पुण्यातील बाटल्यांचा बंगला

0
371

एके काळी लग्नाच्या रुखवतात काचेच्या छोट्या बाटल्यांचे घर किंवा ताजमहाल हमखास दिसे. मला ते बघण्यास आवडे. परीकल्पनाच जणू ! बाटल्यांचे तसे घर खरेच बघण्यास मिळाले तर? तर… राजेंद्र इनामदार या पुण्यातील एका वास्तुरचनाकाराने तसे घर प्रत्यक्ष निर्माण केले आहे. रचनेतील सौंदर्यदृष्टी ही त्यांच्या कामाची खासीयत म्हणावी अशीच आहे.

त्यांनी पाण्यासाठी, सरबतांसाठी वापरण्यात येणाऱ्या पेट म्हणजे Polyethylene terephthalate  या प्रकारच्या प्लास्टिक बाटल्या वापरून आगळी-वेगळी वास्तू निर्माण केली आहे. प्लास्टिक बाटल्या हा विटांना पर्याय ! तसेच, लोखंडाला काही प्रमाणात पर्याय म्हणून बांबू, अत्यल्प सिमेंट, दगडाचा चुरा किंवा चाळलेली माती व पाणी हे अन्य बांधकाम साहित्य. ते थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड असते. घर चांगले तीन मजली आहे – त्यावर दोन हजार लिटरची पाण्याची टाकी; घराशेजारी माणसांसाठी एक व कुत्र्यांसाठी एक असे दोन छोटे डुंबण्यासाठी तलाव आणि जुनी, छान वाढलेली झाडे न तोडता त्यांचे सान्निध्य अशी अफलातून ती वास्तू तयार झाली आहे. पर्यावरणाला जपणारा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. पेट हा प्लास्टिकचा एक प्रकार. ज्या प्लास्टिक बाटल्यांमधून पिण्याचे पाणी मिळते, ते माणसांना अपायकारक नाही असे मानले जाते.

बंगल्याची कल्पना अकस्मात आली. राजेंद्र इनामदार यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी जागा घेतली होती. तेथे काही उपक्रम चालू करावे असे त्यांच्या डोक्यात होते. खरे तर, ते दररोज सायकल चालवणारे, डोंगर चढणारे; पण तरीही राजेंद्र यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची सक्तीची विश्रांती सुरू झाली. प्रकृती बिघडली, बाहेर जाणे बंद झाले. त्यामुळे डोके व मन चालू लागले. सुरुवातीला डॅाग केनेल म्हणजेच कुत्र्यांसाठी होस्टेल बांधावे, त्यात अठरा कुत्र्यांच्या राहण्याच्या छोट्या केजेस व दोन खोल्यांची इमारत असावी, त्यात एका खोलीत ऑफिस अन् स्टाफला राहण्यासाठी एक खोली बांधावी असे ठरले. राजेंद्र यांच्या मैत्रिणीची मुलगी ते काम करणार होती. तिला मदत होईल, मनातील प्रयोगही करून पाहता येईल अशा विचाराने कामाला सुरुवात झाली.

राजेंद्र यांची सवय होती, की ते कधी ट्रेकला गेले असताना, खडकवासला धरणाच्या साठलेल्या पाण्याशेजारी असलेल्या चौपाट्यांवर गेले असताना किंवा लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या, की ते त्या ढीगभर होतील अशा बाटल्यांनी अस्वस्थ होत. मग ते त्या साऱ्या ठिकाणी पोती घेऊन जाऊ लागले आणि मिळतील तेथून बाटल्या पोत्यात भरून आणू लागले. बऱ्याचदा, त्यांनी बाटल्या कचराकुंड्यांत उतरूनही गोळा केल्या. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्यांचा दृढनिश्चय बघून त्यांच्या मित्रांनीपण बाटल्या गोळा करून त्यांना आणून दिल्या आहेत. अशा बाटल्या, दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण तयार करून, ते बाटल्यांत भरून बाटल्यांचे केलेले ते घर. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ)  तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !

आतील दारे, खिडक्या यांचा प्रश्न त्यांच्या छांदिष्ट, अभ्यासू सवयीमुळे सुटला. ते २००८-०९ मध्ये कामानिमित्ताने रत्नागिरीला जात असत. त्यांच्या ऐंशी-नव्वद वर्षे जुन्या साईटचे नुतनीकरणाचे काम तेव्हा सुरू होते. तेथील जुन्या खिडक्या-दरवाजे काढून नवीन ॲल्युमिनियमच्या खिडक्या-दरवाजे बसवण्याचे काम सुरू झाले. त्यांना ते जुने, पण चांगल्या अवस्थेतील सागवानी दारे आणि खिडक्या अल्प किमतीत मिळाल्या. त्यातून सहा दरवाजे, तीन बाय साडेचार फूटांच्या आठ-दहा खिडक्या त्यांच्या संग्रही येऊन पडल्या होत्या. त्या प्रत्येक दाराची किंमत प्रत्येकी तीस-चाळीस हजार रुपये भरेल असा तो ऐवज. अशा रीतीने जुने दरवाजे-खिडक्या रिसायकल अन् रियुज करत; तसेच, बाटल्यांचा पुनर्वापर करत भिंती बांधून तयार झाल्या. प्रश्न छप्पर कसे करावे हा होता. साधे पत्रे टाकावे की सिमेंटची स्लॅब? राजेंद्र यांचा मोठा भाऊ जयंत इनामदार स्ट्रक्चरल डिझायनर आहे. त्यांनी काही गणिते करून स्लॅब टाकण्यास हरकत नाही असे सांगितले.

राजेंद्र यांचा आदर्श लॉरी बेकर. ते ब्रिटिश वास्तुशिल्पी यांना मानत आले आहेत. त्यांच्या स्थापत्य शास्त्रातील शिक्षणकाळापासून त्यांचे बांधकाम पर्यावरणपूरक, नैसर्गिक साधने वापरून केलेले, भरपूर प्रकाश-हवा, त्यासाठी जागा कशी वापरावी आणि त्यातील सौंदर्यदृष्टी यासाठी प्रसिद्ध आहे. राजेंद्र यांनी त्या शिक्षणाचा उपयोग या घरासाठी केला. स्लॅब टाकण्याचे ठरल्यावर फिलर स्लॅबला नेहमीची कौले वापरण्यापेक्षा त्यांनी पाहिजे होत्या तशा मातीच्या बशा कुंभारवाड्यात जाऊन तयार करून घेतल्या. त्यामुळे काँक्रिटचे पैसे वाचले आणि एक वेगळा देखणेपणा आला. अशा प्रकारे मूलभूत रचना पूर्ण झाली !

पुण्यात एका सोसायटीतील पार्किंगच्या शहाबाद फरश्या तोडून पेव्हिंग-ब्लॉक्स बसवणे चालू होते. राजेंद्र यांनी तेथून जुन्या काढलेल्या शहाबाद फरश्या बाराशे-पंधराशे चौरस फूटांवर त्यांचा सुंदर पुनर्वापर करत लावून घेतल्या. कोठून कोठून जुने आणि देखणे फर्निचर गोळा केले. वेताच्या जुन्या तुटक्यामुटक्या खुर्च्या आणून त्या विणून नव्या केल्या.

असा स्वतःच्या मनातील, स्वतःच्या आवडीनुसार निर्माण केलेला, देखणा, टुमदार ‘बाटल्यांचा बंगला’ निर्माण झाला. राजेंद्र यांना त्याचे मनसोक्त समाधान वाटते. जेवणासाठीची जागा, स्वयंपाकघर, एक दिवाणखाना अशी हजार चौरस फूटांची सुंदर वास्तू तयार झाली आहे. राजेंद्र सुट्टीदिवशी कुटुंबाबरोबर तेथे जात, मग मित्रमंडळी येऊ लागली आणि आता तेथे आदरातिथ्य व्यवसायाची कल्पना जोर धरू लागली आहे. सुट्टीदिवशी, दूर ठिकाणी जाऊन कार्यशाळा, चर्चासत्रे घेण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारी अशी ती जागा ठरत आहे. मोठा गट आला तर पंचवीस-तीस लोकांची सोय होऊ शकेल अशी व्यवस्था तेथे आहे. स्वयंपाक करण्यासाठी नेपाळी कुटुंब आहे. पुण्यात, सिंहगडाच्या पायथ्याशी, डोंगररांगांच्या सोबतीने, सागाच्या जंगलाच्या सुरक्षित भवतालात बाटल्यांचे ते घर पुण्यातील राजाराम पुलापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे.

राजेंद्र इनामदार 9822090550

– अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here