घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी

3
671

दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. अकोट-आर्णी (161 ए) आणि दिग्रस-मूर्तिजापूर (361 सी) हे दोन राष्ट्रीय महामार्ग दिग्रस शहरातून जातात. अकोला आणि बडनेरा ही नजीकची रेल्वेस्थानके आहेत. दिग्रस शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. दिग्रसमध्ये जनगणनेनुसार, चव्वेचाळीस हजार लोक राहतात. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे.

दिग्रस शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शहराच्या मध्यभागी मोहिते पाटलांची भली मोठी गढी होती. ती अस्तित्वात नाही, तरी दुर्गामाता चौकानजीकचे मैदान हे गढीचे मैदान म्हणून ओळखले जाते. मोहिते कुटुंबीय हे नागपूरच्या भोसले घराण्याचे नातलग होत. गजाबा मोहिते पाटील यांच्या पत्नी अंजिराबाई या रघुजी महाराज भोसले यांची मावसबहीण होत्या. त्यांच्या मुलाच्या लग्नाला भोसले घराण्याचे शेवटचे राजे जयसिंगराव भोसले दिग्रसला आले होते. दिग्रस शहराला आध्यात्मिक वारसाही लाभला आहे. जुनी मंदिरे दिग्रसमध्ये पाहण्यास मिळतात. रेणुकामातेचे मंदिर शहराच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत आहे. तेथे टेकडीही आहे. ते मंदिर एक हजार वर्षांपूर्वींचे असावे. ते मंदिर माहूरच्या रेणुकामातेचे प्रतिरूप असल्याचे मानतात. आख्यायिका अशी, की एक भाविक रेणुकामातेच्या दर्शनाला माहूरला निघाला होता. चालत चालत तो त्या टेकडीपर्यंत आला; परंतु थकल्यामुळे पुढील प्रवास शक्य झाला नाही. त्याने मातेची माफी मागितली आणि दर्शनाची इच्छा अपुरी राहिल्याची खंत व्यक्त केली. त्याची साद ऐकून माहूरची रेणुकामाता टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून प्रकट झाली ! मंदिर परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या प्रकारे माहूर येथे रेणुकामाता आणि दत्तशिखर आहे, त्याप्रमाणे, दिग्रसला रेणुकामातेचे मंदिर आणि उत्तरेला चार ते पाच किलोमीटर अंतरावर चिंचोली येथे दत्तखांडी आहे. नवरात्रात भाविकांची गर्दी तेथे असते. त्याशिवाय पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात करीची जत्रा भरते. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. वनउद्यान, साहसी खेळांचे मैदान, नक्षत्र गार्डन उभारण्यात आल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे.

घंटीबाबा हे दिग्रसनगरीचे ग्रामदैवत. ‘बाबा के बोल, अंधी दिग्रस’ हे त्यांचे बोल. त्यांचे मूळ नाव उदासीबाबा. ते उत्तराखंडच्या डेहराडूनजवळील कट्टवन्नू येथून दिग्रसला आले. ते गावातील पिंपळाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत. त्यांना पूजाअर्चा करताना घंटी वाजवण्याची सवय होती. त्यावरून त्यांना ‘घंटीवाले बाबा’ असे संबोधतात. बाबांकडे लोकांचे फारसे लक्ष जात नसे, म्हणून बाबा म्हणत, ‘बाबा के बोल, अंधी दिग्रस’. त्यांनी नजीकच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील तपोवन जलाशयाशेजारी काही वर्षे तपाश्चर्या केल्याची वदंताही आहे. त्यांनी दिग्रसकरांना अध्यात्माचा आणि सकारात्मक जीवनाचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते. घंटीबाबा 24 ऑक्टोबर 1945 रोजी दिग्रस येथे समाधीस्थ झाले. त्यांच्या समाधीस्थळी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. तेथे दरवर्षी दसरा ते दिवाळीदरम्यान मोठा उत्सव भरतो. त्यावेळी सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

ब्राह्मणपुरी भागात असलेले प्राचीन राम मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. त्या मंदिराची स्थापना सद्गुरू आबासाहेब महाराज यांनी सतराव्या शतकात केल्याचे सांगितले जाते. ते मंदिर पूर्वी गावाच्या बाहेर, गढीच्या पायथ्याशी आहे असे वाटे, पण ते काळाबरोबर शहराच्या मध्यभागी आले आहे. मंदिर दुमजली लाकडी नक्षीकामात उभारले आहे. मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीतेची देखणी मूर्ती पाहण्यासारखी आहे. रामनवमीनिमित्त दरवर्षी निघणारी शोभायात्रा डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. मंदिराची जागा रामभक्त कावेरी भट यांनी 1905 साली संस्थानला दान दिली. मंदिराचा जीर्णोद्धार 1961 मध्ये वामनराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. मंदिराच्या सभागृहात लोकमान्य टिळक, बापूजी अणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसंत गाडगेबाबा यांच्या सभा झाल्याचे सांगितले जाते.

दिग्रस शहराच्या मध्यभागातून धावंडा आणि मोर्णा नद्या वाहतात. त्यांच्या संगमावर पूर्वी घनदाट जंगल होते. त्या जंगलात हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. ब्रह्मानंद स्वामी महाराज तेथे तपश्चर्या करत असत. ते मंदिर मल्लिकार्जुन संस्थान म्हणून ओळखले जाते. त्याच मंदिरात ब्रह्मानंद स्वामींचेही मंदिर आहे. स्वामींच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त विविध उत्सवांचे आयोजन केले जाते. याशिवाय धावंडा नदीतीरावर गणेश, पाळेश्वर, शनी, मोठा मारूती अशी मंदिरे आहेत. त्यांपैकी पाळेश्वर हे ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिर आहे. त्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून महादेवाची पिंड पूर्वाभिमुख आहे. सामान्यतः शिवपिंड ही दक्षिणोत्तर असते. दिग्रसमधील जैन मंदिर, नगिना मशीददेखील अनेक वर्षे जुनी आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी हे दिग्रसपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथाचे मंदिर दिग्रसपासून सात किलोमीटर असलेल्या वाईगौळ येथे आहे.

यवतमाळ जिल्हा हा पांढरे सोने पिकवणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यातही दिग्रस ही कापसाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. एकट्या दिग्रस शहरात पूर्वी पंधरा सहकारी जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने होते. सहकारी प्रेसिंग मिल बंद पडल्या असल्या, तरी खासगी कंपन्या सुरू आहेत. गाव शेतीच्या बाबतीत समृद्ध आहे. प्रत्येकजण शेती करतो. सोयाबीन, कापूस, हरभरा उत्पादनात लाख (रायाजी) गाव जिल्ह्यात अग्रेसर आहे. गावातील पोस्ट ऑफिसमध्ये बचतठेव म्हणून गावकऱ्यांची तब्बल दोन कोटींहून अधिक गुंतवणूक आहे. याच गावातील रामकृष्ण तायडे यांच्या ‘दत्तोबा’ शेतात भव्यदिव्य व प्रसिद्ध असे दत्तमंदिर आहे. त्या गावाच्या मध्यभागी पूर्वी पाच भव्य गढ्या होत्या. त्या गढ्यांचे अवशेष पाहण्यास मिळतात. गावावर वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य नावाजण्यासारखे आहे. कार्तिक महिन्यात दररोज पहाटे गावातून दिंड्या निघतात. गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन काकडआरती केली जाते. गावाच्या पश्चिमेला ओढ्याच्या किनाऱ्यावर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे.

कापसाच्या व्यापारासाठी पारशी समाजातील उद्योजक दिनबाई चवना दिग्रसला आले होते. त्यांनी समाजाप्रती योगदान म्हणून 1914 मध्ये एक हजार रुपये देणगी देऊन दिनबाई शिक्षणसंस्थेचा पाया रचला. पुढे मोहिते, महिंद्रे-पाटील, मेहता, पाटील या सेवाव्रतींनी शिक्षणसंस्थेचा विस्तार केला. दिनबाई विद्यालयाला लागूनच खास मुलींसाठी मोहनाबाई विद्यालयाची स्थापना 1959 मध्ये झाली. त्या दोन्ही शाळा दर्जेदार शिक्षणासाठी विदर्भात प्रसिद्ध आहेत. दरम्यान, 1956 मध्ये गढीच्या मैदानात रि. फ. मेहता राष्ट्रीय शाळा सुरू झाली. ती शाळादेखील उत्तम शिक्षणासाठी ओळखली जाते. उच्च शिक्षणाची सोय म्हणून 1963 मध्ये बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य व बा.पा. विज्ञान महाविद्यालयाची स्थापना झाली. ते महाविद्यालय मारोतराव पाटील-महिंद्रे यांनी दान दिलेल्या जागेत उभारण्यात आले आहे. दिग्रसमध्ये सैनिक शाळा, फार्मसी, कृषी, बीएड, बीपीएड अशी अनेक महाविद्यालये आहेत.

अलिकडच्या काळात इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने दिग्रसमध्ये मॉनिटर क्लब या इंग्रजी शाळेची स्थापना 1968 मध्ये झाली. त्याशिवाय गुरुकुल, विद्यानिकेतन, विद्याभारती, ड्रिमलँड, कल्पतरू, ईश्वर देशमुख अशा इंग्रजी शाळांनी नावलौकिक मिळवला आहे.

दिग्रस शहर हे कबड्डीची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. दिग्रस परिसरात 1940 पासून दरवर्षी कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जातात. दिग्रसने बाबाराव बावणे, सुधाकरराव धुर्वे, प्यारेलाल पवार, लक्ष्मण पवार, रामू पवार, चंद्रशेखर पाटील आदी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दिले. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नातून 2003 व 2004 साली सलग दोन वर्षे दिग्रसमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दिग्रसचा बैलबाजार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. उत्तम दर्ज्याचे बैल तेथील बाजारात खात्रीशीर मिळतात. दर शनिवारी तो मोठा बैलबाजार दिग्रसला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भरतो.

संगीत क्षेत्रातही दिग्रस शहराचे खूप मोठे योगदान आहे. येथील बाबासाहेब देशपांडे, नामदेवराव क्षीरसागर, कोठेकर, कोल्हटकर, माहुरकर, मोरे, सरमुकादम, वैद्य या संगीत शिक्षकांनी संगीतक्षेत्रात नाव कमावले आहे. यशवंत देव, अजित कडकडे, सुरेश भट, बाबा महाराज सातारकर अशा अनेक नामवंत मंडळींचा त्यांना सहवास लाभला. दिग्रसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही अनेक सेनानी दिले. दत्तोपंत सदावर्ते, बालाजी नालमवार, श्रीधर सवणे हे स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढले. भारत-पाक युद्धात (1971) मनोहर उघडे यांनी बलिदान दिले होते.

दिग्रसमध्ये पूर्वीपासून सहकाराचे वारे वाहत होते. त्यातूनच तेथील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. दिग्रसने राज्याला अनेक राजकीय नेते दिले. नानाभाऊ एंबडवार, सुधाकरराव धुर्वे, उत्तमराव पाटील, शिवाजीराव मोघे, संजय देशमुख, संजय राठोड आदी नेते दिग्रसच्या मातीतून तयार झाले.

दिग्रसमध्ये ब वर्ग नगरपालिका असून त्यावर अनेक वर्षे महिंद्रे-पाटील घराण्याची सत्ता होती. सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषवण्याचा विक्रम महिंद्रे-पाटील घराण्याच्या नावावर आहे. त्याच घराण्यातील दादासाहेब महिंद्रे-पाटील, भाऊसाहेब महिंद्रे- पाटील हे 1957 ते 1967 दरम्यान दिग्रसचे आमदार होते. गोरगरिबांना हक्काचे घर बांधता यावे यासाठी मोतीराम महिंद्रे-पाटील यांनी जागा दिली. तो परिसर मोतीनगर म्हणून ओळखला जातो.

दिग्रसमधील गणेशोत्सव, दुर्गोत्सव नावाजलेला आहे. बाबासाहेब महिंद्रे-पाटील यांनी स्थापन केलेला गणपती हा ‘मानाचा गणपती’ म्हणून ओळखला जातो. लोककलेला प्रोत्साहन म्हणून नारायण पाटील-महिंद्रे यांनी 1943 मध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत फिरत्या लोकनृत्य-लोकगीतांचा उपक्रम सुरू केला. मिरवणुकीतील लावणीनृत्याचा कलाविष्कार पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होई. त्यावेळी ही मिरवणूक चोवीस तासांहून अधिक काळ चालायची. सध्या आवाजाबाबत मर्यादा आल्या असल्या, तरी विविध मंडळांकडून ती परंपरा जोपासली जाते.

दिग्रस शहरातून वाहणारी धावंडा आणि वाशीम जिल्ह्यातून वाहत आलेली अरुणावती या नद्यांच्या संगमावर चिरकुटा येथे धरण 1994 मध्ये बांधण्यात आले आहे. त्या धरणाची उंची शहाण्णव फूट, तर लांबी सोळा हजार नऊशेएकसष्ट फूट आहे. धरणाला अकरा दरवाजे आहेत. सहा टीएमसी क्षमता आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या माध्यमातून दिग्रस, आर्णी, घाटंजी तालुक्यांत सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. दिग्रसपासून अवघ्या बारा किलोमीटर असलेला तो परिसर हिरवाईने नटलेला आहे. त्या धरणातून दिग्रस-दारव्हासह वाशिम शहराला पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय दिग्रसच्या पश्चिमेला नऊ किलोमीटरवर नांदगव्हाण धरण आहे. अरुणावती धरण होण्यापूर्वी त्या धरणावरून दिग्रसला पाणीपुरवठा होत असे. त्या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पंपाशिवाय गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने धरणाचे पाणी सायफन पद्धतीने दिग्रसपर्यंत पोचत असे. ते धरण 2005 मध्ये फुटल्याने दिग्रस शहरात हाहाकार उडाला होता. चौदा जणांचा मृत्यू झाला होता. ते धरण पुन्हा नव्याने बांधण्यात आले आहे.

दिग्रस तालुक्यात जवळपास ऐंशी गावे असून त्यापैकी हरसूल, तुपटाकळी, सिंगद, कलगाव, लाख (रायाजी), कळसा, चिंचोली, तिवरी आदी गावे आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत. दिग्रसपासून आठ किलोमीटरवरील तुपटाकळी गावात तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचे राममंदिर आहे. मंदिराचे सागवानाचे लाकडी बांधकाम आणि त्यावरील नक्षीकाम सुस्थितीत आहे. रामजी पाटील यांनी बांधलेल्या त्या मंदिरातील रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथे रामनवमीला तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्यासह बाबा महाराज सातारकर, रामचंद्रबुवा वरोलीकर, वामनमहाराज, ढोकमहाराज येऊन गेल्याचे सांगितले जाते. रामनवमीला पूर्वी नऊ दिवस शोभेची दारू उडवली जाई. ती पाहण्यासाठी नजीकच्या गावातील हजारो लोक येत. स्वातंत्र्यानंतर गावात गांधी स्मारक बांधण्यात आले आहे. शिक्षणाच्या सुविधेमुळे गावातील अनेकजण सरकारी सेवेत लागले आहेत. स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब इंगोले, ज्येष्ठ धावपटू साहेबराव विठ्ठलराव निकम यांनी तुपटाकळीचा नावलौकिक वाढवला आहे.

लेखासाठी मार्गदर्शन –
रूपा चोपडे 7507110611, माजी अध्यक्ष तेली महिला मंडळ
ऋषिराज तायडे 9404141216, वरिष्ठ उपसंपादक, सकाळ, मुंबई.     

– ऋजुता तायडे 9404137398 rujutatayde91503@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here