द.ब. पारसनीस या इतिहासकाराचा जन्म ! (How the historian named D B Parasnis was born ?)

0
315

हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. मात्र महाराष्ट्रातील लोकांना झाशीच्या राणीविषयी फारशी माहिती 1894 सालापर्यंत नव्हती. उलट, ‘झाशीवाली राणी’ हा एक सर्वप्रिय विषय उत्तर हिंदुस्थानामध्ये होता ! त्या स्त्रीच्या अतुल पराक्रमाच्या आवेशयुक्त व रसभरीत गोष्टी तिकडील वृद्ध लोकांच्या तोंडून सांगण्यात येत. राणी लक्ष्मीबाईंचा वाटा 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये तर फार मोठा होता. दिल्लीचे मोगल बादशहा बहादूरशहा, पेशवे धोंडोपंत (धोंडदेव) ऊर्फ नानासाहेब (ब्रह्मावर्त – कानपूर येथील), सेनापती तात्या टोपे, झाशीची राणी, ब्रिटिश सैन्यातील स्वातंत्र्यप्रेमी व असंतुष्ट सैनिक यांनी मिळून त्या युद्धात प्रमुख भाग घेतला होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही, त्या स्वातंत्र्ययुद्धात एखादा विजेचा लोळ पडावा व लख्ख प्रकाश पडावा असा पराक्रम करून वीरगती प्राप्त करती झाली.

झाशीच्या राणीबद्दल फारशी माहिती त्या काळात महाराष्ट्राला नव्हती. पण, एक गंमतीदार योग आकस्मिक रीतीने 1890 मध्ये जुळून आला. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांची मने त्या विषयाकडे वळली. तो योग असा- पुणे येथे वसंतोत्सवामध्ये (मे महिन्यात) वसंतराव पंडित नावाच्या एका गृहस्थाने ‘वायव्येकडील प्रांत व अयोध्या परिसर येथील तीस वर्षांमागील हकिगत’ या विषयावर एक व्याख्यान दिले. त्यांनी झाशीच्या राणीसंबंधाने मनोरंजक गोष्टी पुष्कळ सांगितल्या. त्या व्याख्यानाचा सारांश पुणे येथील ‘केसरी’ वृत्तपत्रामध्ये 27 मे 1890 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला. वसंतराव पंडित यांची वक्तृत्वशैली ही बरीच आकर्षक असल्याने पुण्यातील लोकांना त्यांचे भाषण आवडले. ‘केसरी’च्या वाचकांनाही त्याची गोडी लागली. झाशीच्या राणीविषयी आदराची भावना व तिचा पराक्रम ऐकण्याविषयी आतुरता व कळकळीचे उद्गार पुण्यात व्यक्त होऊ लागले.

‘केसरी’मधील वसंतराव पंडित यांच्या व्याख्यानाचे वृत्त झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे दत्तकपुत्र श्रीमंत दामोदरराव झाशीवाले यांच्या वाचनात आले. त्यांना ‘केसरी’तील व्याख्यानामधील कपोलकल्पित कथा वाचून अतिशय दु:ख झाले. ते नुसते दु:ख करून थांबले नाहीत तर त्यांनी ‘केसरी’ वृत्तपत्रास पत्र पाठवले. त्यात त्यांनी राणीविषयी गैरसमज नाहीसा व्हावा म्हणून, या सर्व गोष्टी असत्य असून वसंतराव पंडित यांजकडे काही पुरावा असल्यास त्यांनी तो सादर करावा असे जाहीर आवाहन केले. ते पत्र पाहिल्यावर ‘केसरी’कारांनी श्रीमंत दामोदरराव यांची माफी मागितली. वसंतराव पंडित यांच्याकडे पुरावा कसलाच नव्हता. त्यांनीसुद्धा श्रीमंत दामोदरराव यांची माफी 23 सप्टेंबर 1890 रोजी ‘केसरी’ पत्रातून मागितली. लोकमान्य टिळक यांना मात्र तेव्हापासून झाशीच्या राणी संबंधाने खरा, साधार इतिहास प्रसिद्ध व्हावा अशी तळमळ लागली.

त्या सुमारास दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे गृहस्थ ‘महाराष्ट्र कोकीळ’ असे मासिक साताऱ्याहून प्रकाशित करत असत. त्यामध्ये त्यांनी ‘झाशीच्या राणीचा संक्षिप्त इतिहास’ असा लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळे लोकमान्यांनी पारसनीस यांच्याकडे झाशीच्या राणीचा खरा इतिहास शोधून काढून स्वतंत्र रीत्या चरित्र प्रकाशित करावे असा आग्रह धरला. टिळक यांच्याप्रमाणे लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांनीही पारसनीस यांची पुण्यात गाठ घेतली व त्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांची चरित्रे लिहिण्याची विनंती केली.

पारसनीस यांना टिळक व लोकहितवादी यांनी प्रोत्साहन दिले खरे, पण ते काम तेवढे सोपे नव्हते. झाशीच्या राणीला जाऊन पस्तीस वर्षे झाली होती आणि तिच्याबद्दल तिच्या नावापलीकडे काही माहिती नव्हती. झाशीमध्ये इंग्रजांची मोठी छावणी होती. बंडात झाशीच्या राणीच्या राजवाड्याची पडझड/दुर्दशा झाली होती. शेवटी, संन्याशाच्या लग्नाची शेंडीपासून तयारी करावी तशी पारसनीस यांना झाशीच्या राणीच्या अस्सल चरित्राची जुळवाजुळव करावी लागली. त्यांचे ते प्रयत्न व त्यातील कसोशी पाहिली, की कौतुकच वाटते ! त्यांनी प्रथम राणीचे दत्तकपुत्र दामोदरपंत यांना विनंती केली. दामोदररावांनी त्यांच्या स्वत:च्या अनुभवावरून; तसेच, राणीसाहेबांबरोबरच्या वृद्ध माणसांकडून आणि कागदपत्रांमधील माहिती एकदोन वर्षे प्रयत्न करून जमवली. ती सर्व पारसनीस यांच्याकडे पाठवून दिली. अर्थात राणीच्या मुलाकडून मिळालेली माहिती अस्सल व विश्वसनीय होती; पण तरीही पारसनीस त्यावर संतुष्ट नव्हते. त्यांना दामोदरपंतांनी दिलेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहणे गरजेचे वाटले. पारसनीस यांनी चिं.वि. वैद्य आणि माधवराव लेले या इतिहासाच्या अभ्यासकांकडून त्याची तपासणी करून घेतली. तसेच, डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स यांच्या सहाय्याने बंडाच्या वेळी समक्ष हजर असलेल्या राणीच्या पदरच्या एका चाणाक्ष गृहस्थांकडून राणीसाहेबांची व झाशी संस्थानाची हकिगत लिहून घेतली.

राणीसाहेबांच्या सापत्न मातुश्री चिमाबाईसाहेब व बंधू चिंतामण तांबे तोपर्यंत विद्यमान होते. राणीसाहेबांची एक बहीण काल्पीजवळील करवी या गावातील जहागिरदारास दिलेली होती. तेव्हा पारसनीस यांनी राणीसाहेबांचे बंधूंना भेटून व त्यांच्या मातुश्रींना विचारून वेळोवेळी माहिती मिळवली. पारसनीस यांनी त्यापुढे जाऊन विलायतेमध्ये असलेले हिंदुस्थानचे मित्र विल्यम डी.बी. यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून; तसेच, आणखी काही युरोपीयन गृहस्थांकडून माहिती मिळवली. इंग्लिश गृहस्थ मॅल्सन अर्नोल्ड, सिल्व्हेस्टर यांचे इंग्रजी ग्रंथ वाचले. ते सर्व झाल्यावर त्यांनी स्वत: उत्तर हिंदुस्थानचा प्रवास केला. कानपूर, आग्रा, दिल्ली, झाशी, लखनौ अशा शहरांना भेटी दिल्या.

पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती. पारसनीस यांनी राणीच्या पूर्वजीवनापासून सुरुवात करून तिच्या वीरमरणापर्यंतचा साद्यंत इतिहास लिहिला. दत्तकपुत्र दामोदरराव यांच्या जीवनकथेपर्यंतची झाशीच्या राणीची चटका लावणारी जीवनकहाणी इतकी आकर्षक पद्धतीने लिहिली की ती कादंबरीच वाटावी !

झाशीच्या राणीचे चरित्र वाचले, की वाचकाच्या डोळ्यांसमोर राणीची पूजाअर्चा, तिची दिनचर्या, ती करत असलेली अश्वपरीक्षा, बैठकीचे वर्णन, तिच्या देवदर्शनाच्या थाटाची स्वारी, तिच्यातील दृढनिश्चय; तशीच खंबीरता, लढाई जिंकण्याची जिद्द आणि तिचे प्राणार्पण असे सारे काही साक्षात उभे राहते. त्यात लेखक/चरित्रकार म्हणून दत्तात्रेय बळवंत पारसनीस पूर्णपणे यशस्वी झाले होते. ते तीनशेअडुसष्ट पानांचे पुस्तक हातात घेतले, की वाचून पुरे केल्याशिवाय खाली ठेववत नाही. त्यांचे चरित्र म्हणजे लढताना वीरमरण पत्करणाऱ्या झाशीच्या राणीला पुन्हा जिवंत करणेच होय !

पारसनीस यांनी ते चरित्र टिळक यांना दाखवले तेव्हा टिळक यांना समाधान वाटले. त्यांनी उद्गार काढले, की ‘इतिहासातील खोट्या गप्पा प्रसिद्ध केल्याबद्दल मला माफी मागावी लागली, पण असे वाचनीय व सुंदर चरित्र बाहेर येत असेल तर मी माफी मागण्यास तयार आहे !’ अशा प्रकारे वसंतराव पंडित यांच्या खोट्या गप्पांमधून दत्तात्रेय पारसनीस यांनी झाशीच्या राणीचे खरे चरित्र निर्माण केले ! ‘केसरी’ने चरित्राच्या गुणगौरवपर अग्रलेख लिहिला व पारसनीस यांचे नाव महाराष्ट्रात सर्वोतोमुखी झाले. ते साल होते 1894. पारसनीस यांची निरीक्षणशक्ती, अभ्यासूपणा, लेखनकौशल्य यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकवर्गाला झाला.

पारसनीस यांनी लिहिलेले ते चरित्र 2011 साली पुनर्मुद्रित केले गेले आहे. त्या चरित्राची वाचनीयता टिकून आहे. त्या पुस्तकामुळे पारसनीस यांना पुढे काय करायचे त्याचा मार्ग दिसला. त्यातून महाराष्ट्राच्या क्षितिजावर एका तरुण इतिहासकाराचा जन्म झाला ! त्यांचा जन्म 1870 साली झाला म्हणजे त्यांनी झाशीच्या राणीचे चरित्र लिहिले त्यावेळी ते फक्त चोवीस वर्षांचे होते. महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध साहित्यिकांनी या चरित्र पुस्तकाचे कौतुक केले आहे. कविवर्य कुसुमाग्रज चरित्र वाचल्यावर म्हणाले, की ‘राणीचे चरित्र केवळ आदरार्ह नाही तर नाट्याने परिपूर्ण भरलेले आहे.’

(संदर्भ: ‘रावबहाद्दूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस : चरित्र व कार्य’ – दिलीपराज प्रकाशन)

– प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here