‘बालरक्षक चळवळ’ जन्माला महाराष्ट्र राज्यामध्ये 9 जानेवारी 2017 रोजी आली. शिक्षणसचिव नंदकुमार यांची ती संकल्पना. ‘जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा उपक्रम शासनातर्फे राबवला जात आहे. त्यावेळी लक्षात आले, की शाळाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थी यांचा आकडा राज्यात मोठा आहे. ती मुले शाळांत येत नाहीत तोपर्यंत शैक्षणिक प्रगती या शब्दास अर्थ नाही. शाळा प्रगत करण्याच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत, ते शाळा शाळांत टिकले पाहिजेत व शिकले पाहिजेत. लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तपणे ‘बालरक्षक’ बनून कार्य केले तर मुलांना शाळा शाळांत आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकेल. ही कल्पना शाळा तालुका व जिल्हा स्तरावर प्रशिक्षित बालरक्षक तयार करून शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे व स्थलांतर थांबवणे यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले. शाळेत दाखल झालेली मुले टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शाळा तयार करणे महत्त्वाचे आहे ही गोष्ट मुद्दाम नमूद केली गेली व शिक्षकांच्या मनी ठसवली.
बालरक्षक कोण? तर शाळाबाह्य मुले, स्थलांतरित मुले व अनियमित मुले यांना शाळेत आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी जे स्वयंस्फूर्तपणे प्रयत्न करू इच्छितात ते सर्व बालरक्षक. बालरक्षकाची भूमिका राज्याच्या अधिकाऱ्यापासून तर नागरिकापर्यंत कोणीही बजावू शकतो एवढी लवचिकता या योजनेमध्ये ठेवली आहे. फक्त ‘बालरक्षका’ने संवेदनशील दृष्टीने काम केले पाहिजे. शाळाबाह्य मुले शोधून काढली पाहिजेत व त्यांनी शाळेत यावे म्हणून पालकांना समजावून सांगितले पाहिजे. मुलांना शाळेत दाखल करून घेऊन दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्यात शिक्षणासाठी झोकून देऊन काम करणारी व्यक्ती ही ‘बालरक्षक’ असेल.
राज्यामध्ये हजारो कुटुंबे चरितार्थासाठी स्थलांतर करत असतात. त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचेसुद्धा स्थलांतर होते. हजारो मुले बालकामगार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे तेवढीच मुले शहरांमध्ये, गावोगावी भीक मागत आहेत. शेकडो विद्यार्थी शाळाबाह्य बनून व्यसनांच्या आहारी गेली आहेत. अनेक विद्यार्थी अनियमित झालेले आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. तो प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्याचा असेल तर ‘बालरक्षक’ चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवणे गरजेचे आहे अशी या उपक्रमामागे धारणा आहे.
चळवळीमुळे राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न संपूर्ण सुटला नसला तरी चळवळ त्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे. मुंबई ते गडचिरोली स्वयंस्फूर्तपणे काम करणारे बालरक्षक पुढे आले आहेत. त्याच प्रेरणेतून अनेक शाळा स्थलांतरमुक्त झाल्या आहेत ! शिक्षणाविषयी जागृती वाढत आहे. पालकांचे प्रबोधन होत आहे. शिक्षकसुद्धा त्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहू लागले आहेत. बालरक्षक चळवळ येण्यापूर्वीही अनेक शिक्षक स्वयंस्फूर्तपणे ते काम करत होते. परंतु त्यांची दखल या चळवळीच्या माध्यमातून घेतली जात आहे. त्यांच्या यशोगाथा वेगवेगळ्या पुस्तकांतून, वर्तमानपत्रांतून, वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होत आहेत. त्याचीच प्रेरणा घेत औरंगाबाद जिल्हा प्रशासनास त्या जिल्ह्यात एका वर्षात तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबवण्यात यश मिळाले !
(संकलित, रोहिणी लोखंडे यांच्याशी गप्पांमधून)
————————————————————————————————–