मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार हातगावची गढी

2
411

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील गढी म्हणजे जुन्या जीवन राहणीचा उत्तम नमुना आहे. हातगाव हे नगरपासून पंच्याण्णव आणि शेवगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. छगन राजाराम साळुंके भराट पाटील व सीताराम मारोती साळुंके भराट पाटील यांना 1370 मध्ये हातगाव येथील वतनदारी मिळाली होती.

छगन पाटील व सीताराम पाटील हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरचे. वतनदारी व्यवस्था मध्ययुगीन कालखंडात प्रबळ होती. त्यातून गाव पातळीवर वतनदार, जहागीरदार इत्यादी मंडळींच्या नेमणुका होत. ते लोक त्यांच्या त्यांच्या वतनाचे राजेच होऊन जात. त्यामुळे वतनदारी सांभाळणाऱ्या सरदेशमुख, देशमुख, पाटील, कुलकर्णी या पदांवरील माणसांना महत्त्वाचे स्थान समाजात प्राप्त झाले होते. वतनदार मंडळी त्यांच्या त्यांच्या भूभागातील मुलकी व महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाळत असत.

पेंढारी टोळ्यांचा त्रास सतराव्या शतकात मोठ्या प्रमाणात होई. परकीय शत्रूंचे हल्ले असतच. अशा आक्रमक संकटांपासून वतनदारांच्या संरक्षणासाठी गढी बांधण्यात येत. गढी म्हणजे जमिनीवरील लहान आकाराचा किल्लाच असे. गढीत संकटसमयी गावातील सर्व लोक एकत्र सामावू शकत. हातगावच्या गढीचे बांधकाम दगड, माती, चुना आदींचा वापर करून केले आहे. गढीचा आकार चौकोनाकृती आहे. गढीला चार बुरूज आहेत. प्रत्येक बुरूजाला बाहेरील शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था होती. गढीला चार-पाच फूट रूंदीची भक्‍कम तटबंदी आहे. त्यासाठी विटांबरोबर दगडांचाही वापर केलेला आढळतो. गढीला भव्य प्रवेशद्वार आहे. त्या शिवाय आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. वाड्यात राहण्यासाठी अठ्ठेचाळीस खणांचे माळद होते. धान्यसाठा करण्यासाठी भुयारासारखी ‘बळद’ आहेत. अंतर्गत सांडपाणी व पावसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी भूमिगत बंदिस्त दगडी गटार सुस्थितीत आढळून येते. तटबंदीमध्ये एका बाजूला शौचालयाची व्यवस्था आहे.

गढीच्या वास्तूची रचना त्या काळातील स्थापत्य कलेचा आदर्श नमुना आहे असे मानतात. वाड्याची पडझड काळानुरूप झाली आहे. छगन पाटील यांचे वारसदार गढीच्या बाजूला वास्तव्य करत आहेत.

राजेंद्र किसनराव भराट पाटील 9623821333

– भागवत डुकरे 9404419341 bhagawat2011@gmail.com

———————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. ऐतिहासिक आणि खास करून इतिहास विषय हा सविस्तर व पुराव्यानिशी सदर केला कि त्यातील सत्यता पडताळण्याची गरज पडत नाही. त्रोटक माहिती अनेक प्रश्नांना निमंत्रित करते. असो. / आपले प्रयत्न चांगले आहेत. तुमच्या पी एच डी करिता जो विषय आहे त्या बाबत मी थोडी फार माहिती देऊ शकेल.

    • आदरणीय सर
      आपण दुसऱ्या ओळीत सदर केला असं म्हटलं आहे याचा मराठीत अर्थ काय होतो ते मला प्रथम सांगा
      तुमच्याकडे असलेली थोडीफार माहिती मला किती उपयुक्त ठरेल याबाबत मला शंका आहे परंतु तरीही तुमच्या माहितीचे स्वागत आहे.

Comments are closed.