बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले…
दीर्घ अवर्षणे भारताच्या इतिहासात वेळोवेळी झालेली आहेत. दंडकारण्य हा शब्द कसा आला? त्याचा खुलासा रामायणात आहे. दंडक म्हणजे उभी असलेली निष्पर्ण काठी. वनांच्या वर्णनाला व पर्यावरणाला आधुनिक काळात जो एक प्रकारचा स्वप्नाळुपणा जोडला गेला आहे, की तेथे दाट झाडी वगैरे असते, तसे तेथे काही नव्हते. अवर्षण प्रवणता असल्यामुळे, ‘वनराई’ किती निर्माण होऊ शकते त्याबाबत निसर्गाची मर्यादा असल्या कारणाने दंडकारण्यामध्ये वाळक्या काठ्या उभ्या असायच्या. ज्यांना बोरीबाभळीची झाडे म्हणतो, ती उभी होती. ही कथा नेमकी कोठे घडली असावी ते खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण एकंदर वर्णनावरून ती बुलडाणा जिल्ह्याच्या व मराठवाड्याच्या सीमेवर कोठे तरी घडली असावी. त्या ठिकाणी अत्री ऋषींचा आश्रम होता. त्या ठिकाणी अनसूयेने जे पर्यावरणीय काम केलेले आहे, त्या कामाचे अत्री ऋषी कौतुक करताहेत. काय शब्दांत करताहेत? दशवर्षान नावृष्टिम् । रामाला ते सांगत आहेत, की तू आता येथे येण्यापूर्वी दहा वर्षे अनावृष्टीची म्हणजे अवर्षणाची गेलेली आहेत.
दुर्गादेवीचा दुष्काळ हा शब्द महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीचा आहे. बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात समाज कोणी टिकवून धरला? तर दुर्गादेवीने. ‘देवी’ हा शब्द महाराष्ट्रामध्ये दोनच महिलांच्या नावामागे आदराने लावतात. महाराष्ट्रात नुसते अहिल्या म्हणत नाहीत. देवी अहिल्याबाई असे म्हणतात. त्या अहिल्याबाई होळकर. तशीच दुर्गादेवी. वंजारींमध्ये जे लाखा वंजारी होते, त्या लाखा वंजारींमध्ये दुर्गा नावाची महाकर्तबगार महिला होऊन गेली. ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. तिने महाराष्ट्रात दुष्काळ तेरा वर्षे असताना त्या काळच्या बिहार या गंगा काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज जगवला! महाराष्ट्राने त्यासाठी तिला काय दिले? तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो दुर्गादेवीचा दुष्काळ असे म्हटले जाऊ लागले. तिने हा समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला.
तसेच, सकृतदर्शनी रामायणात आर्य अनसूयेच्या काळात त्या प्रदेशामध्ये अगोदर घडले होते. रामायणातील मूळ वर्णन दशवर्षान नावृष्ट्या दग्धे लोको । असे आहे. दहा वर्षांच्या अवर्षणामुळे सर्व प्रदेश जणू बेचिराख झाला होता. ‘निरंतरं ययामूल फले सृष्टे जान्हवीच प्रवर्तीता ।’ आज जसे वेगवेगळ्या ठिकाणी तलाव बांधतात, पाझर तलाव बांधतात, तसे अनसूयेने पाझर तलाव इतक्या मोठ्या संख्येने त्यावेळी बांधले, की ज्या ठिकाणी अत्री ऋषींचा आश्रम होता ती नदी बारमाही झाली! जान्हवी हा शब्द बारमाही नदीला वापरला जातो. अनसूयेने अवर्षणग्रस्त प्रदेशात जान्हवी निर्माण करून दाखवली!
– माधव चितळे 9823161909
( ‘जलसंवाद’, डिसेंबर 2017 वरून उद्धृत. मूळ शीर्षक – भारताची जलसंस्कृती)
——————————————————————————————————————
कोणत्या साली दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता?