कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे…
दशावतारी नाटकाची पूर्वपीठिका फार प्राचीन असून ती इसवी सन सातव्या शतकापर्यंत मागे नेता येते. सातव्या शतकात विष्णुपूरच्या मल्लराजाने दशावतारी खेळांची प्रथा सुरू केली असे सांगतात. कर्नाटकातील यक्षगान हे त्याचे मूळ रूप असून, त्यातूनच महाराष्ट्रातील दशावतार नाट्य उदय पावले आहे. शामजी काळे यांनी 1728 साली दशावतार कर्नाटकातून कोकणात आणला. मात्र, दशावताराचा पहिला उल्लेख दिसतो तो त्या आधीच्या दासबोधात, सतराव्या शतकात. दशावताराचे वाङ्मयीन उल्लेख दासबोधापासून मिळू लागतात. समर्थ रामदासांनी त्या विषयी म्हटले आहे –
‘खेळता नेटके दशावतारी । तेथे येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुसरी । परी अवघे धटिंगण ।।
असे अनुमान करण्यात येते, की रामदासांच्या काळी महाराष्ट्रात दशावतार नाट्य प्रचारात असावे आणि मध्यंतरी ते लुप्त झाल्यामुळे काळे यांनी पुन्हा ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले असावे. परंतु रामदासांचा संचार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत असल्यामुळे त्यांनी केलेला उल्लेख कर्नाटकातील नाट्याविषयीही असणे शक्य आहे.
शामजी नाईक-काळे यांनी हे दशावतारी खेळ इसवी सन 1728 मध्ये कर्नाटकातून आडिवऱ्यास आणले व तेथून पुढे त्यांचा प्रसार उत्तर कोकणात झाला, असा उल्लेख ‘आडिवऱ्याची महाकाली’ या पुस्तकात चिं.कृ. दीक्षित यांनी केला आहे; तर दशावताराची प्रथा वेंगुर्ले-गोवे भागात फार जुनी असून ती नाटके काळे यांनी दक्षिण कोकणातून आडिवऱ्यास नेली असे प्रतिपादन पु.गो. काणेकर हे त्यांच्या ‘नाट्यस्मृती’मध्ये करतात. या दोन्ही मतांतील सत्यांश गृहीत धरून आडिवरे येथे ही नाटके सरळ दक्षिण कोकणातून न जाता बेळगावमार्गे (कर्नाटक) गेली असावी, अशी समन्वयात्मक भूमिका वि.कृ. जोशी यांनी मांडली आहे.
स्थूलमानाने, दशावतारी नाटकाची परंपरा महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासून धरली जाते. दशावतारी नाटके ही ठरावीक प्रसंग, ठरावीक भाषा, ठरावीक अभिनय, ठरावीक आशय यांतच गुंतून पडलेली लोकनाट्ये होत. मुंबईत दशावताराबद्दलचे स्वाभाविक कुतूहल निदान अभिजन वर्गात निर्माण झाले ते बाबी नालंग यांच्यामुळे. बाबी नालंग यांना प्रतिष्ठेचा भारत सरकारचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला, तो आय. एन्. टी. चे सरचिटणीस दामू झवेरी, लोककला विभागाचे संचालक अशोकजी परांजपे आणि नाट्यविभागाचे संचालक कमलाकर सोनटक्के ह्यांच्यामुळे. नंतर पुढे दशावतारातील आणखी एक तरुण कलावंत साक्षात बालगंधर्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे स्त्री भूमिका करणारे ओमप्रकाश चव्हाण यांना बिर्ला फाउंडेशनचा ‘कला शिरोमणी पुरस्कार’ प्राप्त झाला होता.
कमलाकर सोनटक्के आणि तुलसी बेहरे यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) विद्यार्थ्यांसाठी ‘दशावतारी राजा’ हे तुलसी बेहरे यांचे नाटक कोकणात रंगभूमीवर आणले. त्याची संकल्पना नाटककार अशोकजी परांजपे यांची होती. नारायण बोडस यांनी त्या नाटकात राजा रुक्मांगदाची भूमिका केली होती. अरविंद पिळगावकर यांनी सूत्रधार नारदाची भूमिका केली होती, तर राजा मयेकर यांनी भटजी, संकासूर आणि यमधर्म या भूमिका वठवल्या होत्या. त्या नाटकाने दशावतारासंबंधी अभ्यासाला चालना दिली. त्या नाटकाचे अनेक प्रयोग मुंबईत झाले. कोकणच्या लोककला चळवळीला तुलसी बेहरे, राजा मयेकर, मच्छिंद्र कांबळी आदींचे मोठे योगदान होते.
बाळकृष्ण लिंगायत हे मुंबईतील गोरेगाव परिसरात सातत्याने दशावतारी खेळ करत होते. नाईक मोचेमाडकर, पारसेकर, कलिंगण, वालावलकर, गोरे, चेंदवणकर, खानोलकर, आजगावकर, आरोलकर, मामा मोचेमाडकर ही पारंपरिक दशावताराची नऊ मंडळे. ही मंडळे मुंबईत दशावतारी खेळ करत. बाबी कलिंगण, गंगाराम मेस्त्री, राजाभाऊ आजगावकर, बाळकृष्ण गोरे, बाबा सावंत, नितीन आसयेकर, चारुहास मांजरेकर आदी कलाकारांनी दशावतार वाढीसाठी खूप कष्ट घेतले आहेत.
दशावताराच्या सद्यस्थितीबद्दल मत व्यक्त करताना अखिल दशावतार कला अकादमीचे अध्यक्ष बाळकृष्ण नारायण गोरे म्हणाले, “कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत, पैकी शहाऐंशी मंडळे नोंदणीकृत आहेत.”
इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ वगैरे सारख्या नव्या नटांमुळे त्या कलाप्रकाराबद्दल औत्सुक्य वाढत आहे. विष्णूदास भावे यांनी या दशावतारी नाट्यतंत्राचे मूलगामी संस्करण करून त्यांची पौराणिक नाटके सादर केली. त्या दृष्टीने पाहता मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाऊन भिडते.
– सतीश पाटणकर 8551810999 sypatankar@gmail.com
———————————————————————————————————————————————–