मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा (Dagadabai, an ordinary village woman fought for national cause!)

0
509

महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्‍यातील कोलते टाकळी हे छोटेसे खेडे म्हणजे दगडाबार्इ यांचे मूळ गाव ! त्यांचे सासर जालना शहरापासून पंधरा-सोळा मैलांवर असलेल्या बदनापूरजवळील धोपटेश्वर येथे होते. दगडाबाई या मुळातच धाडसी स्वभावाच्या होत्या. त्यात त्यांना स्वातंत्र्य लढ्याची जाणीव झाली. त्यांनी तशी जागृती महिलांमध्ये केली. त्यांनी निजामाची सत्ता ही देशविरोधी आहे, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लढणे म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामच आहे ही गोष्ट महिलांना समजावून सांगितली. निजामाच्या शिपायांना रझाकार म्हटले जाई. रझाकार हे शस्त्रसज्ज असत, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लढताना शस्त्रांचा वापर केला पाहिजे हे दगडाबार्इ यांनी ओळखले. त्यांनी देऊळगावराजा येथील एका कॅम्पवर जाऊन आधुनिक शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

दगडाबार्इंचे धाडस इतके होते, की अनेक जण दिवसाढवळ्यादेखील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्यास घाबरत. पण दगडाबाई रात्री-अपरात्री गावोगाव प्रवास करत व स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत. दगडाबार्इंसोबत संपत भिल्ल, बाबुराव जाधव, लाला लक्ष्मीनारायण हे लोक होते. त्या सर्वांनी निजामाच्या पोलिस चौक्या जाळणे, अत्याचार करणाऱ्या रझाकारांना प्रत्युत्तर देणे अशी कामे केली. एकदा तर दगडाबार्इंनी कोलते टाकळीच्या त्यांच्या गावात असलेल्या रझाकारांच्या छावणीवर हल्ला केला व तेथील शिपायांना ठार केले. त्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. लोक दगडाबाई यांना ‘मर्दानी दगडाबाई’ म्हणू लागले. एकदा, निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रांसह रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्या पॅण्ट, शर्ट घालून, मुलाला पाठीशी घेऊन बंदूकीसह घोड्यावर प्रवास करत असल्याने कुटुंबीय व समाज यांचाही त्यांना आक्षेप होता. पूर्णत: पुरुषी वर्चस्व असलेल्या मराठवाड्यात त्या लष्करी पोशाख घालून वावरत. त्या खांद्यावर मोठी रायफल, खिशात पिस्तुल, प्रसंगी आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली तर बाँब अशा शस्त्रांनिशी सज्ज असत. त्यांना पती देवराव शेळके यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जिवाची शाश्वती नाही म्हणून पती देवराव यांचा दुसरा विवाह मैनाबाई नावाच्या स्त्रीशी स्वतःहून लावून दिला होता.

दगडाबार्इंनी त्यांच्या गावात असलेल्या रझाकारांच्या छावणीवर हल्ला केला व तेथील शिपायांना ठार केले.

हसनाबाद गावात एकदा दंगल उसळली होती. गावकरी व रझाकार यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. तेव्हा दगडाबाई यांनी बरेच मोठे अंतर पोटावर रांगत जाऊन रझाकारांची छावणी गाठली व तेथे गोळीबार केला, त्यात काही रझाकार ठार झाले. रझाकारांनी संपूर्ण हसनाबाद गावाची नाकेबंदी केली, तेव्हा कोणीच पुढे जाण्यास तयार नव्हते. लोकांना त्यांचा मृत्यू समोर दिसत होता. दगडाबाई त्यावेळी मागे हटल्या नाहीत, त्यांनी एकटीने पुन्हा एकदा रझाकारांची छावणी गाठली व त्यावर हातबाँब टाकले. अवघ्या अठरा-वीस वर्षांच्या तरुणीचे ते शौर्य सर्वांनाच चकित करणारे ठरले.

पुढे, भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्‍त झाला. मराठवाडाही जुलमी निजामी सत्तेपासून मुक्‍त झाला. दगडाबार्इंनी स्वतःला नंतरच्या काळातही समाजकार्यात झोकून दिले. दगडाबार्इंच्या त्या अतुलनीय शौर्याची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यांचा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मोठा सत्कार केला. त्या चांदवड येथील ‘शेतकरी महिला मेळाव्या’च्या अध्यक्ष होत्या. दगडाबार्इंचा 5 मे 2013 रोजी वयाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्यावर धोपटेश्वर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

संतोष खेडलेकर  9822097809 skhedlekar15@yahoo.co.in

———————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here