फलटणचे भणगे दत्त मंदिर (Datta temple of Bhanage family is phaltan’s treasure)

फलटणचे दत्त मंदिर 29 एप्रिल 1912 (शके 1834) रोजी स्थापन करण्यात आले आहे. दत्तमंदिराला एकशेदहा वर्षे होऊन गेली आहेत. दत्त मूर्ती एकमुखी आहे. ती गंडकी शिळेची, सहा हातांची आहे. शंकर मार्केटसमोर भणगे वाडा आहे. त्या वाड्यात प्रत्येकी पाच ते सात खणी नऊ खोल्या होत्या. शेजारी मोकळी जागा होती. सदरचा वाडा संपूर्ण लाकडी व टोपण माचीचा असून बांधकाम घाणीच्या चुन्यातून केलेले होते.

माझे पणजोबा सखाराम जगन्नाथ भणगे हे व्यवसायाने डॉक्टर होते. ते फलटण येथील निंबाळकर संस्थान यांचे खाजगी कारभारीही होते. त्यांना बापू म्हणत असत. संस्थानात राममंदिराचे बांधकाम सुरू होते. राममंदिराशेजारी दत्तमंदिरही बांधण्यात आले. राजेसाहेबांनी त्यातील दत्तमूर्ती आणण्यासाठी पणजोबांना पाठवले होते. त्यांनी काळ्या पाषाणाची, गंडकी शिळेची दत्ताची मूर्ती आणली, पण ती राजेसाहेबांना पसंत पडली नाही. तेव्हा त्यांनी दुसरी मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आणून दिली. त्या मूर्तीची स्थापना राममंदिराच्या उत्तर बाजूस करण्यात आली. परंतु माझ्या पणजोबांनी आणलेली काळ्या पाषाणाची मूर्ती राजेसाहेबांनी जब्रेश्वर मंदिराच्या कोनाड्यात ठेवली होती. माझे पणजोबा दत्तभक्त होते. त्यांनी आणलेली काळ्या पाषाणाची मूर्ती बेवारशी ठेवणे वा अन्य अपरिचित ठिकाणी ठेवणे त्यांना योग्य वाटेना, म्हणून त्यांनी राजेसाहेबांना स्वतःच्या वाड्याशेजारी स्वखर्चाने मूर्तीची स्थापना करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. राजेसाहेबांनी ती विनंती मान्य केली.

सखाराम जगन्नाथ भणगे यांनी वाड्याशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मंदिराचे बांधकाम करून त्या मूर्तीची स्थापना गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ते केली. तेच भणगे यांचे खाजगी दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. सखारामपंत, त्यांचा मुलगा दत्तात्रय व दत्तात्रयाचे बंधू धोंडोपंत आणि दत्तात्रयांचा मुलगा विनायक हे त्या मूर्तीची पूजाअर्चा अव्याहतपणे करत आले. धोंडोपंत यांचे निधन डिसेंबर 1979 मध्ये  झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यानंतर त्या मंदिराची जबाबदारी माझे वडील विनायक दत्तात्रय भणगे यांच्यावर आली. दु:खद योग असा, की माझ्या आईचे निधन जानेवारी 1996 मध्ये आणि पाठोपाठ दोन महिन्यांनी वडिलांचे (विनायक) निधन मार्च 1996 मध्ये झाले. त्यावेळी त्या मंदिराची पूजाअर्चा, सण व समारंभ यांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली.

मी माझी मुंज झाल्यापासून दत्तात्रेयांची सेवा करत आहे. माझे वेद अध्ययन फलटण येथील वेदशास्त्र संपन्न कै. तात्या वादे यांच्याकडे 1974 साली सुरू झाले. त्यावेळी मी दहावीत शिकत होतो. मी वैदिक कर्मांबरोबर वास्तुशांत, मुंज, पवमान पूजाअर्चा सर्व काही त्यांच्याकडून शिकून घेतले.

दत्तमंदिराची पूजाअर्चा अव्याहतपणे चालू आहे. माझी पत्नी सुषमा, माझी मुले मयुर आणि शैलेश हेही सेवा करत आहेत. मंदिरामध्ये ऋतुमानानुसार विविध कार्यक्रम साजरे होत असतात. त्यात प्रामुख्याने श्रावण महिन्यात अभिषेक, कार्तिक महिन्यात काकड आरती महिनाभर असते. कार्तिकस्नान समाप्तीच्या दिवशी, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला महाप्रसाद वाटप केला जातो. मार्गशीर्षामध्ये गुरुचरित्र पारायण, सात दिवस महाभिषेक, दत्तजन्माच्या दिवशी रुद्राभिषेक, पवमान अभिषेक, महिम्न अभिषेक आणि सायंकाळी जन्मकाळ; दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वाटप केला जातो. दत्तभक्तांची रीघ असतेच !

मयुर चंद्रशेखर भणगे 9028777807 mayurtours85@gmail.com

चंद्रशेखर विनायक भणगे 9637773445

————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here