कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)

  0
  161

  पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज अवकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील…

  मानवाने कालगणना नेमकी कधी आणि कशी सुरू केली हे सांगणे कठीण आहे. परंतु मनुष्य टोळी करून राहू लागला तेव्हापासून कालमापन काही प्रमाणात सुरू झाले असावे. कारण त्याला व्यवहारात दिवस-रात्र या महत्त्वाच्या दैनंदिन घटनांची दखल घ्यावी लागली! कालगणनेची नैसर्गिक साधने म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचे उदय-अस्त व चंद्राच्या कला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात दिवस-रात्र, अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या अशा प्राथमिक स्वरूपाचे कालमापन केले गेले असावे. माणूस समूहाने एकाच ठिकाणी वस्ती करून राहू लागला तसतशी सामाजिक गुंतागुंत वाढत गेली. त्यातून आकाशाचे निरीक्षण आणि त्या संबंधीचे अनेक संकेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेले. शेतीचा शोध लागल्यानंतर, ऋतूंचे चक्र आणि त्याचे मोजमाप यांना महत्त्व प्राप्त झाले. एक ऋतुचक्र म्हणजे एक वर्ष असे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. आकाशातील ग्रह, तारे यांच्या गती, स्थिती यांच्यामध्ये नियमितपणा आहे याचे ज्ञान काही पिढ्यांमध्ये होऊन त्याबाबतचे कुतूहल वाढू लागले. आकाशातील खगोलीय घटना पाहून घाबरणारा माणूस पुढे त्याच घटनांची मोजमापे करून, त्यांतील नियमिततेचा उपयोग व्यवहारात करू लागला.

  खगोलाचा अभ्यास सर्व पुरातन संस्कृतींमध्ये या प्रकारे केला गेला. त्यातूनच भारतामध्ये कालगणनेसाठी पंचांगाचा विकास झाला. भारतात खगोल आणि त्यासाठीचे गणित ऋग्वेदापासून क्रमाक्रमाने विकसित होत गेले. ज्योतिष हेदेखील वेदांग म्हणून स्वतंत्रपणे स्वीकारले गेले. मात्र, वेदांग ज्योतिष हे खगोल गणित या अर्थी विचारात घेतले आहे हे लक्षात धरले पाहिजे. त्यात फलज्योतिष अजिबात नाही! ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेदांग ज्योतिष आहे. त्यांच्या रचनेमध्ये साधर्म्य असले तरी ते स्वतंत्रपणे वेगळे लिहिले गेले आहे. त्या रचनेचा काळ साधारणपणे इसवी सनपूर्व 2000 ते 1500 असावा.

  त्या पुढील यज्ञ संस्कृतीच्या काळात काळाचे मापन प्रामुख्याने यज्ञाच्या वेळेचे नियोजन यासाठी केले जात असे. काही यज्ञांचा कालावधी फार मोठा, काही वर्षांचा असे, तेव्हा अशा मोठ्या कालासाठीचे नियोजन करता यावे यासाठी पुढील काळाचे गणित करून त्याचा वापर करण्याची आवश्यकता स्वाभाविक ठरली. त्यातूनच पंचांगाची रचना होत आली. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या पाच कालमापन घटकांचा एकत्र उल्लेख.

  त्यांतील तिथी आणि नक्षत्र यांचे उल्लेख वेद काळापासून आढळतात. तेव्हा ते कालमापन घटक सर्वांत जुने. वार हे इसवी सनाच्या आरंभी केव्हा तरी तयार झाले. योग आणि करण ही दोन मापने त्या मानाने उशिरा अंतर्भूत झाली. यज्ञाच्या नियोजनासाठी सुरू झालेले कालमापन हळूहळू सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारात आले. अर्थात सूर्यभ्रमण; चंद्राच्या कलांच्या निरीक्षणातून सुरू झालेले कालमापन सर्वसामान्य माणसाला त्याच्या गरजेचे वाटण्याकरता काही हजार वर्षे लागली. पंचांग लोक का वापरू लागले याचे कालानुसार वर्गीकरण केले तर पुढील प्रकारे क्रम लावता येईल.

  1. खगोलीय घटनांचे निरीक्षण करून त्यांचे भविष्यकाळासाठी आडाखे गणिताच्या आधारे प्रस्थापित करणे.
  2. यज्ञकर्मे योग्य वेळी पुरी व्हावीत यासाठी पुढील काळाचे गणित करून त्याचा वापर करणे.
  3. या बरोबर वातावरणातील बदल, पावसाचे प्रमाण, नदीला येणारे पूर, अवर्षण, टोळधाड अशी संकटे वर्तवता येतील का, याची चिकित्सा स्वतंत्रपणे होत होती. त्या संकटांच्या वेळी दिसून येणारे वातावरणीय बदल यांच्या नोंदी घेऊन त्यावरून भाकिते केली जाऊ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीला आलेल्या पुरांच्या अनेक वर्षांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे कालगणनेचा अशी भाकिते करण्यासाठी वापर केला जाऊ लागला असा तर्क करता येतो.
  4. यज्ञाचे कालमापन जसे आवश्यक होते; तसेच, इतर धार्मिक अनुष्ठाने योग्य वेळी व्हावीत यासाठी सर्वसामान्यांना पंचांग महत्त्वाचे वाटू लागले. आयुर्वेदाच्या विकासाबरोबर ऋतुचक्र आणि आरोग्य यांच्याशी धार्मिक अनुष्ठानांचा मेळ बसवून त्यानुसार धार्मिक आचरण केले जाऊ लागले.
  5. फलज्योतिष इसवी सनाच्या पहिल्या काही शतकांत विकसित झाले. ते सुरुवातीस फक्त राज्यकर्ते आणि काही महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यापुरते मर्यादित होते. ते सर्वसाधारण अभिजनांसाठी फारसे उपलब्ध नव्हते. ग्रहांच्या स्थिती, गती यांवरून व्यक्तिगत भविष्य सांगणे यासाठी पंचांगाचा वापर सुरू झाला.

  या सर्व काल घटकांचा विचार करता असे दिसून येते, की पंचांगाचा वापर आकाश निरीक्षण, कालमापन, यज्ञविधी, धार्मिक विधी, आयुर्वेदानुसार धर्माचरण, मोठ्या प्रमाणात येणारी संकटे यांचे भाकित आणि शेवटी फलज्योतिष किंवा वैयक्तिक ज्योतिष अशा प्रकारे विकसित होत गेला.

  नव्या युगात पंचांग का वापरतात? तर प्रामुख्याने धर्मविधी व शुभकार्ये योग्य काळी घडावीत यासाठी. तसेच, काळाचे ज्ञान करून घेणे, पावसाचे भाकित वर्तवणे आणि फलज्योतिष वर्तवण्यासाठी ग्रहांच्या स्थिती समजाव्या म्हणून पंचांगाचा वापर होतो! त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही उद्देश पंचांग वापरण्यासाठी नव्या काळात नाही. यामुळे पंचांगाचा वापर करणारा वर्ग सीमित आहे. वस्तुत: पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने अशा प्रकारे जोडले, की सर्वसामान्य लोक आपोआप त्यात गुंतत जातील आणि त्यांचे जीवन समृद्ध होईल. दैनंदिन मानवी आयुष्य निसर्गाला जोडणारे भारतीय पूर्वज या अर्थी मला महान वाटतात!

  भारतीय संस्कृतीचा हा ठेवा एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिला आहे. त्याचा सर्वसामान्य माणसाशी ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. आकाश निरीक्षणातून भारतीय संस्कृती फळली-फुलली. पंचांगात आकाश निरीक्षण करता येईल अशी आवश्यक माहिती, आकाशाचे नकाशे, ग्रहांचे-तारकांचे उदय व अस्त- त्याविषयीची निरीक्षणे, उल्कापात अशी माहिती आढळत नाही. वास्तविक त्यासाठी तर पंचांग तयार केले गेले. हौशी खगोल निरीक्षकांना जर ती माहिती पंचांगात पद्धतशीर आणि खात्रीशीर उपलब्ध झाली, तर भारतीय संस्कृतीचा तो ठेवा पुढील पिढ्यांत त्याच्या मूळ उद्दिष्टानुसार प्रस्थापित होईल.

  निसर्गात बदल होत असतात. परंतु त्यावर आधारित असलेले भारतीय धर्माचरण बदलते का? ते तसे बदलले तर निसर्गाला धरून राहण्याची भारतीय संस्कृती जपली गेली असे म्हणता येईल. भारतात अशा प्रकारचे बदल धर्मशास्त्रात पूर्वी वेळोवेळी केले गेले आहेत. कारण धर्मपालन हे जीवन जगण्याचे सुलभ असे शास्त्र होते. भारतीयांची धारणा तशीच घडत गेली आहे. नवे पंचांगकर्ते गणित आधुनिक पद्धतीने संगणकाच्या मदतीने करतात. पण धर्मशास्त्र बदलत नाही. ते जुन्याच नियमांप्रमाणे चालू आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन धर्मशास्त्रात कालानुरूप बदल केले आणि ते तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील.

  काही भारतीय सण हे ऋतुसंभव आहेत. ते सण त्या त्या ऋतूंशी निगडित, संबंद्ध असे राहिले आहेत का? की त्यांचा कालौघात विपर्यास झाला आहे? उदाहरणार्थ, मकर संक्रांत हा उत्तरायणारंभ साजरा करण्याचा सण. उत्तरायण ही उत्तर गोलार्धात असणाऱ्या भारतासाठी एक महत्त्वपूर्ण घटना आहे. सूर्य त्या दिवसापासून उत्तरेकडे वळतो, त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होत जाऊन उष्णता वाढते. दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र छोटी होऊ लागते. थंडीच्या परमोच्च दिवशी हा सण येतो आणि त्यानुसार त्या दिवशी तीळ, गूळ असे उष्ण पदार्थ आहारात वापरण्यास सांगितले आहेत. उत्तरायण सुरू होण्याची तारीख 21 अथवा 22 डिसेंबर. तेव्हा आपण 22 डिसेंबर रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केल्यास तो जास्त सयुक्तिक आणि उपयुक्त ठरेल. असेच अन्य सण आणि उत्सव यांच्याबाबत प्रतिपादन करता येईल.

  विवाह मुहूर्त आणि अन्य मुहूर्त यांबाबतही असे स्पष्टीकरण करता येईल. पावसाळ्यात शेतीची कामे चालत तेव्हा म्हणजे श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या महिन्यांत विवाहासारखी कार्ये पार पडणे अवघड होते. त्यामुळे त्या महिन्यांत विवाह मुहूर्त दिले जात नसत. ती परिस्थिती राहिलेली नाही. साधनांची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे बाराही महिन्यांत विवाह मुहूर्त देणे शक्य आहे. काही पंचांगकर्ते याबाबत सकारात्मक विचार करतही आहेत, मुंजीचे मुहूर्तदेखील त्या प्रमाणे देता येतील. मुंजीचे मुहूर्त रविवार, मंगळवार आणि शनिवारी देत नाहीत. वास्तविक, वार हे नैसर्गिक कालमापन नाही, ते मानवकल्पित आहेत. त्यामुळे सर्व वार अशा समारंभांसाठी सारखेच.

  काही सण आणि उत्सव यांचा विपर्यास झाला आहे, ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाचे विधिवत पूजन करण्याची प्रथा मध्य भारत, गुजरात, महाराष्ट्र या भागांत आहे. हा सण सौराष्ट्र भागातून सर्वत्र प्रसारित झाला. खरे तर, वडासारखा पुराण वृक्ष जोपासण्यामागील, त्या प्रती आदर प्रकट करण्यामागील संकल्पना सुरेख आहे. पण शहरात वडाचे झाड मिळणे दुरापास्त, त्यामुळे वडाच्या तोडून आणलेल्या फांद्या विकत घेऊन त्या पूजल्या जातात. ज्यासाठी या सणाचे प्रयोजन आहे त्याच्या नेमके उलट वर्तन होते! जी गोष्ट वट पौर्णिमेची, तीच दसरा या सणाबाबत देखील लागू आहे. निष्कारण त्यासाठी आपट्याच्या आणि त्या सदृश पानांची रचना असणाऱ्या अनेक झाडांचा बळी दिला जातो. ही वृक्षसंपदा नष्ट करणारी प्रथा लोकांना अधर्माच्या वाटेवर नेत आहे. अशा सणांची पुनर्मांडणी करणे गरजेचे आहे. त्यांतील भावार्थ ओळखून तसे स्वरूप या सणांना देणे गरजेचे आहे.

  धार्मिक सण आणि उत्सव यांच्याशी अर्थकारण बरेच निगडित आहे. अनेक जणांचे व्यवसाय आणि कुटुंबे त्या माध्यमातून चालतात. त्यामुळे हे बदल सहजपणे होणार नाहीत. परंतु प्रगल्भ समाज म्हणून आणि जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाला असे बदल अंगीकारावे लागतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती पुढील पिढीकडेही योग्य मार्गे सुपूर्त होईल!

  – मंदार दातार 9422615876 m.datar76@gmail.com

  ————————————————————————————————————————————

  About Post Author

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here