भास्करराव जाधव : कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार (Bhaskarrao Jadhav : Reformer from Kolhapur)

1
327

भास्करराव विठोजीराव जाधव यांचे वर्णन शिक्षणतज्ज्ञ जे.पी. नाईक यांनी कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार असे केले आहे. पहिले अर्थातच शाहू महाराज. भास्करराव यांच्या नावे कोल्हापुरात एक चौक, एक ग्रंथालय आहे. शाहू छत्रपतींना सारी कारभारसूत्रे 1894 मध्ये मिळाली. त्यांच्या नजरेने भास्करावांना हेरले. महाराज बहुजनांच्या विकासासाठी ज्या प्रकारे झटत होते, त्यांना भास्करराव साथ देत होते. त्यांची दरबारात नेमणूक असिस्टंट सरसुभे म्हणून झाली होती. ते कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे सर्वाधिकारी म्हणून काम पाहत होते. फेरीस मार्केट, अर्बन बँक यांचा जन्म त्यांच्या काळात झाला.

          त्यांनी मराठा दीनबंधूहे पत्र स्वखर्चाने चालवले. ते शेवटी बंद पडले. भास्करराव सत्यशोधक समाजाचे कामही पाहत होते. ते मुंबई इलाख्याचे पहिले मराठी शिक्षणमंत्रीझाले. ते शेतकी आणि अबकारी खात्याचे मंत्री म्हणून 1925 ते 1930 दरम्यान निवडून आले. ते दिल्ली येथे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीतही 1930 साली निवडले गेले. ते दोन्ही गोलमेज परिषदांनाही लंडनला जाऊन आले होते. त्यांनी अधिवेशन भरवण्याचा घाट घातला होता. त्यावेळी त्यांना मृत्यूची चाहूल लागली. त्यांचे अखेरचे भाषण सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनातील राम राम पाहुणंहेच होय.

          भास्करराव हाडाचे वाचक होते. त्यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत या भाषांतील वैचारिक व ऐतिहासिक वाङ्मय वाचण्यास आवडत असे. त्यांची ग्रंथांशी मैत्री लवकर जुळत असे. आयुष्याच्या अखेरीला, त्यांच्या साथीला तुकोबांचे अभंग होते. भास्करराव यांचे स्फुट लेखन – र.धों.चे समाजस्वास्थ्य’, ‘ज्ञान मंदिर‘, ‘महाराष्ट्र शारदा‘, ‘किर्लोस्करइत्यादी मासिके-पत्रिकांमधून प्रसिद्ध होत असे. गणपती उत्सव‘, ‘घरचा पुरोहित‘, ‘मराठे आणि त्यांची भाषा‘, ‘रामायणावर नवा प्रकाश‘, ‘ज्ञानभास्कर‘, ‘वेदोत्पत्तीवर नवा प्रकाशहे त्यांच्या लेखांपैकी काही. त्यांतील काही लेख उपलब्ध नाहीत.

          भास्करराव यांनी घरीही साधी विचारसरणी, वाचन, विचारमंथन हाच परिपाठ ठेवला. त्यांना मरणानंतर दिवस नाही, श्राद्ध नाही, केवळ घरच्यांनी एकत्र जमून प्रार्थना करणे एवढेच मान्य होते. त्यांनी कसले स्तोम, कर्मकांड करू नये हे घरच्यांना सांगून ठेवले होते. भास्करराव यांचा स्मृतिदिन 26 जूनला असतो. त्यानिमित्त सर्व कुटुंबीय विविध सामाजिक उपक्रम राबवतात. त्यांचे वारसदार शाळेला वा कुष्ठरोग्यांच्या केंद्राला मदत करतात.

भास्करराव आणि पत्नी भागीरथी

         त्यांच्या पत्नी भागीरथी जाधव या होत. त्यांना चार मुले आणि चार मुली होत्या. मुली सत्यवती, डॉ. ताराबाई, इंदुमती आणि मैत्रेयी याही शिक्षित आणि संस्कारित होत्या. भास्कररावांचे पुत्र हिंदुराव, विठोजीराव, आप्पासाहेब आणि कर्नल आनंदराव यांनी त्यांच्या कार्यातून भास्करराव यांचा वारसा टिकवला. अप्पासाहेब जाधव यांनी सहकारक्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचे पुत्र रणजित जाधव यांनीही अर्बन बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गीता या संचालक आहेत. आप्पासाहेब जाधव सिनेमा क्षेत्रात साउंड इंजिनीयर म्हणून काम करत, ते माझे आजोबा. मी भास्कररावांची पणती आहे.

रमा जाधव 80079 97223 ramajadhav@gmail.com

———————————————————————————————-———————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here