आठवणींचे पक्षी- भुकेची आग (Athvaninche Pakshi)

5
505
-athavniche-pakshi

‘आठवणींचे पक्षी’ हे प्र.ई. सोनकांबळे यांचे आत्मकथन आहे. लेखक दलित समाजात जन्माला आल्यामुळे जे दुःख, दारिद्र्य व अपमान त्याच्या वाट्याला आला त्याचे चित्रण त्या आत्मकथनात आले आहे. लेखकाच्या बालपणापासून त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकात येतो. लेखकाचे वडील लहानपणी गेले. लेखकाला दोन बहिणी, त्यांची लग्ने झाली होती. त्यांपैकी जी मोठी बहीण आहे तिचे नाव अक्का. ती तिच्या घरी प्रल्हादला घेऊन येते. अक्का स्वतः गरीब आहे. तिचा नवरा आळशी आहे. त्यामुळे ती सतत काम करते. लेखकाला अक्काच्या नवऱ्याने सांगितलेली अनेक कामे – लिंबाचा पाला आणणे, बिंदवा गोळा करणे, शेतात कष्ट करणे अशी – करावी लागत. त्या कामांची माहिती पुस्तकात आली आहे. अक्काचे भावपूर्ण जीवन त्या आत्मकथनात आले आहे. अक्काच्या घरी कोणतेही काम करताना लेखकाला कोणताही अपमान वाटला नाही. अक्काने तिच्या चेरा या गावी सरकारी शाळा असल्यामुळे लेखकाला त्या शाळेत घातले. लेखक शेंगा काढणे, कापूस वेचणे अशी कामे लहान वयापासून करू लागला. वाचकांना त्याच्या व्यक्तिमत्त्वातील प्रामाणिकपणा जागोजागी दिसतो. तो काम करताना शेंगा व कापूस पळवणारे लोक पाहतो, पण तो तसे मालकाला न विचारता करत नाही. लेखक फक्त स्वतःबद्दल लिहीत नाही, तर त्याने कामाच्या बाबतीत स्त्री व पुरुष यांच्यात कसा भेदभाव केला जातो तेही दाखवले आहे. लेखक जातीजातीतही भेदभाव केला जातो हे नमूद करतो. तेव्हा महार, मांग यांच्यामध्येही भेदभाव केला जात असे. लेखकाला तो खालच्या जातीतील आहे म्हणून मालकवर्ग कसा शोषण करतो ते लहानपणीच जाणवते. त्याला त्याने दिवसभर काम करूनही वाईटसाईट कणसे दिली जात असत.

लेखकाने या पुस्तकाचे लेखन धैर्याने केले आहे. लेखकाने महाराष्ट्रातील मांग, महार समाज एकेकाळी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात होता हे वास्तव सांगितले आहे. ते उदाहरण भुकेच्या आगीतून माणसाला काय करावे लागते त्याचे आहे. लेखकाच्या आईने त्याला लहानपणी पंढरपूरला नेले होते. त्यामुळे तो स्वतः मेलेल्या जनावरांचे मांस खात नसे. अक्का त्याला मांसाचे वाटप होत असताना पाठवायची. तेथे मांसाच्या तुकड्यांवरून भांडणे होत असत. लेखकाने रक्त उडणे, कुत्र्यांचे धावून येणे या घटनांचे भीषण चित्रण केले आहे. लेखक स्वतः मांस खात नव्हता तरीही तो अक्का कामावर गेल्यानंतर मांस शिजवून ठेवायचा, दूध तापवून ठेवायचा. ज्या दिवशी घरात मांस असे त्यावेळी लेखकाला वेगळी भाजी केली जात नसे. त्याला तशा वेळी चतकोर रोटी व कांदा खाऊन राहवे लागत असे किंवा तो चिंचोके खाऊन दिवस काढत असे.

त्याला तोही एक माणूस आहे ही जाणीव भीमराव बापू नावाच्या एका पाटील माणसाने करून दिली. ते त्याला परलू महाराज म्हणायचे. लेखकाच्या आयुष्यात घाण पाण्याची अंघोळ, कोणीतरी दिलेली बुरशी चढलेली शिळी भाकरी खाणे बालपणापासून आले. पुस्तकात त्या वेगवेगळ्या प्रकरणांचे वर्णन येते. चेरा येथील शाळा चौथीपर्यंतच होती.

अक्का जरी घरातील कामे करी तरी तिचा नवरा धोंडिबा तिला जीव जाईस्तोवर मारत असे. त्यामुळे लेखक अक्काच्या घरून जगळपूरला जात असे. लेखकाची दुसरी बहीण- बाई जगळपूर येथे राहत असे. तिचा नवरा किसन विचित्र स्वभावाचा होता. त्यामुळे लेखक त्याला घाबरत असे. तर तो तेथे किसन दाजी याच्या भीतीमुळे देवळात राही. बाई नवऱ्याची नजर चुकवून त्याला देवळात भेटे. स्त्रियांच्या वाट्याला आयुष्यभर कशा प्रकारच्या वेदना येत, त्याचे उल्लेख पुस्तकात वारंवार येतात. लेखिकेला जगळपूरच्या किसन दाजीने दुकान काढून देतो अशी आशा लावली. पण त्यांनी लेखकाला दुसऱ्याच्या मळ्यात कामाला जुंपले. अक्का स्वतःच्या घरी बाईला बाळंतपणासाठी घेऊन जाते. तिच्याकरता कंदील चालू ठेवावा लागत असे. एकदा कंदील पेट घेतो आणि अक्काची झोपडी जळते. अक्काची झोपडी जळल्यावर तो बाईकडे आला. तेव्हा त्याला किसन दाजीने चांगले राबवून घेतले. त्याला तो आगीतून फुफाट्यात आला आहे असेच वाटले.

हे ही लेख वाचा –
दया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!

बलुतं – एक दु:खानं गदगदलेलं झाड!

लेखकाने अक्काचे घर तिच्यावर त्याचे ओझे नको म्हणून सोडले. लेखक तेथे चौथीपर्यंत शिकला. तेथील मास्तरांनी ते त्याच्या शिक्षणाचा खर्च करतील असा निरोप दिला. विनायक गुरुजींनी त्याचे नाव हडोळतीला शाळेत दाखल करून घेतले. त्यांना सर्व विनुमास्तर म्हणायचे. खरे तर, त्याची हजेरी फार भरत नव्हती. तरीही विनुमास्तरांनी त्याच्यासाठी शब्द टाकला. गुरुजींनी फीकरता लागणारे पैसे देण्याचे कबूल केले. विनायक गुरुजींचे मराठी फार सुंदर होते. त्यांनीच लेखकाची ओळख इंग्रजी शिकवणाऱ्या शेळके गुरुजींशी करून दिली. लेखकाने त्याला गुरुजींबद्दल आदर असल्यामुळे एकदा फार सुंदर सीताफळ गुरुजींसाठी आणले. त्याबद्दल त्यांना शाबासकी मिळाली.

लेखकाने हडोळतीच्या शाळेचे वर्णन सविस्तर केले आहे. त्याची शिकत राहण्याची खटपट ठळकपणे दिसते. त्याला इंग्रजी बाराखडी येत नव्हती. पण त्याने पाठ करून धडा लक्षात ठेवला. अनेक मुले जरी नापास झाली तरी लेखक मात्र पास झाला. लेखक विनायक मास्तरांनी त्याच्यासाठी जग खुले केले असे नमूद करतो.

लेखक चेरा ते हडोळती असा प्रवास चालत करायचा. लेखकाला असे कळले, की बाभळीची साल विकून पैसे कमावता येतात. त्याचा केरबा नावाचा ढोर समाजातील मुलगा मित्र झाला. तो भाईबाभळीची साल विकत घ्यायचा. केरबाच्या घरी जनावराचे कातडे काढण्याचे काम केले जाई. त्यामुळे तेथे किळसवाणा वास येत असे, पण लेखक केरबाच्या घरी खाण्याच्या निमित्ताने जात असे. लेखकाला त्याच्या जडणघडणीमध्ये बाभळीच्या सालीने मदत केली. लेखकाला जनावरांची हाडेदेखील परिस्थितीच्या हतबलतेमुळे गोळा करावी लागली. लेखक म्हणतो, पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला कोणतेही काम करावे लागत असे. लेखक सुट्टी मिळाली, की हाडे गोळा करायचा. त्याकरता त्याला हागणदारीसारखा भाग वेचून काढावा लागे. हाडे विकून पैसे मिळायचे. लोक वेगवेगळ्या नोकऱ्या करतात, पण हाडे गोळा करणे हा सेल्फ एम्प्लॉयमेंट असा धंदा त्यावेळी होता असे लेखक म्हणतो. तशा प्रकारच्या कामासाठी भांडवल एकच लागते, ते म्हणजे स्वतःचे शरीर. त्याला बाभळीची साल गोळा करताना उच्च लोकांची भीती वाटे; तशीच, भीती एखाद्या मास्तरांनी हाडे गोळा करताना पाहिले तर काय होईल याची असायची.

लेखकाचा स्वभाव कोणाला काहीही न बोलण्याचा असल्यामुळे काम केले, की जो भाव मिळे तो तो घेत असे. हडोळतीच्या शाळेतील दिवस लेखकाला घडवणारे होते. शिक्षणासाठी त्रास किती सहन करावा लागला त्याचे वर्णन पुस्तकात येते. लेखकाकडे चांगला डबा नसे, असला तरी त्यात शिळी भाकरी असायची. काही मुले त्यांना त्याची परिस्थिती माहीत असल्यामुळे त्याला जेवण्यासाठी बोलावत असत, पण लेखक त्याची शिळी भाकरी घेऊन उगाच कशाला त्यांच्याकडे जा असा विचार करून, संडासाच्या मागे जाऊन खायचा. शाळेच्या आजूबाजूला शेतजमीन होती. त्याला डबा नसला, की तो त्या जमिनीतून शेंगा उकरून खात असे.

लेखकाने गावात महारवाडा, मांगवाडा यांच्या जागा कशा वेगवेगळ्या होत्या तेही सांगितले आहे. लेखकाची गाठ धर्मा या मुलाशी शाळेत पडली. धर्मा काळासावळा उंच मुलगा होता. त्याची आई वारकरी होती. तीही मेलेल्या जनावरांचे मांस खात नसे. धर्माला त्याच्या आईने शिकण्यासाठी एका म्हातारीकडे ठेवले होते. धर्मा लेखकाला जुने कपडे द्यायचा. म्हातारीला लेखकाबद्दल चांगले सांगायचा. धर्माला ती म्हातारी पिठाच्या गिरणीतून खाली पडलेल्या पिठाच्या भाकऱ्या करून द्यायची. पण लेखकाला कचकच असलेल्या भाकऱ्या द्यायची. लेखक त्यातूनही खचून न जाता पुढे जात राहिला. त्याने तसे अनेक अनुभव सांगितले आहेत. तसाच एक अनुभव म्हणजे बिंदवा गोळा करणे. गावातील माती गोळा करण्याचे काम म्हणजे बिंदवा गोळा करणे. कुंभाराला रस्त्यावरील माती गोळा करुन, ती चाळून दिली जाते. हाताने किंवा खराट्याने ती माती गोळा केली जाते. ती खूप घाण असते. अनेक मुले त्याला तो ते काम करताना चिडवायची. पण लेखकाला कुंभार त्याच मातीपासून सुंदर वस्तू बनवतो याचे कौतुक वाटत असे. त्याच्या गावी तुळशीनाथ कुंभार हा सुंदर मातीकाम करायचा. लेखक त्याला माती नीट मऊ करून द्यायचा. लेखक त्याची भांडी नीट ठेवणे, ग्राहकाला दाखवणे ही कामे करायचा. माणूस शेवटी मातीतच मिळून जातो. त्यामुळे लेखकाला ते काम कमी प्रतीचे नाही असे वाटे.

-sonkambleलेखकाला पोटासाठी किळसवाणी कामे करावी लागली. लेखकाला एकदा म्हातारीने अंगणातील मेलेले कुत्रे फेकून देण्यास सांगितले. लेखकाने ते काम भाकरीच्या आशेने केले. तो कुत्रा इतका सडला होता, की शेपटीला हात लावताच ती त्याच्या हातात आली. लेखकाने कुंजट घाण असलेला तो कुत्रा फेकून हात धुतले तरी हाताचा वास काही जात नव्हता. एवढे करून त्या बाईच्या घरी परत आल्यावर भाकरी घेताना, बाईची सून त्याला खूप बोलली. त्या पुस्तकात भुकेची कथा जागोजागी उमटली आहे. लेखक चांगले जेवण मिळण्याच्या आशेने अडचणीतही काही वेळा सापडला आहे. पुस्तकात तसे काही प्रसंग येतात. लेखक एकदा मुस्लिम मित्राबरोबर सुन्ता करण्याच्या विधीला गेला. त्यावेळी बैलगाडीतून पडून मातीतील काटे त्याच्या अंगात घुसले. लेखकाला तेथे गेल्यावर कळले, की एका महारोगी बाईच्या घरून भांडी आणली होती. तेथे माणसांना नारूसारखे रोग अतिप्रमाणात झाले होते. लेखक तसे अनुभव घेत जीवनात पुढे पुढे जात राहिला. अक्काने त्याला तो बारा-तेरा वर्षांचा झाल्यावर कोठेतरी कामाला लावले असे लोक म्हणत. अक्काचा नवरा सतत नशेमध्ये मग्न असायचा. त्यामुळे अक्काच्या वाटेला शेण काढणे, लाकडे देणे, गवताचे भारे आणणे अशी कामे यायची. त्याला आईबाप असते तर ही पाळी त्याच्यावर आली नसती असा विचार सतत त्याच्या मनात यायचा.

लेखक हडोळतीच्या शाळेनंतर लातूर येथील बोर्डिंगमध्ये दाखल झाला. त्याची व्यवस्था तेथे कशीबशी झाली. बोर्डिंगचे संचालक लक्ष्मीकांतराव यांनी एकदा लेखकाच्या थोबाडीत मारली. त्यामुळे तेथील सर्वांना वाईट वाटले. तेथील शिक्षकांनी लेखकाबद्दल संचालकांना चांगले सांगितले. लेखकावर बोर्डिंगमधील स्वयंपाकी बायकांचा जीव होता, कारण, त्यांना तो मदत करत असे. त्याला तेथेच कावीळ झाली. तो पार पिवळा पडला. त्याला त्याचबरोबर खरूजही झाली.

लेखक अंघोळ केल्यावर ओल्या कपड्यांत शाळेत अनेकदा येई. कारण त्याला कमी कपडे होते. त्यामुळे लेखकाला थंडी-वारा लागून खोकला, कावीळ असे आजार होत. त्याला वर्गात बाकावर नीट बसता येत नसे. कपडे त्याच्या अंगाला चिपकायचे. तो खाजेमुळे वैतागत असे. त्याच्याभोवती माश्या भुंगायच्या. त्या तो जेवत असताना भाजीत पडायच्या. त्याच्याकडे साबण वापरण्यासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते. त्याच्या मित्राने त्याच्या जखमेला मीठ व खोबऱ्याचे तेल लावले. त्यामुळे लेखकाचे सर्व अंग चपाटले. प्रचंड आग झाली, पण खरूज गेली. तो काविळीसाठी जो कोणी सांगेल तसा उपाय करी. शेवटी, कावीळ अक्काच्या घरी सुट्टीत आल्यावर हळुहळू बरी झाली.

लेखकाने भुकेपोटी भयंकर प्रसंग ओढवून घेतले. त्यापैकी एक म्हणजे शिकार. लेखकाला एकदा तो मळ्यात असताना एक कुत्रा दिसला. लेखक त्याला खूप घाबरत असे. पण लोक त्याला सांगत, की तो काही करणार नाही. एकदा, त्याने त्या कुत्र्याच्या तोंडात एक पदार्थ पाहिला. लेखकाच्या मनात तेव्हा तो हवा असा मोह निर्माण झाला. लेखकाने एक दगड फेकून त्याच्या दिशेने मारला. तेव्हा कुत्रा चवताळला व लेखकाच्या अंगावर धावून आला. त्याने लेखकास पांढरे सुळे दात बाहेर काढून रक्तबंबाळ केले. लेखकाने कुत्रा जर धावून आला, तर खाली बसावे किंवा निजावे म्हणजे तो चावत नाही असे ऐकले होते. म्हणून तो खाली बसला होता, पण लोकांचे म्हणणे खोटे ठरले. त्याने लेखकाच्या अंगावर रुतवलेले दातांचे वण कायमचे राहून गेले. तेव्हाही लोकांनी जखमेवर बिब्बा लाव, लिंबाची साल लाव असे उपाय सुचवले, पण त्या उपायांचा जखमांना त्रासच जास्त झाला. लेखकाने चौदा इंजेक्शनेही घेतली नाहीत. त्याला तो शिकार करण्यास गेला व स्वतःच शिकार झाला असे वाटले.

समाज दलितांवर किती अन्याय पाणी पिण्याच्या बाबतीत करत असे याचा अनुभव ‘चेलमा’ या लेखात आला आहे. लेखक एका बहिणीकडून दुसऱ्या बहिणीकडे जात असताना, त्याला वाटेत एक खड्डा लागला. त्यात पाणी होते. त्याला चेलमा असे म्हणतात. आसपास, वरच्या जातीतील लोक दिसत नव्हते. लेखकाने कोणी बघत नाही असे वाटून तेथे पाणी पिण्याचे ठरवले, पण लोकांची भीती मनात होती. लेखक काही चोरी करत नव्हता, साधे पाणी पीत होता. पण मनात प्रचंड घाबरलेला होता. इतक्यात एका माणसाने त्याला पाहिले. तो पाटलांच्या नात्यातील होता. त्या माणसाने ‘परत पाणी पिताना दिसलास तर चिरडून टाकू’ अशी धमकी दिली. त्या माणसाने लेखकाने जेथील पाणी ओंजळीने प्यायले होते, तेथील थोडे पाणी बाहेर फेकले. त्या पाण्याला बैलालासुद्धा तोंड लावू दिले नाही. लेखकाने अशा प्रकारचा विपरीत अनुभव घेतला. लेखकाला समाजात काही लोक महागड्या खोल्यांत राहतात व काही लोक झोपडीत, वावरात राहतात त्याचे दुःख वाटत असे. त्याला त्या दुःखातही भजने व गाणी यांनी आधार दिला. भारुड, कलगीतुरा, तुकारामांचे अभंग, कबीरांचे दोहे हे सर्व त्याला आधार देणारे वाटले. त्याला टाळ वाजवावासा वाटे, पण त्याला तो दलित समाजातील असल्याने तो हक्क नव्हता. तो वरील वर्गातील लोकांची भजने ऐकण्यास जाई तेव्हा त्याला दूर एखाद्या मुत्रीजवळ बसावे लागे.

लोकांकडे भाकरी मागण्याचा विदारक अनुभव पुस्तकात आला आहे. ‘जोहार मायबाप जोहार’ असे ओरडून भाकरी मागण्याची पद्धत होती. त्याला एकदा एक बाई म्हणाली, की जुने महार केवढ्या जोराने जोहार म्हणायचे, तू काय खाल्ले नाहीस काय? लेखकाच्या काळजाला उपाशीपोटी असे शब्द भिडायचे. त्याला त्याच्या परिस्थितीची दया येणारे काही मास्तर शाळेत भेटले. त्यांपैकी एक ठेंगळे मास्तर. ते हडोळतीच्या शाळेत होते. त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत त्याला डायरी लिहिण्याचा अभ्यास दिला. लेखक मास्तरांना म्हणाला, ‘मला तर रोज रानात जावे लागते.’ तेव्हा मास्तर म्हणाले, ‘जे करतोस ते लिही.’ त्यामुळे त्याने त्याचे सुट्टीतील काम, काही दुःखद प्रसंग हे सर्व डायरीत लिहिले. मास्तरांनी जेव्हा ते वाचले तेव्हा त्यांना त्याची परिस्थिती कळली. ते त्याच्यावर खूप दया करू लागले. घरी बोलावून शिळेपाके का होईना देऊ लागले. त्याने तशा संघर्षात इंग्रजीत चांगले मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये मॅट्रिक पास केले. लेखक औरंगाबादला आंबेडकरांनी दलितांसाठी मिलिंद महाविद्यालय काढले आहे हे कळल्यावर तेथे गेला. लोकांनी त्याला पैसे जमवून दिले. लेखक कॉलेजातील मुलांची गर्दी पाहून थक्क झाला. तेथे प्राचार्य वानखेडे गुरुजींची ओळख झाली. त्यांना ते त्याच्या खोलीत आले असताना, ढेकणे वळवळणारी सतरंजी दिसली. तेव्हा ते त्यांच्या नावाने गादीकरता अर्ज कर असे त्याला म्हणाले. त्याला वानखेडे गुरुजींचे मार्गदर्शन सतत लाभले. लेखकाने महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा चप्पल घेतली. ती कमी किंमतीची होती. पायाला टोचायची. लेखकाने मिलिंद म-pustakहाविद्यालयात एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले. लेखकाला ‘जगात कोठेही गेलात, तरी माणसाने जात मोठी करून ठेवली आहे. पण माळी, ब्राह्मण आणि दलित सगळीच एका धरतीची लेकरे आहेत. आज ना उद्या सगळी मातीतच गडप होतील’ ही जाणीव होते. तशा प्रकारचे चिंतन पुस्तकात बऱ्याच ठिकाणी येते. लेखक म्हणतो, महात्मा फुले, आंबेडकर यांनी मानव जातीवर प्रचंड उपकार केले आहेत. लेखक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षणक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतो. लेखकाची मुलाखत मुंबईतील महाविद्यालयात होते. वानखेडे गुरुजी तेथे योगायोगाने मुलाखत घेण्यास असतात. लेखकाची निवड मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात होते. लेखकाचा विवाह वानखेडे गुरुजींच्या भाचीशी होतो. लेखकाचे इंग्रजी हे खूप चांगले होते व त्या जोरावर त्याला आंबेडकर महाविद्यालयात नोकरी मिळाली. त्याला वानखेडे गुरुजींनी लळा लावला. तू कोणापेक्षाही कमी नाहीस. त्यांनी लेखकाला नेकीने काम करत जा हा विश्वास देऊन जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकवले. लेखकाचा तो संघर्ष आठवणींच्या रूपाने पुस्तकात उलगडला गेला आहे. ज्याला समाजात कोणतीही किंमत नव्हती अशा प्रल्हादला प्राध्यापक प्रल्हाद सोनकांबळे झाल्यानंतर समाजात मान मिळू लागला. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची निमंत्रणे येऊ लागली. लेखकाने असा एक जीवनसंघर्ष उभा केला आहे. ज्याला समाजात काडीची किंमत नाही, असा मुलगा समाजात जगू पाहतो, शिकण्याची इच्छा धरतो हा या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या सहजबोलीत तो हे प्रसंग सांगतो. अनुभवलेले प्रसंग बोलीभाषेत आलेले आहेत, त्यामुळे ते मनावर ठसतात. लेखक कोठेही मोठा बोध देत नाही किंवा कलाकुसर करून, प्रसंग रंगवून उभे करत नाही. तर सर्वच प्रसंग सहजपणाने येतात. त्यामुळे ते अधिक भिडतात. लेखकाच्या लेखणीतून जीवनाविषयीचे चिंतन आपोआप प्रकटते.

– नितेश शिंदे 9323343406
info@thinkmaharashtra.com

About Post Author

5 COMMENTS

  1. Prof. P I Sinkable is my…
    प्राध्यापक प्र.ई. सोनकांबळे हे मराठी साहित्यातील माझे गुरू. मी आज या क्षेत्रात जो ही आहे तो फक्त त्यांच्याच आशीर्वादाने.

  2. मला या पुस्तकाची प्रत…
    मला या पुस्तकाची प्रत झेरॉक्स कॉपी किंवा pdf पाहिजे. कोणी सहकार्य करेल का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here