकारणं बंद झालं. पण तरी 2001 ते 2004 या काळात 100 इमारती तिथं झाल्या. धारावीत सगळ्या चाळींच्या जागी सहकारी हाऊसिंग सोसायट्यांचा प्रस्ताव आहे, कारण धारावीतील माणूस प्रगतीच्या बाजूने आहे. परंतु 2004 सालानंतर 2018 पर्यंत काहीच झालेलं नाही. त्यानंतर फडणवीस सरकारने एकात्मिक विकासाचा प्रकल्प बस्त्यातून बाहेर काढला. पण तेव्हा तो तडीस गेला नाही. पुनश्च महायुतीचे सरकार आल्यावर तो प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रकल्पासाठी पात्रतेच्या अटी-शर्ती पुन्हा एकदा विशिष्ट उद्योगाला पात्र ठरवतील अशा प्रकारे रचल्या गेल्या आहेत. त्यांना प्रचंड सवलती दिल्या आहेत. परंतु खुद्द धारावीतील लोक आणि विरोधी पक्ष यांना ते मान्य नाही. त्यामुळे सध्या ‘धारावी बचाव’ आंदोलन चालू आहे आणि ते दीर्घ काळ चालू राहण्याची चिन्हं आहेत.
परिस्थितीवर सर्वच काही अवलंबून नसतं. काही गोष्टी माणसाच्या हातात असतात. समोर नेहमी आंबाच येईल असे नसतं, पण लिंबू समोर आलं तर त्याचंही मधुर सरबत कसं करायचं हे माणसाच्या हातात असतं. धारावीकरांचा तोच गुण तर मोठा आहे !
– सविता दामले 9930311546 savitadamle@rediffmail.com
(आभार : धारावीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजू कोरडे)
धारावी संबधी आजवर पुष्कळ लिखाण प्रकाशित झालेले आहे . तसे असूनही हा लेख वाचनीय आहे