महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे.
अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कुठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो. विनोदाची वेगळीच जातकुळी असलेल्या लोकनाट्याच्या ह्या प्रकाराची वैशिष्ट्ये सांगून त्याची ओळख करून देत आहेत अनघा पंडित. या माहितीमुळे दशावतारी नाटक बघताना पुढीलवेळी नक्कीच ते अधिक सजगतेने पाहिले जाईल.
‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
– सुनंदा भोसेकर
दशावतार : एक समृद्ध कलावारसा
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागू लागली की प्रत्येक कोकणी माणसाला वेध लागतात ते गावागावातील उत्सव आणि जत्रांचे. ‘जत्रोत्सव’ हे कोकणचे खास वैशिष्ट्य ! गावची जत्रा म्हणजे ‘दशावतार’ हे समीकरणसुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहे. ‘दशावतार’ ही अनेक शतकांची परंपरा असलेली असलेली लोककला आजही कोकणात जपली जात आहे. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग 5 नोव्हेंबर 1943 ह्या दिवशी केला, तो महाराष्ट्रातील आद्य नाट्यप्रयोग. पण त्यापेक्षाही जुनी परंपरा असलेला मराठी भाषेतील नाट्यप्रकार जो आजही तितक्याच उत्साहाने सादर होतो आणि ज्याचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही असा लोककलाप्रकार अर्थात ‘दशावतार’. भारतात नाटक हा पाचवा वेद मानला जातो. इंद्र हा देवांचा राजा. नेहमीची नृत्य पाहून इंद्रादी देवांना कंटाळा आला आणि त्यांनी भरतमुनींना नृत्याशिवाय वेगळा करमणुकीचा प्रकार निर्माण करावा अशी विनंती केली आणि त्या विनंतीस मान देऊन भरतमुनींनी ज्या लोककलेची निर्मिती केली त्याला ‘नाट्य’ असे म्हणतात. ॠग्वेदातून ‘भाष्य’ अथर्ववेदातून ‘भावविशेष’ यजुर्वेदातून ‘कथा’ आणि सामवेदातून ‘गायन’ घेऊन त्या सर्वांचा एकत्रित तयार झाला तो ‘नाट्यवेद’. यानंतर पुढे नाट्यकलेत प्रगती होत गेली. भास, अश्वघोष, कालिदास, भवभूति, हर्ष, पाणिनी, दंडिन, व्यास यासारख्या महान नाटककारांनी नाट्यकलेला अधिकाधिक समृद्ध केले.
दक्षिण कोकणातील नाट्याचा खराखुरा सांस्कृतिक वारसा म्हणजे दशावतार. दशावताराची परंपरा इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत जाते असे मानले जाते. सातव्या शतकात मल्लराजाने दशावतारी खेळांची प्रथा सुरु केली असे उल्लेख आढळतात. पण म्हणजे नेमका कोणता राजा ते स्पष्ट नाही. कर्नाटकातील यक्षगान हे त्याचे मूळ स्वरूप असून शामजी नाईक काळे नावाच्या गृहस्थाने 728 साली दशावतार कर्नाटकातून रत्नागिरी जिल्ह्यातील ‘आडिवरे’ या ठिकाणी आणला व तेथून त्याचा प्रसार पुढे कोकणभर झाला असा उल्लेख ‘आडीवऱ्याची महाकाली’ या पुस्तकात चिं. कृ. दीक्षित यांनी केला आहे. तर दशावताराची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले – गोवा या भागातील असून तेथून पुढे यांचा प्रवास उत्तर कोकणाकडे झाला आहे असे मत पु. गो. काणेकर यांनी त्यांच्या ‘नाट्यस्मृती’ या पुस्तकात मांडले आहे. दशावतारी नाट्याचा उल्लेख सतराव्या शतकातील संत रामदास लिखित दासबोधात देखील आढळून येतो. संत रामदास यांनी लिहिले आहे,
‘खेळता नेटके दशावतारी तेथे येति सुंदर नारी, नेत्र मोडिती कळाकुसरी परी अवघे धटिंगण’
दशावताराचा पाया लोककलांनी घातलेला आहे. पूर्वी खेड्यात लग्न, उत्सवप्रसंगी, देवतांसमोर नाट्यप्रकार केले जात. त्यातील ‘ललित’ हा प्रकार लोकप्रिय होता. ललित म्हणजे ‘लीला’. त्यात वेगवेगळ्या देवदेवतांची सोंगे आणून पौराणिक नाटकांतील प्रसंग सादर करून दाखवत. या ललित नाट्यांचा प्रवास संपूर्ण देशभरात दिसून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामदैवतांच्या जत्रोत्सवाशी या लोककलेचे जवळचे नाते आहे. मालवणी मुलखात या नाट्यप्रकाराला ‘धयकाले’ असेही म्हणतात.
दशावतारी नाट्य विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असते. तथापि ही सर्वच पात्रे प्रत्यक्ष सभामंडपात (रंगमंचावर) मात्र येत नाहीत, त्यांतील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेख केला जातो. वामन, परशुराम, श्रीराम आणि कृष्ण या चार अवतारांतच दशावतारी नाट्य मर्यादित असते. सोबत देव, दानव, नारद, संकासूर आणि पूर्व दशावतारात गणपती, ऋषी, सिद्धी अशी पात्रे येतात.
दशावतारी खेळांचे परंपरागत स्वरूप पाहता या नाटकांची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळपर्यंत चालते. सर्वसाधारणपणे दशावतारी नाट्याचा प्रारंभ रंगमंचावर गणेशपूजनाने होतो. गणपतीची पूजा, आरती होते. पारंपरिक गीते म्हटली जातात. सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. ते संपण्याच्या सुमारास ऋद्धिसिद्धीसह गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले, की सूत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते. सूत्रधार आणि गणपती यांचे संवाद रंगतदार आणि पारंपरिक असतात. पुढील नाट्यप्रवेश निर्विघ्न पार पडण्यासाठी गणपतीची प्रार्थना केली जाते. ‘रघुवीर रणधीर स्मरा’, ‘करू गजवदन चरणी नमना’ अशा प्रकारची नाट्यपदे म्हटली जातात. संपूर्ण दशावतारी नाट्यप्रवेशात दशावतारी नाट्यपदांची रेलचेल असते.
त्यानंतर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होते. त्यावेळी सूत्रधार व गणपती-सरस्वती रंगमंचाच्या कोपऱ्यात निघून जातात. प्रत्यक्ष खेळामध्ये प्रथम मत्स्यावतार आख्यानातील शंखासुराचा (संकासुराचा) प्रसंग दाखवतात. संकासूर व विष्णू यांचे रंगमंचावर आगमन होऊन त्यांचा संवाद होतो. मत्स्यावतार संपल्यावर कूर्म आणि वराह या अवतारांची फक्त सोंगे दाखवतात. नंतरच्या नरसिंहावतारापासून मात्र खेळाला रंग भरतो. त्यात हिरण्यकश्यपू, कयाधू, प्रल्हाद, भालदार व नरसिंह अशी पाच पात्रे असतात. या कथेतील बरेच प्रसंग दाखवण्यात येतात. यानंतरचा अवतार वामन असतो. त्यात फक्त वामन व बळी ही दोनच पात्रे दाखवण्यात येतात. नंतर परशुरामाचा नुसता उल्लेख करून राम व कृष्ण या दोन अवतारांतील मात्र बरेच कथाभाग दाखवले जातात. हे सर्व कथाभाग अतिशय नाट्यपूर्ण व मनोरंजक असतात. त्यातही राधा हे प्रेक्षकांचे आवडते पात्र असल्यामुळे नाटकात तिचे स्थान अनिवार्य असते.
दशावतारी नाटकात दशावतार आणि आडदशावतार असे दोन भाग असतात. त्यांना पूर्वरंग आणि उत्तररंग असे म्हणू शकतो. या दशावतारी नाटकाच्या पूर्वरंगात भगवान श्री विष्णूच्या पहिल्या अवताराचे (मत्स्य अवताराचे प्रतीक म्हणून) शंक अर्थात संकासुराचे दर्शन घडते. पूर्वरंगात संकासुराचे बोलणे मालवणी बोलीतून होते. तो संकासूर ग्राम्य विनोद करतो. त्यातून जी हसवणूक निर्माण होते, ती प्रेक्षकांना रंगमंचाकडे खेचून घेते.
दहिकाल्यात खरी मजा येते ती शंखासूर प्रवेश करतेवेळी. काळ्या कपडयात तोंडाला काळा बुरखा घालून लाल जीभ बाहेर काढून फिरणारा हा दैत्य रंगमंचावर आला की छोटी-छोटी मुले घाबरतात. पण रसिक मात्र शंखासूर आणि नाईक (सुत्रधार) यांच्या संवादाची, विनोदाची मजा चाखत असतात. मालवणी भाषेचा खुबीदारपणे वापर करत शंखासुर रसिकांमध्ये हास्याचे कारंजे फुलवतो. ब्रम्हदेवाचे वेद पळवतो. शेवटी महाविष्णू रंगमंचावर येतो. शंखासुराशी युध्द करुन देवांना भयमुक्त करतो आणि ब्रम्हदेवांचे वेद परत करतो व शंखासुराला वर देवून हा धयकाल्यातील पहिला भाग संपतो जो आड दशावतार (आद्य दशावतार) म्हणूनही प्रसिद्ध आहे. संकासुराची भूमिका करणारा कलाकार हा हुशार, चपळ, चोखंदळ, हरहुन्नरी, विनोदी आणि हजरजबाबी असावा लागतो. संपूर्ण दशवतारामध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांमध्ये संकासुराची भूमिका करणाऱ्या कलाकाराला विशेष महत्व असते. संकासूर सादर करणारा कलाकार हा पहाडी आवाजाचा आणि भारदस्त व्यक्तिमत्वाचा असावा लागतो. त्यातील महत्वपूर्ण गोष्ट अशी, की दशावतारी नाटक हे संपूर्णपणे प्रमाण मराठी भाषेतून चालते; परंतु संकासूर हे एकच पात्र संपूर्ण संभाषण मालवणी आणि कोकणी भाषेतून करते. विनोदाची तीव्रता वाढावी आणि विनोद थेट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचवण्यासाठी ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला जातो. नाटकातील संकासूर हे पात्र जरी दैत्य किंवा राक्षसाचे असले तरीही तो तसा दिसत नाही ते एक विनोदी पात्र आहे असेच वाटते. तो सामाजिक, राजकीय परिस्थितीवर टीकात्मक विनोद करून जनप्रबोधनदेखील करतो. त्याव्यतिरिक्त तो ग्रामीण भाषेत विनोद करतो, मात्र संकासुराने काहीही केले तरीही ते प्रेक्षकांना मान्य असते.
उत्तररंगात म्हणजे मूळ दशावतारात जी पुराणकथा रंगत जाते, ती अस्खलित मराठी, संस्कृतप्रचुर भाषेतच रंगत जाते. त्या वेळी त्या अल्पशिक्षित, शेतकरी, ग्रामीण भागातल्या नटांचे उद्गार ऐकून भाषा पंडितांनीही तोंडात बोटे घालावीत अशी स्वगते हे दशावतारी नट सादर करतात आणि नाटकात रंग भरत जातात. आड दशावतारानंतर आख्यानाला सुरुवात होते. रामायण किंवा महाभारतातील एखादा कथाभाग, पुराणातील एखादा कथाभाग सादर केला जातो. राम-रावण युध्द (सीताहरण), नल-दमयंती, सती महानंदा, द्रौपदी वस्त्रहरण, महारथी कर्ण, श्रावण बाळ हे काही लोकप्रिय कथाभाग आहेत.
पूर्वापार चालत आलेल्या दशावतारी नाटकांच्या बाबतीत सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे दशावतारी नाटकांना कोठल्याही प्रकारची लिखित संहिता नसते. प्रत्येक कंपनीकडे पुराणातील कथांची एक पोथडी असते. ती कथा साधारण पंधरा ते वीस वाक्यांमधे लिहिलेली असते. संध्याकाळी देवळात दाखल झाले, की जेवण तयार होईपर्यंतच्या वेळेत हे कलाकार एकत्र बसतात व एखादी कथा निवडतात. मग त्या कथेवरून प्रवेश ठरवले जातात, पात्र विभागणी होते. प्रत्येक प्रवेश किती वेळ सादर करायचा याचे ठोकताळे बांधले जातात. म्हणजेच निव्वळ पंधरा ते वीस वाक्यांच्या कथेच्या आधारावर संपूर्ण नाटक सादर केले जाते.
दशावतार नाटकाला संहिता नसल्यामुळे ऐन नाटकात संवादांचा काही गोंधळ झाल्यास इतर व्यावसायिक नाटकाप्रमाणे आयत्यावेळी ‘Promter’ हा प्रकार नसतो. नाटकापूर्वी सर्व कलाकार एकत्र बसून स्वतःचे संवाद एकदा बोलून सराव करतात. समोरचा कलाकार कोणते वाक्य बोलतो त्याला अनुसरून दुसऱ्या कलाकाराला स्वतःचे वाक्य बोलावे लागते. मात्र असे असूनही संपूर्ण नाटकात जवळपास किमान तीन ते अगदी सात-आठ तासांपर्यंत थोडाही विस्कळीतपणा जाणवत नाही. संपूर्ण नाटक अखेरपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारे असते. दशावतारी नाटकांना जशी संहिता नसते तसेच दिग्दर्शकदेखील नसतो. मूळ पुराणातील कथा आणि त्यांचे संदर्भ लक्षात ठेवून नाटकातील प्रत्येकजण स्वतःचे संवाद आणि स्वतःकरता दिग्दर्शन स्वतःच करतो. पुरातन काळापासून चालत आलेल्या कथा जशा आहेत त्या त्याच पद्धतीने रसिकांसमोर आजही मांडण्यात येतात. लिखित संहिता नसण्याचा फायदा म्हणजे उस्फूर्त संवादातून नाटकातली पात्रे भोवतालच्या वास्तवावर विनोदाच्या माध्यमातून भाष्य करतात आणि प्रेक्षकांचा त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.
दशावतार नाटकात संगीत, गीतगायनाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. दशावतारी नाटकामध्ये त्यातील सगळे कलाकार मिळून गीतांची, पदांची रचना करतात. संपूर्ण नाटक हे हार्मोनियम आणि झांज यावर अवलंबून असते. सोबतच विविध पात्रांच्या प्रवेशावेळी झांज आणि हार्मोनियम यांच्या एकत्रित वादनातून उत्कृष्ट पार्श्वसंगीताची निर्मिती केली जाते.
पारंपारिक दशावतारी नाटकांतील काही उदाहरणे नमुन्यादाखल –
- नमुना क्रमांक 1 –
‘या या अवंतीपुरात पाऊल टाकताच मनाला किती सौख्य व समाधान होत आहे, केव्हापासून महालात बसून महाराजांची वाट पाहाते आहे. पण त्यांचं का बरं येणं होत नाही. आम्हा आर्य स्त्रियांना पतीवाचून गती नाही’
- नमुना क्रमांक 2 –
‘आव्स हेची खेल्लोरी, बापूस झट्याळो।
बहिण ना ह्याका, भाऊस षड्याळो
फाड्फाड्या कानाचो, एक दिस्ता सुळो
लाडवांच्या खाणाक्, मोदकांच्या खाणाक्
भारी हुळहुळो ।।
थय थय नाचता, पोरगो शिवल्याचो
बसाक दिलो ह्याका राजा उंदराचो
मोरया म्हणा हो … मोरया …’
दशावतार नाट्य सादर करणाऱ्या सर्व कलाकार मंडळींचा मिळून एक गट असतो त्याला कोकणात दशावतार नाटक कंपनी असे म्हणतात. सर्व कलाकार, संगीत गायक, वादक व इतर सर्व असे मिळून साधारण वीस ते पंचवीस जणांचा गट असतो. सर्व कलाकार नाटक ही सामूहिक जबाबदारी कर्तव्यासारखी पार पाडत असतात. कलाकार मंडळी स्वतःच्या नाटक कंपनीसाठी कोणत्याही प्रकारचे काम करायला तत्पर असतात. ते स्वतःचे जेवण बनवण्यापासून, स्वतःचे सामान डोक्यावर उचलून नेणे ते नाटकासाठीचे संवाद तयार करणे, त्याचा सराव, दिग्दर्शन ते अगदी स्वतःच मेकअप करेपर्यंत सर्व कामे हे कलाकार स्वतःच पार पाडतात.
दशावतारी नाटकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, प्रत्येक पात्राची मोठमोठी स्वगते, स्पष्ट उच्चार, कमावलेले आवाज, पुरुषांनी साकारलेली ‘स्त्री’ भूमिका आणि संगीत नृत्यमय लढाया! दशावतारी नाट्यात नेहमी देवांनी दानवांशी केलेला संघर्ष, त्यातून दृष्ट प्रवृत्तीचा झालेला नाश आणि अंतिम विजय सत्याचाच होतो याचे दर्शन होते. येथे पात्र परिचय केला जात नाही. शंकर, विष्णू ही पात्रे रंगभूषेवरून, वेशभूषेवरून ओळखू येतात. नाटकाचा नायक- राजा किंवा खलनायक, राक्षस, त्यांच्या पत्नी त्यांचा उल्लेख पल्लेदार स्वगतामधूनच करतात. त्यामुळे प्रारंभीचे स्वगत समोरील प्रेक्षक कानात प्राण एकवटून ऐकत असतात आणि त्यानुसार मनात कथानकाची बांधणी करतात. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युद्धाच्या वेळी हे कलाकार विशिष्ट पदन्यास करत युद्ध करतात. हे पदन्यास मात्र विशिष्ट कलाकारांकडून ते शिकून घेतात. हा पदन्यास म्हणजे या नाटकाचा मूळ गाभा आहे. ज्या कलाकाराला हा पदन्यास जमला त्याला अर्धे नाटक जमले. ही देव आणि दानव यांच्यात नृत्य स्वरुपात लढाई होते, तीसुद्धा पाहण्यासारखी असते.
आजही दशावतारी नाटकांमधे स्त्रिया काम करत नाहीत. स्त्रियांची भूमिका पुरूषच करतात. पुरूषाचे स्त्रीमधे होणारे रूपांतर पाहणे ही गावकर्यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते. दशावतारी रंगभूमीने ओमप्रकाश चव्हाण यांच्यासारखे दिग्गज कलाकार दिले. दशावतारी नाटकामध्ये स्त्री भूमिका करणारे पुरुष कलाकार यांना विशेष महत्व असते. त्यासाठी खास कलाकार असतात. दशावतारात स्त्री भूमिकेसाठी नटी आणण्याचा प्रयोग पूर्वी केला गेला होता परंतु बऱ्याच धार्मिक, सामाजिक व इतर अडचणींमुळे तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. दशावतारी मंडळांचे एक वैशिष्ट्य असे आहे, की रोज वेगवेगळ्या गावांत वेगवेगळे नाटक असले तरी कलाकार मोजकेच असतात. आज सीताहरणमध्ये रामाची भूमिका करणारा उद्या द्रौपदी वस्त्रहरणमध्ये युधिष्ठिराची भूमिका साकारतो. सीतेची भूमिका करणारा द्रौपदीची भूमिका करते. यामुळे दररोज वेगवेगळी भूमिका साकारताना कलाकाराला त्या त्या भूमिकेनुरूप वेशभूषा, रंगभूषा आणि संवाद यांचा वापर करावा लागतो. कोणतेही औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण नसतानादेखील हे कलाकार हे काम लीलया पार पाडतात. काही वेळा एकाच कलाकाराला अनेक भूमिका निभावाव्या लागतात. अशा वेळी तशीही त्याची तयारी असते. रावणाची भूमिका करायची, तर तो दशग्रंथी ब्राह्मण होता हे लक्षात ठेवले पाहिजे. दुर्योधन उभा करताना लालसेमुळे तो किती टोकाला जाऊ शकतो, हे साकारले पाहिजे. स्त्री भूमिका करताना नारदाची, विष्णूची भूमिकाही निभावावी लागते. त्याची तयारी असते. कलाकाराला नारद साकारायचा असेल, स्त्री भूमिका करायची असेल, तर गाण्याचा रियाज करावा लागतो. आयत्या वेळी एखादा कलाकार आला नाही, तर एकाच कलाकाराला वेगवेगळ्या दोन, तीन किंवा चार भूमिकासुद्धा संपूर्ण नाटकात निभावाव्या लागतात. म्हणूनच प्रत्येक कलाकाराचा त्या त्या विषयाचा चांगला अभ्यास असावा लागतो. ते विविध पौराणिक ग्रंथांचे वाचन करत असतात. एकंदरीत काय तर स्त्री भूमिका करण्यासोबतच नाटकातील कोणतीही भूमिका करण्याची क्षमता प्रत्येक कलाकारांमध्ये असते.
पूर्वी दशावतारी नाटकात अभिनय कौशल्यामुळे अजरामर झालेले अभिनेते कोकणातील लोकांच्या डोळ्यांसमोर अजून आहेत. राजा, देवेंद्र आदी राजपार्टी सजवणारे दादा पाटकर, बाबी नालंग यांच्यासारखे दमदार नट, असूर राक्षसी भूमिका साकारणारे दाजी हिवाळेकर, वासुदेव सामंत, नारदाच्या भूमिकेने स्मरणात राहिलेले मनोहर कवठणकर, अनंत बागवे, स्त्री भूमिका साकारणारे धोंडी मानकर, उमा बेळणेकर यांच्यासारखे भाषाप्रभू, सात्त्विक भूमिकेसाठी लक्षात राहिलेले गोविंद तावडे, कोकणाचे बालगंधर्व अशी पदवी दिलेले बाबा पालव, विनोदी भूमिका साकारणारे वासुदेव सामंत अशा अनेक दशावतारी नटांनी दर्जेदार अभिनयाने त्यांचे युग निर्माण केले आहे.
नाटकात जेवढा अभिनय महत्वाचा आहे तितकाच मेकअप, वेशभूषा आणि केशभूषा यालाही महत्व असते. दशावतारामध्ये रंगभूषा आणि वेशभूषेला इतके महत्व असूनही नाटक कंपनीमध्ये मेकअपमन किंवा वेशभूषाकार नसतो. नाटकातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मेकअप आणि वेशभूषा स्वतःच करताना दिसतो, अगदी स्त्री भूमिका करणारे कलाकारदेखील स्वतःच स्त्री पात्राचा मेकअप अतिशय सुबक आणि सुरेख करतात. नाटकाचा मेकअप करताना प्रत्येक कलाकाराला पात्राची भूमिका, स्वभाव, वय अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आवश्यकतेनुसार मेकअप सौम्य किंवा भडक करावा लागतो. या सर्वासाठी लागणारे सर्व साहित्य, रंग हे कलाकार स्वतःच्या पैशाने खरेदी करत असत पण अलीकडच्या काळात नाटक कंपनीचे मालक हे साहित्य पुरवतात. प्रत्येक दशावतारी कलाकाराकडे स्वतःची एक पेटी असते. त्या पेटीत कलाकाराचे सर्व साहित्य असते. भरजरी कपडे, फेटा, पगडी, जाकीट, शेले, मुकुट, मण्यांच्या माळा, रुद्राक्षमाळा, बांगड्या, इतर दागिने, दाढी-मिश्या, केसाचे टोप, हार, गजरे, विविध साड्या-ब्लाउज, अंतर्वस्त्रे, नाटकातील गदा, तलवार, वाद्य, आणि बरंच काही अशा सर्व साहित्याने ती पेटी भरलेली असते. पूर्वी दशावतारी कलाकार स्वतःची पेटी स्वतः डोक्यावरून घेऊन जायचे आणि प्रसंगी झोपताना त्याचं पेटीचा उशी म्हणून वापर करायचे.
दशावतार नाटक हे अगदी साधे सोपे आणि सुटसुटीत असते, इतर व्यावसायिक नाटकांप्रमाणे डामडौल नसतो. केवळ तीन बाय तीन मीटरची जागा मिळाली की नाटक उभे राहते. दशावतार नाटके मंदिर, लहानसे सभागृह, धर्मशाळा किंवा मोकळ्या मैदानात सादर होतात. नाटकाचे नेपथ्यही अगदी कमी असते. साधा पडदाही वापरला जात नाही. एखाद्या चादरीचा आडोसा घेऊन आधीचे पात्र विंगेत जाते आणि त्याच ठिकाणी दुसरे पात्र येते, राजा येतो. एखादे बाकडे संपूर्ण नाटकात मोठी भूमिका निभावत असते. तेच आसन, तेच शयनगृह, तेच सिंहासन आणि नृसिंह अवतारातला दाराचा उंबराही तोच असतो. नाटकामध्ये बदलले जाणारे ठिकाण हे पात्रांच्या बोलण्यावरून प्रेक्षकांना समजून येते. दशावतारी नट त्याच्या संवादफेकीने नेपथ्य आणि रंगमंचावरील दृश्य बदलत असतात, हीच तर खरी दशावतारी नाटकाची आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांची खासियत असते. ज्या ठिकाण नाटक सादर होते ती जागा सोडून बाकी चहूबाजूने प्रेक्षक एकमेकांना खेटून बसलेले असतात. इंटिमेट थिएटरचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
नाटकामध्ये बाकड्याच्या डाव्या बाजूला पायपेटी, मृदंग, तबला आणि चक्की असते! (चक्की म्हणजेच झांज). पायपेटी वाजवणारा दशावतारी नाटक मंडळाचा ‘नायक’ असतो. त्याचे दशावतारी गायन म्हणजे खऱ्या अर्थाने दशावतारी नटाला ऐन वेळी केलेले दिग्दर्शन होय. पुढील प्रवेश मृदंगाच्या थापेवर बदलत जातात. दशावतारी नाट्यप्रवेशाला ‘कचेरी’ असे म्हणतात. संपूर्ण दशावतारी नाटकात पायपेटी, मृदंग आणि चक्की ही तीन वाद्ये प्राण ओततात. प्रसंग बदलताच, त्यांची भूमिका दशावतारी नाटकात मोलाची मानली जाते. अजून एक महत्वपूर्ण बाब अशी, की दशावतारी नाटकात सहसा ध्वनीक्षेपक आणि ध्वनीयंत्रणेचा वापर केला जात नाही नाटकातील प्रत्येक पात्रांचे आवाज हे इतक्या वरच्या पट्टीतले असतात की शेवटच्या प्रेक्षकापर्यंत ध्वनीक्षेपकाशिवाय आवाज व्यवस्थित पोचतो. जी गोष्ट ध्वनीयंत्रणेची तीच गोष्ट प्रकाशयोजनेची. नाटक सादर होते ते ठिकाण बहुतांशी मोकळ्या जागेत असते त्यामुळे झगमगीत विद्युत रोषणाई शक्यच नसते. केवळ नाटकातील पात्रे व्यवस्थित दिसतील इतका पुरेसा उजेड रंगमंचावर असतो. पूर्वीच्या काळी तर गॅसबत्तीच्या उजेडात नाटक सादर होत असे.
कार्तिकी एकादशी आणि त्यानंतरची त्रिपुरारी पौर्णिमा या मुहूर्तावर दशावताराचे प्रयोग सुरू होतात. गावातील जत्रेत विधिपूर्वक दशावतारी नाटक, मंदिरात साकार होते आणि त्याची भैरवी कृष्णाकडून पहाटे गाडगे फोडून केली जाते त्याला दहीकाला म्हणतात. एकंदरीत काय तर दशावतार हे विशिष्ट अशा मुहूर्तावरच सुरु होतात. त्या त्या गावात जाऊन पूजाअर्चा गाऱ्हाणं वगैरे विधी संपन्न होतात. पूर्वी नाटकातील कलाकारांना गावातील लोकं तांदूळ, डाळ, मासे असा शिधा देत. काही गावांत कोंबडे देण्याचीही प्रथा आहे. प्रत्येक दशावतार कलाकाराला ठरलेली देणगी दिली जाते. काही वेळा देणगीची रक्कम अल्प असते पण त्या त्या मंदिरात नाटक सादर करण्याचा मान असतो. ही नाटके कार्तिक पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमा या कालावधीत चालू असतात. या व्यवसायाचा श्रीगणेशा हा गणपतीच्या पेटाऱ्याची पूजा करूनच होतो. नाटक मंडळात या पेटाऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक दशावतारी नाट्यमंडळाच्या मालकापासून त्या दशावतारी नाट्यातील कलावंतापर्यंत, सर्वांना ‘दशावतारी पेटारा’ त्यांचे दैवत वाटते. तो पेटारा त्यांचा पंचप्राण असतो, हे पेटारे बांबूपासून विणलेले असतात. त्यात गणपतीचा मुखवटा, दोन लाकडी हात, समई, निरांजन, पंचारती आणि देवपूजेचे साहित्य असते. नाटकापूर्वी हे सर्व मांडून गणेशाची पूजा केली जाते. नाटक कंपनी गावात दाखल झाली आणि त्यांनी पेटारा आणला की ग्रामस्थही त्या गणपतीची आवर्जून पूजा करतात. जत्रांमधल्या नाटकांमध्ये या गणपतीची आरती केली जात नाही. पण व्यावसायिक स्वरूपात करावयाच्या नाटकांची सुरुवात गणपतीच्या आरतीने केली जाते. पेटार्यातील गणेशदर्शनाबरोबरच शस्त्रं, अस्त्रं दाखवायची पद्धतही पूर्वी होती.
दशावतार नाट्यप्रयोगातून कलाकारांना फार मोठी काही आर्थिक प्राप्ती होत नाही. जे पैसे मिळतात त्यातील बहुतांश पैसा हा नाटकावरच खर्च होतो. नाटकांमुळे कंपनीच्या मालकाला फारसा फायदा होतो असे नाही. अनेकदा नाटक कंपनीच्या मालकांनी नाटकांसाठी स्वतःचेदेखील पैसे खर्च केलेत त्यामुळे कित्येक कलाकार, कंपनीचे मालक कर्जबाजारी झाल्याची उदाहरणे आहेत. बहुतेक दशावतारी कलाकार वार्षिक किंवा द्विवार्षिक करार करतात. या पद्धतीने मोबदला निश्चित केला जातो. कलाकार मंडळी अत्यंत कमी पैशात काम करत असत. काही नामवंत कलाकारांनाच पुरेसा मोबदला मिळत असे. आज या परिस्थितीत थोडीफार सुधारणा झालेली आहे. प्रेक्षक अनुभवी, अष्टपैलू, गाण्यात कुशल आणि शब्द फेकण्यात कुशल कलाकारांना बक्षीस देतात. आजही दहा रुपयांपासून बक्षिसे देणारे लोक आहेत. दशावतार नाटकामध्ये जेव्हा ‘उत्तररंग’ सुरू होतो, तेव्हा पूर्वरंगामध्ये रिद्धी किंवा सिद्धीची भूमिका करणारा अभिनेता आरतीचे ताट घेऊन प्रेक्षकांभोवती फिरतो. लोक त्या आरतीच्या ताटात त्यांच्या इच्छेनुसार पैसे देतात. आरती घेऊन येणाऱ्या कलाकाराला ‘बिलीमारो’ असे म्हटले जाते. ‘बिली’ म्हणजे कन्नडमध्ये पैसा आणि जो कोणी पैसे मागतो त्याला ‘बिलीमारो’ असे संबोधले जाते. मात्र, अशा पद्धतीने आरती फिरवण्याचा उद्देश केवळ पैसे गोळा करणे नसून, रंगमंचावर अवतरलेल्या गणपतीचे आशिर्वाद देणे हा आहे.
एकंदरीत आजच्या तांत्रिक युगात दशावतार अजूनही जिवंत आहे. हा कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा, अस्मितेचा, वैभवाचा समानार्थी आहे ! हा समृद्ध वारसा भावी पिढ्यांसाठी जपला गेला पाहिजे.
– अनघा पंडित 8087269353 anaghapandit297@gmail.com