फ्रेडा बेदी आणि तिचे दुष्काळ वृत्तांकन (Freda Bedi’s famine reports in last century still relevant)

0
425

ऐंशी वर्षांपूर्वी बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळात लक्षावधी माणसे मृत्युमुखी पडली होती. मोठ्या दुष्काळात माणसे मरतात, निसर्गाचा कोप होतो आणि निसर्गापुढे मानवप्राणी हताशच असतो असे मानणारा मोठा वर्ग त्यावेळीही होता; कदाचित, तशा लोकांची संख्या सध्या त्याहून अधिक आहे, मात्र तरी त्या दुष्काळाची तऱ्हा वेगळी होती. बंगालमध्ये पडलेला दुष्काळ हा सरकारनिर्मित आहे आणि त्याचे दुष्परिणाम झाले ते सरकारच्या धोरणांमुळे व सरकारी कारभारातील त्रुटींमुळे असे आरोप होते. ती टीका जसजशी अधिकाधिक होऊ लागली, तसतसे दुष्काळाच्या वृत्तांकनावर ब्रिटिश सरकारने निर्बंध आणले. तरी काही वृत्तपत्रांनी त्या निर्बंधांचा निषेध करत, सत्य पुढे आणण्याचे काम चालूच ठेवले होते. तशा वृत्तपत्रांपैकी एक होते लाहोर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र – ट्रिब्युन. महत्त्वाचे म्हणजे एक ब्रिटिश महिला त्या वृत्तपत्रासाठी त्या दुष्काळाचे रिपोर्टिंग करत होती आणि तिने सरकारला हैराण केले होते. त्या महिलेचे नाव – फ्रेडा बेदी. तिने लिहिलेल्या वृत्तांतांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे – Bengal Lamenting.

बाबा प्यारेलाल बेदी आणि फ्रेडा हौलस्टन यांचा प्रेमविवाह झाला.

फ्रेडा बेदी ह्यांचे मूळ नाव फ्रेडा मारी हौलस्टन. जन्म 5 फेब्रुवारी 1911. त्या ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना, त्यांचा बाबा प्यारेलाल बेदी या भारतीय सहविद्यार्थ्याशी मैत्री-प्रेमविवाह झाला. ती गोष्ट 1933 सालची. पती-पत्नी दोघेही शिकत होती. ऑक्सफर्डमध्ये एक स्वदेशी (ब्रिटिश) आणि एक विदेशी यांचे विवाह होत नसत असे नाही, परंतु खूप कमी. बेदी यांच्या विवाहाला ऑक्सफर्डमध्येच विरोध झाला – सकृतदर्शनी, फ्रेडा यांनी त्यांच्या मित्राच्या खोलीत जाताना बरोबर कोणालाच ‘सोबत’ घेतले नाही म्हणून त्यांच्यावर काही कारवाई झाली. मात्र त्यांनी एका भारतीयाशी लग्न केले हे तत्कालीन विद्यापीठ ‘व्यवस्थे’ला पसंत पडले नाही आणि ते त्यांच्यावरील कारवाईचे खरे कारण होते असे संबंधित लोक मानत होते. ते खरे असावे असा आणखी एक तपशील मिळाला – विवाहाची नोंदणी विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात झाली, तरी विद्यापीठ रजिस्ट्रार यांनी नवविवाहित दाम्पत्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला !

तो तपशील आहे फ्रेडा व प्यारेलाल यांचा मुलगा, चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांच्या The Stories I Must Tell या आत्मकथनात्मक पुस्तकात. कबीर बेदी हादेखील आईवडिलांप्रमाणे वादळी जीवन जगला. तो 1970-80 या काळात उदयोन्मुख असलेला नट. तो जाहिरात आणि मॉडेलिंग या व्यवसायांत उमेदवारी करता करता अभिनय क्षेत्रात शिरला. भारतात त्याने संख्येने अगदीच कमी म्हणता येणार नाही इतक्या चित्रपटांत भूमिका केल्या. अलेक पदमसी यांनी त्याला ‘तुघलख’ आणि ‘ऑथेल्लो’ या दोन नाट्यप्रयोगांत प्रमुख भूमिका दिल्या. त्याला अभिनय क्षेत्रात भारतापेक्षा अधिक यश परदेशात मिळाले. इटालीमधील टेलिव्हिजनवर प्रकाशित झालेली ‘संदोकन’ ही मालिका अभूतपूर्व गाजली. तिच्या लोकप्रियतेचे किस्से, भारतात रामायण मालिकेने मिळवलेल्या लोकप्रियतेशी मिळतेजुळते आहेत. ती मालिका इटालीपाठोपाठ इतर युरोपीय देशांतही खूप लोकप्रिय ठरली. त्याच्या उल्लेखनीय हिंदी चित्रपटांत ‘नागीन’ आणि ‘खून भारी मांग’ यांचा उल्लेख करता येईल. त्याने दिल्ली दूरदर्शनवर आणि रेडिओ यांवरही काम केले होते. कबीर बेदी यांची शालेय जीवनाच्या काळात राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्याशी मैत्री होती. कबीर बेदी त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात, की त्यांचे वडील बाबा प्यारेलाल बेदी हे गुरु नानकदेव यांच्या वंशातील सोळावे वारस होत. प्रोतिमा बेदी या प्रसिद्ध ओडिसी नर्तिका कबीर बेदी यांच्या पहिल्या पत्नी. त्यांना दोन मुले झाली – पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी. सिद्धार्थ याला वयाच्या पंचविसाव्या वर्षी छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) हा विकार जडला आणि त्याने त्या रोगाच्या प्रभावाखाली आत्महत्या केली. पूजा बेदी हिनेही काही चित्रपटांत काम केले. तसेच, तिचा दूरदर्शनवरील काही कार्यक्रमांत सहभाग होता.

The Stories I Must Tell या कबीर बेदीच्या आत्मकथनात्मक पुस्तकात फ्रेडा आणि त्यांचे पती बाबा प्यारेलाल बेदी यांच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे. तो उल्लेख उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेसा होता. मी फ्रेडा यांच्याबद्दलची जितकी माहिती गोळा करत गेलो तितके मला अधिकाधिक अचंबित होण्यास झाले. Bengal Lamenting हे फ्रेडा यांचे पहिले स्वतंत्र पुस्तक. ते प्रकाशित 1944 साली झाले. त्या पुस्तकाच्या प्रारंभी फ्रेडा यांनी एक उद्धृत दिले आहे –

”In Rama was there a voice heard, lamentation and weeping and great mourning, Rachel weeping for her children and would not be comforted because they were not.”

प्रास्ताविकात त्या म्हणतात – ‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. —-’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे. स्थानिक पातळीवर हाताळता येणार नाही अशा राष्ट्रीय समस्येच्या देशव्यापित्वाचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यात आहे. ते पाऊल लेखणीने प्रत्येक बंगाली माणसाच्या आणि प्रत्येक भारतीयाच्या हक्कांसाठी देण्याच्या लढ्यासाठी उचललेले आहे. प्रत्येक भारतीयाच्या भवितव्याची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय सरकारात देशभक्तांच्या सहभागाची मागणी आहे.

प्रास्ताविकात मांडलेल्या भूमिकेशी सुसंगत असे, त्यांना दौऱ्यात घडलेल्या, मन विषण्ण करणाऱ्या दृश्यांचे संयमित असे चित्रण पुस्तकात आहे. त्यांना सर्वात वाईट वाटले ते निराधार झालेली मुले बघून ! ‘सर्व प्रकारची दुःखद परिस्थिती सभोवती होती. असहाय्यतेची जाणीव मनाला पीडा देत होती- आठ वर्षांचे मूल त्याच्या बारा वर्षांच्या बहिणीची सेवा करत आहे, दोन वर्षांचे बाळ सहा वर्षांच्या त्याच्या भावाला बिलगून बसले आहे. कसे मन भेदून टाकणारी दृश्ये होती ती !’ मात्र फ्रेडा केवळ विलाप करत बसल्या नाहीत. त्या वेदनेच्या मुळाशी गेल्या. “उत्तम पीक येऊन गेल्यानंतर जमिनीवर उरलेले गवताचे बुडखे तुडवत, आम्ही गावे एकामागून एक पार करत गेलो. नवा तांदूळ गेला कोठे? काही गावांतील दुकानांत तांदूळ आहे, पण दुकानदार मागत असलेल्या किंमतीला तो कोणालाच विकत घेता येत नाही. तांदळाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रोखली गेली आहे; मग तो जातो कोठे? साठेबाजी करणाऱ्यांच्या हाती, पुन्हा एकदा?—- सर्वांवर उपाय एकच दिसतो – नियंत्रण ! परंतु नियंत्रण ठेवायचे तर यंत्रणा हवी आणि भ्रष्टाचार निपटून काढण्यास हवा ! सर्व संबंधितांचा सहभाग त्यात नसेल तर मदतीचे वाटप न्याय्य होणार नाही.” परिस्थिती इतकी गंभीर असताना, सरकारी यंत्रणा मात्र राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना पकडण्यात गुंतली होती. स्थानिक वृत्तपत्रे त्याचा निषेध करत होती. त्याचाही उल्लेख त्या वृत्तांतात येतो – सर्व सरकारी यंत्रणा राजकीय नेत्यांना अटक करण्यात गुंतली आहे. यंत्रणेतील काही लोक तरी साठेबाज आणि नफेखोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी वापरता येणार नाहीत का? असे प्रश्न वृत्तपत्रे विचारत आहेत.”

फ्रेडा यांनी दुष्काळ व आपत्तिग्रस्त प्रदेशात प्रवास विविध मार्गांनी केला – गर्दीने भरलेल्या रेल्वेतून, पायी, तसेच सायकलनेही – त्यांनी पुरुषांच्या सायकलीने मिदनापूर ते खरगपूर हा एकवीस किलोमीटरचा प्रवास केला. सायकलीचे ब्रेक व्यवस्थित काम करत नव्हते. सर्वत्र दारुण परिस्थिती दिसत असताना, त्यांना सुखद असा एक धक्काही बसला. “दोन हजार सातशेबावीस शाळांपैकी एक हजार एकशेपंच्याहत्तर शाळा बंद झाल्या होत्या, उरलेल्या शाळांत हजेरी तीस टक्के इतकी खाली आली होती. पण मुलांची शिकण्याची इच्छा कायम होती. अनाथाश्रमातील मुलांनी, मी त्यांना ‘तुम्हाला काय देऊ?’ असे विचारल्यावर मागितले ते पुस्तक आणि शिकण्याची व्यवस्था !”

फ्रेडा यांनी पुस्तकाच्या अखेरीस भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे पुन्हा प्रतिपादले आहे. “या साऱ्याचा दोष केवळ व्हॉईसरॉय किंवा गव्हर्नर आणि अधिकारी यांच्याकडे आहे असे म्हणून गप्प बसता येत नाही. ‘जैसे थे’ स्थितीच्या बाजूने कोठलाही मुद्दा मान्य करता येण्यासारखा नाही. देशभक्तांच्या कोणत्याही संघटनेने मानवी जीविताचे नुकसान टाळले असते यात काहीही शंका नाही. केंद्रस्थानी राष्ट्रीय सरकार हवे ही भारतीयांची मागणी हा जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. स्वातंत्र्य हा केवळ एक शब्द नाही. ती भारतीयांचे प्राण आणि रक्त यांच्याइतकीच मूलभूत गरज आहे. स्वातंत्र्य ह्या एकाच सिमेंटमुळे भारतीय समाजाचा प्रत्येक घटक त्या कठीण प्रसंगी एकत्र व घट्ट राहू शकतो.

मूळच्या ब्रिटिश असलेल्या महिलेने भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने सतत बोलावे आणि प्रयत्न करावे हे भारतीयांना निश्चितपणे नवलाचे वाटते; तर तत्कालीन समाजात आणि राज्यकर्त्यांत त्या गोष्टीने कशी व किती खळबळ माजली असेल याची कल्पनाच करावी लागेल ! फ्रेडा दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती बघण्यासाठी बंगालमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊन गेली होती. त्यांनी त्यांची मातृभूमी इंग्लंड असली तरी ‘आता माझा देश भारत आहे’ असे लग्नापूर्वीच जाहीर केले होते. त्यांच्या लग्नाला बाबा प्यारेलाल बेदी यांच्या मोठ्या भावाचा प्रखर विरोध होता. तो मावळावा यासाठी फ्रेडा यांनी त्यांना एक पत्र लिहिले. त्या पत्राचा काही भाग कबीर बेदी यांनी त्यांच्या आत्मकथनात दिला आहे. मूळ पत्र (फ्रेडा यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी लिहिलेले) fredabedi.com वर 22 मार्च 2019 रोजी उपलब्ध करून दिले गेले आहे. त्या पत्रातील मजकूर असा आहे – “माझी आई आणि माझ्या सहवासातील इतर जन ह्यांची निवड करायची की प्यारे आणि त्याचा देश असा प्रश्न देवाच्या कृपेने माझ्यापुढे उभा राहिला नाही; परंतु तसा प्रसंग आलाच असता तर माझी निवड अर्थातच प्यारे आणि त्याचा देश- भारत यांच्या बाजूनेच झाली असती. मला प्यारेच्या प्रेमाचे वैभव लाभले आहे आणि मला त्याच्या पुढे इतर सारे तुच्छ आहे. प्रेम याचा अर्थ स्त्रीचे जे प्रेम असते – नाजूक, कणखर,उत्कट, स्वतःचा विसर पडलेले, प्रगाढ, शांत आणि तृप्त असे प्रेम. पुरुषाची निर्मिती स्त्रीविना राहण्यासाठी ईश्वराने केली आहे असे मी मानत नाही.”

फ्रेडा बेदी यांचे पुढील आयुष्य अनेक वळणांनी गेले. बाबा प्यारेलाल आणि त्या, दोघेही जहाल कम्युनिस्ट होती. ती दीक्षा त्यांना ऑक्सफर्डमध्येच मिळाली होती. उभयतांनी एक पुस्तक संपादित केले आहे – Karl Marx – Letters on India. त्या पुस्तकाचे प्रकाशन 1936 साली झाले. त्याचबरोबर त्यांनी Contemperory India नावाच्या त्रैमासिकाचे संपादन केले. त्या त्रैमासिकाच्या पहिल्या वर्षातील तिसऱ्या अंकातील लेखक होते – सुभाषचंद्र बोस, प्रा. के.टी. शाह, डॉ. लंका सुंदरम, बाबा प्यारेलाल बेदी, जे.सी. कुमारप्पा, इफ्तिकार रसूल. त्या त्रैमासिकाचा अंक दीडशेहून जास्त पानांचा असे आणि वार्षिक वर्गणी नऊ रुपये एवढी होती. त्यांनी डाव्या वळणाच्या चळवळी लाहोरहून केल्या, त्यांच्या घरातील एक खोली भारतातून येणाऱ्या बंडखोर सैनिकांसाठी राखून ठेवलेली असे. तेथे नेहमी येणाऱ्यांत समाविष्ट होते – शेख अब्दुल्ला, हरकिशनसिंग सुरजित, इंद्रकुमार गुजराल, ग्यानी झैलसिंग. ब्रॅडलॉ यांच्या नावाचे एक सभागृह – Bradlaugh Hall लाहोरमध्ये आहे. ब्रॅडलॉ हे इंग्लंडमधील खासदार होते आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण करण्यासाठी इंग्लंडहून मुंबईला 1889 मध्ये आले होते. त्या सभागृहात फ्रेडा बेदी यांनी मोठ्या समुदायासमोर भाषण केले होते. ते त्यांचे राजकीय स्वरूपाचे पहिले भाषण होते. लाहोरमधील त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग वाढत राहिला. त्यांनी सत्याग्रह 1941 साली केला आणि त्यात त्यांना सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. पुढे, तीन महिन्यांनी तांत्रिक मुद्यांवर ती संपली. तो सत्याग्रह बराच नाट्यपूर्ण झाला असे कबीर बेदी यांनी त्यांच्या आत्मकथनात म्हटले आहे. खुद्द महात्मा गांधी यांनी फ्रेडा यांची निवड सत्याग्रहासाठी केली होती.

Bengal Laments हे पुस्तक फ्रेडा यांच्या लेखनप्रवासातील उत्तरार्ध असे म्हणावे लागते. तोपर्यंत त्यांची पुस्तके संपादित स्वरूपाची होती. त्यांचे चरित्रकार व्हाईटहेड सांगतात, की From a Woman’s window हा त्यांचा लाहोरच्या नियतकालिकातील स्तंभ होता. तो महिलांनी महिलांसाठी लिहिलेला इंग्रजी भाषेतील पत्रकारितेच्या सुरुवातीच्या प्रयत्नांपैकी एक म्हणावा लागतो (andrewwhitehead.net  8 सप्टेंबर 2021). त्यांनी त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवांचे चित्रण Behind the Mud Walls या पुस्तकात केले आहे. ते 1940 साली प्रकाशित झाले. त्यांचे आणखी एक पुस्तक Rhymes for Ranga त्याच वर्षी प्रकाशित झाले. रंगा हा त्यांचा पहिला मुलगा. पूर्ण नाव रंगा त्रिलोचन बेदी. त्यातील रंगा हे नाव बाबा प्यारेलाल आणि फ्रेडा यांचे जवळचे मित्र – ‘हिंदू’चे भूतपूर्व संपादक रंगास्वामी अय्यंगार यांच्या स्मरणार्थ ठेवले गेले असे कबीर बेदी सांगतात. Rhymes ही त्या रंगासाठी लिहिलेली गाणी आहेत. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती 2010 साली प्रकाशित झाली आहे. त्याचे परीक्षण (जया भट्टाचारजी यांनी केलेले) माहितीजालावर उपलब्ध आहे. त्यात भट्टाचारजी म्हणतात, “ही गाणी कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली आहेत, पण त्यांच्यावर कोणत्याही काळाचा असा शिक्का मारता येत नाही. त्या गीतांत, नव्या राष्ट्राच्या जन्माचा अभिमान दिसतो, महात्मा गांधी, न्यूटन, राष्ट्रीय ध्वज, गाई-गुरे, पाळीव प्राणी, वेगवेगळे ऋतू; इतकेच काय, मरियमची गाणी (येशूच्या जन्मावरची) सुद्धा येतात.”

प्यारेलाल बेदी यांचे शेख अब्दुल्ला यांच्याबरोबरचे साहचर्य अनेक वर्षे टिकले. फ्रेडा बेदी यांचे चरित्रकार अँड्रयू व्हाईटहेड यांची एक मुलाखत 16 मार्च 2019 रोजीच्या ‘आऊटलूक’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी सांगितले, की बाबा बेदी हे अब्दुल्ला यांचे वरिष्ठ आणि निकटचे सल्लागार होते. त्यांनी अब्दुल्ला यांच्यासाठी चव्वेचाळीस पृष्ठांची काश्मिरची राज्यघटना तयार केली होती. स्टॅलिनने सोविएत युनियनसाठी जी घटना 1936 साली तयार केली होती, त्याच्यातील अनेक मुद्दे त्या घटनेत उचलले आहेत. फ्रेडा बेदी यांनी काश्मिरमध्ये महिलांसाठीच्या कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणून दोन वर्षे काम केले.

Sister Palmo (फ्रेडा बेदी) - courtesy of the Bedi family

फ्रेडा यांनी भारतात जे निर्वासित फाळणीनंतर आले, त्यांच्या छावण्यांचे काम मेहनतीने केले. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामाजिक कार्याची आखणी करण्यासाठी ब्रह्मदेशात (म्यांमार) 1953 मध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांनी विपश्यना शिकण्याची इच्छा श्वेडागॉन पॅगोडाचे प्रमुख धर्माधिकारी यांच्यापाशी व्यक्त केली. त्या ध्यानधारणा लंडनपासून करत आल्या होत्या. त्यांना काही आध्यात्मिक अनुभूती रंगून येथे झाली. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचबरोबर ब्रह्मचर्य. पुढे त्यांनी तिबेटमधून आलेल्या निर्वासितांसाठी फार मोठे काम केले. त्यांतील काहींना इंग्रजी शिकवले आणि विश्वभरात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास सक्षम व प्रोत्साहित केले. त्यांना बौद्ध धर्मातील सर्वोच्च असा भिक्षुणीचा सन्मान – ‘बुद्धिस्ट भिक्षुणी दीक्षा’ – 1972 मध्ये दिला गेला. त्यांचे नाव Gelongma Palmo असे ठेवले गेले. दीक्षा समारंभ हाँगकाँग येथे झाला आणि तो दोन दिवस चालला (त्याची सविस्तर हकीगत बेदी यांच्या पुस्तकात येते).

आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद 26 मार्च 1977 रोजी नवी दिल्ली येथे भरली होती, ती सुरू होण्याच्या आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले.

फ्रेडा बेदी यांच्यावर तीन पुस्तके लिहिली गेली आहेत –

  1. 1. The Revolutionary Life of Freda Bedi – Vicky Mackenzie 2017
  2. 2. The Spiritual Odyssey of Freda Bedi – England , India – Norma Levine -2018
  3. 3. The lives of Freda Bedi – The political , Spiritual , and Personal –

Author – Andrew Whitehead 2019 .

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

(छायाचित्रे -फ्रेडा बेदी डॉट कॉम’वरून साभार)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here