Home वारसा महाराष्‍ट्रातील गडकिल्‍ले गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण

गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण

गोरक्ष किल्ला हा दोन हजार एकशेसदतीस फूट उंचीचा असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तो ठाणे जिल्ह्याच्या कर्जत डोंगररांगेत मोडतो. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गोरक्ष किल्ला हा मुंबईकरांना आणि पुणेकरांना एका दिवसात करता येण्याजोगा आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्रगड यांना ऐतिहासिक वारसा नाही तरी त्यांच्या सुळक्यांचे प्रस्तरारोहकांना मात्र आकर्षण वाटते. त्या गडाला महत्त्व शहाजी राजांच्या काळात होते; मात्र तेथे लढाई झाल्याचा उल्लेख नाही. गडाचा उपयोग शिवकालात आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. नाणेघाटमार्गे जुन्नरला जाताना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. गोरक्षनाथांच्या साधनेचे ते ठिकाण म्हणूनच त्याचे नाव गोरखगड असेही पडले आहे. किल्ल्याच्या आजुबाजूचा परिसर तेथील घनदाट अभयारण्यामुळे प्रसिद्ध आहे. गोरखगडाचा विस्तारही मर्यादित आहे. मात्र मुबलक पाणी, निवाऱ्याची योग्य जागा गडावर आहे.

गोरक्ष किल्ल्याच्या सुळक्यात अतिविशाल गुहा खोदलेली आहे. तेथे समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले चाफ्याचे दोन डेरेदार वृक्ष आणि समोर असणारा मच्छिंद्रगड निसर्गाचे भव्य, असीम दर्शन घडवतात.

गोरक्ष किल्ल्याच्या पठारावर पाण्याची टाकी एकूण चौदा आहेत; त्यांपैकी तीन गडावर प्रवेश केल्या केल्या लागतात. गुहेजवळील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गोरक्ष किल्ल्याचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात पन्नास पायऱ्या आहेत. त्या मार्गावरून जपून चालावे लागते. गडाचा माथा लहान आहे. वर महादेवाचे मंदिर आहे आणि समोर नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा परिसर न्याहाळता येतो.

गोरक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी मुरबाडहून म्हसा फाट्यामार्गे धसई गावात जावे लागते. तेथून दहेरीपर्यंत खाजगी जीपची अथवा एस.टी.ची सेवा उपलब्ध आहे. दहेरी गावातून समोर दोन सुळके दिसू लागतात. त्यांपैकी लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरक्ष किल्ल्याचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. त्या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात. मुरबाड-मिल्हे मार्गाने दहेरी गावी यावे. त्या गावातून सोप्या वाटेने गडावर जाता येते.

गोरक्ष किल्ल्यावर पोचण्यासाठी सिद्धगडावरूनही वाट आहे. अनेक ट्रेकर्स सिद्धगड ते गोरक्ष किल्ला असा ट्रेक त्या वाटेने करतात. त्या वाटेवर घनदाट जंगल आहे. सिद्धगडावर मुरबाड-नारिवली मार्गाने जावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिद्धगडावर रात्री मुक्काम करून पहाटेच सिद्धगड उतरावा. वाटेत ओढ्याबरोबर एक वाट जंगलात शिरते. त्या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर धबधब्याच्या वाटेला जाऊन पोचता येते. त्या वाटेने वर आल्यास छोटे पठार लागते. तेथे पठारावर महादेवाचे छोटे मंदिर आहे आणि दोन समाधी आहेत. तेथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते.

राजेंद्र शिंदे

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here