Home गावगाथा दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)

दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)

5

दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या ?
लक्ष्मणाच्या ….
लक्ष्मण कुणाचा ?
आई बापाचा
दे माय खोबरानी वाटी
वाघाच्या पाठीत, हाणीन काठी.

दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाईम्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. त्याची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. चौगाव हे आमचे गाव अठरा पगड जातींचे आहे. माळी आणि हाटकर पाटील (धनगर) यांची संख्या तेथे जास्त. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. त्या समाजाची पकड गावच्या राजकारणावर होती. माझे चुलते नवल बापू मोरे हे गावचे सरपंच सलग पंधरा वर्षे होते. इतर समाजात गवळीभिल्ल यांचीही संख्या लक्षणीय आहे. सोनार, लोहारसुतारमहार, मांगचांभार, कोळी, न्हावीशिंपी बऱ्यापैकी संख्येने आहेत. गावात बलुतेदारी पद्धत होती. शेतीबरोबरच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय गावाचा आहे.

    चौगावच्या दक्षिणेकडे वीस-पंचवीस किलोमीटरपर्यंत सरकारी जंगल होते. त्यामुळे गाई, म्हशीशेळ्या यांची संख्या आमच्या गावात विपुल होती. आमच्याकडेही लहान मोठ्या वीस-पंचवीस शेळ्या असायच्या. गवळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन व दुग्धोत्पादन हा आहे. ते अशा भागांमध्ये स्थायिक झाले आहेत, जेथे त्यांच्या गायी-म्हशींना चरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल उपलब्ध असेल. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. म्हशींची संख्या सर्वात जास्त होती. म्हशी घरासमोर किंवा पाठीमागील वाड्यात किंवा गावाजवळील खळ्यात बांधत. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा.

        दिवाळी दहा-पंधरा दिवसांवर आली की मी सहा-सात जणांचा एक ग्रूप तयार करायचो. हातभर लांबीचा बारीक बांबू किंवा जाड काठी घेऊन तिच्या एका टोकाचे चार भाग करून ते फाकवून द्यायचे व त्या खोबणीत मातीची पणती बसवायची. गवरीचे तुकडे (रेटूक) एका डब्यात ठेवायचे. एका मुलाकडे राँकेलचा डबा ठेवायचा. गवरीचे तुकडे किंवा राँकेल ठेवण्यासाठी सहसा संडासचेच डबे धुऊनचुऊन वापरायचे. पणतीमध्ये गवरीचे तुकडे टाकून, वरून थोडे रॉकेल ओतायचे. गवरी चेतवली (पेटवली) की झाली ‘दिवटी तयारसंध्याकाळी अंधार पडला की आमचा ग्रूप सज्ज होऊन बाहेर पडे. ओळखीच्या घरी ज्यांच्या घरासमोर गुरे असतील तेथे जाऊन गुरांना दिवटीने ओवाळायचे. घरासमोर उभे राहून गुरांवर आधारित गाणी म्हणायची. ती गाणी पारंपरिक असायची किंवा प्रसंगानुरूप तयार केली जायची. ज्याचा ग्रूप चांगली गाणी म्हणेल तो ग्रूप भारी समजला जाई. गाणी म्हटल्याबद्दल घरधणीन तीन पैसे, पाच पैसे द्यायची तर कधी थोडे रॉकेल द्यायची. थोडी गाणी माझ्या लक्षात राहिली आहेत; गाण्यांचे अपभ्रंश होत होत काहींचे उच्चार बदलून गेले आहेत. दिवटीची दखल कोणी घेत नाही असे दिसले तर खालील गाणे म्हणायचो.

उठ रे उठ रे घरना धनी
काय निजना गोधड्या तानी
तुना दारसे दिवटी वनी
सोनानी दिवटीरूपाना दांडा

असे ते बरेच मोठे होते. ज्याच्या हातात दिवटी त्याने गाणे म्हणायचे. राहिलेल्या मुलांनी त्याच ओळी त्याच्या मागून एका सुरात म्हणायच्या. इतर काही गाणी अशी होती –

उघड बकरक्या बकरीसनं झाडपं
बकऱ्या जाऊ दे वरला रानले
वरला रानले बोरी भारी
येऊ दे बकऱ्या चरीचुरी
नदीनं पाणी झिरीमिरी ।।१।।

उघड बकरक्या बकरीसनं झाडपं
बकऱ्या जाऊ दे हेटला रानले
हेटला रानले चारा भारी
येऊ दे बकऱ्या चरीचुरी
नदीनं पाणी झिरीमिरी ।। २।।

(बकरक्या म्हणजे शेळ्या चारणारा)

          गाणे याप्रमाणे जंगलातील भागांची नावे व तेथील एकेक वैशिष्ट्य घेऊन लांबवत न्यायचे. दिवटी शक्यतोवर विझू द्यायची नाही. आळीपाळीने गाणी म्हणायची. दिवट्या आमच्यासारख्या अनेकांच्या असायच्या. गाई आणि म्हशी यांच्यावर आधारित गाणी जास्त असायची. एक गाणे असे,

गोफनना पागरा
गाई आल्या मोगरा
अरे यमझमुकरे पाला
देव दऱ्यामंधी गेला
देवदऱ्यामधीचा झू
तटकिल्यान्या जाळी
सत कुढत वो माळी
माय मैदानना काटा
गाई हानल्या वाटा
वाटखरडीना वेळू
गाई लागल्या खेळू
खेयता खेयता झायी रात बा झायी
आंधळी गायनी मारी लात बा मारी
आवं तुना गायक्या मोठा
त्याना हातमा लाल लाल सोटा
त्यानी वाघ मारा मोठा
लह्य लह्य नारळना गोटा.

काही गीतांतील शब्दांचे उच्चार बदलत गेले म्हणून काही शब्दांचा अर्थ लागत नाही. विशिष्ट चालीवर म्हटलेली ती गाणी ऐकण्यास गोड वाटतात. गायीचे तसेच एक गाणे. त्याचे ध्रुव पद ..।

काय वर्णू ही पंढरपुरी
गाय चारे सदा डोंगरी ।ध्रु।

हे असायचे किंवा…

मनी कपीला गाय बरवी रे
दुध भरून देते चरवी  ।। ध्रु।।

मनी कपीला गायनी पाठ जशी
पंढरपूरनी वाट   ।।ध्रु।।

मनी कपीला गायना शिंगे जशा
वाण्या बाम्हणना लिंगे   ।।ध्रु।।

मनी कपीला गायना डोया जशा।
लोणीयाना गोया     ।। ध्रु।।

मनी कपीला गायनी शेप जशी
तप्तीले लागी झेप      ।। ध्रु।।

मनी कपीला गायनं पोट जसं
येहेरवरनी मोट      ।।ध्रु।।

मनी कपीला गायना कान जशे
केयीयानं पान      ।।ध्रु।।

गायीचा एकेक अवयव घेऊन गाणे अशा प्रकारे रचत जायचे. गायीचे नाव घरमालकाला विचारून ते नाव कपिला ऐवजी घ्यायचे. गाणे म्हणणारा भरपूर स्वातंत्र्य घेत असे. शेतातील आणि जंगलातील चारा गुरांना उपयोगी पडायचा. गुरांच्या मलमूत्रापासून शेतकऱ्यांना खत मिळायचे. त्या कुजलेल्या शेणखतामुळे शेती पिकायची. सर्व खते नैसर्गिक असायची. कृत्रिम खते आमच्या गावात आली नव्हती. दुधदुभते भरपूर असल्याने दही, ताक, कढी, लोणी, तूप, बेरी असे पदार्थ खाण्यास भरपूर मिळायचे.

रोगांचे प्रमाण कमी असायचे. कृतज्ञता म्हणून गायी, म्हशीशेळ्या, गुराखी यांच्यावरील गाणी म्हणून दिवाळी साजरी केली जायची. आम्ही जुन्या गाण्यांबरोबरच नवीन नवीन गाणी तयार करायचो. आमची धडपड आणे-दोन आणे मिळवण्यासाठी असायची. त्याबरोबर मोठी माणसे आमच्या गाण्यांचे कौतुक करायची.

          ज्यांच्या घरांजवळ त्यांची गुरेढोरे नसत तेही आम्हाला गाणे म्हणण्याचा आग्रह करत असत. बरेच जण असे असायचे, की ते आम्हाला एक पैसापण देत नसत. आमचा कार्यक्रम मात्र आज नाही दिले तर उद्या देतील या आशेवर चालू असायचा. बैलावर आधारित एक गाणे … (गाणे थोडे चालीवर म्हणण्याचा प्रयत्न केला तर त्यांतील गोडवा वाढतो.)

गाय जणली गोठ्यामंधी रे
गाय जणली गोठ्यामंधी .

तिच्या पोटी धवळा नंदी  रे
तिच्या पोटी धवळा नंदी .

त्याला घाला गेज गाठी रे
त्याला घाला गेज गाठी.

नानावटीना सौ सौ पेठा रे
नानावटीना सौ सौ पेठा.

गाडो गाडी कपाशी घेती रे
गाडो गाडी कपाशी घेती.

शेकडो गणती पैसे येती रे
शेकडो गणती पैसे येती.

आमले भी द्या ना खोबरानी वाटी रे
आमले भी द्या ना खोबरानी वाटी.

(जणली म्हणजे व्याली)

          तुम्ही गाय आणि बैल यांच्या जिवावर नानावटी म्हणजे पैसेवाले झाले. दिवट्या घेऊन फिरणारे आम्ही म्हणजे गुराखी; आम्हालाही काहीतरी बक्षिसी द्या असा या गाण्याचा अर्थ आहे. आम्ही करूणाजनक गाणे एक तयार केले होते..

शेवऱ्या नी नेवऱ्या धांड्या भिडो…
सवा पारनी न्याहरी भिडो …

गायक्यानी गाई त्या सोड्यात भिडो …
जंगलमा चारा मातेल भिडो …

खाईसनी माज त्यासले चढना भिडो…
शेवऱ्या नी नेवऱ्या धांड्या भिडो …

दोन्हीस्नी टक्कर झायी भिडो …
पोटमा शिंगडं घुसनं भिडो..

शेवऱ्या मरी तठे पडना भिडो..
कावळा काव काव करतंस भिडो..

घारभी घिरट्या घालंस भिडो…
कपिला गाय तठे हांबरस भिडो..।

गायक्या धाय धाय रडंस भिडो…
शेवऱ्या नी नेवऱ्या धांड्या भिडो.

धांड्या म्हणजे गोऱ्हा. एक गोऱ्हा मेला ही दु:खद घटना या गीतात आली आहे.

म्हशींवर आधारित काही गाणी होती –

भुरी म्हैसना भुरा हेला रे
भुरी म्हैसना भुरा हेला.

त्यावर टाका सत्तरशेला रे
त्यावर टाका सत्तरशेला.

सत्तरशेलांसन्या नवू नवू जाती रे
सत्तरशेलांसन्या नवू नवू जाती.

पांची पालख्या हारोहारी रे
पांची पालख्या हारोहारी.

मधली पालखीवर शाहू राजा रे
मधली पालखीवर शाहू राजा.

शाहू राजाना भला भला हाथी रे
शाहू राजाना भला भला हाथी.

गुजरात जातन्या भल्या भल्या म्हशी रे
गुजरात जातन्या भल्या भल्या म्हशी.

टोमणं टोमणं सरकी खाती रे
टोमणं टोमणं सरकी खाती.

पखाल पखाल पाणी पिती रे
पखाल पखाल पाणी पिती.

हंडा नी गुंडा दूध देती रे
हंडा नी गुंडा दूध देती.

ते भी दूध गुजरातले जाई रे
ते भी दूध गुजरातले जाई.

बादली धुईसनी चहा करती रे
बादली धुईसनी चहा करती.

या गाण्यात टोमणं म्हणजे टोपले. पखाल हे पाणी वाहून आणण्याचे साधन. ते हेल्याच्या (रेडा) पाठीवर लादायचे हे जुने शब्द आले आहेत. शाहू महाराजांच्या हत्तीसारख्या विशालकाय म्हशी होत्या असा उल्लेख येतो. आम्ही गाणी पारंपरिक रचनांत थोडा बदल करून म्हणत असू. आम्हां लहान मुलांचा तो उपक्रम दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत चालायचा. आम्हाला जास्त पैसे शेवटच्या दिवशी मिळायचे. माझी एक चुलतीसुखलाल भाऊची माय, रेशमाकाकू मला चार आणे द्यायची. गंगारामबापूची आई गिरीजामायतीसुद्धा मला एकगठ्ठा चार आणे द्यायची. चार आण्याला मोठी किंमत होती. आम्ही पैसे वाटून शेवटच्या दिवशी घेत असू.

    लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम नसायचा. नवीन शिराई (झाडणी) आणलेली असायची. तिला लक्ष्मी मानण्याची पद्धत होती. तिची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा. शेतकरी गाई-म्हशी हीच त्यांची लक्ष्मी असे मानत. लक्ष्मी पूजनाच्या आधुनिक पद्धती प्रथम गुजराती समाजाकडून शहरांत व शहरांकडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत पसरल्या. स्त्रियांना लक्ष्मीची पदवी बहाल करून लक्ष्मी पूजनापर्यंत सासरी अडकावून ठेवू लागले.

          दिवाळीआधीच लग्न झालेल्या मुली आठ-पंधरा दिवस माहेरी आलेल्या असायच्या. भाऊ बहिणीला तिच्या सासरी जाऊन घेऊन यायचा. लहान आकाराची बैलगाडी असायची. तिला छकडा म्हणायचे. छकडा गाडीला वरून बांबूच्या फराट्या वाकवून टप (छत) केलेला असायचा. त्यावरून पडदा टाकून गाडीत बसलेल्याला सावली केलेली असायची. नवीन नवरीला सासरी पोचवताना किंवा माहेरी आणताना तशा गाडीचा वापर करायचे. काही तालेवार नेहमीच तशी पडद्याची गाडी वापरायचे. बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळा असायच्या. सासुरवाशीण तशा गाडीची वाट पाहत राहायची.

गाडी चालली घुंगराची
अन वाट बाई डोंगराची ।

हे गाणे आम्ही लहानपणी गुणगुणायचो. मुलीला घ्यायला सासरी/माहेरी पुरुष माणसाला जावे लागे. त्याला मुऱ्हाळी म्हणायचे. मी माझे चुलते तुळशीरामतात्या यांच्याबरोबर माझ्या मोठ्या शांताबहिणीला घ्यायला साध्या बैलगाडीने शेवाडे गावी गेल्याचे आठवते. आमचा प्रवास आठ दिवस नातेवाईकांच्या गावाला मुक्काम करत करत तरी चालला असेल.

          चौगावकरांसाठी त्यांच्याकडे असणाऱ्या म्हशी याच लक्ष्मी होत्या. गवळीलोकांकडे म्हशी भरपूर होत्या, पण इतर समाजातील सर्वच लोकांकडे म्हशी असायच्या. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही काही जण म्हशींना सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढायचो. तशा वेळी फटाके खूप फोडायचो. गावाबाहेर नदीकाठी छोटे मरीआईचे (मरीमाय) देऊळ आहे. तेथे म्हशींना न्यायचो. दोन्ही गुढगे टेकून म्हशींना मरीआईला सलामी देण्यास लावायचो. मरीमायच्या देवळाच्या अवतीभवती सगळीकडे उकिरडे होते. मरीमाय ही देवता रोगराई निर्माण करणारी देवता. लोकांची समजूत तिला प्रसन्न करून घेतले तर त्यांची आणि त्यांच्या म्हशींची रोगराईतून मुक्तता होईल अशी असावी.

         जिभाऊ (वडील) आम्हाला फटाके दिवाळीसाठी आणून देत नसत. आम्हीपण कधी हट्ट केल्याचे आठवत नाही. आपण फटाके फोडले काय आणि इतरांनी फोडले कायकाय फरक पडतोआवाज तर सगळ्यांना सारखाच ऐकण्यास मिळतो. हे वडिलांचे तत्वज्ञान. ते आम्हाला टिकल्यांच्या डब्या, गुलकाडीच्या पेट्या आणून द्यायचे. फार झाले तर ‘चिंगे‘ फटाके आणून द्यायचे. फटाके घरातील सर्व मुलांना सारख्या संख्येने वाटून द्यायचे. मी दिवटीचे गाणे म्हणून आलेल्या पैशांतून गोळ्याबिस्कुटे व टिकल्या घ्यायचो. फटाक्यांचा मोह मला नंतरही कधीच झाला नाही. फटाके फोडणे म्हणजे पैशांची विनाकारण नासाडी हे वडिलांनी लहानपणीच मनावर ठसवले होते; सुरसुऱ्या (सुनसुंदऱ्या) लावण्यास मात्र आवडायचे.

    आम्ही ‘दिवाळीच्या सणाला नवे कपडे घालायचे असतात‘ हे फक्त पुस्तकात वाचायचो. प्रत्यक्षात दिवाळीला कधीच नवे कपडे मिळाले नाहीत. ‘लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते‘ अशी गत असल्याने दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेल्याचे फारसे आठवत नाही. माहेरी आलेल्या बहिणी व त्यांच्या मुलांना नवीन कपडे घेण्याची पद्धत होती. पण ते कपडेही दिवाळीनंतर बहीण जेव्हा सासरी जाईल तेव्हा घ्यायचे. त्याच वेळी आमचा नंबर लागला तर लागला. नवीन कपडे अंगावर घालण्यास मिळणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आणि तेवढीच दुर्मीळ! आई मावशीच्या घरून येताना त्यांच्या घरातील जुने, पण चांगले कपडे घेऊन यायची. आमचे बरेचसे बालपण त्या कपड्यांवर निभावले गेले. पण त्या गोष्टीचे वैषम्य कधीही वाटले नाही. त्या कपड्यांतही आनंदच वाटायचा. वरण-भात, शिरा, पुरणपोळी, सांजोऱ्या अशी गोडधोड खाण्याची मजा असायची. घरचे सगळे शेतात न जाता घरीच असायचे. बहीण, भाचे यांमुळे घराचे गोकुळ बनायचे. बच्चे कंपनीसाठी दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी वाटायची. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍

 प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस हा अत्यंत धामधुमीचा असायचा. कोळिणीची हाक पहाटे दोन-तीन वाजता कानावर यायची. कोळीण ओळखीच्या घरोघरी जाऊन तेथील माणसांना ओवाळायची. चौगावमध्ये पूर्वीपासून चालत आलेली ती प्रथा होती. जिभाऊ एवढ्या रात्री उठायचा नाही. मला किंवा मोठा भाऊ मधूअण्णाला उठावे लागे. अण्णा मोराण्याला दशरथ मामाकडे चौथीपर्यंत शिकण्यास होता. त्यामुळे मलाच रात्री डोळे चोळत उठावे लागे. आई ओवाळणी म्हणून एक बंधे (बंदे) नाणे तिच्या ताटात टाकायची किंवा तिला सकाळी येऊन घेऊन जायला सांगायची. दिवाळी असो-नसो आमचे गाव पहाटे चारला जागे झालेले असायचे. म्हशींचे दूध काढणे, पाणी पाजण्यासाठी हाळवर (पाण्याचे कुंड) घेऊन जाणे, त्यांच्या अंगावर पाणी शिंपडून त्यांना चांगले धुऊन काढणेशेणपुंजा आवरणेझाडझुड करणेनदीपलीकडील विहिरीवरून हंडा-गुंडा भरून घरातील पिण्याचे पाणी भरणे ही रोजची कामे असत.

आई दिवाळीच्या दिवशी पहाटे कानात तिळीचे तेल टाकायची. गल्लीतच पाटलं (पाट) टाकून आंघोळ घालायची. घमघम वास येणारा मसाला साबू लावून आणि चांगले अंग घासून आंघोळ करायची. बहिणींची ओवाळण्याची लगबग सकाळी असायची. गावात आम्हा मोरे यांची फक्त सहा घरे होती. माझे वडील आणि त्यांचे चार भाऊ अशी पाच घरे व त्यांचे चुलते शेनपडू बाप्पा यांचे एक मोठे घर. सर्व सहाही घरांतील मुली प्रत्येक घरी जाऊन मुलांना व माणसांना ओवाळत. मला सहा बहिणी. आमच्या प्रत्येकाच्या घरी मुलींची संख्या जास्त होती. त्यामुळे आमचा सकाळचा बराचसा वेळ ओवाळून घेण्यात जायचा. आम्ही लहान मुलेआमच्या खिशातच पैसे नाहीत तर आम्ही ओवाळणी काय देणार? बहिणींकडून आम्हाला नारळ आणि करदोडा (कटीदोरा) मिळायचा. आई कोणत्या मुलीला किती रुपये द्यायचे हे ठरवायची आणि तीच पैसे द्यायची. प्रत्येकीला पैसे न देता त्या घरातील मोठ्या बहिणीजवळ एकत्रित रक्कम दिली जाई. तीच पद्धत प्रत्येक घरी असल्याने आमचे जेवढे पैसे गेलेले असायचे तेवढे माझ्या बहिणींमार्फत परत आईकडे यायचे. थोडेफार इकडे तिकडे होई आणि त्यामुळे कोणालाच काही वाटत नसे. लहान बहिणी रुपया-दोन रुपया ओवाळणीवरही खूष असायच्या.

    त्यानंतर सुरू होत असे फराळाचा दौर. आम्ही फराळाची पद्धत आईच्या माहेरकडून शिकलो होतो. मालेगावबागलाणकडील भागाला बारी वरचा भाग व आमच्या भागाला बारी खालचा भाग असे म्हणत. बारी म्हणजे एक प्रकारे डोंगरघाट. फराळासाठी मुरमुऱ्यांना हळदमीठतिखट लावायचे. शेंगदाणे टाकायचे. दाळ्या टाकायच्या. घरच्या घरीच साधा चिवडा बनवायचा. एकमेकांच्या घरातील मुले माणसांना फराळाला बोलावायचे. मित्र मंडळी यांना फराळासाठी घरी बोलावायचे. जुन्या वह्यांचे कागद फाडून त्या कागदांवर फराळाचे वाटप करायचे. फराळ एकदम साधा पण एकमेकांच्या घरी जाऊन खाण्यात प्रेमजिव्हाळागोडी सर्व काही असायचे. सर्व घरी तसाच फराळ असायचा, पण माझे एक चुलते जंगलू आप्पा यांच्या घरी सखूकाकू आम्हाला गरम भजीकुरडाया किंवा बर्फी असा फराळ द्यायची. ओवाळायला आलेल्या बहिणींना तो फराळ द्यायचा. त्याचबरोबर दूध, सांजोऱ्याखिचडी यांवरही महिला मंडळ ताव मारायचे. दिवाळीच्या आठ दिवस आधी दोन-तीन डबे भरतील एवढ्या सांजोऱ्या तळून ठेवलेल्या असायच्या. गुळाचा सांजा असणाऱ्या सांजोऱ्या दोन आकारांच्या असायच्या. पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल आणि अष्टमीच्या चंद्रासारख्या अर्धगोल (पुडा). सासरच्या वेगवेगळ्या गावांहून माहेरी आलेल्या बहिणी दिवसभर एकमेकींना सोडत नसत. कोणाच्याही घरी खाण्यापिण्यात कोणालाच संकोच वाटत नसे. दुपारी जेवणात वरण, भात, शिरा, भजी, कुरडया असा बेत असायचा. वरण-भात हे माझ्या लहाणपणचे सर्वात आवडते जेवण होते. दुपारची वेळ कधी संपते याची आम्ही वाट पाहायचो. कारण आम्हाला ओढ लागलेली असायची रेड्यांची (हेलासनी) टक्कर पाहण्याचे.

    दुपार संपल्यानंतर हळुहळू लहानथोर मंडळी हाळच्या वाटेजवळील नदीकिनारी जमा होऊ लागायची. उंच मातीचे टेकाडे नदीच्या पलीकडे होते तर अलिकडे महादेवाचा पार, वड, पिंपळाची मोठाली झाडे होती. नदीपात्र त्या ठिकाणी मोठे होते व सर्वत्र वाळूच वाळू होती. आम्ही लहान मुले मोक्याची जागा धरून बसायचो. काही मुले पलीकडे उंच टेकाडावर जाऊन बसत, काही अलिकडे किनाऱ्यावर उभी राहत किंवा झाडांवर जाऊन बसत. नोकरी-व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी गेलेली मंडळी दिवाळीला गावी यायची. त्या सगळ्यांच्या भेटीगाठी त्याच नदीकिनारी आणि त्याच दिवशी जास्त करून होत असत. अनेकांच्या भेटी घडवून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी आमच्या गावची दिवाळी ही आगळीवेगळी होती.

गावाने कोणत्या हेल्यांची टक्कर लावायची हे आधीच ठरवलेले असायचे. ठरावीक लोकांकडचे हेले टक्करीसाठी तयार केलेले असायचे. म्हशी गबाजी गवळी आणि खंडू गवळी या भावांकडे भरपूर असायच्या. त्यांच्याकडे असणाराजाण्या हेला गावात प्रसिद्ध होता. तो हत्तीसारखा धिप्पाड होता. त्याची शिंगे लहान होती, पण त्याची सगळी ताकद त्याच्या माथ्यात होती. काळू फौजदाराचा हेला लहान होता, पण त्याची शिंगे लांब आणि टोकदार होती. वसंत सिंधी (निर्वासित) हा धुळ्याला राहायचा, पण चौगावला त्याच्या म्हशींचा वाडा होता. त्याचाही हेला टक्कर खेळण्यात पटाईत होता. हेले अजून रामदास मास्तर, साखरलाल नाना अशा बऱ्याच जणांकडे असायचे. जे हेले टक्करीचे असायचे त्यांना भरपूर खुराक खाऊ घालायचे. ढेप, सरकी, कुळदाचे (कुळीथ) आंबोण, गूळ खाऊ घालायचे. आम्ही तर असेही ऐकायचो की काही जण आंबोणमधे अंडी फोडून खाऊ घालायचे. काही गावांमध्ये टक्करीच्या दिवशी त्या हेल्यांना दारू पाजायचे अशाही वार्ता असायच्या. हेल्यांना शेंदऱ्या व पिवळ्या रंगाने पूर्ण रंगवायचे. त्यामुळे ते अजूनच भयंकर दिसत. त्यांची मिरवणूक म्हशींबरोबर वाजतगाजत काढायचे. अशा वेळी अँटम बार, सुतळी बार, फटाक्यांच्या मोठाल्या लडी लावल्या जात. सगळा गाव नदीकडे व ग्रामपंचायतीसमोरच्या मोकळ्या भागात जमा झालेला असायचा.

    मरीआईचे दर्शन झाले, की दोन्ही हेल्यांना नदीत आमनेसामने पण एकमेकांपासून अंतरावर आणले जायचे. हेल्यांबरोबर दोनचार म्हशी असायच्या. तो प्रकार बायांवरून माणसांत खुन्नस लावून देण्यासारखा असावा. हळुहळू म्हशींना बाजूला करून हेल्यांना काठीने मारून जवळ जवळ आणले जायचे. सुरुवातीस, दोन्ही हेले एकमेकांचा अदमास घेत एकमेकांभोवती फिरायचे. शेवटी, एकमेकांचे डोके एकमेकांना भिडायचे. लोक हुर्यो करून ओरडायचे. हेल्यांना चेव चढायचा. कोणी डोक्याची ताकद वापरायचा तर कोणी शिंगांचा वापर करायचा. दोन्ही हेले रक्तबंबाळ व्हायचे. शेवटी, कोणता तरी एक हेला पळ काढायचा. दुसरा त्याचा पाठलाग करायचा. ते जंगलात लांबवर पळत जायचे. काही माणसे त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना अडवायची. पळणारे रेडे गावात शिरू नयेत म्हणून लोक काळजी घ्यायचे. ते गावात शिरले तर कितीजणांना चिरडतील याचा नेम नसायचा. तशा हेल्यांमध्ये एकमेकांविषयी कायम खुन्नस असायची. त्यामुळे दोन्ही हेले जंगलात किंवा हाळेवर पाणी पाजताना आमनेसामने येणार नाहीत याची काळजी घेतली जात असे. शिवाय, कोणता गुराखी कोणत्या जंगलात म्हशी चारण्यास घेऊन गेला आहे याची माहितीही एकमेकांना असे.

          आर्वी या गावातसुद्धा म्हशी खूप होत्या. तेथील एक हकिकत ऐकली होती. तेथे एका बाईकडे खूप म्हशी होत्या. त्यांच्यात एक हेला होता. त्याचे नाव ‘गोवर्धन‘. ती बाई त्या रेड्याला टक्करीसाठी कोठे कोठे घेऊन जायची. टक्करीच्या वेळी जवळच थांबून असायची. ती तिच्या रेड्याला प्रोत्साहन देण्यासाठी एकदाच म्हणायची,”गोवर्धन्या, उचल” की लोक समजून जायचे, गोवर्धन्याने समोरच्या हेल्याला उचलून फेकलेच म्हणून समजा!

          मी टक्कर पाहून परत आल्यावर सगळ्या गावात फिरण्यास निघायचो. फुसके गेलेले फटाके गोळा करायचो. चांगले फटाकेही काही सापडायचे. फुसके बार सकाळच्या झुणीत (शेकोटीत) टाकून त्यांचा अचानक झालेला जाळ पाहण्यात मजा यायची. फटाक्यांच्या आवरणाची चित्रे मला आवडायची. तीही जमा करायचो. एकदा मला रिकामी काड्यापेटी सापडली. उघडून पाहतो तर तिच्यात चक्क एक रुपयाची नोट होती. त्या वेळी एक रुपयालापण खूप किंमत होती.

          न्हावी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यायचाआरसा दाखवायचा. त्याला काही पैसे द्यावे लागायचे. मला ते माहीत नव्हते. मी म्हणायचो,”आमच्या घरी आरसा आहे. आम्ही आमच्या आरशात तोंड पाहून घेऊ.” मांग यायचाघरापुढे डफडे थोडे बडवायचा. त्याला पैसे द्यायचे. अशा प्रकारे सगळे कारू-नारू, बलुतेदार दिवाळी मागायचे. काहींना पैसे तर काहींना धान्य द्यावे लागायचे. दिवाळी संपली की पाहुण्या मुलांना कपडे घेतले जायचे. त्यांच्या बरोबर आम्हालाही कपडे मिळायचे.

आमच्या गावच्या प्रथा बऱ्याच काळ तशाच होत्या. सवंगडी शिक्षण आणि नोकरी, व्यवसाय या निमित्ताने पांगले तरी आम्ही दिवाळीला चौगावला जात असू. टक्कर पाहण्यासाठी का होईनाएकमेकांची भेट होईल या आशेने नदीकाठी जमत असू.

   माझे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी लागली. लग्न झाले. दिवाळीच्या सुट्या लागल्या की कधी गावी जाईन असे होऊन जायचे. आधी आम्ही सर्वजण चौगावला जायचो. घरी गेल्यावर शेतीच्या सर्व कामांत घरच्यांना मदत करायचो. पत्नी अलकाला घ्यायला तिच्या माहेरहून कोणीतरी येणार, मुले व ती दिवाळीला मोराण्याला जाणार, मी सुट्या संपल्यावर जाताना त्यांना घेऊन जाणार, हे सारे ठरलेले असायचे. मी जोपर्यंत भाड्याच्या घरात राहत होतो तोपर्यंत हा सिलसिला चालू होता. जिभाऊ 1998 सालच्या शेवटच्या दिवशी वारले. त्यानंतर दोन महिन्यांत माझे सिन्नरमधील घर बांधून पूर्ण झाले. लक्ष्मी पूजनाला आपल्याच घरी थांबणे बरे या विचारातून घरी दिवाळीला जाणे बंद झाले. बहिणीही त्यंच्या त्यांच्या संसारात गुरफटल्या. त्यांचीही मुलेबाळे मोठी झाली. त्याही दिवाळीला येईनाशा झाल्या.

 

    जंगलतोड सतत होत राहिली. जंगलात झाडे राहिली नाहीत. डोंगर उघडेबोडके झाले. चारा नष्ट झाला, म्हणून गावातील गाई-म्हशींची संख्या कमी होत गेली. चौगाव परिसरातील जंगलात अंजनची झाडे विपुल होती. उन्हाळ्यात अंजनाला पालवी फुटते. अंजनची पाने आपट्याच्या पानांसारखी असतात. आंबट, तुरट चवीचा तो पाला म्हशींना खूप आवडतो. ताजा हिरवा अंजनाचा पाला खाऊन म्हशी जास्त दूध द्यायच्या. पाला ओरपल्याने झाडांचे नुकसान काहीच होत नसे. धरणे बांधून झाल्यामुळे जमिनीला पाणी मिळू लागले. लोकांचा कल शेतीतून नगदी पिके घेण्याकडे वाढू लागला. गावातील जनावरांचे गोठे मळ्यांमध्ये हलवले गेले. दिवटी घेऊन गाणे म्हणण्याची आमची लहानपणची पद्धत बंद झाली.

    हेल्यांची जोपासना करणे लोकांच्या जिवावर येऊ लागले. पूर्वी हेला पखालीने पाणी वाहण्यासाठी उपयोगी पडायचा. ताकदीचे हेलेच टक्कर खेळण्यासाठी राहिले नाहीत – जल्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला‘. पखाल समजल्याशिवाय ही म्हण कोणाला कळणार नाही. हेला बैलाबरोबर औताला काही ठिकाणी जुपायचे. हेला म्हशींच्या गर्भधारणेसाठी गरजेचा असायचा. हेल्याची उपयुक्तता आता संपली आहे. त्याच्या मरणाची तजवीज जन्मतः केली जाते. तीच वेळ बैलांवरही येईल असे वाटण्याजोगी स्थिती आहे. त्या जातीवर हा एक प्रकारचा अन्याय आहे. हेल्यांची टक्कर पूर्वीसारखी रंगत नाही. मी नोकरीला लागेपर्यंत हेल्यांची टक्कर होत होती. पण ‘जाण्या‘ हेल्यासारखी ‘जान ‘ नंतरच्या हेल्यांमधे दिसली नाही. विहिरीवरचा हाळ (हौद) गेला. नदीतील वाळू नाहीशी झाली. नदीचे पात्र बेशरमच्या झाडांनी व्यापले. नदीचे पाणी झिरीमिरी नाही तर चांगले खळाळते आहे, पण नदीला नाल्याचे रूप आले आहे. माझ्या गाण्यांतील बकऱ्या व बकरक्यागाई आणि गायक्या नाहीसे झाले आहेत. नदीचे पात्र नाही. नदीकाठची वड-पिंपळाची झाडे राहिली नाहीत. तेथे मनुष्य वस्ती आहे. हेल्यांच्या टक्करी इतिहासजमा झाल्या आहेत.

          फराळासाठी केवळ मुरमुऱ्यांचा चिवडा जाऊन कितीतरी नवनवीन पदार्थ आले आहेत. पण फराळासाठी पूर्वी जसे मित्रआप्तस्वकीय जमत तसे कोणी जमत नाही. गोडधोड खाण्यास तर सर्वच जण नकार देतात. दिवाळीच्या आठ-पंधरा दिवस आधी येणाऱ्या व दिवाळीनंतर आठ-पंधरा दिवसांनी सासरी जाणाऱ्या विवाहित महिला त्यांच्या घरांतील लक्ष्मी पूजा झाल्यावर येतात. जास्त दिवस थांबण्यास कोणालाच वेळ नाही. खेड्यातील लोकं त्यांच्या जुन्या पद्धती सोडून देऊन शहरी लोकांचे अनुकरण करतात.

    मोबाईल क्रांतीने जग बदलून टाकले आहे. क्षणात एकमेकांशी संपर्क होत असल्याने एकाच जागेवर बसून एकमेकांना भेटणे शक्य झाले आहे. करमणुकीचे इतके नवीन प्रकार निर्माण झाले की जुने सर्व प्रकार मोडकळीस निघाले आहेत. गावातील धाब्याची घरे जाऊन सिमेंट काँक्रिटच्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. ज्या आईवडिलांच्या ओढीने गावाकडेघराकडे पाय ओढले जायचे ते आईवडील राहिले नाहीत. आम्ही कोणाचे तरी आई वडील झालो आहोत आणि आमच्या मुलांच्या भेटीसाठी आम्हाला घरी थांबणे गरजेचे झाले आहे. विज्ञानात एक तत्त्व सांगितले जाते ‘All Properties Are Periodic’ सगळे काही वर्तुळाकार चक्रात फिरत आहेत. काळाच्या या छोट्या जीवनात ते नवीन वाटते. प्रत्येकाला त्याचे बालपण हवेहवेसे वाटते. गेलेला काळ कधीच परत येत नाही हे सगळ्यांना समजते, म्हणून माणूस आठवणींत रमतो. काल्पनिक रीत्या का होईना भूतकाळात जगलेल्या क्षणांचा आनंद घेतो. दिन दिन दिवाळीचे दिन आता संपले आहेत. मी वर्णन केलेली माझ्या गावाची दिवाळी आता माझ्या गावातील आताच्या पिढीलाही नवलाईची वाटेल. सासुरवाशीणीला जाच सासरी खूप असायचा. प्रवासाची साधने मर्यादित असल्यामुळे त्यांना फक्त दिवाळी-आखाजीला माहेरी जाता यायचे. त्यामुळे त्या दिवाळीची वाट चातकासारखी पाहायच्या. यांत्रिकीकरणामुळे पूर्वीची कष्टाची कामे कमी झाली. बदलत्या राहणीमानात एकत्र कुटुंब पद्धत कमी होत गेली. सासुरवास जाऊन उलट म्हाताऱ्या माणसांना सुनवास सुरू झाला. सासर-माहेरमधील अंतर कमी झाले. तसतसे दिवाळीचे स्वरूपही बदलत गेले.

गोविंद बी. मोरे 9588431912 gm24507@gmail.com
—————————————————————————————————————–

About Post Author

5 COMMENTS

  1. ग्रामीण भागातील यथार्थ चित्रण आपल्या लेखनाच वैशिष्ट्य आहे. आपण प्रत्येक ग्रामीण भागातील माणसाला त्याचे बालपण आठवून दिले खूपच छान लेखन…💐💐💐💐

  2. श्री गोविंद मोरे सरसहज सोप्पं झुळुझुळु भाषेत मला वहात नेलंत.चौगावच्या वाळूत उभं केलंत.नदीकाठच्या गावी अशी वाळू मैदानं असंत.करदोडा मलाही मिळालाय लहानपणी,त्यांचा कमरेपेक्षा थोरल्याची घातलेली ए.सी. पॅंट धरुन ठेवण्यासाठीच जास्त व्हायचा.सगळ्यांच्याच पॅंटा मागे ए.सी.लागलेल्या कोणी कोणाला हसायचं नाही.खिशाचा उपयोग गोट्यांच्याबरोबरच चिवडा चकली ठेवायला व्हायचा.व्हाळावर चड्डी फारकत घ्यायची मग पाण्यात हुंदड घालायची.सर मनापासून धन्यवादकाही काळासाठी रोजच्या वातावरणातून गाईम्हशींच्या जवळ नेलंत.आजच्या पोरांना घाण वाटेल पण तो ओल्या शेणाचा वास तो बळीराणा मनात अगदी नाकातही भिरभिरला.सर तुम्हाला तुमच्या परिवाराला शुभेच्छा देत आहे.आणि संकल्प करतोय येत्या दिवाळीला खान्देशातल्या खेड्यात झालं लावून गूळ तूप आन् वयनबाटी खाईन.चंद्रकांत जोशी९८६९०१३५८९

  3. आभारी आहे मित्रा.तुम्ही मला लिहीण्यास प्रव्रुत्त करीत राहीलात.आपले असंख्य आवडते विद्यार्थी लिहीण्याचे बळ देत राहीलेत.किरण भावसार सारखे कवी लेखक मार्गदर्शन करीत राहीलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version