नाट्यसंगीतातील घराणी (Music traditions in Theater)

0
278

संगीत नाटकांचा आलेख हा चढउताराचा आहे. अलिकडच्या काळात जुन्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन होत असले तरी त्यात स्मरणरंजनाचा भाग जास्त आहे असे असले तरी नाट्यसंगीताची लोकप्रियता टिकून आहे. ‘दिवाळी पहाट’ वगैरे कार्यक्रमांमधून आणि विविध वाहिन्यांवरील गाण्यांच्या कार्यक्रमांमधून तसे दिसून येते. शास्त्रीय संगीत गाणारे त्यांच्या मैफलीत नाटकातल्या पदांचा समावेश करतात. जशी शास्त्रीय संगीतात घराणी आहेत तशी नाट्यसंगीतातही घराणी आहेत. किंबहुना घराणेबद्ध शास्त्रीय संगीताचे विधायक वळणही नाट्यसंगीताने दाखवले आहे. नाट्यसंगीतातील घराण्यांविषयी लिहित आहेत मागच्या पिढीतले शास्त्रीय आणि भावसंगीत गाणारे नामवंत गायक वसंत आजगावकर. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील ‘मोगरा फुलला’ या सदरात प्रकाशित झालेले इतर लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

नाट्यसंगीतातील घराणी

घराणे म्हणजे काय तर समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह. या समान पूर्वजांपासून काही पिढ्या सातत्याने अस्तित्वात असणाऱ्या कुटुंबाचा घराणे या समानार्थी शब्दाने निर्देश होतो. तसा तो समान गुरूपासून सुरू झालेल्या परंपरेचाही होतो. माणसांची घराणी असतात तशी चित्रकला, नृत्य, संगीत या कलांमध्येही घराणी असतात. सर्वसामान्य श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातील घराणी बहुधा परिचित असतात. कारण त्यांचा उल्लेख गायक, गायिका किंवा वादकांची ओळख करून देताना केला जातो. पण नाट्यसंगीतात घराणी असतात हे कुणाला ठाऊक नसते. किंबहुना त्याची कल्पनाच नसते. शास्त्रीय संगीतात ज्या घराण्याच्या गुरूकडून शिष्याला शिक्षण मिळाले असेल त्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणे रागविस्तार केला जातो. आलाप, ताना, बोलालाप, बोलताना इत्यादी गोष्टींना प्रत्येक घराण्यात वेगवेगळे महत्त्व देऊन राग मांडला जातो. त्यामुळे प्रत्येक घराण्याची राग मांडण्याची पद्धत वेगवेगळी होते.

नाट्यसंगीत हे तसे सुगम संगीताच्या जवळ आहे. कारण एखादा प्रसंग खुलवण्यासाठी किंवा नाटकातल्या प्रसंगातली भावना व्यक्त करण्यासाठी नाट्यगीताची योजना केलेली असते. त्यामुळे शब्दांनाही काही प्रमाणात महत्त्व असते. संगीत आणि शब्द परस्परांना साथ देऊन भावना व्यक्त करतात. अनेकदा कथानक पुढे सरकायलाही मदत करतात. मग घराणी कशी म्हणायची? खरे म्हटले तर नाट्यसंगीताला बऱ्याच प्रमाणात रागदारी संगीताचा आधार असला तरी कुठल्या एका शास्त्रीय संगीतातल्या घराण्याच्या पद्धतीनुसार नाट्यसंगीत सादर केले जात नाही. नाटकातला प्रसंग अधिक उठावदार करण्यासाठी किंवा त्या त्या भूमिकेतील पात्रांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही पदे लिहिली गेली व ती गायक नटनट्यांनी गायली. ज्या गायकनटाची किंवा नटीची गायनपद्धती लोकांना आवडली ती गाणी लोकप्रिय झाली. त्यानुसार ज्या ज्या गायकांच्या गायनपद्धतीमुळे ही गाणी प्रसिद्ध किंवा लोकप्रिय झाली त्या त्या गायकांची पद्धत एकप्रकारे एकेक घराणे होऊन गेले. नाट्यसंगीत कसे लोकप्रिय होत गेले हे आपण सोदाहरण पाहूया.

सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘शाकुंतल’ नाटक रंगभूमीवर आणले. त्यात दिंड्या, साक्या आदि लोकसंगीताचा वापर अधिक होता. रागदारी संगीताचा वापर कमी होता. त्याकाळी मोरोबा वाघुलीकर, हल्याळकर, बाळकोबा नाटेकर असे चांगल्या आवाजाचे गायकनट प्रसिद्ध होते पण लोकांवर मोहिनी घालतील अशा गाण्यांच्या चाली उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी पारशी किंवा उर्दू रंगभूमीवरच्या काही चालीसुद्धा मराठी नाटकांत वापरल्या गेल्या. नाटकातल्या गाण्यांसाठी संगीतज्ञ नेमावा व उत्तम चाली वापरून गाणी रंगभूमीवर सादर करावी हा विचार ‘मानापमान’ व ‘स्वयंवर’ या नाटकांपासून पुढे आला. त्या काळात बालगंधर्वांसारखा उत्तम गायकनट रंगभूमीला मिळाला. त्याच्या गायकीवर लुब्ध होऊन रसिक श्रोते नाटकाला गर्दी करू लागले. ‘मानापमान’ नाटकाला प्रसिद्ध हार्मोनियमवादक व संगीतज्ञ गोविंदराव टेंबे यांनी आणि ‘स्वयंवर’ नाटकाला भास्करबुवा बखले यांच्यासारख्या शास्त्रीय संगीतातल्या थोर गायकाने संगीत दिले होते. त्यांनी नाटकाच्या आशयाशी सुसंगत अशा विविध रागातल्या बंदिशींच्या चालींचा वापर करून नाटकातली गाणी सुश्राव्य आणि मधुर केली होती. बालगंधर्व यांच्यासारख्या अद्वितीय गायकनटाने ती रंगभूमीवर गाऊन लोकप्रिय आणि अजरामर केली. त्यांच्या गायनपद्धतीचे अनुकरण पुढील पिढ्यांतले गायक व गायिका करू लागले व गंधर्व गायकीचे घराणे निर्माण झाले.

तोच प्रकार ‘ललितकलादर्श’च्या केशवराव भोसले यांचा. पंडित रामकृष्णबुवा वझे या शास्त्रीय संगीताच्या थोर गायकापाशी चिजांचा अपार संग्रह होता. त्यांनी नाटकांना संगीत दिले आणि ती गाणी केशवराव भोसले यांच्यासारख्या अप्रतिम आवाजाच्या गवय्याने गायली. अत्यंत स्वच्छ आणि सहज टिपेला पोचणारी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे गाणे ऐकण्यासाठी लोक त्यांच्या नाटकांना गर्दी करू लागले. ही गायकी रामकृष्णबुवा वझे यांच्या नावाने लोकप्रिय न होता केशवराव भोसले यांच्या नावाने लोकप्रिय झाली.

केशवराव भोसले यांच्या गायकीचे एक घराणे आहे तसे दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचेही घराणे वेगळे आहे. या विलक्षण मधुर व तयार गळ्याच्या गायकाने त्याच्या  आवाजाची मोहिनी श्रोत्यांवर घातली. त्यांचे गाणे वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांनी ‘मानापमान’ नाटकातल्या काही पदांना स्वतंत्र चाली देऊन ती गाणी गायकीने अतिशय लोकप्रिय केली. आजही ही गायकी लोकप्रिय आहे. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांसारख्या शास्त्रीय संगीतातल्या मर्मज्ञांनी दिलेल्या पदांच्या चाली लोकप्रिय झाल्या.  त्याचे श्रेय त्यांच्या संगीताइतकेच त्या चाली स्वतःच्या गायनकौशल्याने रंगभूमीवर सादर करणाऱ्या गायक नट-नट्यांकडेही जाते. छोटा गंधर्वांनी या जुन्या नाटकातल्या गाण्यांना स्वतःच्या स्वतंत्र ढंगाच्या गायकीने नटवून पुन्हा पुढच्या पिढीत ती गाणी लोकप्रिय केली. त्यांची गाणी श्रोत्यांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे नाटकाला जाणारे रसिक श्रोते नाटकात गायक नट किंवा नटी कोण आहे हे पाहून नाटकाला जात. छोटा गंधर्वांचीही एक गायन परंपरा तयार झाली. पुढे भावगीताचा जमाना सुरू झाल्यावर साहजिकपणे नाटकात भावगीते शिरली. तेथेही ‘आंधळ्यांची शाळा’, ‘कुलवधू’ अशा नाटकांत ज्योत्स्ना भोळे यांच्यासारख्या शास्त्रीय संगीत उत्तम गाणाऱ्या व भावगीतही तितकेच समजून गाणाऱ्या चतुरस्र गायिकेचं गाणं ऐकण्यासाठी श्रोते नाटकाला जाऊ लागले. हा त्या गायिकेच्या गाण्याचाच प्रभाव होता.

पुढल्या काळात नाट्यसंगीताला पुन्हा आपल्या प्रतिभासंपन्न गायकीने आणि चालींनी बहर आणला तो पं. जितेंद्र अभिषेकींनी. त्यांच्या संगीताला रंगभूमीवर रामदास कामत, वसंतराव देशपांडे यांसारख्या गायकांनी लोकप्रिय केले. या लोकप्रियतेत काही प्रमाणात ग्रामोफोन कंपनी, आकाशवाणी या माध्यमांनी हातभार लावला. त्यामुळे ती गाणी, नाटक न पाहिलेल्या अनेक श्रोत्यांपर्यंत पोचली व लोकप्रिय झाली. जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत, वसंतराव देशपांडे यांची गाणी इतर गायक-गायिकाही त्यांच्या कार्यक्रमात गातात. पण हे घराणे अभिषेकी बुवांच्या नावाने ओळखले जाते. याच काळात विद्याधर गोखले लिखित आणि ‘ललितकलादर्श’ संस्थेने सादर केलेली संगीत नाटके गाजली. त्यांचे संगीत वसंत देसाई व राम मराठे अशा दिग्गज कलाकारांनी केलेले होते. त्यातली गाणी स्वतः राम मराठे, प्रसाद सावकार व भालचंद्र पेंढारकर अशा कलाकारांनी गायली. या साऱ्या विवेचनात मी अगदी मोजक्याच कलावंतांचा निर्देश केला आहे. पण आणखी अनेक स्त्री-पुरुष कलाकारांनी हे नाट्यसंगीताचे दालन त्यांच्या गायनाने समृद्ध केलं आहे. तसेच एक गोष्ट या विवेचनातून निर्विवादपणे जाणवते की नाट्यसंगीत लोकप्रिय होण्यामध्ये गायक-गायिकांचा मोठा वाटा होता. तसेच अशा प्रसिद्ध गायक-गायिकांनी त्यांच्या गायन पद्धतीने रसिकांसमोर आदर्श निर्माण केला व त्याचे शक्य होईल तितके अनुकरण इतर गायक-गायिकांनी करून प्रसिद्धी मिळवली. त्यानुसार ज्यांनी आपली स्वतंत्र गायनपद्धती लोकप्रिय केली त्यांनी रसिकांसाठी आपले स्वतंत्र घराणे निर्माण केले असे म्हणण्यास हरकत नाही. बालगंधर्व, केशवराव भोसले, पेंढारकर, दीनानाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, राम मराठे, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यसंगीतात स्वतःची स्वतंत्र घराणी निर्माण केली. त्यानंतर त्यांनी ज्यांच्याकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली ते गुरुघराणे कोणतेही असो. आजही या थोर गायक-गायिकांचे अनेक गायक-गायिका त्यांच्या गाण्यात जाणीवपूर्वक किंवा नकळत अनुकरण करतात हे त्या बुजुर्गांच्या स्वतंत्र गायकी घराण्याचे द्योतक आहे.

वसंत आजगांवकर 9870283798 vasantajgaonkar103@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here