धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail under the pressure of marketing forces)

4
1840

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती. धरणगाव हे गाव एरंडोलपासून दहा किलोमीटर अंतरावर तर जळगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. अमळनेर, पारोळा, चोपडा ही गावे त्या टापूत येतात.

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला त्यावेळी ते धरणगाव येथे दहा तास मुक्कामी होते. इंग्रजांची वखार तेथे होती आणि ब्रिटिश काळात धरणगाव हे खानदेशातील महत्त्वाचे शहर होते असा इतिहास आहे.

धरणगावची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावात गल्ल्या जातींप्रमाणे आहेत; आणि तसेच, गावांतील वाडेही ! गावात गल्ल्या ह्या अतिशय छोट्या आहेत. कित्येक गल्ल्या तर अशा आहेत, की तेथून कोणतेही वाहन नेता येणार नाही, तेथे पायीच जावे लागेल. दोन वाहने विरूद्ध दिशांनी आली तर ती एकमेकांना ओलांडू शकत नाहीत. वाहन सहज मागे घेता येणाऱ्याने समोरच्याला रस्ता खूप प्रयत्नांनी, मोकळा करून द्यावा लागतो. गल्ल्याही सरळ नाहीत; त्या वेड्यावाकड्या आणि वळणावळणाच्या आहेत. काही गल्ल्यांत बऱ्याच अंतरापर्यंत आत गेल्यावर अचानक आडवी घरे लागतात आणि पुढे गल्ली बंद होते! काही ठिकाणी त्या आडव्या लागलेल्या घरांच्या एका कोपऱ्यातून एक माणूस सहज निघू शकेल अशी चोरवाट पलीकडच्या गल्लीत जाण्यासाठी असते. काही लोकांचे म्हणणे असे, की गाव जुने आणि समृद्ध असल्यामुळे, तेथे बाहेरून शत्रूचे आक्रमण होऊ नये किंवा किंवा चोर-दरोडेखोरांना गावात लुटालूट सहज करता येऊ नये; तसेच, त्यांना कोंडीत पकडता यावे याकरता तेथील गल्ल्यांची रचना अशी करण्यात आली आहे.

धरणगाव ही एके काळी व्यापारी पेठ असावी. भाटिया, जैन आणि गुजराथी या गल्ल्यांतील काही जुनी तगडी घरे मन आकर्षित करून घेतात. गल्ल्यांतील घरे ही उंच दगडी जोत्यांची; तसेच, घरात आणि ओसरीवर बसवलेली जाड अशी शहाबादी फरशी. भक्कम असे जाड चौकोनी किंवा गोल खांब- ते ज्यावर उभे केले आहेत त्या नक्षीदार दगडी कुंबी, भक्कम आणि जाड असे सारे आकर्षक कडे, त्यावर पटई… अशी सागवानी लाकडाची घरे मन आकर्षून घेतात. दोन खांबांमधील अंतर हे सहा किंवा साडेसहा फूट. धरणगावमध्ये लाकडाच्या वखारी बऱ्याच आहेत. सातपुडा पर्वत जवळ असल्यामुळे लाकूड सहज उपलब्ध होत असावे.

धरणगाव हे गाव जुने असले तरी तेथे पारोळ्यासारखी गावाभोवती संरक्षक भिंत नाही. नाही म्हणावे तर किरण थिएटरकडे एक छोटासा बुरूज दिसतो. इंग्रजांची तेथे वखार होती. ती पडक्या अवस्थेत आता आतापर्यंत होती. महात्मा फुले हायस्कूलची जुनी इमारत हे चक्क एक गोडाऊन आहे. इमारतीच्या मागे बरीच मोठी, मैदानासारखी जागा आणि काही अवशेष आहेत. पूर्वी तेथे शेंगतेलाचा की कसलासा कारखाना होता.

गावात माळी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचे मोठा माळीवाडा आणि लहान माळीवाडा असे दोन भाग होते. इतर गल्ल्यांमध्ये धनगर, भाटिया, जैन, वाणी, बडगुजर, गुरव, मराठा, लोहार, गुजराथी, कासार, खत्री अशा गल्ल्या आहेत: तर, तेली लोकांची तेलाठी, ब्राह्मणांची वस्ती असलेली भावे व अग्निहोत्री आणि गौतमनगर व मुस्लिम वस्ती असलेली भडंगपुरा, कसाईवाडा, पाताळनगरी, बेलदारगल्ली… अशा जातवार वस्त्या आहेत. तसेच, पिलू मशिदीजवळचा काही भाग हा मुस्लिम वस्तीचा आहे. तेथे उर्दू प्राथमिक शाळा व उर्दू हायस्कूल आहे. गावात दोन मुस्लिम नगराध्यक्ष होऊन गेले आहेत- किकाभाई बोहरी आणि अलिकडच्या काळात शिवसेनेचे सलीम पटेल. नगरपालिकेत पाच-सहा मुस्लिम नगरसेवक निवडून येतात. गावात पाच मशिदी आहेत. अर्थात नंतरच्या काळात त्या गल्ल्यांमध्ये, इतरही लोक, विशेषत: बाहेरून नोकरीनिमित्त व शिक्षणासाठी आलेले लोक राहत आहेत. त्यामुळे समाज संमिश्र होऊन गेला आहे. शिवाय, गाव आता गावाबाहेर वसले आहे. तेथे सर्व जातिधर्मांचे, ऐपत असलेले लोक प्लॉट पाडून राहत आहेत. गरीब लोकांनी रस्त्याचा कोटा किंवा रिकाम्या सरकारी जागा यांवर मिळेल तेथे हक्काचा आसरा निर्माण केला आहे. सायकलींची जागा मोटारसायकलींनी घेतली आहे.

धरणगावात काही जातींच्या जातपंचायतीही आहेत. जातपंचायती समाजातील वादविवाद, भानगडी, सामाजिक कार्ये वगैरे गोष्टी करतात. त्यांची अधिकृत नोंद असून त्यांचे सरकारी ऑडिटही होते. चांगल्या हेतूने स्थापन झालेल्या या जातपंचायतींमध्ये काही काळाने वाईट प्रवृत्ती बळावल्या आणि पुढे पंचायतीतील शिक्षांचे सामाजिक बहिष्कारात रूपांतर झाले. जातपंचायतीचा निर्णय हा बंधनकारक करण्यात आला. तो निर्णय न मानणाऱ्याला जातिबहिष्कृत करण्यात येऊ लागले, त्यांच्यावर दंड ठोठावण्यात येऊन त्या दंडाच्या रकमेतून जातपंचायतीची कार्यालये उभी राहिली. त्या कार्यालयांना ‘मढी’ असे संबोधण्यात येई. ‘इस्तो पाणी बंद’ म्हणजे त्या कुटुंबाशी कोणीही संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येई. त्यामुळे जातपंचायतीच्या निर्णयाविरूद्ध कोणी ब्र काढेना. पोलिस स्टेशनला जाता येईना. पण काही बंडखोर समाजसुधारकांनी त्याविरूद्ध बंड पुकारले. जातपंचायतीच्या अधिकाराला त्यामुळे पायबंद बसला. जातपंचायतीमुळे गाव व जात बदनाम होते हे ओळखून काहींनी जातपंचायतीच्या दुष्ट रुढी परंपरांना, ठराव करून कायमचा पायबंद घातला. सामुदायिक विवाहासारखी समाजसुधारणेची नवीन परंपरा सुरू केली. काही जातींनी मुलींची घटती संख्या पाहून आंतरजातीय विवाहाला जातपंचायतीद्वारे प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. गाव काळाप्रमाणे कर्मठपणाकडून सुधारणावादाकडे प्रगती करू लागला आहे.

धरणगाव पेन्शनर लोकांचे म्हणून ओळखले जाते. बाहेरून कमावून आणावे आणि उर्वरित आयुष्य तेथे घालवावे ! धान्य, भाजीपाला, दूध वगैरे जीवनावश्यक वस्तू माफक दरात तर डॉक्टरांची सेवा घरपोच मिळू शकते.

धरणगावचा पाणीपुरवठा हा धरणगावापासून जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरी या गावाजवळून वाहणाऱ्या अंजनी नदीतून केला जात असे. पण तो अपुरा पडू लागल्यामुळे, पुढे, तापी नदीवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पण पाणी समस्या ही धरणगावकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. पावसाळ्यात पाणी गढूळ येते तर इतर वेळीही ते नियमित येईल याची शाश्वती नसते. ‘पाणी जपून वापरा’ असे धरणगावकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. पाण्याचे महत्त्व धरणगावकऱ्यांना जेवढे कळते तेवढे इतरांना क्वचितच कळत असेल ! धरणगावच्या चौकाचौकात वार्ताफलकांवर नेहमीची आणि महत्त्वाची बातमी कोणती असेल तर ती म्हणजे धरणगावच्या पाणी पुरवठ्याची. तांत्रिक बिघाडामुळे इतके दिवस पाणी पुरवठा बंद राहील अशी बातमी धरणगावात पसरली की लोक हंडेगुंडे-डबडे, प्लॅस्टिकचे कॅन घेऊन, लहानथोरपणा विसरून गावाबाहेरच्या सार्वजनिक विहिरींवर किंवा गावातील काही आडांवर गर्दी करत. ज्यांच्याकडे बैलगाड्या आहेत असे शेतकरी लोक बैलगाड्या जुंपून शेतातील विहिरींवरून पाणी भरत. त्यांची जागा बरीचशी गावातील हापश्यांनी (हातपंप) घेतली आहे. नवीन कॉलनींमध्ये जवळजवळ प्रत्येकाने बोअर मारून पाण्याची सोय केली आहे. बोअर तीनशे ते पाचशे फूट खोल आहेत.

गढूळ पाण्याच्या समस्येने शाळेतील मुले शाळेत येत नसत किंवा आली तर मध्येच उठून पळत. आता मात्र, जिथून पाणीपुरवठा होतो तेथे फिल्टर बसवलेले आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे. पाणी साठवण्यासाठी लोक सोनवदहून गुरूवारच्या बाजारात येणारे मोठमोठे माठ, रांजण यांचा वापर करत. पुढे प्लॅस्टिक डबे, टाक्या; तसेच, पत्र्याचे डबे, टाक्या वापरत. कारण सर्वांच्या घरी हौद नसायचे.

धरणगावचा अस्सल धार्मिक सोहळा म्हणजे वहनोत्सव व रथोत्सव. वहन हे साधारण चित्ररथासारखे असते. त्या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून होऊन समाप्ती कोजागिरी पौर्णिमेला होते. दररोज नवीन देवतेचे वहन ! त्यासाठी काही दिवस अगोदर वहनाला जुंपल्या जाणाऱ्या बैलजोडीचा लिलाव बालाजी मंदिरात लाऊडस्पीकर लावून केला जातो. लिलाव ऐकण्यास गर्दी जमते. श्रद्धाळू भाविक बोली लावतात. सर्वात जास्त बोली मारूतीच्या वहनाला लागते. त्यासाठी खूप चढाओढ असते. प्रत्येक वहनाचा मार्ग ठरलेला असतो. त्या मार्गाची साफसफाई संध्याकाळी तीन-चार वाजल्यापासून होते. रात्रभर चालते. वहन ज्या रस्त्यावरून जाणार त्या गल्लीतील बायका-माणसे रात्रीच्या वेळी त्यांच्या झोपलेल्या मुलांनासुद्धा जागे करून वहनाला नमस्कार करण्यास लावतात. वहन खरेदी करणाऱ्या श्रद्धाळूला वहनाच्या वाजंत्रीचा; तसेच, वहनापुढे नाचणाऱ्या लेझीम पथकांच्या बक्षिसाचा खर्च करावा लागतो. वहनाच्या पुढे नाचणाऱ्या लेझीम पथकात वेगवेगळ्या समाजांचे चमू असतात. मुलांमध्ये पथकात नाचण्यासाठी ईर्षा असते. गुलाल वारेमाप उधळला जातो. ती मुले शेवटच्या रांगेत नाचणे शिकून दरवर्षी एकेका रांगेची बढती होत पुढे पहिल्या-दुसऱ्या रांगेत नाचण्यासाठी तयार होतात ! मारुतीचे वहन संध्याकाळी चार वाजल्यापासून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत परत बालाजी मंदिरात येते. दरम्यान, एकादशीला रथ बालाजी मंदिरापासून कोटापर्यंत दोऱ्याने ओढत दिमाखात निघतो. भाविक रथाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या पाचपंचवीस खेड्यापाड्यांतून आलेले असतात.

दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावच्या बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. जवळपास तीन कोटी रुपये खर्चाचे ते भव्यदिव्य मंदिर धरणगावला एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवणार आहे असे मानले जाते. धरणगावला त्या मंदिरामुळे तीर्थक्षेत्र- पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मंदिर सोनपाषाण दगडात बांधले जात असून त्यासाठी गुजरातमधील कच्छ येथून दगड मागवण्यात आला आहे. त्या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाच हजार वर्षे टिकतो. त्याच्यावर ऊन, वारा, पाऊस याचा काही परिणाम होत नाही. उलट, अशा नैसर्गिक वातावरणात त्याची चकाकी वाढते. त्या कामासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन कोटी एक्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. धरणगावातील डॉक्टर कै.टी.डी. कुडे यांच्या परिवाराने गर्भशिखराचा खर्च म्हणून अकरा लाख अकरा हजार एकशेअकरा रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

धरणगावचा दुसरा मोठा उत्सव म्हणजे श्रावण महिन्यात भरणारी मरीआईची यात्रा. ती यात्रा दर मंगळवारी भरते. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्त्या आणि शेवटच्या मंगळवारचा तमाशा. धरणगावच्या आजूबाजूच्या तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून नामांकित मल्ल तेथे हजेरी लावतात. त्यात हिंदकेसरी पैलवान तसेच दिल्लीचे पैलवानही येतात. इनामाची रक्कम लाख-दोन लाखांपर्यंत जाते. भादू पैलवान, वना पैलवान, पुना पैलवान, भगवान पैलवान अशी नावे गावात एकेकाळी प्रचलित होती. नवोदितांमध्ये पुढे नावारूपाला येत असलेले भानुदास, संजय, रमेश, महेश महाजन हे पैलवान लोक होत. गावातील महात्मा फुले हायस्कूलचा एक विद्यार्थी सावंतवाडी येथे झालेल्या माध्यमिक शालेय राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेत उपविजेता ठरला होता. तर मुलींमध्ये रूपाली रमेश महाजन व रेणुका रामकृष्ण महाजन या कुस्ती राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या आहेत.

चिंतामण मोरया गणपती मंदिर हे धरणगावकरांचे श्रद्धास्थान होय. ते मंदिर गाव आणि रेल्वे स्टेशन यांच्यामध्ये शेतात आहे. ते शेत खाजगी आहे. शेतमालकाचे नाव आर.जे. गुजराथी असे आहे. ते पी.आर. हायस्कूलमध्ये शिक्षक होते. चिंतामण मोरया या मंदिराचा जीर्णोद्धार हा गुजराथीसरांच्या पूर्वजांनी 1886 मध्ये केला. ते वर्ष मंदिरावर कोरलेले आहे. तेथे दर संकष्ट चतुर्थीला भाविकांची सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत गर्दी असते, ते गावातील फिरण्यास जाणाऱ्या लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण झाले आहे. नव्या जमान्यात मंदिराच्या आसपासच्या शेतांमध्ये प्लॉट पाडून घरे बांधली गेल्यामुळे मंदिर त्या घरांच्या गराड्यात गायब झाले आहे, पण गर्दी कायम असते !

तीनशेपन्नास वर्षांपूर्वीचे जुने सांडेश्वर महादेव मंदिर नगरपालिका हद्दीतील शेतजमीन गट नंबर 1042 मध्ये अस्तित्वात आहे. त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते झाला होता. हरिद्वार, वाराणसी, प्रयाग या ठिकाणचे साधुसंत त्या ठिकाणी भेट देण्यासाठी, पूजाअर्चा करण्यासाठी येतात. श्रावण महिन्यात त्या ठिकाणी भक्तांची रेलचेल असते. मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य भंडाऱ्याचे आयोजन असते. गोसावी लोकांचे गोमेश्वरी देवीचे मंदिरही फार जुने आहे.

धरणगावात माळी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे सावता माळी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी होते. त्यासाठी माळीवाड्यात जेवणासाठी गावपंगतीची योजना असते. दानशूर लोक; तसेच, सर्वांना परवडेल असा दर प्रतिव्यक्ती ठेवून निधी जमवला जातो. जवळपास पंधरा हजार लोकांचा स्वयंपाक केला जातो. जेवणाचा मेनू साधा पण चवदार असतो- वरण-भात, वांग्याची किंवा देवडांगरची (गंगाफळ) घोटलेली भाजी. त्यावर भरपूर तुपाची धार ! त्या पंगतीत जेवढे तूप वाढले जाते तेवढे तूप अन्यत्र सहसा कोठे पाहण्यासदेखील मिळणार नाही. समाजाचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येकजण घरचे कार्य असल्यासारखा, स्वतःहून राबत असतो. सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध असतात, गावच्या दारुड्यांची त्या एका दिवशी गैरसोय होते. कोणी दारू पिऊन धिंगाणा करण्याची हिंमत करत नाही. तशा लोकांची धुलाई करण्यास एक धुलाई पथक तयार असते ! सोहळा माळी समाजाचा असला तरी माळीवाड्यातील इतर समाजही त्यात भाग घेतात. गावातील समाजाला; तसेच, इतरांना ‘आग्रहाचे निमंत्रण’ पाठवले जाते. भजन-कीर्तनाचा मोठा कार्यक्रम असतो, माळीवाड्यात काही प्रसिद्ध बुवा होते व आहेत. वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे.

अक्षय्य तृतीयेच्या वेळेस तेथे रामलीला उत्सवही साजरा होतो. तो उत्सव रात्री साधारणतः दहा वाजता सुरुवात होऊन पहाटे चार वाजेपर्यंत चालतो.

धरणगाव सांस्कृतिक दृष्ट्या जागृत आहे. मुख्य सभा साने पटांगण (कोटबाजार) येथे भरतात. असे म्हणतात, की त्या ठिकाणी साने गुरुजींची सभा होणार होती, परंतु ते पोचू शकले नाहीत; त्यांचे निधन झाल्याची बातमी आली. त्यावरून त्या जागेचे नाव साने पटांगण असे पडले. त्या पटांगणावर एका कोपऱ्यात भाजी बाजार भरत असे. रोज संध्याकाळी शेतातून थेट येणारे शेतकरी त्यांचा भाजीपाला तेथे विक्रीला आणत. त्या पटांगणावर विविध प्रकारची लहानसहान दुकानेही होती. गुरूवारी धान्य बाजार भरत असे. गावातील; तसेच, खेड्यापाड्यातील बहुतेक शेतकरी त्यांचा माल आणत. त्यात ज्वारी, गहू, दादर आणि अनेक प्रकारच्या डाळी तेथे मिळत. तो बाजार दुपारनंतर तेथून गावाबाहेर बाजारपट्ट्यात जाई. गाव एखाद्या कुटुंबासारखे असल्याने लोक रोज सकाळ-संध्याकाळ तेथे या ना त्या निमित्ताने जमत. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत. पटांगणाचे ते सार्वजनिक महात्म्य गाव विस्तारले तसे राहिलेले नाही.

दादर नावाची धरणगावची ज्वारी प्रसिद्ध आहे. ती हिवाळ्यात निव्वळ थंडीवर येते. ते पीक रब्बीतच घेतले जाते. ते पीक तापी नदीच्या किनाऱ्यावरील गाळयुक्त सुपीक जमिनीत घेतले जाते. पावसाळ्यात मूग, उडीद, तीळ अशी, लवकर येणारी पिके घेऊन त्यावर जमिनीत ओल असेपर्यंत ज्वारीची पेरणी केली जाते. पीक उगवेपर्यंत जमिनीत ओल असावी लागते. एकदा दादरचे पीक उगवून वर आले, की ते पुढे हिवाळ्यात निव्वळ थंडीवर फुलते. त्याची भाकर खाण्यास गुळचट आणि चवदार असते. दादरचा भाव साध्या ज्वारीपेक्षा अधिक असतो. तो चांगल्या प्रतीच्या गव्हापेक्षाही जास्त असतो. ज्वारीचे प्रकार शाळू, मालदांडी (सोलापूरची) हेही आहेत.

गावाजवळून पाट वाहत असल्याने बागायती पिके काही प्रमाणात आहेत. त्यात सर्वात जास्त वाटा हा भाजीपाल्याचा. भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त घेतले जाणारे पीक म्हणजे भेंडी. भेंडी ही मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जाते. धरणगावची कोवळी लुसलुशीत भेंडी मोठमोठ्या टोपल्या-करंड्यांमधून उत्तर भारतात, दिल्ली, पंजाबपर्यंत रेल्वेने निर्यात होते. धरणगावात मिरची बाजार आणि आंब्याच्या दिवसांत कच्च्या कैऱ्यांचा बाजार जोमात भरत असतो. तेथे मिरची किंवा कैरी घेण्यासाठी भुसावळ, जळगाव; तसेच, अंमळनेरकडून गरजू लोक बाजाराला येतात. मार्केट कमिटीमध्ये बकरी बाजार व बैलबाजार भरतो.

धरणगावचे वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. भरीत बनवावे ते लेवा-पाटीदार लोकांनीच. ते चवदार भरीत बनवण्यात तरबेज आहेत. इतर लोकांच्या आहारातही हिवाळ्यात वांग्याचे भरीत असते. हिवाळ्यात भरीत पार्ट्याही होत असतात. धरणगावच्या लालजींचा पेढाही प्रसिद्ध आहे.

धरणगावात शेतीशिवाय दुसरा म्हणावा असा मोठा उद्योगधंदा नाही. बहुतेक अल्पशिक्षित तरुण तीस-बत्तीस किलोमीटरवर असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी अल्प वेतनावर गुजराण करतात. काही नोकरवर्ग धरणगावाहून रेल्वेने ये-जा करतो. सुरत-भुसावळ ही पॅसेंजर गाडी सकाळी सात वाजता धरणगावी येते आणि रात्री आठ-साडेआठला गाडी उलट धरणगावी येते. त्यावरून ये-जा करणाऱ्यांची दमछाक किती होत असेल ते लक्षात येते. शेतकरी, शेतमजूर आणि नोकरवर्ग; तसेच, भाजीपाल्याशी संबंधित व्यवसाय तेथे आहेत. भाजीपाल्याच्या गाड्या रोज रात्री भायखळा, नवी मुंबई येथे तर सकाळी जळगाव येथे जातात. धरणगाव शहर आणि तालुका येथे कपाशीच्या पिकाचा वाटा हा जास्त आहे. तेथे कापसाच्या सोळा-सतरा जिनिंग प्रेस सुरू झाल्या आहेत. धरणगाव ह्या शहराची ओळखच ‘कापसाचे केंद्र’ म्हणून उदयास आली आहे. एका जिनिंग प्रेसमध्ये साधारणतः तीनशे मजूर काम करतात. त्यामुळे तेथे चार-पाच हजार मजूर काम करत आहेत. जिनिंग प्रेसला आणखी पूरक उद्योग सुरू असल्याने सात-आठ हजार लोकांना रोजगार गावात उपलब्ध झाला आहे.

धरणगावात तीन माध्यमिक शाळा असून दोन मराठी माध्यमाच्या व तिसरी उर्दू माध्यमाची आहे. परशुराम रायचंद (पी आर) हे जुने हायस्कूल होते. त्याची स्थापना 1880 च्या आसपास झाली. हायस्कूलमध्ये गावांतील मुले येत होती, तर महात्मा फुले हायस्कूलमध्ये सर्वसामान्य गरीब घरांतील खेड्यापाड्यांतील मुले जास्त होती. पुढे, आणखी दोन हायस्कूल झाली- बालकवी ठोंबरे विद्यालय आणि इंदिरा कन्या शाळा. तसेच, आनोरे, पष्टाणे, साकरे वगैरे खेड्यांमध्ये हायस्कूल झाल्यामुळे गावातील जुन्या असलेल्या पी आर व महात्मा फुले हायस्कूल यांना विद्यार्थ्यांची कमतरता भासू लागली आहे. नवीन उदयास आलेल्या शाळा पुढे निघून गेल्या आहेत. महाविद्यालय 1971 पासून सुरू झाले. ते पी आर हायस्कूल सोसायटीने चालवलेले आहे. ते कॉलेज जळगाव रोडवर रेल्वे स्टेशनजवळ मोकळ्या जागेत बांधले गेले आहे. पूर्वी, ते पी आर हायस्कूलच्या इमारतीत भरायचे. तेथे आर्ट्स व कॉमर्स फॅकल्टीज आणि सायन्सचे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत वर्ग आहेत. त्या कॉलेजमुळे आजूबाजूच्या पंचवीस-तीस गावांतील विद्यार्थ्यांसह धरणगावच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय झाली आहे.

गावात ख्रिस्ती लोकांची वस्ती नाही, पण मुलींची एक मिशनरी शाळा होती. ती शाळा निवासी होती. नवापूर, नंदुरबार, साक्री; तसेच, मुंबईच्या काही आदिवासी गरीब मुली तेथील बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत. त्यांच्यासाठी तेथे एक चर्चही असावे. चौथीनंतर त्या मुली महात्मा फुले हायस्कूलमध्ये येत. त्यांचा लौकिक वक्तशीर आणि शिस्तबद्ध असा होता. त्यांच्या बोर्डिंगमधून शाळेत येताना मध्ये रेल्वे ट्रॅक लागत असे. ती शाळा वजा बोर्डिंग व्यवस्था बंद पडली आहे. बाहेरून येणाऱ्या मुली बंद झाल्या आहेत. त्या जागेवर इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाले आहे.

योगराजसिंह परिहार हे गृहस्थ धरणगावचे नगराध्यक्ष सत्तावीस-अठ्ठावीस वर्षे (1948 ते 1970 आणि 1975 ते 1981) होते. बाळूशेट भाटिया हे किराणा दुकानदार होते. ते सर्वांशी प्रेमाने वागणारे होते. त्यांना अजातशत्रू म्हणत. त्या सज्जन माणसाचा अंत अपघातात झाला, त्यांच्या नावे साकरे येथे हायस्कूल आहे. तेथील वैद्य- भावे दीर्घायुषी होते. त्यांची सेवा दीर्घकाळ स्मरणात राहील अशी होती.

गावाच्या एकाच घरातील तीन व्यक्ती आयएएस अधिकारी होत्या. मुलगा, मुलगी, सून अशा त्या तीन व्यक्ती. राज्य सरकारमध्ये मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या अधिकारी लीना मेहेंदळे या त्यांपैकी एक होत.

धरणगावात नाट्यगृह नाही. बाहेरून नाटके येत नाहीत. कॉलेजच्या गॅदरिंगची नाटके ही कुमार थिएटर किंवा कॉलेजमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या स्टेजवर होतात. धरणगावला कुमार व किरण ही दोन सिनेमा थिएटर्स होती. कुमार थिएटरमध्ये गाजलेले जुने चित्रपट लागत तर किरण थिएटरमध्ये मारधाडीचे चित्रपट बहुतकरून असत. त्यांची जाहिरात बैलांच्या लोटगाडीला लावलेले पोस्टर व पुढे डफ वाजवणारा मुलगा अशी होत असे; मधून मधून माईकवरून मुलगा तोंडाने ‘बहुत मारपीटसे भरा हुआ सिनेमा’ असे ओरडत असे. बाकी धरणगवामध्ये वर्षभर या ना त्या गल्लीत सप्ताह – त्यानिमित्त कीर्तनांची मेजवानी असते. खुद्द धरणगावामध्येही तीनचार कीर्तनकार होते. तमाशा शौकिनांसाठी वर्षातून तीनचार वेळेस प्रसिद्ध तमासगीर हजेरी लावत. अधूनमधून छोट्या सर्कशीही पाहण्यास मिळत.

ह.भ.प.कै. सुपडूबुवा महाराज हे धरणगावजवळच्या आनोरे या गावचे. पण त्यांचे कार्यक्षेत्र आणि घरही धरणगाव हे होय. सुपडूबुवा हे वारकरी संप्रदायातील मोठे नाव. ते आयुष्याची शेवटची काही वर्षे पंढरपूर येथे राहत होते. त्यांचे निधन तेथेच झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात प्रेते जाळण्यास बंदी असताना त्यांचा अंत्यविधी त्यांच्या भक्तांनी, विशेष परवानगीने, चंद्रभागेच्या वाळवंटात केला होता. त्यांनी धरणगाव येथे विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली होती; सोसायटीची इमारत त्यांच्याच काळातील आहे. त्यांचा पणतू पुन्हा वारकरी संप्रदायात आला आहे. त्याचे नाव डोंबिवली, कल्याण परिसरात आहे. धरणगावचे दुसरे कीर्तनकार कै. ह.भ.प. आत्मारामबुवा महाराज हे होत. माजी आमदार कै. हरिभाऊ महाजन यांचे ते वडील. त्यांनी ह.भ.प. धुंडा महाराज यांचे कीर्तन स्वखर्चाने धरणगावी ठेवले होते. त्या कीर्तनाला लांबून लांबून लोक आले होते. त्यांचे समकालीन मित्र म्हणजे सुकलालबुवा, कृष्णाबुवा, आत्मारामबुवा बडगुजर हे. महामंडलेश्वर भगवानबुवा महाराज यांनी वारकरी शाळा निवासी पद्धतीने चालवली आहे. सी.एस. पाटील हे धरणगाव महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. ते चतुर्भुज महाराज म्हणून कीर्तन करतात. तसेच, हिरामणबुवा महाराज भागवत कथाकथन करतात. त्यांनीही वारकरी शाळा चालवली आहे. नाना महाराज, आर.डी महाजनसर हे इंग्रजीचे शिक्षक म्हणून बालकवी ठोंबरे शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते रमेशबुवा महाराज म्हणून कीर्तन करतात. तसेच पी आर हायस्कूलमधून निवृत्त झालेले म्हस्के सर हेही कीर्तनकार होते. ते निवृत्तीनंतर त्यांच्या गावी नगर जिल्ह्यात निघून गेले. धरणगाव एरंडोल तालुका असताना एरंडोल पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील हेही उत्तम कीर्तनकार होते.

धरणगावला कवींची परंपरा मोठी आहे. प्रसिद्ध निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म धरणगावचा. त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली. गो.गं. वाजपेयी हे धरणगावचेच. कवी उत्तम कोळगावकर यांच्या नोकरीची सुरुवात धरणगावच्या महात्मा फुले हायस्कूल येथे झाली. पुढे ते जळगाव आकाशवाणी येथे कार्यक्रम अधिकारी आणि नंतर सोलापूर येथे आकाशवाणी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. ते नाशिक आकाशवाणी केंद्रप्रमुख म्हणून निवृत्त झाले. पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे हे सुद्धा कवी आणि लेखक आहेत.

प्रकाश किनगावकर

महावितरणमधून इंजिनीयर म्हणून निवृत्त झालेले कवी प्रकाश किनगावकर हे सुद्धा बरीच वर्षे धरणगाव येथे वास्तव्यास होते. प्रकाश किनगावकर यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची कविता दहावीच्या वर्गाला पाठ्यपुस्तकात होती. कवी बी.एन. चौधरी हे धरणगावचेच. तेही पी आर हायस्कूलमध्ये शिक्षक होते. कवी प्राध्यापक वा.ना. आंधळे हे धरणगाव महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते.

नगरपालिकेचे वाचनालय छोटे आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी विक्रम ग्रंथालय नावाने नवे वाचनालय सुरू केले. विक्रम जोशी नावाचा ‘आरएसएस’चा कार्यकर्ता मुलगा आणीबाणीच्या काळात जळगावहून धरणगावी येत असताना, रस्त्यात अपघात होऊन वारला. त्याच्या मित्रांनी आणि स्वयंसेवकांनी त्याच्या नावाने विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाची स्थापना 1990 मध्ये केली. संस्थापक कार्यकर्त्यांमध्ये कै. सुदेश काशिनाथ चौधरी, महेश नामदेव अहिराव आणि सुरेश ध्रुवसिंग वयस यांचा समावेश होता. पुढे, त्याच स्वयंसेवकांनी जागा घेऊन गावात एक भव्य वाचनालय सुरू केले आहे. त्या वाचनालयात वाचकांसाठी बसण्यास ऐसपैस जागा आणि वाचण्यासाठी पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विक्रम ग्रंथालयात ‘गुणवान विद्यार्थी सत्कार’ वगैरे कार्यक्रम होत असतात. नामवंत वक्त्यांची भाषणे होतात. बाबासाहेब पुरंदरे, रमेश पतंगे, भिकूजी इदाते, अशोक मोडक, अरुण करमरकर अशा संघ विचाराच्या मातब्बर लोकांची व्याख्याने तेथे झाली आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असून सत्तर विद्यार्थी तिचा लाभ घेतात. ग्रंथालयाचे अध्यक्ष प्राध्यापक आर.एन. महाजन हे असून, सचिव महेश अहिराव हे आहेत तर ग्रंथपाल म्हणून भगवान कुंभार काम पाहतात. त्या वाचनालयाला खासदार निधीतून पंचवीस लाख रुपयांची देणगी मिळाल्याने ग्रंथालय आणि वाचनालय यांची भव्य इमारत उभी करता आली. या ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांचे उद्घाटन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते झाले.

धरणगावची मुख्य बोलीभाषा ही अहिराणी असली तरी जातींप्रमाणे इतरही बोलीभाषा आहेत. त्यात भाटिया, गुजराथी, गुजरी, मारवाडी, पारधी, मोची वगैरे लोक आपसात त्यांची भाषा बोलतात. ती इतरांनाही थोडीफार समजते. पण ते इतरांशी बोलताना मराठीतच बोलतात. लेवा-पाटीदार लोकांची बोलीभाषा ही काही शब्द आणि उच्चारण यांनी वेगळी वाटते. पण ती बोलीभाषा अहिराणी मराठी जाणणाऱ्यांना सहज समजते. मुसलमान लोक मात्र मुसलमानी आणि मराठी-अहिराणी अशा दोन्ही भाषा बोलतात.

पर्यावरणवादी तरुणांनी ‘जलदूत फाऊंडेशन’ ही संघटना स्थापन करून त्यामार्फत काही विधायक कामे केली आहेत. त्यात गावातील तेली तलाव, टिळक तलाव आणि मार्केट कमिटीजवळचा आणखी एक तलाव यांचा गाळ काढून त्या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवलेली आहे. तसेच, वृक्षारोपण वगैरे कार्यक्रम हाती घेतले आहेत. तरुणांनी ती कामे लोकवर्गणीतून केली आहेत.

धरणगावचा विस्तार गावाबाहेर बराच झाला आहे. रेल्वेगेटवर होणारी वाहनांची गर्दी उड्डाणपुलामुळे नाहीशी झाली आहे. कोटबाजाराचे महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिल्याचे दिसत नाही. नवीन नगरपालिकेचा ‘कॉम्प्लेक्स’ बाजारपट्ट्यात बांधण्यात आला आहे. कितीतरी नवीन गोष्टींची भर पडत आहे !

धरणगावाजवळच असलेल्या लोणे-भोणे येथे यात्रा भरते. लोणे-भोणे हे तसे छोटे गाव, पण धरणगावसारख्या मोठ्या गावातून बायकामुले मोठ्या हौसेने यात्रेला बैलगाड्या जुंपून जात असत. धरणगावापासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर पद्मालय, उनपदेव, मनुदेवी, जळगावजवळ कुसुंब्याला रतनलाल बाफना यांनी चालवलेली गोशाळा अशी ठिकाणे आहेत. भवरलाल जैन यांचे ‘जैन इरिगेशन’चे शेतीचे प्रयोग पाहण्यासारखे आहेत.

साहेबराव (एस. ए.) महाजन 9763779709
——————————————————————————————————————————

About Post Author

4 COMMENTS

  1. धरणगावची बारीक सारीक माहिती लेखकाने अतिशय चांगल्याप्रकारे विशद केली आहे. त्यांचे अभिनंदन 🎊 आणि शुभेच्छा.

  2. मी स्वतः धरणगाव येथील काळ अनुभवलेला असल्यामुळे मला लेख वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्यात अतीशय सुंदर नानांनी केलेले लिखाण.

  3. अशा प्रकारचा स्थानिक इतिहास लिहिणे खूप गरजेचे आहे. नवीन पिढीला ही माहिती असायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here