Home मराठी भाषा विस्मरणात गेलेली पुस्तके धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)

धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)

1

हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पां.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्मनीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक,सामाजिकनागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे…

‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ (History of Dharmashastra) हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिकसामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून History of Dharmashastra चाच आधार वेळोवेळी घेतला आहे. तो धर्मासंबंधी सखोल माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो इंग्रजी भाषेत आहे. त्याचे खंड पाच आहेत आणि पृष्ठे साडेसहा हजारांहून अधिक आहेत. History of Dharmashastra म्हणजे भारताचा प्राचीन व मध्ययुगीन धार्मिक आणि सामाजिक कायदा असे शीर्षकातच स्पष्ट करण्यात आले आहे ! धर्म संकल्पनेचा उगम, विस्तार, त्यात विविध कालखंडांत होत गेलेले परिवर्तन; तसेच, भारतातील धार्मिक व सामाजिक नीतिनियम यांचे विस्तृत, सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन ग्रंथात आहे. धर्मशास्त्रात अंतर्भूत असणाऱ्या सुमारे हजारेक विषयांवरील विचार त्यात समाविष्ट होतो. हजारो संस्कृत उद्धरणे, स्पष्टीकरणे ग्रंथाच्या तळटीपांमध्ये दिली आहेत.

ग्रंथाचा पहिला खंड 1930 साली प्रसिद्ध झाला. त्याची सातशे साठ पृष्ठे आहेत. त्या खंडात महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांबरोबरच, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या धर्मशास्त्रविषयक साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा ऐतिहासिक क्रमाने (Chronological Order) परिचय करून देण्यात आला आहे. तो ऋग्वेदा पासून सुरू होतो. धर्म संकल्पनेच्या प्रवासाचा वेध तेथून छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, भगवद्गीता, मनुस्मृती व अन्य स्मृती यांच्या आधारे प्रथम घेतला आहे. गौतम, आपस्तंभ, वसिष्ठ, मनू, याज्ञवल्क्य यांच्या धर्मशास्त्र विषयक विचारांचा परामर्श त्यात आहे. धर्मशास्त्र विषयक साहित्य निर्मितीचा कालखंड ठरवण्याच्या दृष्टीने बौद्धायन, कात्यायन, जैमिनी, पतंजली यांच्याबरोबरच पाश्चात्य अभ्यासक ब्यूलर, मॅक्सम्युलर यांच्या मतांचा विचार केला आहे. गौतमाची धर्मसूत्रे ही धर्मशास्त्रावरील उपलब्ध साहित्यातील सर्वात प्राचीन सूत्रे समजली जातात. त्या धर्मसूत्रांचे, तसेच बौद्धायन, आपस्तंभ, हिरण्यकेशी, वसिष्ठ यांच्या धर्मसूत्रांचे विस्तृत व सखोल विवेचन तेथे आहे. त्या महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांखेरीज शंख-लिखितधर्मसूत्र, मानव-धर्मसूत्र, विष्णू, हरित, वैखानस, अत्री, उ:शनस, कण्व, कश्यप, गार्ग्य, च्यवन, जतुकर्ण, देवल, बुध, बृहस्पती, भारद्वाज, शततप, सुमंतु आदी ऋषींच्या धर्मसूत्रांची चिकित्सा करून कौटिलीय अर्थशास्त्राचा धर्मशास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करून दाखवला आहे. त्या ओघात पौर्वात्य व पाश्चात्य अभ्यासकांच्या मतांची समीक्षा येतेच. स्मृति वाङ्मय – उदाहरणार्थ, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, नारदस्मृती इत्यादी, रामायण-महाभारत ही महाकाव्ये, पुराणे यांच्यातील धर्मशास्त्र संबंधी भागांच्या माहिती बरोबर इसवी सनाच्या अठराव्या शतकातील धर्मशास्त्रविषयक ग्रंथांची, भाष्यांची माहिती या खंडात देण्यात आली आहे. धर्मशास्त्र हा विषय केवळ पोथ्या-पुराणांपुरता बंदिस्त व मर्यादित नसून किमान दोन हजार वर्षे त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर प्रभाव आहे. त्याचीच साक्ष शिलालेखांवर व ताम्रपटांवर कोरलेल्या धर्मशास्त्रातील आज्ञा देत असतात.

दुसरा खंड 1941 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याची पृष्ठे साडे तेराशेहून अधिक आहेत. त्यात वर्ण, संस्कार, यज्ञ, आश्रमव्यवस्था यांबरोबरच श्रौत विधींविषयी विस्तृत विवेचन आहे. तो दोन भागांत विस्तारला आहे. धर्माचे प्रकार – उदाहरणार्थ, साधारण-धर्म, वर्णाश्रम-धर्म आदींचा विचार या खंडात केला आहे. सत्य, दान, मनोनिग्रह, नैतिक मूल्ये, मानवी जीवनाचे ध्येय मानलेले चार पुरुषार्थ यांच्याबरोबर वर्णव्यवस्था, तिचा उगम, त्या अंतर्गत येणारे हक्क, नीतिनियम, कर्तव्ये इत्यादींचा ऊहापोह त्यात केला आहे. उपनयन, विवाहादी संस्कार- त्यांचा उद्देश, विवाहांचे प्रकार, नियोग, विधवा विवाह, सती अशा प्रथा यांच्याविषयी चिकित्सक माहिती तेथे मिळते. यज्ञ संकल्पना, आहारविषयक, आचारविषयक, दानविषयक नीतिनियम यांचाही समावेश या खंडात करण्यात आला आहे. मानवी जीवनातील विविध टप्प्यांची कल्पना करणारे चार आश्रम व त्यासंबंधी नियम, देवयज्ञ, मनुष्य यज्ञ (अतिथी सत्कार), श्रौत यज्ञ इत्यादींचा अंतर्भाव तेथे होतो.

तिसरा खंड ‘राजधर्म, व्यवहार आणि सदाचार’ या तीन विषयांना पूर्णपणे वाहिलेला आहे. त्यात राज्यकारभार, प्रशासन व न्यायव्यवस्था यांविषयी ऐतिहासिक काळापासून करण्यात आलेले चिंतन समग्रपणे मांडलेले आहे. तिसरा खंड अकराशे पृष्ठांचा आहे. तो 1946 साली प्रसिद्ध झाला. ‘राजधर्मा’त राज्याची सात अंगे, राजाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मंत्रिमंडळ, राष्ट्र, दुर्ग, कोश, मित्रराष्ट्र, सैन्य आदींचा विचार आला आहे. न्यायव्यवस्था हे धर्मशास्त्राचे महत्त्वाचे अंग. त्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश ‘व्यवहार’ या संज्ञेमध्ये होतो. न्यायव्यवस्थेबाबतचे कौटिल्याचे विचार, न्यायनिवाडा, साक्षीदार, हत्या, चोरी, दरोडेखोरी, बलात्कार, जुगार, शिक्षा, शिक्षेचे प्रकार, भागीदारी, स्त्रीधन असे अनेक विषय येथे हाताळलेले आहेत. आचरणाशी संबंधित विषयांवर ‘सदाचार’ या भागात विवेचन केले आहे. श्रुती-स्मृतींनी सांगितलेले सदाचाराचे नियम, त्यांचे उल्लंघन, प्राचीन काळातील व आधुनिक भारतातील रूढी, मान्यता यांचा विचार तेथे येतो.

चौथा खंड साडेनऊशे पृष्ठांचा आहे. तो 1953 साली प्रसिद्ध झाला, त्यात आठ प्रमुख विषयांचा अंतर्भाव आहे. पहिल्या विभागात पातक, प्रायश्चित्त, कर्मविपाक यांचे विवेचन केले आहे. ऋग्वेदातील पातक संकल्पना, पातकांचे प्रकार, ऋत संकल्पना, कर्मसिद्धान्त, प्रायश्चित्त, त्याचे प्रकार, स्वर्ग-नरक यांच्या कल्पना इत्यादींची चर्चा येथे आहे. दुसऱ्या विभागात अशौच, शुद्धी, परलोकविद्या यांचा विचार आहे. तिसरा विभाग श्राद्ध या विषयाशी संबंधित असून चौथ्या विभागात काशी, गया, कुरुक्षेत्र, मथुरा, वृंदावन आदी विविध धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रांबद्दल तपशिलात चर्चा आहे.

पाचवा खंड साडे सतराशे हून अधिक पृष्ठसंख्येचा आहे. तो 1958 आणि 1962 अशा दोन वर्षी दोन भागांत प्रसिद्ध झाला. काणे यांचे वय तेव्हा ब्याऐंशी वर्षांचे होते. धर्मशास्त्र या विषयाचा संक्षिप्त आढावा घेणारे, शंभराहून अधिक पृष्ठसंख्या असणारे पाचव्या खंडातील समारोपाचे प्रकरण विशेष मननीय आहे. पाचव्या खंडाच्या पहिल्या विभागात व्रतेधार्मिक उत्सव यांचा आढावा आहे. वैदिक साहित्यात, स्मृती वाङ्मयामध्ये वर्णिलेले व्रतांचे महात्म्य, व्रतांचे प्रकार; तसेच, नवरात्रदिवाळीमकरसंक्रांतीमहाशिवरात्र इत्यादी उत्सव यांविषयीची माहिती आहे. दुसऱ्या विभागात काल, मुहूर्त, दिनदर्शिका यांवर चर्चा आहे. तेथे ज्योतिषाचा धर्मशास्त्रावरील प्रभाव व परस्परसंबंध यांचे विवेचन आहे. तिसरा विभाग सुख-समृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या ‘शांतीं’बाबत वैदिक काळापासूनची माहिती देतो. चौथ्या विभागात पुराणे आणि धर्मशास्त्र याबद्दल चर्चा आहे. पाचव्या विभागात पुराणांची आणि बौद्ध धर्माचा प्रभाव कमी होण्याच्या कारणांची चिकित्सा केली आहे. सहावा विभाग तंत्रशास्त्र व धर्मशास्त्र यांतील संबंधांची चर्चा करतो, तर सातव्या विभागात मीमांसांचा व धर्मशास्त्राचा तौलनिक मागोवा घेताना मीमांसेतील महत्त्वाचे सिद्धान्त स्पष्ट केले आहेत. आठव्या विभागात सांख्य, योग व तर्क यांचे धर्मशास्त्राशी असलेले नाते उलगडून दाखवले आहे. नवव्या विभागात विश्वोत्पत्ति शास्त्र, कर्मसिद्धान्त व पुनर्जन्म या संकल्पनेची चिकित्सा केली आहे. दहाव्या विभागात वैदिक कालखंडापासून इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत दिसून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा आणि संकल्पनांचा आढावा घेऊन भविष्यातील तिच्या वाटचालीचा कल दर्शवला आहे.

हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’च्या रूपाने काणे यांनी भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा संकलित केला आणि पुढील पिढ्यांकडे सुपूर्द केला. त्यांनी तो ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहून भारतीय विचारधारेचे हे संचित जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून दिले आहे.

– यशवंत आबाजी भट

(महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ 1980)

————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version