बेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Second Marathi Literary Meet 1960)

रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली…

बेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र श्रीपाद जोग हे होते. ते संमेलन ठाणे येथे 1960 साली झाले. जोग यांची ओळख व्यासंगी, साहित्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, ग्रंथसमालोचक, विद्येचे निष्ठावंत उपासक, साक्षेपी समीक्षक व प्राध्यापक अशी आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे 15 मे 1903 रोजी झाला. रा. श्री. जोग यांनी काव्यशास्त्राची समीक्षा हाच त्यांच्या आयुष्यातील ‘छंदतारा’ मानला. त्यांनी त्यांचे काव्यसमीक्षेचे दालन साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र यांच्या सततच्या मनन-चिंतनातून समृद्ध केले. ते काव्यशास्त्र समीक्षेत ध्रुवतारा ठरले. त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांच्या ज्ञानाने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या भारून टाकल्या.

रा.श्री. जोग एम ए 1925 साली झाले. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या एच.पी.टी. कॉलेजमध्ये व सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये काही महिने आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1926 ते 1963 अशी जवळजवळ सदतीस वर्षे अध्यापनाला समर्पित केली. त्यांना एम ए ला असताना 1925 साली संस्कृतची भगवानदास शिष्यवृत्ती मिळाली होती. संस्कृत आणि मराठी हे त्यांच्या अध्यापनाचे विषय होते. त्यांची निवृत्तीनंतर विशेष प्राध्यापक म्हणूनही पुणे विद्यापीठात नेमणूक झाली होती. त्यांनी ‘विद्यादानाचे अत्यंत पवित्र काम’ खऱ्या अर्थाने केले. रा.श्री. जोग यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ काव्यशास्त्राचाच नव्हे, तर लेखनातील प्रत्येक तपशिलाचा खोलवर शोध घेतला आणि त्या आधारे समतोल, सखोल व साक्षेपी असे लेखन केले.

प्राध्यापक रा.श्री. जोग म्हणजे ‘अभिनव काव्यप्रकाश’ हे एक अजोड असे नाते आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणून तो ग्रंथ 1930 साली प्रसिद्ध केला. तो विद्यार्थीप्रिय आणि शिक्षकप्रिय ग्रंथ ठरला. त्याच्या आवृत्यांमागून आवृत्या निघत गेल्या. ललित कलांतील सौंदर्याचा वेध घेणारा ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ. त्यापाठोपाठ त्यांचे विविध ग्रंथ प्रसिद्ध होऊ लागले आणि रा.श्री. जोग यांचे नाव समीक्षा व्यवहारात मानाचे होऊन बसले. ते मराठी साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयेतिहासा’चे संपादक होते. त्यांनी तिसरा, चौथा आणि पाचवा खंड संपादित केला. ती त्यांची मराठी साहित्याला मोठी देणगी आहे.

जोग यांनी ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. तसेच, अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचाराला प्रदान केली. मराठी साहित्य विचाराचा पाया त्या ग्रंथामुळे घातला गेला. जोग यांनी संस्कृत आणि पाश्चिमात्य साहित्यशास्त्र यांचे मंथन करताना कोठल्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता, समतोल दृष्टी ठेवून निष्कर्ष काढले. त्यामुळेच त्यांनी चिकित्सेनंतर योग्य म्हणून ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ हे विश्वनाथाने केलेले काव्यलक्षण किंवा ‘ल्हादैकमयता’ हे मम्मटाने मानलेले काव्यप्रयोजन यांचा स्वीकार केला. त्यांनी रससंकल्पनेचा पुरस्कार जोरदार केला, मात्र रससंख्येच्या बाबतीत आग्रह धरणे अनाठायी ठरवले. त्यांनी त्यांचा संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रगाढ व्यासंग असतानाही, त्यात सारे काही आहे असा हट्टाग्रह कधी बाळगला नाही.

‘चर्वणा’, ‘विचक्षणा’ आणि ‘दक्षिणा’ हे त्यांच्या साहित्यविषयक स्फुट लेखांचे संग्रह गाजले. त्यांचे एकूण चौदा महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांनी बारा ग्रंथांचे संपादन केले. त्यांचे शंभरच्या वर स्फूट लेख प्रसिद्ध आहेत. तसेच, ‘ज्योत्स्नागीत’ (1926) आणि ‘निशागीत’ (1929) हे दोन काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध आहेत. जोग यांनी ‘निशिगंध’ या टोपणनावाने कविता लिहिल्या होत्या. त्यांनी ‘केशवसुत काव्यदर्शन’ यामधून वा.म. जोशी व्याख्यानमालेत ‘केशवसुत आणि नंतरची आधुनिक कविता’ यांचा खोलवर अभ्यास मांडला. त्यांचे ‘अर्वाचीन मराठी काव्य’ हे पुस्तक 1946 साली प्रसिद्ध झाले. त्यांच्या प्रभावी समीक्षापर लेखनामुळे एक ललितेतर लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकला ! ज्ञानाला अभ्यासाची आणि सततच्या मनन-चिंतनाची जोड मिळाली, की किती अभ्यासपूर्ण, काळाच्या कसोटीवर टिकणारे समीक्षा ग्रंथ निर्माण होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.रा.श्री. जोग हे आहेत. त्यामुळे काव्येतिहास शिकवताना त्या ग्रंथांचा पिढ्यानुपिढ्या उपयोग होऊ शकला.

जोग यांचा फार निकटचा संबंध महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी साहित्य महामंडळ या संस्थांच्या कार्याशी होता. त्यांनी त्या संस्थांमध्ये प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या केळकर व्याख्यानमालेत ज्ञानेश्वर ते शाहिरी वाङ्मय असा सातशे वर्षांचा काव्याचा तपशीलवार आढावा घेतला. बदलत्या वाङ्मयीन अभिरुचीचे सम्यक दर्शन घडवणारे रा.श्री. जोग, मराठी काव्याचा चालता बोलता कोशच ठरले! त्यांचा ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ हा ग्रंथ 1959 साली प्रसिद्ध झाला आणि त्याचे फलित म्हणून की काय पण ते पुढील वर्षीच, म्हणजे 1960 साली बेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.

ते संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात, “मराठी नियतकालिकांनी लेखनशुद्धीचा स्वीकार करावयास पाहिजे, असे विवेकी विचारवंतास वाटू लागले आहे. ही लेखनशुद्धी म्हणजे लेखनातील संयम आणि सौजन्य या गोष्टी होत. मराठी वाङ्मयाच्या प्रारंभी ज्ञानेश्वरांनी या बाबतीत आदर्श घालून दिला होता…” असे म्हणाले होते.

त्यांनी मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 1943 साली, तर सोलापूर जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 1948 साली भूषवले होते.

त्यांचे निधन 21 फेब्रुवारी 1977 साली झाले.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488

————————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here