द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो...