स्वच्छ आल्हाददायक हवेचे देगाव (Degaon village for clean and pleasant weather)

2
369

दापोली तालुक्यातील देगाव नावाचे गाव प्राचीन आहे असे म्हणतात. ते मौजे दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. गावाच्या पश्चिमेकडे दक्षिण-उत्तर पसरलेला सडा (उंच डोंगर) आहे. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत.

तो सारा रानजंगल वाटावा असा भाग म्हणजे निसर्गाचा अस्सल आविष्कार वाटतो. झाडे तरी किती विविध ! हिरडा, बेहडा, बिब्बा, आवळा वगैरे औषधी वनस्पती; रिठा, रायवळ आंबा, अळू (फळझाड), किंजळ, कुंभ, कुडा, साग, खैर अशी वृक्षसंपदा. समृद्ध असा तो भाग आहे. त्यात पदभ्रमण करताना वृक्षराजी मध्येच सामोरी येतात निगडी-करवंदाची झुडपे. हिरवाईचा साज ल्यालेला अवघा परिसर ! तेथे पाताळी नदी बारमाही वाहते. ती जंगलामधील करवंदांच्या जाळ्यात उगम पावते आणि दक्षिणेकडे उन्हवऱ्याच्या खाडीत विलीन होते. सड्यावरून पाताळी नदीकडे येणारे पाण्याचे ओहोळ पावसाळ्यात दुथडी भरून खळाळत वाहत असतात. पऱ्ह्या, जांभा अशा दगडांतील खोल नैसर्गिक विवरे. निसर्गसौंदर्याची नुसती लयलूट आहे !

पाचकुडीच्या जंगलात बिबट्या, कोल्हे, तरस, चितळ, रानडुक्कर, भेकर, ससे अशा वन्य प्राण्यांचा व विविध पक्षांचा अधिवास आहे. कोळसा करण्यासाठी केलेली वृक्षतोड व रत्नागिरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या जांभा दगडाचे चिरे काढण्यासाठी खोदलेल्या खाणी यांतूनही हे वैभव टिकून राहिले आहे ! देगावच्या निसर्गावर नागरीकरणाचे ओरखडे अजून उठलेले नाहीत. त्यामुळे गाव निरव शांततेचे, स्वच्छ-आल्हाददायक हवेचे आहे.

         गाव पुरातन आहे. गावात पाताळी नदीकाठी गणपतीच्या देवळासमोर जुनी मोठी जोती आहेत. ती गावच्या प्राचीनतेची साक्ष देतात. देगाव हे खोती गाव होते. खोत होते गोंधळेकर. दोन जोत्यांवर अठराव्या शतकात बांधलेल्या दोन वास्तू होत्या. जोत्यांपैकी एकावर खोतांचे घर आणि दुसऱ्या जोत्यावर धान्य साठवण्याचे मोठे कोठार होते. खोत शेतकऱ्यांकडून शेतसारा (धान्य) जमा करून सरकार दरबारी भरण्याचे काम करत असत. खोती पद्धत पेशवाईपासून सुरू झाली, ब्रिटिश काळात कायम राहिली आणि स्वातंत्र्यानंतर रद्द झाली. खोती पिळवणूक करणारी असे समजले जाते, परंतु देगावच्या गोंधळेकर खोतांविषयी तेथील जनमानसात आदरभाव होता व अजून तसेच उल्लेख होतात. गावात कोठे कौटुंबिक-सामाजिक समस्या, मतभेद, वाद झाले की समेट घडवण्यासाठी गावकरी खोतांशी सल्ला-मसलत करत असत. गावकऱ्यांना खोतांचा न्यायनिवाड्यासाठी, छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आधार वाटत असे. देगावचे खोत हलाखीच्या परिस्थितीतून जाणाऱ्या गावकऱ्यांना मदत करत असत. देगावचे रहिवासी अशोक गोंधळेकर हे खोतांच्या घराण्याची ती परंपरा चालवत आहेत. त्यांनी वाहन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. ते अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांना मदत करण्यास तत्पर असतात. ते प्रामुख्याने आंबा, काजू, कोकम, नारळ याचे उत्पादन व विक्री करतात.

गावात चार देवळे आहेत. गणपती, झोलाई देवी, व्याघ्रेश्वर ही तीन पुरातन आणि 1990 च्या सुमारास बांधलेले विठ्ठल-रखुमाईचे देऊळ अशी ती चार मंदिरे. झोलाई देवीचे देऊळ देगावच्या वेशीवर वसलेले आहे. ते पाताळी नदीच्या काठावर आहे. व्याघ्रेश्वराचे देऊळ गावाच्या दक्षिणेकडील उंच डोंगरावर, गावापासून दूर करवंदांच्या, तीनधारी निवडुंगाच्या-निगडीच्या जाळ्यांमध्ये आहे. निवडुंगाच्या तीनधारी व फड्या अशा जाती होत्या. ते ठिकाण डोंगरावर दाट जाळीमध्ये लपलेले, सहजी न दिसणारे असे निर्जन आहे. ते व्याघ्रेश्वराचे म्हणजे शंकराचे देऊळ गावकऱ्यांमध्ये वाघोबाचे देऊळ या नावाने प्रसिद्ध आहे.

गावात कोकणातील चालीरीतींप्रमाणे शिमगा (होळी) व गौरी-गणपती हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावापासून दूर राहणारी मंडळी त्या सणांच्या वेळी गावात येतात. होळीच्या सणाला सुरुवात फाल्गुन पंचमीपासून होते व सणाची समाप्ती पौर्णिमेच्या दिवशी गणपतीच्या देवळासमोर रात्री होम पेटवला जाऊन होते. पण त्याआधी, त्याभोवती फेर धरत पुरुष व मुले गाणी व नृत्ये सादर करतात. झोलाई देवीची पालखी वाजतगाजत गावकऱ्यांच्या घरी नेण्याची पद्धत आहे. वाघोबाची जत्रा मार्गशीर्ष पंचमीच्या दिवशी असते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा गौरी-गणपतीचा सण घरगुती स्वरूपात साजरा केला जातो. सणाची सांगता सर्व वाड्यांमधील गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुका गणपतीच्या देवळासमोर एकत्र येऊन, सामुदायिक आरती होऊन बाप्पांचे, गौरींचे पाताळीमध्ये विसर्जन होते. विठ्ठल-रखुमाईच्या देवळात चालणारी भजन-कीर्तने, झोलाई देवीची पालखी, वाघोबाची मार्गशीर्ष पंचमीच्या दिवशी सुरू होणारी जत्रा हे सारे प्रसंग म्हणजे गावकऱ्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक गरजा भागवून विरंगुळा देणारी, श्रद्धा जोपासणारी स्थाने आहेत.

गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी दापोलीला जावे लागते. मुलांमध्ये संगणक साक्षरता आहे. तरुण पिढी कामधंद्यासाठी गाव सोडून गेल्याने तीनशे उंबरठा व सुमारे साडेसातशे लोकसंख्या असलेल्या देगावमध्ये शेतीच्या, आगोटच्या (पावसाळी) कामाच्या वेळी घर शाकारणीच्या, पावसाळ्यात चारा (गवत) कापणीच्या कामाला कर्ते हात मिळत नाहीत, गुरेढोरे गावात फारशी कोणाकडे राहिलेली नाहीत. त्यामुळे चारा कापणीचे काम केले जात नाही. गवत बेसुमार वाढते. खेडेगावातील हे सार्वत्रिक प्रश्न झाले आहेत.

गावातील लिंगायत, मराठा, कुणबी मराठा, कुणबी, नवबौद्ध या जातीनुसार वाड्या वसवलेल्या आहेत. गावात बारेवाडी, बामणेवाडी, बुद्धवाडी, कातळवाडी, मराठवाडी, कोंड, सुतार मेट, गुरवांची घरे आदी वस्तीचे वेगवेगळे विभाग आहेत. खोत गोंधळेकर कुटुंबीयांचे घर या सर्व वाड्यांपासून निराळे, कोकणातील तत्कालीन घरांची वैशिष्ट्ये राखून असलेले  आहे. तेथे हडपे (धान्य, सामान ठेवण्यासाठी लाकडाचे अजस्त्र पेटारे), घरट (भात भरडण्यासाठी असलेले मोठे जाते), मापटे-पायली-शेर-मण वगैरे धान्य मोजण्याची जुनी भांडी असा जुन्या काळचा आगळ्या वस्तूंचा खजिना आहे.

देगावमधील गवतारू (गवताचे छप्पर असलेली) घरे आता कौलारू आहेत. गावात दापोली कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली बागायती पिके घेतली जातात. कलिंगडसारख्या फळांची, आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे आर्थिक स्तर उंचावल्यामुळे हलाखीच्या परिस्थितीशी झुंजावे लागत नाही. सरकारी दवाखाना व डॉक्टर शेजारच्या फणसू गावात असल्याने गावकऱ्यांना दूर तालुक्याच्या गावी दापोलीला जावे लागत नाही. आजारपणात वैद्यक मदत लवकर मिळते. गावकऱ्यांमध्ये असलेल्या आरोग्यविषयक अंधश्रद्धा कमी झाल्या आहेत. विंचू वा जनावर (साप) चावल्यास गावकरी आधी डॉक्टरांकडे जातात.

देगाव गावालगत असलेल्या उन्हवरे गावातील गरम पाण्याचे झरे, तसेच देगाव गावाच्या लगत असलेल्या फणसू गावातून रस्ता असलेल्या पन्हाळे काजी गावातील पुरातन लेणी ही दोन ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. नव्या बदलांना, नव्या समस्यांना सामोरे जात कोकणातील जुन्या संस्कृतीच्या खुणा व चालीरीती जपत, सण-उत्सव साजरे करणाऱ्या देगावात रस्त्यावर मैलांच्या निदर्शक दोन ब्रिटिशकालीन दगडी शिळा आहेत. त्या सहसा कोठेही आढळत नाहीत. त्या अंतर दाखवणाऱ्या शिळा आहेत. त्यामुळे तो रस्ताही दीडदोनशे वर्षे जुना आहे हे लक्षात येते. अशा शिळांवरून ‘मैलाचे दगड’ हा शब्दप्रयोग मराठीत आला ! देगावच्या एकमेव गाडी रस्त्यावर वाकवलीपासून नऊ मैल अंतर दशर्वणारे, लाल मातीच्या रस्त्यावर विराजमान झालेले ते मैलाचे दगड; आधुनिक डांबरी रस्त्याकडेला अनेक उन्हाळे-पावसाळे पाहत अढळ आहेत- पुन्हा देगावचे जुनेपण दाखवत !

(अशोक गोंधळेकर 8390706573 यांनी दिलेल्या माहितीआधारे)

रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. दापोलीला दोन तीन वेळा जाण्याचा योग आला होता. पण या वेब साईट मुळे उशिरा का होईना देगाव सारख्या अनेक निसर्गरम्य स्थळांची माहिती आता अनेकांना
    उपलब्ध होत आहे . या लेखामुळे अनेकाना महाराष्ट्रातील अश्या निसर्गरम्य परिसराची ओळख होण्यास मदत होईल. खूप छान लेख आहे

  2. मी मुकुंद गोंधळेकर मीही देगावचाच आहे. जन्मापासून इयत्ता सहावी पर्यंत मी देगावातच राहिलो.
    देगावात अनेक प्रकारची झाडे आहेत. वरील लेखात उल्लेख केलेला नाही अशी आणखी काही देगावातली झाडे म्हणजे फणस, कोकम, ऐन, काडकुडा (याचे स्थानिक नाव खुर), बकुळ, कदंब (याचे स्थानिक नाव नीव), जांभूळ, वड, पिंपळ, सुरमाड ( फिश टेल पाम) वगैरे.

    देगावच्या पश्चिम बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगरावरून पूर्वेकडे वाहणारे अनेक पावसाळी ओहोळ पाताळी नदिला मिळतात. ओहोळ, नाला यांना कोकणात पर्‍ह्या म्हणतात. देगावात अनेक पर्‍ह्ये आहेत.

    दापोली , खेड पासून वाकवली मार्गे देगावला जात असता देगावच्या अलिकडचे गाव फणसू. देगाव व फणसूच्या सीमेवर जो पर्‍ह्या आहे त्याचे नांव सीमेचा पर्‍ह्या. त्यानंतर आहे चर्‍हटांब्याचा पर्‍ह्या. गावदेवीच्या देवळामागून वाहाणारा देऊळ पर्‍ह्या. आम्हा गोंधळेकरांच्या घरासभोवतालच्या परड्याच्या उत्तर बाजुने वाहाणारा पाटाचा पर्‍ह्या तर दक्षिण व पूर्व बाजुने हावाणारा खैराचा पर्‍ह्या.

    देगावचा कोंड म्हणून जी वाडी आहे गावाच्या दक्षिण भागात, त्या वाडीतून वाहाणारा घोगल पर्‍ह्या. या घोगल पर्‍ह्यावर एक नैसर्गिक पूल आहे. वरून जांभा कातळ आहे. त्या कातळाखलून पर्‍ह्या वाहतो. या नैसर्गिक पुलावरून बैलगाडी, ट्रक जाऊ शकतो. देगाव मार्गे उन्हवरे गावाकडे जाणारा रस्ता बांधताना सर्व पर्‍ह्यांवर मोर्‍या , पूल बांधले आहेत. घोगल पर्‍ह्यावरही नविन बांधलेला पूल आहे. नैसर्गिक पूल सध्या वापरात नाहीये.
    पावसाळ्यात हे सर्व पर्‍ह्ये वाहू लागतात. मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी या पर्‍ह्यांना पूर येतो. पन्नास, साठ वर्षांपूर्वी पर्यंत बारमाही वाहतुकी योग्य रस्ते बांधलेले नव्हते, पर्‍ह्यांवर पूल नव्हते, त्या काळात मुसळधार पावसात पूर आलेला पर्‍ह्या ओलांडणे अवघड होत असे. पर्‍ह्यातून उतार नसल्यामुळे माणसे थांबून राहायची.
    देगावच्या भूक्षेत्रातील विविध भागांना नांवे आहेत. गावाच्या पश्चिमेकडे जो डोंगर आहे त्याच्या माथ्यारचा भाग सडा म्हणून ओळखला जातो. या सड्यावरच्या एका भागाचे नांव आहे सातविण सडा. सड्याच्या खाली पूर्व उतारावरील काही भाग पाखर मणून ओळखला जातो. याच पूर्व उतारावर एक टेप आहे त्याचे नांव दर्सा. या डोंगराचे उत्तरेकडील, फणसू गावाच्या सीमेवर जे टोक आहे त्याचे नांव कोलेटेंबी. फणसू-देगाव सीमा ओलांडून गावाकडे येत असताना बहुतांशी सपाटी आहे, तो भाग माळ म्हणून ओळखला जातो. या माळावरच काही भातशेते आहेत त्यांचे नांव मानीठ. माळावरील अन्य एका भागाचे नांव आहे दिवाण शेत. गावदेवीच्या देवळासमोर अनेक भातशेते आहेत ती बारकोंबडा म्हणून ओळखली जातात. गावदेवीच्या देवळाच्या पूर्व बाजूला टेप आहे त्याचे नांव देऊळ टेप. गाव व पाताळी नदी यांच्या मध्ये दोन स्वतंत्र टेपे आहेत, त्यापैकी उत्तर बाजुच्या टेपाचे नांव आहे रावण टेप व दक्षिण बाजुच्या टेपाचे नांव आहे भडवळ टेप. पाखरेच्या खाली एक टेप आहे त्याचे नांव ढबूसगड. कोंड सोडून उन्हवरे रस्त्यालगत आहे वडाचा माळ. कोंडावरून पांगारी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे गौळवाडी. इथे वस्ती नाहिये, केवळ त्या भागाचे नांव गौळवाडी आहे.
    देगाव गावात समावेश असलेली बामणेवाडी गावापासून दूर, कोंढ्ये गावाच्या सीमेलगत आहे.
    देगावचा मसणवटा (स्मशान) पाताळी नदी काठी आहे. परंतु, बामणेवाडीचा मसणवटा त्या वाडी जवळच आहे.
    पूर्वीच्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीची (सध्या नवबौध्द) वाडी गावापासून अलग आहे. महारांची वाडी म्हारवडा म्हाणून ओळखली जायची. आता ती आहे बौध्द वाडी. म्हारवड्याची विहीर बारकोंबड्यात होती व आहे. त्यांचा मसणवटा वेगळा होता व अद्यापही वेगळाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here